प्रकरण २. स्थानिक कार्यक्रम (2)

याप्रमाणें समाजाच्या कामाचा आराखडा ठरला पण घरची व्यवस्था अद्याप झाली नव्हती. माझे आईबाप आणि पत्नी सौ. रुक्मिणीबाई माझ्या जन्मभूमीच्या गावींच रहात असत. तीन बहिणी जनाक्का, तान्याक्का व चंद्राक्का पुण्यास हुजूर पागेंत शिकत होत्या. लहान भाऊ एकनाथ कोल्हापुरांत माझे मित्र गोविंदराव सासने यांचेकडे शिकत होता. त्याची मुलगी सुशीला आणि माझ्या आलगूरच्या मामाची मुलगी मथुरा या दोन मुली जमखिंडीस आमच्याच घरीं राहून शिकत होत्या. माझा पहिला मुलगा लहानपणींच वारल्यामुळें दुसरा मुलगा प्रताप यावेळीं ३|४ वर्षांचा होता. या सर्व विखुरलेल्या कुटुंबाचा पोशिंदा मी एकटाच असल्यानें आणि माझें काम तर देशभर पसरलेलें असल्यानें कुटुंबाची एकत्र राहण्याची सोय कोठें करावी हा मला मोठा पेंच पडला.

हा विचार ठरविण्यासाठीं माझा पहिला दौरा मीं जमखिंडीकडेच ठरविला. पुण्यास राहणारे वृध्द ब्राह्म प्रचारक श्री. शिवरामपंत गोखले यांना बरोबर घेतलें. आणि मार्च महिन्याच्या सुमारास जमखिंडीस गेलों. ब्राह्मधर्माचा प्रचार जमखिंडीस अगदीं नवा होता असें नाहीं. विलायतेंस जाण्यापूर्वी दर रविवारीं आमचे घरीं ब्रह्मोपासना होत होत्या. आईबाबांना त्या इतक्या आवडल्या होत्या कीं, मी विलायतेला गेल्यावरहि त्यांनीं त्याचा क्रम चालविला होता, असें त्यांच्याकडून येणा-या पत्रांवरून कळलें. पण नुसत्या उपासना वेगळया आणि या नवीन सुधारकी धर्माच्या तत्वाची मांडणी जाहीर रीतीनें करणें वेगळें. सुमारें दोन आठवडे राहून प्रार्थना समाजानें पुरस्कारलेल्या सहा मूल तत्त्वांची छाननी करण्यासाठीं सहा निराळीं जाहीर व्याख्यानें मीं दिलीं. ठिकाण पोस्ट ऑफिससमोरच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर म्युनिसिपालिटीच्या    दिवाणखान्यांत होतें. नाविन्यामुळें बरीच गर्दी जमे. माझ्यासह आलेले वृध्द शिवरामपंत ब्राह्मण असूनहि माझ्याकडे राजरोस जेवतात ह्या गोष्टीचा गवगवा गांवभर झाला. त्यामुळें व्याख्यानाची प्रसिध्दि करण्यास हस्तपत्रिकांची निराळी योजना करण्याची जरुरी भासली नाहीं. जमखिंडी हा गांव आगगाडीपासून दूर आणि विचारांत मागासलेला, आचारांत अत्यंत सोंवळा असल्यामुळें ह्या व्याख्यानमालेमुळें त्याच्यावर आकाशांतली कु-हाडच पडली म्हणायची. ह्यापूर्वी ह्या गांवचा मी किती जरी लाडका असलों तरी माझीं आत्यंतिक सुधारक तत्त्वें आणि तीं मांडण्यांची सडेतोड पध्दति कोणाच्याहि गळीं सहजासहजीं उतरण्यासारखी नव्हती. लोकमत हळू हळू प्रक्षुब्ध होऊं लागलें. त्या आगींत तेल ओतण्याचें श्रेय जमखिंडी हायस्कुलांतील एका उपद्व्यापी शिक्षकानें आपल्याकडे घेतलें. हे सद्गृहस्थ व्याख्यान ऐकावयास स्वतः आपण सर्वांच्या अगोदर आणि पुढें येऊन अगदीं जणूं भाविकपणें माना डोलावीत बसत. पण त्यांनीं अगोदरच नियोजित केलेली वानरसेना रस्त्यांत गोंगाट करण्यास सज्ज असे. सर्वोत शेवटीं ‘जातिभेद’ या विषयावर जेव्हां व्याख्यान सुरू झालें तेव्हां खालील रस्त्यावरील वानरसेनेने गोंगाट करून तृप्त न राहता दगड आणि कच-याचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारें शेवटची आरती होऊन ही माला संपली.

माधवराव गाडगीळ नांवाचे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना मात्र हीं सर्व तत्वें पटलीं. त्यांनी शिवरामपंत गोखले यांना आपल्या घरीं ब्रह्मोपासनेस जाहीर रीतीनें बोलावून इतर लोकांसहि आमंत्रण कलें. त्यांचें घर भर बाजारांत मारुतीचे देवळाजवळ होतें. उपासनेस इतर कोणी आले नाहीं तरी वरील उपद्व्यापी मास्तर आणि त्यांची वानरसेना हजर राहिली. त्यांनीं आमचा बराच छळ केला. घर भर बाजारांत असल्यानें शौचकूपाची जागा किंचित् लांब होती. बिचा-या वृध्द शिवरामपंतांना वरचेवर लघवीचा उपद्रव होत असल्यानें त्यांना तेथें जावें लागलें. ते आंत गेल्याबरोबर द्वाड पोरांनीं बाहेरून दरवाज्यास कडी लावली. शिमग्याचे दिवस असल्यानें ह्या पोरटयांच्या लीला सशब्द होऊं लागल्या. त्या गोंधळांत बिचा-या शिवरामपंतांच्या आरोळया आम्हांस ऐकूं येत नव्हत्या. शेवटीं कोणी एकानें गाडगीळांना हा निरोप आणून दिल्यावर त्यांनीं आपल्या अधिकाराच्या जोरावर पंतांची कशीबशी सुटका करून सुखरूप घरीं पोंहोंचविलें. या गोष्टीचा पुकार गांवभर झाल्यानें शिमग्यांतल्या रात्रींच्या दंगलीचा मोर्चा आमच्या राहत्या घरावर होऊं लागला. धुळवडीच्या आदल्या रात्रीं तर असा कहर उडाला कीं, आमच्या बाबांना पोलीसाची मदत घ्यावी लागली. प्रकरण येथपर्येत आल्यावर आमच्या घरच्या मंडळीनें कोठें रहावें हा प्रश्न आपोआप सुटला. असा सामाजिक प्रकोप होण्याचें आणखी एक कारण असें झालें कीं, जमखिंडीच्या महारांच्या शाळेंत एक महाराची १० वर्षोची लहान मुलगी होती. तिला मुरळी सोडण्यांत आलें होतें असें ऐकल्यावरून तिला मीं घरीं बोलावून घेतलें आणि तिच्या पुढील शिक्षणाची चांगली व्यवस्था ठेवण्याबद्दल तिच्या आईबापांस बजावलें. निदान मुरळीचा धंदा चालूं नये अशी ताकीद दिली. सुधारणेची मजल व्याख्यानांतच न आटोपतां ती प्रत्यक्ष कृतींत उतरूं लागलेली पाहून जीर्णमतवादी समाजाला कां चीड येऊं नये ! ज्यांनीं मराठा समाजाचे एक सन्मान्य पुढारी म्हणून जातपंचायतीचे खटले निकालांत काढावयाचे त्यांच्यावरच हा प्रसंग गुदरावा ही घटना विचाराला निर्णयकारक होती. आपल्या लहानशा नोकरीची पेन्शन घेऊन आपलें सारें चंबूगवाळें घेऊन मुंबईस येण्याचें त्यांनीं ठरविलें. मी हें सर्व आतां विनोदानें लिहीत आहें. पण माझ्या मानी बाबांना पिढीजात जन्मभूमि सोडून आपलें सर्व उरलें सुरलेलें खटलें आवरून प्रेमळ मित्रांची व नातलगांची अखेरची रजा घेऊन तडकाफडकी मुंबईची वाट धरावी लागली, त्यावेळीं त्यांना काय वाटलें असेल हें ते आणि देवच जाणो ?

शिवरामपंत आणि मी मुधोळास गेलों. हा गांव जमखिंडीचे दक्षिणेस १२ मैलांवर आहे. श्रीमंत घोरपडे यांची ती मराठी राजधानी आहे. पण मागासलेपणांत तिचा नंबर जमखिंडीचे वर लागतो. मायभूमीहून वरील आहेर घेऊन आलेल्या माझ्यासारख्या वीराचा सत्कार अधिक काय व्हावयाचा ? गांवांत विशेष खळबळ उडाली नाहीं त्याचें एक कारण जाहीर व्याख्यानाची प्रथाच तेथें नवी होती. न जाणो, माझीं व्याख्यानें कळलींहि नसतील. जमखिंडींतील उपद्व्यापी मास्तराप्रमाणें स्वयंस्फूर्तीनें पुढें येण्याइतका तेथें कोई कळवळयाचा माणूस नव्हता. माझ्याबरोबर माझ्या दोन बहिणी जनाक्का व चंद्राक्का ह्यांना पुण्यांतील शाळेंत जावयाचें, होतें म्हणून त्याहि बरोबर होत्या. म्हणून मी त्यानंतर दुसरीकडे कोठें दौरा न नेतां पुण्याहून मुंबईस आलों.

प्रकरण २. स्थानिक कार्यक्रम

स्थानिक कार्यक्रम    
परत आल्यावर मुंबईंतील कामाचा कार्यक्रम मी ठरवूं लागलों. धर्मकार्यांचीं दोन मुख्य अंगें आहेत. पहिलें आचार्य कार्य; दुसरें प्रसार कार्य. ज्यांनीं धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांच्या धर्माचरणाची व्यवस्था राखण्यासाठीं प्रयत्न करणें; दर आठवडयाला साप्ताहिक उपासना चालविणें; घरोघरीं भेट देऊन कौटुंबिक धर्माचरणाची निगा ठेवणें; समाजांत जे निराश्रित आणि अपंग असतील त्यांची शुश्रूशा ठेवणें; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टि, इत्यादि गृहविधी चालविणें; सभासदांतील परस्पर परिचय वाढवून तो दृढ व्हावा म्हणून वेळोवेळीं स्नेहसंमेलनें करणें इत्यादि इत्यादि. स्त्रियांसाठीं दर शनिवारीं आर्य महिला समाज, मुलांसाठीं रविवारचे धर्म व नाति शिकविण्याचे वर्ग, तरुणांसाठीं तरुण ब्राह्ममंडळ, वृध्दासाठीं संगतसभा आणि बाहेरच्यांसाठीं व्याख्यानें हा क्रम आठवडाभर चाले. ह्यांत मीं आल्यावर खालील नवीन संस्थांची भर टाकली.

मी विलायतेंत असतांना तेथील स्त्रियांनीं चालविलेलें युनिटेरियन पोस्टल मिशन हें कार्य निरखून पाहिलें होतें. माझे पोस्टल मिशन मित्र वासुदेवराव सुखटणकर यावेळीं पुण्यास होते. त्यांच्याकडून अशाच थाटावर ब्राह्म पोस्टल मिशन ही घटना मीं स्वेदशीं येण्यापूर्वीच करविली होती. ब्राह्म धर्मांच्या तत्वावर आणि उपासना पध्दतीवर लहान लहान पुस्तकें छापवून तीं टपालमार्गें लोकांस वाटून त्यावर वाचकांकडून जीं प्रश्नोत्तरें येतील त्याबाबत सतत पत्रव्यवहार ठेवून, सवडीप्रमाणें वाचकांस भेटीस बोलावून, धर्मप्रसार करण्याच्या पध्दतीला पोस्टल मिशन हें नांव आहे. या कामांत युनिटेरियन लोकांकडून त्यांचीं लहानमोठीं पुस्तकें व द्रव्यनिधीचीहि मदत मिळविली. मी स्वदेशीं आल्यावर सुखटणकर माझ्या जागीं विलायतेला गेले. त्यांचें पुण्यांतील हें कार्य मीं मुंबईला आणून तें वाढविलें. ह्या कामीं माझे मित्र व समाजाचे सभासद सय्यद अबदुल कादर ह्यांची मोठी मदत झाली. ह्या मिशनसंबंधानें पहिल्या सात आठ वर्षांच्या अवधींत एकंदर ३४३८ बाह्म धर्मावरील पुस्तकें, १२७०० लहानसहान पत्रकें, ६३३ युनिटेरियन पुस्तकें व ५००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यांत आला. ह्यांतील पुष्कळशीं फुकट वाटण्यांत आलीं व काहींची अल्प किंमत घेण्यांत येत असे. जे कोणी पुस्तकांची मागणी करीत अगर पत्रव्यवहार करीत त्यांची नांवें एका पुस्तकांत दाखल करण्यांत येत असत व त्यांच्याशीं पत्रव्यवहार करून उदार धर्मवार्ता त्यांस कळावी अशी व्यवस्था करण्यांत आली होती. मी दोन वेळां मुंबई इलाख्यांतील कांहीं ठिकाणीं प्रवास करून व्याख्यानें दिलीं. त्या दोन्हीं सफरींचा खर्च युनिटेरियन असोसिएशननें त्यावेळीं दिला होता. पुढें प्रार्थनासमाजाशीं धर्मप्रचारक या नात्यानें असलेला माझा संबंध सुटल्यानंतर हें काम बंद पडलें.

हायस्कुलांतील व कॉलेजांतील तरुनण विद्यार्थ्यांना मौलिक धर्मग्रंथांचे वाचन करण्याची सवय लागावी म्हणून हा उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (Liberal Religious Reading Class) हा वर्ग काढण्यांत आला. ह्या वर्गांत महाराष्ट्रीयन, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्न धर्मांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होत असे. म्हणून हा वर्ग इंग्रजी पुस्तकांचा इंग्रजींत चालवावा लागे. हा दर बुधवारी सायंकाळीं प्रार्थनामंदिरांत भरत असे. ह्याच्या प्रसिध्दीसाठीं वेळोवेळीं जाहीर व्याख्यानें करावीं लागत. डॉ. आर्म्सस्ट्राँगचे God and Soul, इमर्सनचीं पुस्तकें, प्रो. डॉयसेनचें Philosophy of Upanishad  अशा पुस्तकांचें अध्ययन चालत असे. समाजांतील डॉ. भांडारकर फ्री लायब्ररीमधून ह्या वाचनाला पोषक अशीं पुस्तकें विद्यार्थ्यांना

इकडील प्रांतीं ब्राह्मधर्माचा स्वीकार आणि प्रसार प्रार्थना समाजाकडून आतांपर्यंत कित्येक वर्षे चालला असला तरी ब्राह्मधर्माच्या तत्वाप्रमाणें सभासदांचे गृह संस्कार व विधी चालविण्याचें काम त्यामानानें फार चाललेलें असे. तत्वाप्रमाणें विधी चालविण्याला अनुष्ठान हे नांव असें. ह्या अनुष्ठानाचा परिणाम ब्राह्म कुटुंबामधील तरुणांपासूनच घडविण्याचा प्रयत्न करणें बरें आणि त्यासाठीं तरुणांनीं ब्राह्मधर्मानुसार उपासना चालविण्यास शिकावें, त्यांनीं परस्परांत स्नेहवर्धन करावें, गृह्य संस्काराचे वेळीं एकमेकांत मिसळावें, आपल्या घरीं असे संस्कार चालविण्याचा आग्रह धरावा वगैरे हेतु साध्य करण्यासाठीं सन १९०५ सालच्या दस-याच्या दिवशीं मीं तरुण ब्राह्म संघ (Young Theists Union) ही महत्त्वाची संस्था स्थापन केली. प्रार्थना समाजांत समाविष्ट झालेल्या तरुणांनीं कट्टर अनुष्टानाला तयार व्हावें म्हणून मीं ह्या संघाच्या घटनेचे
नियम मोठया कसोशीनें तयार केले. बाहेरच्या तरुणांनीं हे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतल्यास त्यांनाहि आंत येण्यास वाव असे. या कार्याशिवाय लोकशिक्षण आणि परोपकाराचीं कृत्यें करण्यासाठीं प्रार्थना समाजाच्या इतरहि संस्था होत्या. मजुरांसाठी रात्रींच्या शाळा मुंबई शहरांत निरनिराळया १०|१२ ठिकाणीं चालत. त्यांतच दोन शाळा अस्पृश्यांसाठीं होत्या. त्यांची देखरेख मला ठेवावी लागे. पंढरपुरांत बालहत्या प्रतिबंधकगृह म्हणून एक नमुनेदार संस्था समाजाकडून चालविण्यांत येत आहे. समाजाचें मुखपत्र ‘सुबोध पत्रिका’मराठी आणि इंग्रजी बाजूनें दर आठवडयास प्रसिध्द होत आहे.  त्यांचाहि मला नेहमीं परामर्ष घ्यावा लागे. अशीं निरनिराळीं स्थानिक कामें चालवून शिवाय मुंबई प्रांत आणि त्याबाहेरहि मला वरचेवर प्रवास करावा लागे.