प्रकरण ३. काठेवाडचा दौरा (2)

अशा प्रवासांत मला नेहमीं एक स्मरणीय अनुभव येत असे. त्याचा उल्लेख करणें बरें. कधीं श्रीमंतांचे घरीं थाटाचें आदरातिथ्य तर लगेच खाण्यापिण्याचे अत्यंत हाल अशी स्थितीची अलटपालट होऊन माझी चांगली कसोटी लागत असे. उत्तम साळीचा भात खाऊन दुसरे दिवशीं शिळी भाकरहि मिळत नसे. अहमदाबादेस मी परत येतांना थोडाच वेळ राहिल्यामुळें गाडी अवेळीं निघाल्यानें मला एक दिवसाचें उपोषण पडलें. बी. बी. सी. आय. रेल्वेवरील मियागांव स्टेशनवर गाडी भर बारा वाजतां मला सोडून पुढें चालती झाली. स्टेशन क्षुद्र असल्यानें तेथें कसलीच सोय नव्हती. दोनचार मिनिटांत गाडी गेल्यावर सर्वत्र सामसूम झाली. स्टेशन मास्तर, पोर्टर कोठें गेले तें कळेना. उन्हांत पिण्याला पाणी मिळेना तर खाण्याची गोष्ट काय ? दीड दिवसाच्या उपोषणानें माझ्या पोटांतील कावळे आंतडीं कुरतडूं लागले. अर्ध्याच मैलावर एक कुग्राम होता. ट्रंक व बिछाना प्लॅटफॉर्मवरच टाकून मी तेथें भक्ष्यशोधार्थ गेलों. त्या ओसाड खेडयांत मला नीट माणसेंहि दिसेनात, दारें लागलेलीं व उघडीं असतील तर माणसें नसलेलीं असा प्रकार होता. मी एका ब्राह्मणाच्या घरांत शिरलों. त्याच्या घरीं श्राध्द होतें असें कळलें. दोन प्रहर उलटून गेले तरी हा यजमान नुकताच उठून हजामतीला बसला होता. जेवणाची सोय होईल कां विचारतां त्यानें मी ब्राह्मण आहे कां असें विचारलें. नाहीं म्हणतांच त्यानें मला चक्क बाहेर जाण्यास सांगितलें. हताश होऊन शेवटीं एका शिंप्याचे दुकानवर आलों. माझी कठीण अवस्था सांगितली. शिंप्याला पाझर फुटला. आपली पत्नी जवळच्या तळयावर गेली आहे. ती आल्यावर कांहीं उरलेंसुरलें असल्यास मिळेल असा त्यानें धीर दिला. शेवाळलेला घाणेरडया पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली. तिनें एका पितळींत कालचा उरलेला उसळीवजा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यांत वाढली. कढींत पाहतों तर चारपांच माशा पडलेल्या होत्या. मुकाटयानें त्या वेंचून टाकून मीं हें पक्वान्न अधाशासारखें खाल्लें. पण पाणी कांहीं केल्या पिववेना. कसेंबसें आंचवून मी बाहेर ओठीवर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर पडलों. श्रमामुळें झोंप लागली. अर्ध्या तासानें उठून चटईवरच पाणी प्यालों. माझ्या जवळच चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याची खंती न बाळगतां मी पाणी पितों हें पाहून शिंप्याचे डोळे लाल झाले. त्यानें कांहींच मुर्वत न ठेवतां मला दुकानांतून खालीं उतरण्यास सांगितलें. यांत मुसलमानाचा अपमान होऊन तोहि खालीं उतरला. तो पोलीस शिपाई होता. मोठया मिनतवारीनें मी कोण कोठचा आहें ही चौकशी तो करूं लागला. मी रेल्वेंतला एक उतारूं आहें, माझें सामान प्लॅटफॉर्मवर पडलें आहे, जात न पाळणारा एक मराठा आहे, वगैरे सांगितलें. तो म्हणाला, “चला, जवळच आमचे फौजदारसाहेबांचें ठाणें आहे. तेहि मराठेच आहेत. तुमचें सामान मी स्वतः डोक्यावर घेऊन तेथें पोंहोंचवितों. तसें त्यानें केलेंही. फौजदारसाहेब कोल्हापूरचे माझे चांगले परिचयाचे निघाले. माझी कहाणी ऐकून ते कळवळले. पडदा पालटला आणि उत्तम सोय लागली. रात्रीं मी ठाण्यावर राहिलों. मियागांव तेथून सुमारें दोन मैलावर होता. एका पोलीसाकडून ठाकूरांस निरोप गेला. त्यांनी ताबडतोब एक सुंदर गाडी पाठविली. नानालाल कवीनें माझ्या येण्याबद्दलचें ठाकूरसाहेबांना जें पत्र पाठविलें होतें तें चुकून एक दिवस उशीराचें होतें म्हणून हा सर्व त्रास पडला असें सांगून ठाकूरजींनीं माफी मागितली. तेथें एक दिवस राहून थाटाचा पाहुणचार भोगून मुंबईस परत आलों. येणेंप्रमाणें प्रार्थना समाजाच्या आणि पुढील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाकरतां काठेवाड आणि गुजराथ प्रांतीं मीं एकंदर चार सफरी केल्या.

१९०४ च्या पावसाळयाच्या आंत आमचे बाबा जमखिंडींतील वस्ती कायमची सोडून घरदार आणि कुटुंबांतील सारी मंडळी घेऊन मुंबईस आले. त्यापूर्वीच राममोहन राय आश्रममध्यें आमची राहण्याची सर्व व्यवस्था करण्यांत आली होती. गिरगांवांतील प्रार्थना मंदिराच्या आवारांत या आश्रमाची चार मजली भक्कम इमारत आहे. तळमजल्यांत भांडारकर ग्रंथालय आहे. दुस-या मजल्यावर लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळया खोल्या करून आमची व्यवस्था करण्यांत आली होती. तिस-या मजल्यावर एक मोठें दालन असून त्यांत समाजाचीं संमेलनें वगैरे करण्याची व्यवस्था होती. चवथ्या मजल्यावर पुढें थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यांत आली आहे. तेथें खासगी प्रार्थनेची जागा असून बाहेरून आलेल्या मिशनरीची सोय करण्यांत येते. मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरितां खोल्यांची अलग सोय असून स्नानासाठीं तुटक खोल्या आहेत. एकंदर सोय चांगली आहे. माझ्या कुटुंबांत एकूण दहाबारा माणसें होतीं. समाजाचा प्रचारक या नात्यानें माझी नेमणूक झाली तेंव्हा माझ्या खर्चासाठीं दरमहा ६० रु. ची व्यवस्था करण्यांत आली. शिवाय प्रवासाचा वगैरे सर्व खर्च माझा मींच पाहून घ्यावा लागत असे. इतकेंच नव्हे तर समाजाचीं व तदनुषंगिक इतर कामें मीं काढल्यास त्याच्याहि खर्चाची जबाबदारी मजवरच पडे. सात वर्षे मीं हें काम केलें तरी माझ्या ह्या नेमणुकींत कांहीं वाढ झाली नाहीं, आणि ती मी मागावी असेंहि मला कधीं वाटलें नाहीं. मुंबई हा मुख्य राजधानीचा गांव. राममोहन आश्रमाची सोय झाल्यामुळें आणि त्याच्या पूर्वीपासूनहि पाहुण्यांची ये जा फार असे. समाजाचे सभासदच नव्हते तर इतरहि प्रागतिक मताचे सन्माननीय पाहुणे नेहमीं येऊन आश्रमांत उतरत. त्यांतील कांहीं युरोप वगैरे बाहेरदेशीं जाणारे व तिकडून येणारे प्रतिष्ठित गृहस्थ असत. त्यांच्याहि सरबराईचा बोजा आम्हांवर पडे. खर्चाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी पाहुणचाराची दगदग आमच्या घरच्या कुटुंबियांवर नेहमीं पडे, आणि ही कळ बोलून दाखविण्यासारखीहि नव्हती. गृहमेधाचें कठीण दिव्य मुकाटयानें चालवावें लागे. घरचें सर्व देखरेखीचें काम बाबांकडे होतें. भावंडें शाळेंत जात असत. तीं मोठीं झाल्यावर माझ्या कामांत सामील झालीं. वृध्द आईबाबाहि माझ्याच नादीं लागलीं. माझ्या कार्याशीं मी इतका तादात्म्य झालों होतों कीं, माझें हें करणें न्यायाचें कीं अन्यायाचें होतें, सत्य होतें कीं असत्य होतें ह्याचा विचार त्यावेळीं माझ्या ध्यानांतहि नव्हता आणि घरच्या मंडळींची मनोरचना तक्रार करण्यासारखी तर कधीच नव्हती. असा हा आमच्या प्रपंचाचा अल्लारखी गाडा चालला होता.

प्रकरण ३. काठेवाडचा दौरा

१९०६ च्या एप्रिलमध्यें माझे मित्र गुजराथचे नानालाल कवि सादरा येथें सरकारी नोकरींत होते. त्यांना उन्हाळयाची सुटी पडल्यामुळें माझ्याबरोबर काठेवाडांत समाजाच्या प्रचारकार्यासाठीं दौरा काढण्याचें ठरविलें. मी त्यांच्या घरीं सादरा येथें गेलों. स्टेशनहून सादरा गांव बराच लांब असल्यानें व प्रदेश वाळवंटाचा असल्यामुळें माझी प्रवासाची उंटावरून जाण्याची व्यवस्था केली होती. संवय नसल्यामुळें ह्या प्रवासाचा मला बराच त्रास झाला. अंग फार हालल्यानें दोन दिवस कमरेला ठणका लागला होता. साद-याहून आम्ही दोघे प्रथम अहमदाबाद प्रार्थना समाजांत गेलों. तेथें व्याख्यानें आणि सभासदांशीं परिचय वगैरे करून घेण्यांत दोन दिवस गेले. समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमीयाशंकर यांची प्रथमच ओळख झाली. त्यांनी स्थापलेलें मोठें अनाथालय पाहिलें. ह्या समाजाला पैशाचें भरपूर साहाय्य आहे. प्रार्थना मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे. सभासदांची संख्या पुष्कळ आहे, पण अनुष्ठानिक सभासद फारच कमी होते. रा. रमणभाई नीलकंठ समाजाचे चिटणीस होते. अहमदाबादहून आम्ही राजकोटला गेलों. प्रसिध्द विद्वान् (प. वा.) शंकर पांडुरंग पंडित, बॅ. सीतासम पंडित आणि घनश्याम नारायण पंडित हे तीन पंडित बंधू काठेवाडांत मोठी मान्यता पावलेले राजकोटांत कायमची वस्ती करून राहात असत. आम्ही शंकर पांडुरंग यांचे घरीं उतरलो. रा. शंकर पांडुरंग पंडित हे प्रार्थनासमाजिष्ट होते, आणि दुसरे दोन प्रागतिक ध्येयाचे होते. राजकोटांत राजकुमार कॉलेज व इतर तशाच मोठया लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची मध्यवर्ति संस्था होती. ग्राशिया नांवाचा काठेवाडांतील जमिनदारांचा श्रीमंत वर्ग असे; त्यांचीहि एक शाळा श्रीमंती थाटाची होती. कवाईत करणे, घोडयावर बसणें व इतर मर्दानी खेळ खेळणें ह्या बाबतींत ह्या कुमारांची फार काळजी घेण्यांत येत असे. आणि हीं कामें ह्या तरुणांना फार आवडतहि असत. क्षत्रियाला शोभणारा पेहेराव, पाणीदार वृत्ति आणि कसलेली शरीरप्रकृति पाहून आनंद झाला. मुंबई इलाख्यांतील राजेरजवाडयांच्या मुलांची सोय येथें एकत्र केल्यानें परस्पर परिचय होऊन ते पुढें राजपदारूढ झाल्यावरहि तो कायम राहात असे. राजकोटहून आम्ही भावनगरला गेलों. तेथील कॉलेजांत माझें व्याख्यान झालें. सर प्रभाशंकर पट्टणी यांचें या संस्थानांत फार वजन असे, त्यांचीहि ओळख झाली. भावनगरहून आम्ही जुनागडला गेलों. दिवाणांचेकडे उतरलो. व्याख्यानें, भेटी हा ठरीव कार्यक्रम झाल्यावर जवळच असलेल्या गिरनार पर्वतावर जाण्याचा विचार ठरला. दिवाणांच्या ओळखीमुळें गिरनार पर्वतावर आमची राहण्याची व्यवस्था मोठया बडदास्तीची झाली.

“गढ जुनो गिरनार वादळ थीनुं बातुं करी”ही काठीवाडी म्हण बहुजन समाजांत प्रसिध्द आहे. तिच्यामुळें हा गड पाहण्याची आम्हांस फार आतुरता लागली होती. मेघाशीं भाषण करणारा हा जुना गड गिरनार जवळ जवळ चार हजार फूट उंच आहे. त्याच्या पायथ्याशीं एका मोठया प्रशस्त दगडावर सम्राट अशोक राजाचा एक प्रसिध्द शिलालेख आहे. गिरनारच्या पश्चिमेस गीर नांवाचें प्रसिध्द जंगल लागूनच आहे. त्यांत पशूंचा राजा सिंह त्याचें साम्राज्य आहे. हिंदुस्थानांत याची पैदास दुसरी कोणीकडे नसल्यानें या जंगलाला मोठें महत्व आलेलें आहे. जुनागडच्या प्राणिसंग्रहालयांत सुमारे १०|१२ सिंह आम्हीं पाहिले; त्यावेळीं त्यांच्या घोर गर्जनांनीं प्रदेश निनादून गेला. हें दृश्य मोठें प्रेरणा करणारें होतें. खर्च्यांवरून आम्हांला गिरनारवर नेण्यांत आले. संस्थानच्या आतिथ्यालयांत आमची थाटाची सोय झाली. शिखरावर प्रसिध्द आणि प्राचीन अशीं कित्येक सुंदर जैन मंदिरें आहेत. स्वामीनारायण पंथाचींहि कांहीं देवळें आहेत. येथून आसमंतांतला देखावा आत्म्याला जागृत करणारा दिसतो. ह्या पर्वतावर मोठमोठया खोल गुहा आहेत. त्यांतील एका गुहेमध्यें आम्ही प्रवेश करून अंधारांतून बरेंच लांबवर आंत गेल्यावर गाभा-यात कितीतरी निस्संग आणि विरक्त साधू रहात असलेले आम्हीं पाहिले. पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारांत रौद्ररसाची प्रेरणा करीत होता. साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न, शरीरें धष्टपुष्ट आणि तेजःपुंज, बहुतेक नग्न आणि राखेनें माखलेलीं पाहून फार आश्चर्य वाटलें. ह्या निर्जन प्रदेशांत ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचें कोडें आम्हांला पडलें. आम्हा प्रापंचिकांच्या मनांत अर्थात् असले खाण्यापिण्याचे विचार अगोदर येणार. साधूंना असले प्रश्न विचारल्यास त्यांनीं नुसतें हंसून आमची बोळवण गेली. गुहेच्या आसपास ठिकठिकाणीं शुध्दोदकाचीं कित्येक टांकीं दिसलीं. त्यांचा उपयोग हे साधु आणि जंगलांतले व्याघ्रादि वन्य पशू यांच्याशिवाय दुसरे कोण करणार ? हे आळीपाळीने टांक्यावर येऊन जात असत. त्यांच्या गांठी भेटी झाल्यास काय प्रकार घडत असेल हें कळण्याला मार्ग नव्हता. अशा समागमांत चार दिवस आमचे मोठया समाधानाचे, एकांतवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले. आणि परत आम्ही जुनागडास दिवाणांच्या कोठींत आलों. तेथें मियागांवचे ठाकूर बडोदे सरकारचे मांडलिक आमचे सहपाहुणे होते. ठाकूरसाहेबांनीं परत जातांना आपल्या मियागांव या जहागिरीच्या जागीं मीं दोन दिवस राहून जावें म्हणून मोठया अगत्याचें आमंत्रण केलें व तें मीं आनंदानें पत्करलें. प्रार्थना समाजाच्या कार्याविषयीं ठाकूरसाहेबांनीं मोठी सहानुभूति प्रकट केली. येथून दुस-या एका लहानशा संस्थानच्या गांवीं आम्हीं गेलों. तेथें काठेवाडी जुन्या मताचे शाहीराची भेट झाली. त्याचीं साधीं व परिणामकारी भजनें एकतारीवरचीं ऐकावयाला मिळालीं. त्यांतील तेजाभगत नांवाच्या शाहीराचीं दोन तीन अनुभविक पदें मीं उतरून घेतलीं. पुढें माझ्या कीर्तनांत त्यांचा चांगला उपयोग झाला. दिवस उन्हाळयाचे असल्यामुळें रात्री फार सुखावह गेल्या. तेथें नाथालाल कवीची व माझी ताटातूट झाली. मी एकटाच अहमदाबादेहून मुंबईकडे परतलों.