प्रकरण १३. कार्यांची सुरुवात (2)

अशा प्रकारचीं दर्याद्रतेची कामें करण्यास पुरुषांपेक्षां स्त्रियांच्या अंतःकरणाची जोड मिळविणें आवश्यक असतें. या सदनाच्या कामामुळें तेंहि लवकर घडून आलें. १९०८ सालीं खालील प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी नेमण्यांत आली. लेडी म्यूर मॅकेंझी, अध्यक्ष; सौ. चंदावरकर, उपाध्यक्ष; मिसेस स्टॅनले रीड, चेअरमन; सौ सीताबाई सुखटनकर आणि सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या जॉईंट सेक्रेटरी; मिस् एस्. के. काब्राजी खजिनदार. ह्यांपैकीं डॉ. वासुदेवराव ह्यांची पत्नी सौ. सीताबाई सुखटनकर ह्या पूर्वाश्रमींच्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे चालक रेव्हरंड बिशप ह्यांची कन्या. ह्यांनीं इंग्लंडमध्यें असतांना ह्या मिशनला तेथील युनिटेरियन लोकांची सहानुभूति मिळवून ७०० रु. पाठविले होते. त्या हिंदुस्तानांत आल्यावर त्यांनीं ह्या स्त्रियांच्या कमिटीच्या चिटणीसाचें काम पत्करलें. पण पुढें डॉ. सुखटनकरांना लवकरच मुंबई सोडून लाहोरला जावें लागल्यानें ह्या बाईंचा मिशनशीं फारसा संबंध उरला नाहीं. ह्या कमिटीवरच्या मोठमोठया घराणदार बायकांनीं व्यक्तिशः मिशची वेळोवेळीं फार काळजी घेतली आणि मोठेमोठे निधि जमवून मिशनला दिले. लेडी म्यूर मॅकेंझी यांनीं त्यांचे पती कांहीं दिवस ऑक्टिंग गव्हर्नर असतांना १९०९ सालीं महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यावर सभा भरवून प्रत्यक्ष मदत केली. १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यांत पुण्याच्या शाळेच्या बक्षिस समारंभांत अध्यक्षस्थानावरून लेडी म्यूर मॅकेंझीनें जोरदार भाषण करून श्रीमंत वर्गांचें लक्ष मिशनकडे वळविलें. मलबार हिलवरील आपल्या बंगल्यांत आपल्या कमिटीची सभा भरवून निधि मिळविण्यास नाना प्रकारचे उपाय सुचिवले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ कर्ते सर स्टॅनले रीड यांच्या पत्नीनीं १९०९ सालीं मिशनमधील सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वाटला. सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचें काम करण्यांत चूर असत. सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनांत समाचाराला येऊन खाऊच्या पाटयांच्या पाटया भरून विद्यार्थ्यांना वाटीत असत. प्रसिध्द दादाभाई नौरोजी यांची नात मिसेस पी. कॅप्टन, (मुंबईचे असि. पोस्टमास्तर जनरल यांची पत्नी) ह्या प्रसिध्द देशाभिमानी बाईनें मिसेस सुखटनकरांच्या पाठीमागें चिटणीसाचें काम पत्करलें. पुढें पुण्याची शाखा सुरू झाल्यावर तळेगांव दाभाडे येथें रात्रींची आणि दिवसाची शाळा मिशननें काढली. त्यांचा सर्व खर्च ह्या दंपतीनें दिला आणि पुण्याच्या शाखेला एक शिवण्याचें यंत्र व हार्मोनियन बक्षिस दिला.

ह्या सदनाच्या कार्यांतून मिशनच्या कामाच्या ज्या मुख्य मुख्य अंगाची निष्पत्ती झाली त्या सर्वांत महत्वाचें काम म्हणजे मुंबई शाखेचें परळ येथील वसतिगृह होय. अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणासाठीं कितीहि शाळा आणि उद्योगालयें काढलीं तरी त्यांची खरी उन्नति येवढयानेंच होणें शक्य नाहीं. अशा शाळेंतून अस्पृश्यांचीं मुलें दिवसांतून फार तर पांच तास राहून बाकीचा सर्व काळ आपल्या घरगुती वातावरणांतच आणि मागासलेल्या समाजस्थितींत घालवितात तोंपर्यंतत्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाहीं याची जाणीव पूर्वीपासून चालकांना होती. त्याच्यासाठीं स्वच्छ ऐसपैस जागेंत ह्या कामांत तयार झालेल्या कुलगुरूंच्या वैय्यक्तिक नजरेखालीं दिवसांतून चोवीस तास विद्यार्थ्यांची राहाण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृहाची जरुरी होती. पण हें ध्येय सुरुवातीपासूनच कसें गांठतां यावें. नुसते दिवसाच्या शाळेंत येण्यास ज्यांची तयारी नाहीं ते आपल्या गांवाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरांत कोठून राहायला येणार! पण निराश्रित सदनाचें तीन वर्षें कार्य चालल्यानें हें ध्येय साधण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. मिशनच्या शाळांची वाढ या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे इंग्रजी ४ इयत्ता चालविण्यापर्यंत झाली. ह्या अवधींत शाळांच्या आसपासच्या निवडक मुलांना फक्त जेवावयास घरीं दोनदां जाऊन बाकीचा वेळ सदनांतच घालविण्याची संवय करण्यांत आली. स्नानास घालणे, कपडेलत्ते, अभ्यासाचीं पुस्तकें, खेळांचीं उपकरणें आणि प्रशस्त पटांगण इत्यादि पुरवून घरापेक्षां शाळाच त्यांना अधिक प्रिय वाटेल असा हरएक प्रयत्न करण्यांत आला. शेवटीं ४ फेब्रुवारी १९०९ रोजीं रीतसर वसतिगृह उघडण्यांत येऊन पटावर ११ मुलें नमूद करण्यांत आलीं. सप्टेंबर १९०९ पासून त्यांच्या जेवण्याखाण्याची सुद्धां सोय करण्यांत आली. १९१० डिसेंबर अखेर पटावर ३६ मुलांची संख्या दाखल झाली. त्यांतून कांहीं जरी मुलें गेलीं तरी २१ मुलें कायमचीं शिल्लक उरलीं. त्यांपैकीं ३ मुली होत्या. मिशन जरी मुख्यतः अस्पृश्यांसाठीं काढलें आहे तरी पटावरील संख्येपैकीं निदान एक चतुर्थांशाहून जास्त नाहीं इतकी स्पृश्य वर्गीय मुलें घेण्याला मुभा ठेवली होती. ह्याचा उद्देश दुहेरी होता. स्पृश्य मुलांशीं मिळून मिसळून वागून त्यांच्याशीं अभ्यासांत चढाओढ करून त्यांच्या संवयीचें निरीक्षण करून अस्पृश्यांनीं आपला फायदा करून घ्यावा. उलटपक्षीं अस्पृश्यांविषयीं जो विनाकारण तिटकारा स्पृश्यांमध्यें असतो तो निराधार आहे, हें त्यांच्याशीं प्रत्यक्ष मिसळून पाहण्याची संधी ह्या स्पृश्यांना मिळाली. केवळ मुलांशींच वागण्यांतच नव्हे तर मोठया माणसांमध्यें प्रचार करतांनाहि पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशीं वागतांना व्यासपीठावरून बोलतांना प्रचारकांना हा दुहेरी हेतू सांभाळावा लागे. इतकेंच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षा स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचें काम कित्येक वेळां अधिक अवघड होत असे. वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचा दैनिक कार्यक्रम येणेंप्रमाणे-

 

५-०   सकाळीं उठणें.
५-३०  सकाळची प्रार्थना    
६-०   कांजी.
६-३०  बुक बाईंडिंगचें काम.
७-३०  शालेय अभ्यास    
९-०    स्नान व न्याहारी
१०-०   बुक बाईंडिंगचें काम.
११-१-० दिवसाची शाळा.
१-१-३० भोजन.
१-३०-५ दिवसाची शाळा
५-६ व्यायाम.
६-० भोजन.
७-३० - शालेय अभ्यास किंवा रात्रीची शाळा.
१०-० झोंपणें.

 

याखेरीज रविवारीं सकाळी नैतिक शिक्षण, तिसरे प्रहरीं विद्याथ्यांचें चर्चा मंडळ व सायंकाळीं साप्ताहिक उपासना होत असत. स्वयंपाकाकरतां एक बाई नेमलेली असे. घरकामाकरतां एकहि नोकर नसे. आपापलीं कामें करून सामान्य कामाची वांटणी मुलेंच बिनबोभाट करीत असत. कोणत्याहि प्रकारें कोणत्याहि प्रसंगीं जातिभेद पाळला जात नसे. याबाबतींत कोणीं कधीं तक्रारहि केली नाहीं. अन्न नेहमीं शाकाहारी असे आणि तें विद्यार्थ्यांना मानवलेंहि. स्वच्छता आणि नैतिक बंधनें ह्या दृष्टीनें विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे कसोशीनें पाहण्यात येई. पुरेशा जागेची मोठी उणीव भासत असे. मोफत औषध देण्याचें कामहि प्रयोगादाखल १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेर चाललें. उद्देश हा होता कीं, औषधाचे द्वारें मिशनचा संबंध या लोकांशीं जडावा. नवीन औषधोपचाराची या लोकांस संवय लागावी. नोव्हेंबर १९०६ पासून डिसेंबर १९०८ अखेर पर्यंत दोन वर्षें दवाखाना खुला राहून त्यांत १२३९ रोग्यांना दाखल करण्यांत आलें व ३४४४ वेळां औषधोपचार देण्यांत आले.

 जाती      पुरुष स्त्रिया. मुलें.    एकूण.
   मराठा 
 ६१      ९६    ८१      ३३८
महार २२२ ६४ १६० ४४६
मोची ४८ २२ ७५ १४५
मांग १७ २२ ४२
भंगी   १६
सुरती २७ २६ ८६ १३९
मुसलमान ३५ ४१ २१ ९७
ख्रिस्ती ११ १२ ३२
ज्यू १२ १८
एकूण    
५३५ २९६ ४४२ १२७३


ह्या सर्व कामाचा खर्च २३३ रु. ९ आ. ९ पै. आला त्यावरून किती काटकसरीनें काम करण्यांत येत होतें हें दिसून येतें.

शाळाखातें : राहतां राहिलेलें महत्वाचें काम म्हणजे शिक्षणाचे. यासाठी शाळाखातें पसंत करील अशा तज्ज्ञाची मोठी जरुरी होती. निराश्रित सेवासदनाचें हें चाललेलें काम पाहून आणि त्यासाठीं मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून रा. वामनराव सोहोनी या प्रार्थना समाजाच्या सभासदाला आपल्याला वाहून घेऊन काम करण्याची प्रेरणा झाली. ते ह्या कामाला सर्वतोंपरी पात्र होते. सदनांतील प्रचारक मंडळी सदनांतील कामें करूनच तयार झाली. रा. सोहोनी अगोदर बाहेर तयार होऊनच मिशनला १९०८ सालच्या आरंभीं येऊन मिळाले. ते आल्याबरोबर मिशनच्या परळ येथील शाळेचा दर्जा प्राथमिक शाळेंतून दुय्यम शाळांत वाढला. रा. सोहोनींचें काम मागें सांगितलेल्या दोन पध्दतींपैकीं सुवर्णकार पध्दतीचें (Intensive) होतें. शाळाखात्याचे सर्व नियम सांभाळून त्यांनीं फार चोखपणें हें काम केलें.

शाळाखात्याच्या इन्स्पेक्टरकडूनच नव्हे तर सर जमशेटजी जीजीभाई, बँ, एच्. डी. वाडीया, मि.
सुरेंद्रनाथ टागोर, मि. एफ् अंडरसन, मि. व मिसेस सेंट निहालसिंग अशा प्रसिद्ध व्यक्तिंकडून त्यांनी उत्तम शेेरे मिळवले.

ही शाळा ठाणें जिल्ह्यांतील चेंबूर येथें उघडण्यांत आली. ह्या शाळेचे कामीं  मुंबई कार्पोरेशनमधील इंजिनियर, रा. अमृतलाल ठक्कर यांचे अविश्रांत श्रम फार उपयोगी पडले.

(३) मदनपुरा-दिवसाची शाळा-पटावरील संख्या १२२, पैकीं ९७ मुलें आणि २५ मुली.

(२) कामाठीपुरा - भंगी लोकांसाठीं दिवसाची शाळा ही एका गुजराथी गृहस्थाच्या उदार आश्रयानें चालू होती. हिला प्रथम जागाच मिळेनाशी झाली. भंगी लोकांचा तिरस्कार इतर अस्पृश्यांनाहि वाटत असे. शिक्षक मिळण्याची मारामार पडूं लागली. त्यामुळें शाळा बंद पडते कीं काय असें वाटूं लागलें. शेवटीं बडोद्यास तयार झालेले एक घेड जातीचे गृहस्थ मिळाले. पटावरील संख्या ७६ होती. रोजची हजेरी ६६ होती. मराठी ४ इयत्तेपर्यंत शिक्षण दिलें जाई.

प्रकरण १३. कार्यांची सुरुवात

निराश्रित साह्यकारी मंडळीचें अशा रीतीनें एक वर्ष लोटल्यावर कामाचा चहुकडे बोलबाला होऊं लागला. ह्या नवीन कार्याबद्दल अनुकूल प्रतिकूल मतें प्रकट करण्यांत वृत्तपत्रकारांची चढाओढ लागली. या राष्ट्रीय मुहूर्त कालांत मुंबईस बिनबोभाट परोपकारी कृत्य करणारे दोन दानशूर गृहस्थ होते. एक मलबारी नांवाचे पारशी गृहस्थ व दुसरे दयाराम गिडुमल, सुरतेचे डिस्ट्रिक्ट जज्ज, असे होते. पुण्याचे प्रो. धोंडोपंत कर्वे, अनाथ महिलाश्रमाचे संस्थापक; प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, भारत सेवक मंडळाचे संस्थापक; राजकारणांत सारा हिंदुस्थान हलवून सोडणारे टिळक वगैरेंनीं महाराष्ट्राला तत्कालिन अग्रपद मिळवून दिलें होतें.  अशा मुहूर्तकाळीं वरील दोन परोपकारी गृहस्तांना केवळ महिलांच्या उध्दारासाठीं निष्काम बुध्दीनें कांहीं तरी करावें ही तळमळ लागून राहिली होती. एके दिवशीं दयाराम गिडुमल ह्या थोर पुरुषाकडून मीं त्यांना समक्ष भेटून जावें अशी अत्यंत प्रेमळपणाची चिठ्ठी आली. ती भेट मी कधीं विसरणार नाहीं. त्यांनीं मला अत्यंत आपलेपणानें कवटाळून, डोळयांत आंसवें आणून विचारलें कीं, हें अपूर्व मिशन काढण्याची कल्पना मला कशी सुचली. ह्या कामीं अस्पृश्यवर्गांच्या महिलासाठीं मीं कांहीं तजवीज केली आहे काय असें विचारलें. मीं निर्भीडपणें सांगितले कीं, ह्या हतभागी भारतामध्यें पुरुषापेक्षां महिलांची स्थिति अत्यंत दुर्बळ व केविलवाणी आहे हें मी जाणून आहें. माझ्याप्रमाणेंच माझ्या घरांतल्या मंडळींनाहि ही जाणीव असल्यानें माझी त्यागी बहिण आणि पूज्य माता यांनीं आपलें पाठबळ दिलें आहे. याची वार्ता दयारामजींच्या कानावर अगोदरच आली होती. म्हणूनच त्यांनीं मला समक्ष भेटीला बोलावून असें कळकळीचें स्वागत केलें. त्यांनीं विचारलें, “ह्या अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठीं तुम्ही काय करूं शकतां?” मीं उत्तर दिलें,“आमच्या मध्यवर्ती आश्रमांत निराश्रित सेवासदन या नांवाखालीं एक स्वतंत्र शाखा आम्हीं काढूं.” दयारामजींनीं ताबडतोब दरमहा १०० रु. ची मदत देऊं केली आणि हें सदन निघालें. मिशनची पहिली शाळा १८ ऑक्टोबर १९०६ सालीं मुरारजी वालजीच्या बंगल्यांत निघाली होती. पण कामाची वाढ झाल्यानें ही जागा पुरेना म्हणून एल्फिन्स्टन रोडवरील स्टेशनाचे पश्चिमेस ग्लोब मिलजवळ एका चाळींत अधिक प्रशस्त जागा घेतली.

मिशनचा पहिल्यापासूनच एक दंडक ठरला होता कीं, मिशनमध्यें काम करणा-यांनीं ज्या ठिकाणीं अस्पृश्य लोक रहातात तेथेंच त्यांच्यांत मिळून मिसळून रहावें, काम करणारांनीं आपल्या कुटुंबासह येऊन रहावें. मिशन-यांच्या बायकामुलांनीं अस्पृश्य मानलेल्या बायकामुलांमध्यें मिळून मिसळून रहावें. ह्या उद्देशाला अनुसरून ग्लोब मिलजवळच्या एका चाळींत मिशननें आपलें ठाणें घातलें. खालच्या मजल्यांत शाळा, दवाखाना, उद्योगालय वगैरेची व्यवस्था करण्यांत आली आणि वरच्या मजल्यांत माझे वृध्द आईबाप, रा. सय्यद अबदुल कादर व त्यांची बहिण आणि तिचा नवरा इतक्यांची राहण्याची सोय करण्यांत आली. तेथे वरील सदनाची संस्थापना २१ में १९०७ रोजीं झाली. ग्लोब मिलच्या आसपास या चाळीला लागूनच मोठें पटांगण होतें. किंबाहुना येथें शहराची वस्ती संपली होती आणि उन्हाळयाच्या दिवसांत मुलांना खेळावयास प्रशस्त जागा होती. पण पावसाळयांत ह्या जागेंत मोठी दलदल माजून दोन तीन महिने पाणी सांचून रहात होतें. त्यामुळें रहाण्याला जागा रोगराईची आणि गैरसोईची होती. म्हणून लवकरच ही जागा सोडून स्टेशनाला लागूनच नवीन प्रशस्त बंगला घेतला व तेथें या सदनाचें काम जोरांत चाललें.

मिशनचे हेतू पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणें होते. (१) शिक्षणप्रसार (२) नोक-या मिळवून देणें (३) सामाजिक अडचणींचें निवारण करणें आणि (४) सार्वत्रिक धर्म व्यक्तिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांत करणें. शेवटचे तीन हेतू वरील सदन निघेपर्यंत साधणें अशक्य होतें. म्हणून ह्या सदनाचे हेतू खालील प्रमाणें ठेवण्यांत आले वरिष्ठ वर्गांतील जे कोणी उत्साही स्त्री-पुरुष विशेषतः सुशिक्षित भगिनी आपल्यास वाहून घेऊन मिशनच्या कामास येण्यास तयार असतील त्यांच्यामध्यें कामाची पात्रता येण्यासाठीं त्यांना तयार करणें, आणि ते तयार झाल्यावर आणि होत असतांहि अस्पृश्य वर्गाच्या गरीब स्त्रियांमधून त्यांना कामें देणें. मिशनचें काम अत्यंत उदार धर्माच्या पायावर चाललें होतें. त्यासाठीं दर शनिवारीं व्याख्यानें आणि कीर्तनें होत. रविवारीं सकाळीं धार्मिक शिक्षणाचे वर्ग आणि सायंकाळीं उपासना होत. प्रथम प्रथम हें काम मी स्वतःच माझ्या बहिणीच्या सहाय्यानें करीत असे. सदन निघाल्यावर त्याची स्वतंत्र व्यवस्था चांगली झाली. सणाचे दिवशीं सामाजिक मेळे होत. त्यांत अश्पृश्यवर्गीय स्त्रीपुरुष वरिष्ठ वर्गांच्या स्त्रीपुरुषांत समानतेनें भाग घेत. पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्यानें, ४ कीर्तनें, ५ पुराणवाचनें असे प्रसंग झाले. भजनसमाज उघडण्याच्या दिवशीं परळ आणि देवनार शाळेच्या सर्व मुलांना व्हिक्टोरिया गार्डनमध्यें फिरवून आणून मिठाई वाटण्यांत आली. मोहरमचे सुट्टींत सर्व मुलांना आणखी कांहीं वडिल माणसांना घारापुरी येथील लेणीं दाखवून आणण्यांत आलीं. त्यावेळीं तेथें प्रीतिभोजन झालें. गांवांतील लोकांपासून, जुने वा नवीन कपडे (सुमारें १५००) गोळा करून गरीब लोकांस वाटण्यांत आले. गरीब स्त्रियांसाठीं, विशेषतः कुमारी व विधवांच्या शिक्षणासाठीं शिवणकामाचा वर्ग सुरू करण्यांत आला. त्यांत तयार करण्यांत आलेले कपडेहि वाटण्यांत आले. ह्या लोकांत स्वच्छतेच्या संवयी वाढाव्या म्हणून दर शनिवारीं व रविवारीं शाळांतील मुलांना सदनांत स्नान घालण्याची सोय करण्यांत आली. ह्या साध्या गोष्टीचाहि प्रथम गैरसमज होऊन ब-याच अडचणी येऊं लागल्या. अस्पृश्य वर्गांतील निरनिराळया जातींचीं मुलें एकमेकांत मिसळण्यास कचरत म्हणून ब-याच अडचणी येऊं लागल्या. चिकाटीनें आणि चतुराईनें काम चालवून त्यांतून पार व्हावें लागलें.

शाळा जरी काढल्या तरी त्यावेळीं अस्पृश्यवर्गीय मुलांना शाळेंत रोजच्या रोज जाण्याची सोय नसे व त्यांच्या पालकांना रोजच्या रोज पाठविण्याची आवड नसे. शिक्षणाची अभिरुचि लावून देण्यासाठीं सदनांतील स्त्री प्रचारकांना घरोघरीं भेटी द्याव्या लागत असत. हें काम ख्रिस्ती लोकांचें आहे असें समजून हें मिशनही ख्रिस्ती असावें असा गैरसमज होऊं लागला. त्याचें निराकरण करण्यासाठीं प्रचारक स्त्रियांनीं भारत, भागवत, रामायण वगैरे हिन्दु ग्रंथांचें घरोघरीं वाचन सुरू केलें. एकादशी, शिवरात्री वगैरे हिन्दुसणाचे दिवशीं सदनामध्यें भक्तिविजयासारखीं हिंदु संतांचीं चरित्रें वाचून दाखविण्यांत आलीं. आजा-यांची शुश्रूषा करण्यासाठीं आणि बाळंतपणाची मदत देण्यासाठीं सदनांतील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यांत आलें. श्रीमती वेणूबाई, द्वारकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनांत राहून  हीं कामें उत्कृष्ट रीतीनें करीत. या सदनांतील घरगुती सर्व कामें माझी बहीण जनाबाई पार पाडी व बाहेरच्या कामाचा सर्व बोजा रा. सय्यद अबदुल कादर यांनी उचलला होता. या कामासाठीं निराश्रित महिला समाज ही निराळी संस्थाच जनाबाईनें काढली होती. या महिला समाजाचा पहिला वार्षिकोत्सव सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखालीं साजरा करण्यांत आला होता. या महिला समाजाचीं कामें भायखळा  व परळ येथें दोन ठिकाणीं स्वतंत्रपणें चालत असत.

भायखळा येथील शाळेंत शिवणकामाचा वर्ग शनिवार व रविवार खेरीज रोज भरे. ह्या वर्गामधून बाहेरूनहि कांहीं बायका आपले कपडे शिवून नेत. दोन शिवण्याचीं यंत्रें व एक विणकामाचें यंत्र सदनास मिळालें होतें.

घरोघर भेटीला जाऊन समाचार घेण्याचें काम वर्षभर चालत होतें. त्या कामाचा फायदा आमच्या निराश्रित भगिनींना कितपत मिळाला हें आम्हांस सांगवत नाहीं. परंतु त्याचा आम्हाला मात्र निरीक्षणदृष्टया बारच फायदा मिळाला. घरांतील वर्ग सुमारे ६ महिने चालले. गेल्यावर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यांत आली. पुष्कळांना दवाखान्याचा लाभ देण्यांत आला. पोलीस कमिशनराकडून बेवारशीं मुलें व बायकां मिळून ५ आलीं त्यांची निगा ठेवण्यांत आली.

महिलांच्या समाजाप्रमाणेंच पुरुषांचाहि सोमवंशीय समाज स्थापन करण्यांत आला. इंप्रूव्हमेंट ट्रस्टमधील चाळ नं. ३ मध्यें हा समाज ता. २४ मार्च १९०५ रोजीं स्थापन करण्यांत आला. ह्याचा हेतू अस्पृश्य लोकांकरवींच स्वोध्दारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घ्यावी असा होता. १९१० अखेर पटावर ४० सभासद होते. ते दरमहा चार आणे वर्गणी देत. दर रविवारीं एकेश्वरी मताच्या उपासना त्यांचेसाठीं चालविण्यांत येत. १९१० सालीं ११ जाहीर सभा, अस्पृश्यांच्या निरनिराळया मोहल्यांतून ह्या लोकांनीं घडवून आणल्या. अशाच एका सभेचे वेळीं, ‘एकनाथ व अस्पृश्य जाती’ या विषयावर माझें जाहीर व्याख्यान झालें. ह्या मंडळींचा उत्साह इतका वाढला कीं, या समाजासाठीं एक स्वतंत्र उपासना मंदिर बांधावें असा विचार १९०९ च्या नोव्हेंबरमध्यें ठरून वेळोवेळीं सभा होऊं लागल्या. ह्यासाठीं फंड जमा होऊन ६५० रुपये मुंबई बँकेंत ठेव पंचांच्या नावें ठेवण्यांत आली. परंतु कोणत्याहि कामांत स्थावर मिळकत होऊं लागली म्हणजे वादाची मुळी पेरल्याप्रमाणें होतें. हा अनुभव ह्या लहानशा कामांतहि येऊन कांहीं वर्षानें हें काम बंद पडलें.

ह्या निराश्रित सेवासदनाच्या खर्चासाठीं दयाराम गिडुमल यांनीं दरमहा १०० रु. ची देणगी दिली होती. ती तीन वर्षांसाठींच होती. सुरुवातीचे अनुभव घेऊन पाहण्यासाठींच हे प्रयोग चालले होते. त्या दृष्टीनें पाहतां ह्या मिशनला फार लाभ झाला. प्रचारकांना अशा कामाचा आणि मनुष्यस्वभावाचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष कामापेक्षांहि अधिक महत्वाचा वाटला. लहान लहान आणि वयपरत्वें अंथरुणाला टेकलेलीं माणसें यांचे फार हाल होतात हें माझ्या नजरेस येत असें. गिरणींत बारा तास काम करणा-या माणसांना आपलीं पोटचीं मुलें आणि वृध्द जराग्रस्त आईबापें यांच्या जोपासनेस वेळ मिळत नसे. म्हणून अशांची सेवा हेंच सदनाचें मुख्य काम असे.

अशा कामांतील अनुभवाचीं पुढील कांहीं उदाहरणें लक्षांत घेण्यासारखीं आहेत. मुलांना शाळेंत पाठविण्यासाठीं आमच्यावर विश्वास बसावा म्हणून कांहीं निवडक मुलांना सदनाच्या ठिकाणीं माझ्या आई-बापाकडे मुलें आणून मातेचा लळा लावण्याचा प्रयोग करून पाहिला. लष्करांतून सेवानिवृत्त झालेले एक महान जमादार समजुतदार गृहस्थ होते. ८ वर्षांची एक मुलगी व ६ वर्षाचा एक मुलगा अशीं दोन अपत्यें त्यांना होतीं. आठ आठ दिवस त्या मुलांना आमच्या सदनांत ठेवण्यास ते कबूल झाले. अगदीं आपल्या पोटच्या पोराप्रमाणें त्यांना ठेवून घेण्यास माझी आई देखील कबूल झाली. चंद्राक्का नांवाची माझी धाकटी बहिण नुकतीच वारल्यामुळें विरहाचा मोठा धक्का बिचारीला बसला होता. त्यांतून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून तिनें हें संगोपनाचें कार्य पत्करलें. एके दिवशीं सदनांत कांहीं गोडधोड झालें होतें म्हणून लहानग्या गंगूनें (मुलीचें नांव) नेहमीपेक्षां जरा जास्त खाल्लें. गंगूला आपल्या स्वतःच्या बिछान्यांत घेऊन आई निजत असे. असा लळा लावल्याशिवाय मुलें घर सोडून राहण्यास तयार होण्यासारखीं नव्हतीं. मध्यरात्रीनंतर गंगूला अंथरुणांतच जुलाब होऊं लागले. बिचा-या आईनें सर्व अंथरुण धुऊन काढलें. मुलीला साफसूफ करुन ऊबदार उपचार करुन उजाडण्याचे पूर्वी नीटनेटकें केलें होतें. मी रागें भरेन म्हणून घडलेला प्रकार मला कळविला नाहीं; तर तो मला पुढें कळलाच. मीं माझ्या आईचे पाय धरले. अशा गोष्टींनीं या लोकांचा विश्वास आमच्यावर हळू हळू बसून पुढें लवकरच आमच्या प्राथमिक आणि दुय्यम शाळाच नव्हेत तर एक मोठे विद्यार्थी वसतिगृह देखील चांगलें नांवारूपास आलें.

माझी बहिण जनाबाई समाचारास घरोघरीं जात असतां त्यांना फार खडतर अनुभव आले. एका घरीं एक अगदीं वृध्द बाई अंथरुणास खिळली होती. पडून पडून तिच्या पाठीला जखमा झाल्या होत्या. जनाबाई रोज तिची पाठ शेकण्यास जाई. तिच्या पाठीला शेकण्याला पाणी तापविण्याकरतां जनाबाई चुलीकडे जाऊं लागली. तेव्हां बाई म्हणते, “बाई तुमचे फार फार उपकार आहेत. पण माझ्या चुलीला शिवूं नका. तुम्हां ख्रिस्ती लोकांनीं चूल बाटविल्यास लोक मला नावें ठेवून वाळींत टाकतील.” जनाबाईला आपल्या घरचा स्टोव्ह नेऊन आपलें स्वीकृत काम मुकाटयानें करावें लागलें.

राही नांवाच्या दुस-या एका वृध्द बाईला असाध्य जखमा झाल्या होत्या. मोठया सायासानें ह्या बाईला जे. जे. हॉस्पिटलांत पोहोंचविण्यांत आलें. दुसरे दिवशीं तिचा समाचार घेण्यासाठीं जनाबाई जाऊन पाहाते तों तिच्या तरुण मुलानें तिला घरीं नेलेलें आढळलें. आणि हा उपद्व्याप केल्याबद्दल त्याच्याकडून बराच शिव्यांचा प्रसादहि मिळाला. घरीं नेऊन आपल्या वृध्द आईच्या थोबाडांतहि त्यानें मारल्याचें कळलें. मुलगा दारूच्या निशेंत होता म्हणूंनच हीं कृत्यें त्याच्याकडून पार पडलीं. तो कामावर गेल्यावर जनाबाई त्या बाईला भेटण्यास घरीं गेल्या. मुलगा रेल्वेंत मजूर होता. दारूच्या निशेंत रेल्वे ओलांडीत असतां दोन्ही डब्यांत चेंगरून जागच्याजागीं ठार झाला. तेव्हां त्याची आई ‘बाळा, माझ्या तोडांत मारायला तरी पुन्हां येरे’ असे हंबरडे पुत्रशोकानें फोडूं लागली. त्याच शोकांत म्हातारीचा त्या रात्रीं शेवट झाला आणि जनाबाईचें हें हृदयविदारक कामहि संपलें.

पुष्कळ बायांना गरोदरपणीं व बाळंतपणीं फार नाजुक उपचार करण्याची पाळी येई. मिशनचे हितचिंतक मोठमोठे स्त्रीडॉक्टर असत. ते औषधोपचार सांगत. पण शुश्रूषेचीं कामें सदनांतील स्त्रियांवर पडत. एनीमा देणें वगैरे नवीन उपचाराचें काम आल्यास जुन्या मताच्या रोग्यांना आवरणें फार कठीण होई. ते अत्यंत बीभत्स शिव्या देत निघून जात.

खालच्या वर्गांत मुरळी सोडण्याची चाल त्यावेळीं जारी असे मदनपु-यांत आमच्या शाळेंत येणा-या एका मुलीला मुरळी सोडणार आहेत असें कळल्यावरून सदनांतील भगिनी चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यास त्या मुलीच्या आईकडे गेल्या. आपल्या धर्मांत हात घातल्याबद्दल अत्यंत संताप येऊन पुन्हां आमच्या अंगणांत येऊं नका असें त्या मुलीच्या आईनें दरडावून सांगितलें आणि आपल्या मुलीला शाळेंतून काढून घेतलें.

एकदां पुण्याच्या डॉ. मॅनकडून मुरळी सोडलेली एक मुलगी सदनांत आली. तिला अंग भरून वाईट रोग जडला होता. तिची कोठेंहि व्यव्सथा होत नसल्यानें निर्वाणीचा उपाय म्हणून ही मुलगी सदनांत पाठविली गेली. पण मुलाबाळांनीं भरलेल्या सदनांत ही मुलगी ठेवणें धोक्याचें होतें. म्हणून आमच्या भायखळा येथील शाळेजवळ एक स्वतंत्र खोली घेऊन जनाबाईला तिच्यासाठीं निराळें रहावें लागलें. मुलगी फार आडदांड स्वभावाची होती. बरेच दिवस तिनें फार त्रास दिला. पुढें बरी झाल्यावर आणि चांगली शिकल्यावर तिचा योग्य स्थळीं विवाह करून देण्यात आला. ही मुलगी महाराची होती. ती हल्लीं निजाम हैद्राबाद येथें शिक्षकीण आहे, वेळोवेळीं पोलीसांकडून अनाथ अर्भकें सदनांत पाठविलीं जात. अस्पृश्य म्हणून इतर अनाथालयांत त्यांचा शिरकाव होणें अशक्य होतें. अशा मुलांना पंढरपूरच्या आश्रमांत किंवा मालाड येथें काढलेल्या दयाराम शेठच्या आश्रमांत पाठविण्यांत येई.