प्रकरण ६. दक्षिण महाराष्ट्रांतील दौरा

 अशा वेळीं माझ्या मुलाच्या मृत्यूमुळें मीं वैतागून मनःशांतीसाठीं महाराष्ट्रांत व कर्नाटकांत दौरा काढला. बरोबर डॉ. रुबेन व स्वामी स्वात्मानंदजी यांना घेतलें. प्रथम ठाण्यास उतरलों. तेथें डॉ. संतुजी रामजी लाड यांचे घरीं राहून उपासना चालविली. जाहीर व्याख्यान झालें. त्यांत तेथील सभासद रा. गुप्ते यांनीं भाग घेतला. त्यानंतर नाशीक येथें तेथील सुप्रसिध्द वकील माझे मित्र रा. निळकंठराव पाटणकर यांचेकडे उतरलों. जाहीर व्याख्यानें व खासगी संभाषणें सुरू झालीं. पण सर्वांत डॉ. रुबेनचें भजन लोकप्रिय ठरलें. भजनमार्गांत फारसा शुध्द बुध्दिवाद किंवा रुक्ष प्रयत्नवाद आम्हा हिंदु लोकांना मानवत नाहीं. भक्तिरसाच्या पुरांत वहात जाणें आवडतें. रुबेननें एकतारीवरील भजनांत कांहींहि मत प्रतिपादलें तरी चालेल; एरव्ही खटखट नको असें एका पुढा-यानें स्पष्ट सांगितलें. रा. पाटणकरांचे ओळखीनें व सूचनेवरून नाशीक जिल्ह्यांतील आसवले येथें राहणा-या अस्पृश्यवर्गाच्या श्रीमंत पुढा-याकडे गेलों. पण आम्हां तिघांचा हा विचित्र प्रवेश पाहून आम्ही कांहीं तरी मागावयाला भिकार बैरागीच आलों अशी समजूत करून घेऊन मुख्य मालक आम्हांस घराबाहेर भेटावयासच आला नाहीं. आम्हीं कंटाळून नदीवर जाऊन स्नान वगैरे उरकलें. खावयास वगैरे आमच्या जवळ उन्हाशिवाय कांहींच नव्हतें. मुकाटयानें आम्हीं अहमद नगराची वाट धरली. पुढें रा. पाटणकरांनीं या गृहस्थाची चांगलीच हजेरी घेतली.

अहमदनगरचें काम आटोपून आम्ही बारामतीस आलों. डॉ रुबेननीं अहमदनगराहूनच आमची रजा घेतली. आणि त्यांची जागा रा. लक्ष्मण मनकू सत्तूर यांनीं घेतली. बारामतीला ब्राह्मधर्माचा प्रसार अगदीं नवीन होता. बैलगाडीनें आम्ही तिथून पंढरपुरास गेलों. तेथें प्रार्थना समाजाच्या बालहत्याप्रतिबंधक गृहांत उतरलों. तेथील हायस्कूलचे प्रमुख रा. मोडक आमच्या परिचयाचे होते. स्वात्मानंदजीचें व माझें अशीं दोन व्याख्यानें दोन दिवशीं स्वारीनें जाहिराती लावून आपल्या शाळेंत केलीं. पण आयत्यावेळीं पाहतों तों या स्वारीचा डाव भलताच होता. अर्धा तास उलटून गेला तरी शाळेंत एक चिट्पाखरूंहि आलें नाहीं. हेडमास्तरांनीं आपल्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणीं नाकेबंदी केल्यामुळें आमचा हा कोंडमारा झाला. अक्षरशः रिकामीं बाकें आमच्या समोर दिसूं लागलीं. स्वामी स्वात्मानंदजी मोठे करारी. “शिंदेजी, आज हम व्याख्यान करेंगे. आप सुनीये, कल आप कीजिये और मैं सुनोगा.” असें म्हणून त्यांनीं संपूर्ण व्याख्यान दिलें. दुसरे दिवशीं मींहि तसेंच केलें. हें पंढरीमहात्म्य! “हा तो कांहीं नव्हे निराशेचा गांव। भले पोटीं वाव राखिलीया॥“ पुढें सोलापुरास सरकारी वकील रा. नागेश पै यांचेकडे उतरलों. तेथील रिपन क्लबांत व्याख्यान झालें. पंढरपूरच्या उलट प्रकार घडला. व्याख्यानावर चांगली चर्चा झाली. विजापुरांत रा. आजरेकर वकिलांच्याकडे उतरलों. तेथील एका थिएटरांत व्याख्यान झालें. आमच्याबरोबर ब्रह्मो पोस्टल मिशनच्या पत्रिकांचा व पुस्तकांचा गठ्ठा होताच. ही सामुग्री आम्ही सढळ हातानें वाटील चाललों. हुबळीस सर नारायण चंदावरकरांचे व्याही रा. नारायणराव
शिरूर यांचा कळकळीचा पाहुणचार घेतला. म्युनिसिपल हॉलमध्यें व्याख्यान झालें. धारवाडांत उतरण्याची विवंचना पडली. तेथील माझे बालमित्र रा. जनार्दन सखाराम करंदीकर यांची गांठ पडली. त्यांनीं उतरण्याची व कामाची उत्तम व्यवस्था केली. बेलगांवास आम्ही मणेरीकर यांचेकडे उतरून त्यानंतर पुण्याहून मुंबईस आलों.

घरीं पर येईतोंपर्यंत मंडळींचा आजार वाढला होता. अशा घाईंत काशी येथील भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेची कामगिरी अंगावर घ्यावीच लागली. पुढील नाताळांत तें काम आटोपून बंगाल, बिहार, आसामच्या लांब दौ-यावर निघालों. शेवटीं बारीसाल येथें जाहीर व्याख्यान करीत असतां घरून एक तांतडीची तार हातीं आली. मुंबईस सौ. रुक्मिणीबाई हिच्यावर कामा हॉस्पिटलमध्यें एक कठीण ऑपरेशन झालें, आणि अहमदनगर येथें बहिण चंद्राक्का मृत्युशय्येवर पडली आहे असा मजकूर होता. डॉ. वैकुंठ कामत यांनीं ही तार केली होती. जवळजवळ तीन हजार मैलांचा दौरा टाकून मी तांतडीनें घरीं निघालों. रात्रीं १२ वाजतां अहमदनगर येथें पोहोंचलों. प्रिय भगिनीचें शेवटचें दर्शन घेऊन मी पुन्हां येतों असें आश्वासन देऊन पत्नीच्या समाचारास मुंबईस गेलों. दुसरे दिवशीं चंद्राक्काच्या निधनाची बातमी आली. १९०६ चा फेब्रुवारी तारीख दोन हा दिवस. ह्याचें नांव प्रचारकार्य !

ता. १२ फेब्रुवारी १९०४ रोजीं ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे सेक्रेटरी यांचेकडून पत्र आलें. त्यांत सेंट्रल पोस्टल मिशन, लंडन या संस्थेनें प्रार्थना समाजामार्फत ह्या मिशनचें कार्य यशस्वी रीतीनें चालविल्याबद्दल शिंदे सुखटणकर यांचे अभिनंदनाचा ठराव पास केला. त्यानंतर ता. १८ ऑक्टोबर १९०४ रोजी वरील संस्थेकडून दुसरें पत्र येऊन त्यांत ह्याच कामाचा विस्तार करण्यासाठीं उदार धर्मवाचक ग्रंथांचा एक विशेष वर्ग चालवून त्यांत विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पारितोषिकें देण्याची व्यवस्था केल्यास तूर्त १०० रु. ची देणगी पाठवूं काय असें विचारलें होतें.

कलकत्यास हेमचंद्र सरकारनें असा वर्ग काढून त्यांना अशी देणगी देण्यांत आली होती. उदार धर्मवाङ्मयाचा प्रसार हिंदुस्थानांत अधिक प्रमाणावर करण्यासाठीं ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचा प्रतिनिधी या नात्यानें काम चालविण्यास माझीं इतर कामें सांभाळून मी तयार आहें कीं नाहीं हें विचारलें होतें. तयार असल्यास वाङ्मयाचा अधिक सांठा गरजेप्रमाणें पुरविण्याची हमी घेतली होती. त्यासाठीं जो खर्च होईल तोहि वेळोवेळीं रोख पाठविण्याची कबुली दिली होती. त्यांना मीं उत्तरीं कळविलें कीं, ‘मीं हा विशेष वर्ग चालविण्याचें कार्य आधींच सुरू केलें होतें. ह्या वर्गांतील हजेरीपटावर सुमारें ३० अंडर ग्रॅज्युएट्चीं नांवें होतीं. तूर्त विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेंत गुंतले असल्यामुळें हा वर्ग बंद ठेवण्यांत आला आहे. योग्य वेळीं सालोसाल तो पुढें चालू होईल.’ ही व्यवस्था कित्येक वर्षें चालू ठेवण्यांत आली, त्यामुळें तरुणांचें लक्ष समाजाचे कामाकडे विशेष लागलें.