प्रकरण १७. अंतर्बाह्य खळबळ (2)

त्या अर्जामध्यें पुढील विशेष मागण्या करण्यांत आल्या : (१) ना. गर्व्हनरांनीं मिशनच्या घटनात्मक नियमाप्रमाणें मिशनचे पेट्रन म्हणून पांच हजार रुपये देऊन उदार आश्रयदाते व्हावें. (२) मुंबई सरकारनें मातृसंस्थेला उदार ग्रँटइन्-एड (वर्षासन) द्यावी. (३) मिशनचा ५००० रु. फंड वेगळा काढून ठेवला आहे. त्यापासून मुंबई इलाख्याच्या मध्यभागाच्या ३ जिल्ह्यांतून सरकारी मान्यता दिलेल्या शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीं शिष्यवृत्या देण्याचें ठरविलें आहे. ह्या खर्चाचा १/३ खर्च मुंबई सरकारनें ग्रँट म्हणून दरसाल द्यावा. (४) ह्या फंडाला मिस् व्हायोलेट क्लार्क मेमोरियल शिष्यवृत्या फंड हें नांव देण्याला परवानगी असावी. (५) मुंबई इलाख्याच्या शिक्षण खात्यानें इलाख्यांतील दुय्यम शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांचा अधिक प्रवेश व्हावा आणि त्याविषयींचे सविस्तर अहवाल शिक्षण खात्यानें प्रसिध्द करावे असें त्या खात्याला हुकूम सुटावे. (६) इलाख्यांतील म्युनिसिपालिटयांना आणि इतर स्थानिक संस्थांना अस्पृश्यांसाठींही नवीन शाळा काढण्यासाठीं आणि जुन्या शाळांतून हजेरीची संख्या वाढविण्यासाठीं सूचना देण्यांत याव्यात.

वरील मागण्यांना नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपल्या मगदुराप्रमाणें उत्तरे दिलीं. सूचना केली कीं, लोकमतावर परिणाम करण्याचें मिशनचे काम सर्वांत महत्वाचें आहे आणि शिक्षणाचे बाबतींत नुसतें वाङ्मयीन शिक्षण देऊन न राहतां औद्योगिक शिक्षणाकडे मिशननें लक्ष्य पुरवावें. ह्या नंतर डेप्युटेशनच्या सभासदांना गर्व्हनरसाहेबांनीं अल्पोपाहार दिला आणि प्रत्येक सभासदाचें प्रेमळपणें स्वागत केलें.

मिशनच्या मागण्यांचा अर्ज आणि त्याला गव्हर्नरनें दिलेलें समर्पक उत्तर ह्यांच्या निराळया प्रती छापून प्रत्येक जिल्ह्यांतील अधिका-यांकडे पाठवून द्याव्यात आणि मिशनच्या मागण्यांकडे जिल्ह्यांतील म्युनिसिपालिटयांचें लक्ष्य वेधावें असा मुंबई सरकारनें लवकरच ठराव पास केला. इतकेंच नव्हें तर स्वतः गव्हर्नरसाहेबांनीं पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजास भेट दिली त्यावेळीं जें भाषण केलें त्यांत कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांचें लक्ष्य ह्या मिशनच्या कार्याकडे वळविलें. ते म्हणाले, “हिंदुस्थानांतील निरनिराळ्या मिश्र जातींना एकत्र  करून लवकरच हिंदुस्थानांत एक राष्ट्राची उभारणी करावी हा सरकारचा हेतू आणि कर्तव्य आहे. हें कार्य सर्वत्र चालू झाल्याचीं लक्षणें हल्लीं दिसत आहेत. त्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कार्यामुळें हिंदुस्थानांत विश्वबंधुत्व निर्माण होत आहे. त्याचा मी येथें विशेष उल्लेख करतों. इंग्लंडांतील पुष्कळ कॉलेजांकडून असा मिशनसाठीं मिशन-यांचा पुरवठा होत आहे. तुम्ही देखील ह्या बाबतींत आपला शक्य तो वेळ पुरवून पुणें येथील कार्याला मदत कराल तर बरें होईल.”
मिशनच्या ४ थ्या बक्षिस समारंभानिमित्त ५ दिवस उत्सव करण्यांत आला. त्यांत चोखामेळयाचे प्रसिध्द हरिदास धोंडीबा सासवडकरांची कन्या प्रसिध्द कीर्तनकार सौ. बायजाबाई हिचीं तीन कीर्तनें करण्यांत आलीं. भायखळा येथील मदनपुरा मोटारस्टँडवर भव्य मंडप घालण्यांत आला होता. त्यांत मुंबई येथील सर्व जातीचे गिरणी कामगार आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या स्त्रीपुरुषांची अलोट गर्दी जमली होती. बाईचीं कीर्तनें बहुजनसमाजास इतकीं आवडलीं कीं तिसरे दिवशींची रात्रीची गर्दी अनावर झाली. मांडवाचे खांब पाडून गर्दी आंत शिरूं लागली. मांडव जमीनदोस्त झाल्यानें कीर्तन बंद करावें लागलें. दुसरेच दिवशीं मुख्य समारंभाचा दिवस असून ना. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क हे अध्यक्षस्थान स्वीकारणार होते. आयत्यावेळीं त्यांची कन्या वारल्यामुळें गेल्या वर्षी विरस झाला होता. त्याची पुनरावृत्ति ह्या वर्षी हा मंडप पडल्यामुळें होते कीं काय अशी भीति वाटूं लागली. मिशनचे उत्साही कार्यकर्ते रा. अमृतलाल ठक्कर, त्यावेळचे मुंबई कार्पोरेशनचे इंजिनियर ह्यांनीं रात्रीचा दिवस करून शेंकडों मजूर लावून पहिल्यापेक्षांहि चांगला मंडप दुसरे दिवशीं दुपारचे आंत उभा करून बैठकीची जय्यत तयारी करून दिली. गांवांतील नामांकित लोकांची गर्दी उसळली होती. सर नारायणराव यांनीं गव्हर्नरसाहेबांचें योग्य स्वागत केलें.

नामदार गव्हर्नरांनीं यावेळीं केलेल्या सहानुभूतिपर भाषणाचे खालील उद्गार चिरकाल संस्मरणीय राहतील. “ह्या मिशनचे काम दुहेरी. एका बाजूस वरिष्ठ वर्गाचें लक्ष्य अस्पृश्य वर्गाच्या दुःखांच्या कहाणीकडे वेधणें, दुस-या बाजूला ह्या अस्पृश्यांना शिक्षण देऊन वर आणणें. माझ्यापूर्वीचे एक प्रसिध्द गव्हर्नर मौंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ह्यांनीं आपल्या मार्च १८२४ च्या खलित्यांत अस्पृश्यांविषयीं असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, ह्या अस्पृश्य वर्गाचे लोक संख्येनें अत्यंत मोठें आणि अत्यंत तिरस्कृत गणले गेले आहेत. ब्रिटिश सरकारनें जर ह्यांना शिक्षण दिलें तर ते उपयुक्त ज्ञानामध्यें सर्वांच्या शिखरावर बसतील; पण इतर वरिष्ठ वर्गाचा त्यांच्याबद्दलचा तिरस्कार कायम राहील आणि शिक्षण घेऊन हे ज्ञानसंपन्न झाले असता ह्यांचा तिरस्कार करणा-या बहुजनसमाजाला एका बाजूस ठेवून ह्या तिरस्कृत पण नवीन सुशिक्षितांना आम्हाला हाताशीं धरावें लागेल. ८७ वर्षांपूर्वींच्या मोठया मुत्सद्याचे हे उद्गार आहेत. ह्या तिरस्कृत वर्गास जर आम्ही शिक्षण देऊं तर प्रत्यक्ष शिक्षणाचाच वरिष्ठ लोक तिरस्कार करूं लागतील. असी भीति ह्या मुत्सद्याला पडली होती. आतां भारतांत किती बदल झाला आहे. तेव्हां भारतीयांच्या मनांत कोणत्याही प्रकारचा किंतू येऊं न देतां त्यांना शिक्षण घ्यावें लागत होतें. आतां कांहीं झालें तरी शिक्षणाचा मगदूर आणि पात्रता न पाहतां शिक्षण घ्या अशी एकच ओरड सुरू झाली आहे. आतां तुमच्या मिशनची अशी इच्छा आहे कीं, ह्या अस्पृश्यवर्गांनाही त्या शिक्षणाचा पूर्ण वांटा मिळावा.”

ह्यानंतर नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपली पूर्ण सहानुभूति व्यक्त करून भाषण संपविलें. गेल्या वर्षी मि. जॅक्सन साहेबांच्या खुनामुळें मिशनसंबंधीं कांहीं सरकारी अधिका-यांच्या मनांत जो व्यर्थ गैरसमज पसरला होता, त्यांच्या कानावर प्रांताधिपतींचे हे रोखठोक उद्गार जाऊन त्यांच्या संशयाचा निरास झाला अशी मिशनच्या चालकांची अखेरची खात्री झाली.

ह्याच वेळीं प्रचारकांनीं अमक्या अमक्या नियमाप्रमाणें वागावें, वेळोवेळीं कामाचे अहवाल पाठवावेंत, रोजनिशी ठेवावी वगैरे किरकोळ वाद धुमसतच होता. अहवाल तर वर्षाकाळीं मी लिहितच होतो आणि वेळोवेळीं वर्तमानपत्रांत प्रसिध्द करीत होतो. माझ्या कार्यास अशा प्रसिध्दीची जरुरीच असे. पण हीं कामें लेखी नियमांच्या चौकटींत बसविणें आणि त्यावर आग्रह धरणें हें मला केव्हां केव्हां परवडत नसे. ह्यामुळें मी वेळोवेळीं रंजीस येऊं लागलो. समाजाचें काम मीं माझें आध्यात्मिक काम म्हणून पत्करलें होतें. एकाद्या ऐहिक नोकरीप्रमाणें लेखी राजीनामा देऊन तींतून सुटून जाणें मला इष्ट वाटेना. ज्या नोकरीचा मीं अर्ज केला नव्हता ती कशी संपणार ? विश्वासानें मला हांक मारली होती ती मी तितक्याच विश्वासानें कसल्याहि ऐहिक अटी न घालतां स्वीकारली होती. म्हणून हा प्रसंग अंतस्थ खळबळीचा होऊन राहिला. ह्यांतून मला एकच मार्ग दिसूं लागला. तो हाच कीं, समाजानें मला जें अल्पसें वेतन देऊं केलें तें बंद करावें; पण समाजाची नोकरी सोडूं नये. मीं नेहमीं फिरतीवर हिंडत होतो. घरीं पत्र लिहिलें कीं माझ्या पश्चात् कोणी हें वेतन आणून दिल्यास घरच्या मंडळींनीं तें स्वीकारूं नये. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे १९१० सालच्या नोव्हेंबर महिन्यांत समाजाचा व माझा प्रचारक या नात्यानें संबंध सुटला, असा समाजाच्या कमिटीनें ठराव करून मला कळविलें. माझें मन शांत झालें. मिशनची निराश्रित सेवासदनाची दयाराम गिडूमल यांची देणगी ह्याच सालीं दीड महिना अगोदर बंद झाली होती. म्हणून माझी बहिण जनाबाई यांचेंहि वेतन बंद झालें. तरी त्यांनीं पूर्वीप्रमाणेंच काम चालूं ठेवलें. समाजाचे प्रचारक या नात्यानें मीं आपलें काम १९०३ नोंव्हेंबरपासून १९१० नोव्हेंबर अखेर सतत ७ वर्षें केलें. त्यांत मीं मोठी पात्रता दाखविली असें मला मुळींच वाटत नव्हते. कामच असें होतें कीं, त्यांत आत्मसंतोषाला जागाच नाहीं.

माझ्या घरीं मी आणि जनाबाई येवढींच काय तीं मिळवतीं माणसें. काम अमर्याद आणि मिळकत मात्र अत्यंत मर्यादित आणि अनिश्चित. असा स्थितींत घरच्या माणसांचे हाल होणें हें साहजिकच होतें. आम्हीं बाहेरगांवीं मोकळया हवेंत राहिलेलों. मुंबईसारख्या दाट वस्तीमध्यें घरच्या मंडळींची प्रकृति नीट राहीना. १९०६ सालीं धाकटी बहीण चंद्राबाई नगर येथें वारली. माझ्या पत्नीवर बाळंतपणांत अत्यंत कठिण शस्त्रक्रिया करावी लागली. पांच सहा महिन्यांनीं, नवीन जन्मलेलें मूल वारलें. माझ्या मातोश्रीला कॅन्सरचा असाध्य रोग जडला. १९१० सालीं माझ्या पत्नीचा आजार बळावून अस्थि-क्षय (Bone Tuberculosis) झाल्यानें त्यांना सुमारे ६ महिने खाटेशीं जखडून ठेवावें लागल्यानें, १९१० सालीं फेब्रुवारी ८ ला माझ्या मातोश्रीचा अंत होऊन तिची अत्यंत कठिण व्याधींतून मुक्तता झाली. तिचा ध्यास घेऊन माझे बाबाहि त्याच सालच्या जून २७ तारखेस कालवश झाले.

वार्धक्यांतील दुर्बलता आणि व्याधीच्या वेदना सोसूनही माझे आई व बाबा महारवाडयांत घाणेरडया वस्तींत स्वतः राहून मला मदत करीत असत. मला मात्र प्रार्थना समाजाच्या कामासाठीं राममोहनराय आश्रमांत राहावें लागे. पुढें मिशनची आर्थिक स्थिति सुधारून सुसंघटित वसतिगृहें सुरू झाली. पण त्यापूर्वी अस्पृश्यांची पोरकी आणि होतकरू मुलें आमच्या निराश्रित सेवासदनांत येत. ती वयानें लहान असत. त्यांचें संगोपन करण्याचें काम माझ्या आईनें आनंदानें पत्करले होतें. मिशनच्या विद्यार्थ्यांसाठीं हितचिंतकांकडून जे जुने कपडे येत त्यांत कांहीं चांगली चांगली लुगडी येत. ती कापून त्याचे लहान लहान परकर, पोलकी, अंगडी, टोपडी वगैरे करण्याचें काम आई काटकसरीनें करीत असे. टायपिस्ट आणि कारकून हे पुढें मिशनला मिळाले. पण त्यापूर्वी मिशनच्या सन्माननीय खजिनदाराच्या हाताखालीं पध्दतशीर हिशोब लिहिणें, ऑडीटसाठीं पावत्यांची जंत्री करून ठेवणें वगैरे तपशीलाचें व दगदगीचें काम माझे बाबा चोख करीत. ह्या कामांत जमखंडी संस्थानांत त्यांची ख्याति चांगली असे. हीं कामें करीत असतांना ह्या दोघांच्या पवित्र मनाला वेतनाच्या विचाराचा स्पर्शही झाला नाहीं. पण ह्यापेक्षां विशेष म्हणजे मिशनच्या कामीं माझ्या सत्वाची एकसारखी पारख चालली असतां मला माझ्या आईबापांचा मोठा आश्रय असे. तो असा एकदम तुटल्यामुळें मी एकाद्या पोरक्याप्रमाणें हवालदिल झालों.

अशी ही अंतरबाह्य खळबळ उडून मी वर सांगितल्याप्रमाणें १९१० नोव्हेंबरांत प्रार्थना समाजाच्या वेतनाच्या बंधनांतून सुटलों. त्यावेळपर्यंत मी राममोहन आश्रमांत राहात होतो. मी होऊनच वेतन नाकारलें; आश्रमाचा फायदाहि मी होऊनच नाकारावा हें स्पष्ट दिसले. आश्रम ज्या उदार गृहस्थानें समाजाला दिला त्या शेठ दामोदरदासांनीं मी आश्रम सोडून जाऊं नये अशी मला मोठी गळ घातली. पण शरीराच्या स्वास्थाला, मानसिक शांतीचीच अधिक जरूरी असते. म्हणून मी वांद्रा येथें मोकळया हवेंत एक लहानशी जागा भाडयानें घेतली आणि आश्रमाला रामराम ठोकला. परंतु समाजांतील सलोखा बिघडला नाहीं. समाजाचे चिटणीस माझे मित्र रा. द्वा. गो. वैद्य ह्यांनीं माझ्या योगक्षेमाची जबाबदारी आपल्यावर व्यक्तिशः घेतली. समाजांतील आणि बाहेरच्या कांहीं थोडया चाहत्या मंडळीकडून खासगी रीतीनें वर्गणी जमा करून माझ्या मित्रानें पुढें दोन वर्षें माझी तरतूद राखली. कोणाकडून वर्गणी जमविली हे त्यानें मला मुळींच कळूं दिलें नाहीं. मात्र माझ्या स्वातंत्र्याला आणि सुधारणाकार्याला बाध न येईल अशा करारानें ही मदत करावी अशी अट मी घातली होती. ती ह्या भल्या मित्रानें पूर्णपणें पाळली. असा रीतीनें माझ्या संसाराचे गाडे चालले आणि ६०० रु. दरमहा नियमानें येऊं लागले.