प्रकरण ५. घरच्या अडचणी

घरच्या अडचणी
समाजाच्या स्थानिक कामाला अशा रीतीनें रंग चढला पण इकडे घरच्या मंडळीची हलाखीची स्थिति वाढत चालली. जमखिंडीसारख्या खुल्या हवेच्या आणि साध्या राहणीच्या बाहेर गांवाहून आलेल्या आमच्या मंडळींना मुंबईची दाट वस्ती व कोंदट हवा नीट मानवेना. माझी पत्नी सौ. रुक्मिणीबाई हिला १९०४ आक्टोबरचे सुमारास तिसरा मुलगा विश्वास झाला. ह्या बाळंतपणापासून तिची प्रकृति खालावली. आईबाप वृध्द आणि बहिणी शाळेंत जाणा-या किंवा सार्वजनिक कामांत पडणा-या म्हणून घरकामावरचा सारा भार माझ्या पत्नीवरच पडल्यामुळें तिची तारांबळ उडाली. अशा स्थितींत माझी धाकटी बहिण चंद्राक्का हिला क्षयाची भावना जडली. १९०१ सालीं माझे मित्र वासुदेवराव सुखटणकर यांची बहिण शांताबाई ही माझे बहिणीसह पुण्याचे हुजुरपागेच्या हायस्कूलमध्यें शिकत होती. ती प्रकृतीनें फार अशक्त होती. सुखटणकरांची आई वारल्यामुळें तिची काळजी घेण्यास घरीं कोणी नव्हतें. पुढें तिला क्षयाची भावना झाली म्हणून आमचे घरीं जमखिंडी येथें हवापालटीसाठीं नेण्यांत आलें. पुढें ती त्या रोगानें वारली. माझी बहिण चंद्राक्का ही नेहमीं तिच्या सहवासांत व शुश्रूषेंत असल्यामुळें आणि पुढें मुंबईतील कोंदट हवेचा तिच्यावर परिणाम झाल्यानें तिला तोच रोग जडला. माझ्या वृध्द आईबापांस ही एक चिंता उपस्थित झाली. १९०५ च्या उन्हाळयाचे आरंभीं माझे बाबा चंद्राक्काला घेऊन खंडाळयाला हवाफेरीसाठीं राहूं लागले. तेथून पुण्यास वेताळ पेठेंतील भाजेकरांच्या वाडयांत स्थानांतर केलें. मी मुंबईहून जाऊन येऊन रहात होतों. या वर्षीं मी पुण्यांतच जास्त राहून तेथील समाजाचे कामांत मदत करूं लागलों.

ह्या सालांतील रामनवमीच्या दिवशीं पुणें येथील मीठगंज पेठेंत अस्पृश्यांसाठीं एक रात्रीची शाळा उघडली. त्यावेळीं जनाक्का व तान्याक्का उन्हाळयाच्या सुटीनिमित्त घरीं आल्या होत्या. शाळा उघडण्याचा समारंभ झाला; त्यांत हुजुरपागेंतील ब-याच मुली हजर होत्या. भिजलेली डाळ व उसाचा रस वाटण्यांत आला. हा समारंभ भाजेकरांचे वाडयांतच करण्यांत आला. समारंभास कांहीं ख्रिश्चन मुली हजर होत्या. त्यांतील एक मुलगी उसाच्या रसांत थुंकली आहे अशी खोटी हूल इतरांनीं उठविली. त्यामुळें समारंभाचा बराच विरस झाला. या अपशकुनामुळें या शाळेंत पुढें वेळोवेळीं अडचणी येऊं लागल्या. ही शाळा पुणें प्रार्थना समाजाच्या स्वाधीन करण्यांत आली आणि अखेरीस पुढें निघालेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनमध्यें सामील करण्यांत आलीं.

सुबोध-पत्रिकेच्या ता. १९-३-१९०५ च्या अंकांत खालील इंग्रजी मजकूर आहे :
A friend writing from Poona says that the presence of Mr. V. R. Shinde there, is infusing a new spirit in the Prarthana Samaj of that town. he has within the short time that he has been there, organised a Sangat Sabha which meets on every Wednesday from ६ to ७ p.m. The Liberal Religious Reading Class which is conducted by him and where at present he is reading Armstrong’s ‘Gos and the Soul’ with the pupils, meets in the Prarthana Samaj every Friday evening and is attended on an average by १६ students from the Fergusson, Decoan and Science Colleges. Mr. Sinde has opened similar classes in the first two Colleges but they will have to be closed when the college classes break up for the Summer vacation. Besides this as a result of his labour the Tukaram Society, presided over by Dr. Bhandarkar has begun to meet regularly. Mr. Shinde is trying to open an Arya Mahila Samaj on the lines of Bombay. Altogether, Poona Prarthana Samaj affairs are showing a life which our friend hopes will continue for a long time to come.

चंद्राक्काच्या प्रकृतींत कांहीं केल्या उतार पडेना म्हणून तिला अहमदनगरच्या कोरडया हवेंत न्यावें लागलें. वासरामागील गाईप्रमाणें वृध्द आईबाप बरोबर होतेच. नगरांत हा प्रकार तर मुंबईंत सौभाग्यवतीची तब्येत अधिकाधिक बिघडत चालली होती. तशांत तिसरा मुलगा ऑक्टोबर महिन्यांत वारला, म्हणून चि. जनाक्कास मुंबईस आणावें लागलें. तिलाहि त्याच वेळीं प्लुरसीची (Pleuricy) व्यथा जडली. असा भौतिक अडचणींत माझें मन उद्विग्न होण्यास आणखीं एक कारण घडलें. माझ्या प्रचारकार्यावर नियंत्रण पडावें म्हणून स्वतंत्र नियमांची एक रचना करण्याचें घाटूं लागलें. त्याचेसाठीं एक पोटकमिटी नेमून तिच्या तंत्रानें प्रचारकानें वागावें अशी वाटाघाट सुरू झाली. हें माझ्या स्वतंत्र प्रकृतीला पटेना. आधीं काम करावें मग अनुभव घ्यावा; आणि नंतर योग्य वेळीं नियम करावे हा स्वाभाविक क्रम मला बरा वाटूं लागला. एकीकडे पैशाची तरतूद नाहीं, दुसरीकडे कामाचा अंदाज नीट नाहीं अशा स्थितींत शाब्दिक नियमांची गडबड मला अवेळीं आहे असें वाटूं लागलें. सुखटणकरांचीं पत्रें याच बाबतींत अनुकूल अशीं जर्मनींतून येत असत. समतोल बुध्दीनें प्रत्येक नियमावर त्यांनीं अभिप्राय दिला. प्रचारकानें सभासदांच्या घरीं गृह्यसंहार चालविण्याचें काम समाजानें ठरविलेल्या संस्कारासंबंधानेंच करावें अशा अर्थाचा एक नियम होता. ब्राह्मसमाजाच्या स्वातंत्र्याला हा नियम बाधक होता, म्हणून तो वगळावा असें सुखटणकरांचें मत पडलें. मला हा सर्वं घाटच अनवश्यक आणि उगाच चालू गाडयांत खीळ घालणारा वाटून माझें मन उद्विग्न झालें. मीं माझ्या कामाची डायरीच ठेवावी, वरचेवर अहवाल घ्यावा वगैरे पिरपिर सुरू झाली. माझ्या कामाच्या ओघांत मी हीं कामें स्वयंस्फूर्तीनें प्रथमपासूनच करीत होतों, पण अमक्याच वेळी व अमक्याच पध्दतीनें तीं व्हावींत ह्या नियमांमुळें माझ्यावर अनवश्यक कामाचा बोजा पडूं लागला. आणि पुढें पुढें हा मतभेद अधिक वाढीस लागला.