रोजनिशी- प्रस्तावना-१८

मराठीमध्ये रोजनिशीवाङ्मयाची वानवाच आहे. अलीकडच्या काळातील एकदोन लक्षणीय रोजनिशा म्हणजे ग. वा. मावळंकर यांची `काही पाउले` व ना. ग. गोरे यांची `कारागृहाच्या भिंती` या होत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातील वा विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील रोजनिशी जवळजवळ दुर्मिळ. साताराच्या प्रतापसिंह महाराजांनी आपल्याविरुद्धचे ब्रिटिश हस्तकांचे कारस्थान हाणून पाडावे या उद्देशाने आपल्या काही हस्तकांना इ.स. १८३९ मध्ये लंडनला पाठविले होते. यशवंतराव राजे शिर्के हे त्यांपैकी एक होते. `यशवंतराव राजे शिर्के यांची रोजनिशी` म्हणून एक पुस्तिका अलीकडे प्रसिद्ध झाली आहे.१ परंतु तारीखवार नोंदीचे स्वरूप तेथे आढळत नाही, तर दोनएक वर्षात लंडनला काय घडले याचे या पुस्तिकेच्या अखेरीस दोनतीन पानांत वर्णन येते, व तेथेही गोषवारा देऊन काही तारखांचा उल्लेख आढळतो. जहाजावर खाण्या-पिण्याच्या बाबतीत सांभाळलेले सोवळे, जहाजावरील स्वयंपाक, लंडन शहर, तेथील धान्ये, नाचतमाशे यांचे दोनतीन वाक्यांत जुजबी असे वर्णन केलेले आढळते. `एका सरकारी कामगाराचे रोजनिशीतल उतारे` या शीर्षकाखाली `टोमदेव` या टोपणनावाने `विविधज्ञानविस्तारा`मधून (पुस्तक ४६ ते ५०,  जाने. १९१६-नोव्हें. १९२०) काही एक लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. हे लिखाण रा. ब .का. ना. साने यांचे असावे, असा अंदाज प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनी व्यक्त केलेला आहे.२ पुणे, रत्नागिरी आदि जिल्ह्यातील
(१. यशवंतराव राजे शिर्के यांची रोजनिशी, (संपा.) ज. बा. कुलकर्णी, मुंबई, इतिहास संशोधन मंडळ, १९७०.
२.  वा. ल. कुळकर्णी, `विविधज्ञानविस्तार : कार्याचे स्वरूप` युगवाणी, दिवाळी अंक, १९७४.)
गावांची, तेथील देवस्थानांची, कुळांची इ. माहिती देण्याचाच लेखकाचा प्रमुख उद्देश आहे, आत्मप्रकटीकरण करण्याचा नव्हे. सोयीसाठी रोजनिशीलेखनाची भूमिका त्याने घेतली आहे एवढेच. लेखकाने टोपणनावाने स्वतःच ती प्रसिद्ध केली आहे यावरूनही ते स्पष्ट होते. `कै. रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी`१ ह्या पुस्तकात कै. करंदीकरांच्या रोजनिशीतील उतारे पाहावयास मिळतात. परंतु मूळ रोजनिशी इंग्रजीत असून नोंदी व्यावहारिक स्वरूपाच्याच आढळतात. श्री. बाबासाहेब खापर्डे यांनी `श्री. दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र`३ लिहिताना रोजनिशीतील नोंदींचा भरपूर उपयोग केला आहे. परंतु बाबासाहेबांची रोजनिशीही इंग्रजीत असून मजकूर बव्हंशी माहितीपरच आहे.
अण्णासाहेबांच्या रोजनिशीत इंग्लंड व युरोपमधील काही देशांचे वर्णन आहे. म्हणून विलायतेतील प्रवासवर्णनपर काही ग्रंथांचा निर्देश या संदर्भात योग्य ठरेल. श्री. रावजी भवानराव पावगी यांचा `विलायतचा प्रवास` हा ग्रंथ दोन भागात १८९२ पर्यंत प्रसिद्ध झाला. ह्या ग्रंथात बोटीच्या प्रवासाचे व लंडन शहराचे पुष्कळ तपशीलवार वर्णन आहे. त्या काळात माहिती मिळण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त म्हणता येईल असा आहे. परंतु पावगींच्या ठिकाणी वृत्तीचा स्वतंत्रपणा नाही. बोटीच्या प्रवासाला प्रारंभ केल्यापासून त्यांचा न्यूनगंड जाणवतो. "ह्या देशात सर्व साहेब लोक आमचे वरिष्ठ तेव्हा सर्वांला मान देण्याची आम्हाला पडली सवय आणि आता प्रसंग पडला त्यांच्याशीच. नोकरचाकर देखील तेच." कोणीही गोरा दिसला की त्याला खडी ताजीम द्यावयाची नाही, कारण कदाचित तो नोकरही असेल असा त्यांना बुद्धिपूर्वक निश्चय करावा लागतो.३ इंग्लंडमधील स्थळांची वगैरे बारीक तपशीलवार वर्णने पावगींनी केली आहेत.
(१. कै. रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी, संकलक प्रकाशक विठ्ठल रघुनाथ करंदीकर, सातारा, १९६२.
२. बा. ग. तथा बाबासाहेब खापर्डे, श्री. दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र, पुणे, प्रसाद प्रकाशन, १९६२.
३. रावजी भवानराव पावगी, विलायतचा प्रवास, भाग १, पुणे, आर्यभूषण १८८९, पृ. ९.)
परंतु ती कमालीची वस्तुनिष्ठ. हे सारे पाहताना आपल्याबरोबर कोण होते, त्यांच्या प्रतिक्रिया काय पडतात हेसुद्धा ते उल्लेखित नाहीत. ज्या संस्थानिकांसोबत ते इंग्लंडला गेले होते त्याचा नामनिर्देशसुद्धा येत नाही, एवढी त्यांची वस्तुनिष्ठता असल्याने वर्णनपर पुस्तकाच्या पलीकडे त्याची योग्यता जात नाही. डॉ. पां. दा. गुणे जर्मनीत अभ्यासाला गेले असता इ. स. १९१० ते १९१३ ह्या काळात त्यांनी लिहिलेली पत्रे `माझा युरोपातील प्रावस` ह्या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहेत.१ गुणे यांची शैली उत्तम मराठी वळणाची आहे. त्यांच्या वर्णनात थोडीफार व्यक्तिगतता असली तरी त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार होताना दिसत नाही. अलीकडच्या काळातील प्रभाकर पाध्ये, गंगाधर गाडगीळ यांची परदेशातील प्रवासाची व अनुभवाची वर्णने लालित्यपूर्ण आहेत. मात्र ती ललितवाङ्मय निर्माण करण्याच्या हेतूतूनच लिहिली गेली आहेत. अशी हेतुपूर्वकता नसूनही म. शिंदे यांचे हे लेखन लालित्यपूर्ण झाले आहे. याचे कारण त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार प्रत्ययकारी रीतीने आपोआप होतो, हेच म्हणावे लागेल.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करून त्या अनुरोधाने आपण त्यांच्या रोजनिशीचे स्वरूप ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. मनाची आध्यात्मिक ठेवण, व्यापकपणे विचार करणारी जीवनदृष्टी, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी, भाषेच्या सामर्थ्याची यथोचित जाण इ. वैशिष्ट्यांनी युक्त असणारे म. शिंदे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व अपवादात्मकच म्हणावे लागेल. अशा एका असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने जशी महत्त्वाची आहे तशीच वाङ्मयगुणांच्या दृष्टीनेही मौल्यवान आहे.
गो.मा. पवार
(१. पां दा. गुणे, माझा युरोपातील प्रवास, मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी, मुंबई, १९१५.