(रविवार ता. २१ ऑगस्ट १९१० रोजी केलेल्या उपदेशाचा सारांश.)
आज आमच्या ब्राह्मसमाजाचे एक प्रसारक भाई बलदेव नारायण हे परलोकवासी होऊन सहा वर्षे झाली. हे इराणात प्रचारासाठी गेले असता बगदाद येथे अकस्मात पटकीचा उपद्रव होऊन तेथील तुर्की इस्लाम हॉस्पिटलमध्ये ता. २१ ऑगस्ट सन १९०४ रोजी मरण पावले. ह्यांच्याविषयीचा एक लहानसा सुंदर चरित्रात्मक ग्रंथ कुचबिहारी येथील बाबू गौरीप्रसाद मुजुमदार ह्यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे. भाई बलदेव हे आमच्या समाजाच्या नामांकित आणि पुढारी प्रचारकांपैकी एक होते असे नाही, किंबहुना हिंदुस्थानातील कित्येक ब्राह्मांना ह्यांचे नावही माहीत नसेल, तथापि ब्राह्मसमाजामध्ये प्रचारकपणाला जे दोन अत्यावश्यक गुण, म्हणजे स्वतःविषयीच्या वासनांचा पूर्ण संन्यास आणि समाजसेवेविषयी आतुरता हे त्यांच्या अंगी पूर्णपणे वसत होते. भाई बलदेव बहारप्रांती जन्मले. लौकिकात कुलीन शब्दाचा जो अर्थ होतो त्या अर्थाने ह्यांचा जन्म मुळीच कुलीन नव्हता. पण ऋषींचे कुल कधीच पहात बसू नये. धर्म आणि नीती ह्यांची लागवड कडधान्याप्रमाणे केवळ वंशपरंपरेने होत नसते. ह्यांच्या बीजांची वाढ होण्याला भूमीचे सर्वतोपरी अवलंब नको आहे. केवळ नैसर्गिक नियमानुसार जन्मास आलेल्या विभूतीमध्ये सात्विक गुणांचा आणि तेजाचा कळस झाल्याची उदाहरणे उपनिषद काळापासून मुबलक मिळत आहेत. पुराणातही पूज्यपादारविंद विदुर आणि तत्प्रणीत नीती पुष्कळ सापडते. केवळ जातिकुलाभिमानाच्या बाह्य अवडंबराने मनुष्य जेव्हा डोईजड होतो, तेव्हा निसर्ग देव जणू काय आपला सात्विक सूड उगविण्यासाठी आणि धर्मनीतीची स्वतंत्रता स्थापण्यासाठी आपली विशेष अपत्ये निर्माण करून जगास देतो. बलदेव भाईही ह्याच कोटीतले होते. ते स्वतःजरी बहार प्रांतात जन्मले तरी त्यांना दक्षिणेतील मंगळूर येथील समाज इतका आवडला की, त्यांच्या मागे त्यांच्या झोळीत जी काही भिक्षा उरली ती सर्व मंगळूर ब्राह्मसमाजास त्यांनी अर्पण केली आणि तिचा व्यय कानडी भाषेतून ब्राह्मधर्मविषयक पुस्तकांचा प्रसार करण्याकडे व्हावा असे मृत्युपत्रात नमूद करून ठेवले. स्वतः संन्यासी होते तरी पंक्तिप्रपंच न करता सामाजिक मेळे आणि संमेलनेही ह्या भिक्षेतून व्हावीत असे बजावून ते इराणात प्रचारास गेले. आणि तेथेच त्यांनी आपली ऐहिक यात्रा संपविली. ह्याप्रमाणे वर्ण, आश्रम, प्रांत, देश, भाषा, जाती, कुल आणि धर्म ह्या कशाचीच बाधा ब्रह्मतत्त्वास होत नाही, हे त्यांनी आपला जन्म, जिणे, आणि मृत्यू ह्या तिहींच्या द्वारे दाखविले.
भाई बलदेव ह्यांनी समाजकार्यास आपल्या आयुष्याचे जे दान केले त्यात त्यांच्या मनाची एक विशिष्ट प्रकारची वृत्ती होती. तिच्यामुळे त्यांच्या कार्यात यश आले. तिचाच आपण विचार करू. आम्ही पुष्कळ वेळां आपापल्या परी लहानमोठी दाने करीत असतो. पण त्यांची सफलता दानाच्या विषयावर नसून दात्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. दान करताना आपण मोठा उपकार करतो, स्वतःचा त्याग करतो, इत्यादी भ्रामक कल्पनांस आपण बळी पडू नये, ते दान कितीही लहान असो, किंवा मोठे असो, खिशातून काढून टाकलेले एकादे नाणे असो, किंवा आपल्या एकंद आयुष्याचे समर्पण असो, ते करीत असताना आपल्याला असे वाटत असावे की केवळ आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड आपण करीत आहो. आपली सर्व दाने ही मागील ऋणांची फेड असते अशी आपली नित्य समजूत ठेवावी.
आमच्या हिंदू धर्मात ह्या ऋणानुबंधाविषयी चांगली मार्मिक आणि तात्त्विक फोड केलेली आहे :
यज्ञार्थात्कर्मणोsन्यत्र लोकोsयं कर्मबन्धनः ।
तदथै कर्म कौतेय मुक्तसंगः समाचर ।।
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोsस्त्विष्टकामधुक् ।।
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ ।।
इष्टान्भोगन्हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।।
तैर्दत्तानप्रवायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ।।
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्विषैः ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ।।
- भ. गी. अध्याय ३ श्लोक ९ ते १३
वरील श्लोकांचा अर्थ पुराणवादी काहीही करोत आणि प्रस्तुत रूढीमध्ये ह्यांचा प्रचार कसाही असो, आम्हांला वरील वचनाचा इत्यर्थ एवढाच दिसून येतो की, समाजाची वाढ आणि विकास म्हणजे त्यातील व्यक्तींनी परस्पर ऋणामध्ये गुरफटून जाणे हे होय. वरील श्लोकात सांगितलेले देव दूरस्थ आकाशात नसून ते समाजाचेच लहानमोठे घटकावयव असतात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती सुस्पष्ट जरी दिसत नाही तरी त्यांच्यामधील परस्पर देवघेवीवर समाजाची सरणी अवलंबून असते. ह्या निराकार समाजदैवतांची संभावना करून आपली शक्त्यनुसार ऋणमुक्तता करून घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्यास जो चुकतो तो ‘स्नेत एव सः’ ह्या वचनाप्रमाणे चोर ठरतो. यद्यपि पिनल कोडाप्रमाणे चोरीची त्याजवर शाबिती झाली नाही तरी त्याहून वरिष्ठ कोडाबरहुकूम त्यावर शाबिती होतेच. हे जे परस्पर ऋणानुबंधनाचे चक्र प्रवर्तित झाले आहे, त्याचे अनुवर्तन जो कोणी करीत नाही त्याचे आयुष्य व्यर्थ असे सोळाव्या श्लोकात सांगितले आहे. म्हणून आम्ही दान करावे इतकेच नव्हे तर ते करीत असताना आम्ही जगावर मोठा उपकार करतो अशी आढ्यतेची भावना न ठेवता मागील ज्ञात किंवा अज्ञात ऋणाची केवळ फेड करतो अशी नम्र भाविक बुद्धी राखली पाहिजे. म्हणूनच उपनिषदे म्हणतात :
“श्रद्धया देयं ।। अश्रद्धयाsदेयं ।। श्रिया देयं ।।
र्हिया देयं ।। मिया देयं ।। संविदा देयं ।।”
- तैतिरीयोपनिषद् ११-३
दान करीत असताना आपल्या मनामध्ये अशी श्रद्धा असावी की, ह्याचा परिणाम चांगला होईलच होईल. आपण देतो ह्याची आपणास पावती मिळेल की नाही, पुकारा होईल की नाही, परिणाम घडेल की नाही, अशा प्रकारच्या अश्रद्धेने दान करू नये. इतकेच नव्हे तर देत असताना आपणास लज्जा वाटावी. हे ऋण आपल्या हातून आतापर्यंत फिटले नाही, तेव्हा आता ह्याचा स्वीकार होईल की नाही म्हणून उलट आपला हात भीतीने कापावा. तसेच आपल्या अंतःकरणात कधीही तळमळ असू नये की, हे आपण देतो ते न देता आपल्याजवळ राहिले तर आपल्या बायकामुलांना संतोष होईल. उलट आपल्या बायकामुलांप्रमाणेच दुस-यास जो संतोष होईल, त्याच्या सहानुभूतीच्या आनंदाने द्यावे, हे स्पष्ट करण्यासाठी “संविदा देय” असे म्हटले आहे. असे न करता आपण मेहेरबाणी करण्याच्या बुद्धीने देऊ लागले तर आपली निराशा होते. केव्हा केव्हा तर ह्याहून दानाचा अधम प्रकार असा घडतो की दान देत असताना आपण दुस-यास ऋणच देतो असे समजून त्याची फेड आपल्यास कधीतरी होईल अशी दुराशा आपल्याला लागलेली असते. अशा रीतीने ऋण देणे म्हणजे आपला सत्यानाश करून घेणे होय. पश्चिम आफ्रिकेतील निग्रो लोकांत प्रचलित असलेल्या भाकड कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे, त्यात ह्या संबंधाची एक मार्मिक गोष्ट आहे ती अशी :-
एकदा एका लबाड मनुष्याने आपल्या मित्राजवळ २०० काठ्या उसन्या मागितल्या आणि पुढच्या बाजारी परत करीन असे सांगितले. मात्र त्या दिवशी सकाळी येताना बरोबर भरलेली बंदूक आणावी आणि आपली वाट पहात घरी येऊन बसावे असे बजाविले. लगेच त्या लबाड मनुष्याने आपल्या मित्रमंडळींपैकी एक चित्ता, एक बोकड, एक रानमांजर आणि एक कोंबडा ह्यांच्यापासूनही वरील प्रकारचा करार करून दोन-दोनशे काठ्या उसन्या आणल्या. (काठी हे एक प्रकारचे जंगली नाणे दिसते). बाजाराच्या दिवशी हा लबाड मनुष्य आपल्या बसावयाच्या खोलीत मूठभर दाणे पसरून आपण आतल्या खोलीत दार लावून दडून बसला. ठरल्याप्रमाणे प्रथम कोंबडा जो अर्थात लवकर उठणारा प्राणी तो आला आणि भूक लागल्यामुळे जमिनीवर पडलेले दाणे सहजच वेचून खाऊ लागला. मागून रानमांजर आले. त्याने कोंबड्यास खाल्ले. इतक्यात बोकड आला, त्याने रानमांजरास हुसकावून लावले, इतक्यात चित्ता आला. त्याने बोकडाची न्याहारी केली. मागाहून भरलेली बंदूक घेऊन माणूस आला, आणि स्वसंरक्षणार्थ त्याने चित्त्यावर बंदूक झाडली. आवाज ऐकल्या बरोबर दडून बसलेला तो लबाड मनुष्य बाहेर येऊन आपला मित्र चित्ता ह्याचा खून करणा-याला तो धमकी देऊ लागला. शेवटी आणखी दोनशे काठ्या जास्ती देऊन त्या लबाड मनुष्यापासून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली. तात्पर्य हे की, अशा रीतीने ऋण न देता शक्त्यनुसार प्रत्येकाने दानच केले असते तर आपत्ती टळली असती. ह्याप्रमाणे आम्हीही दान करतेवेळी मनात नीच हेतू धारण केल्यास आमचाही यद्यपि शारीरिक नसल्यास आध्यात्मिक नाश होतोच.
केव्हा केव्हा गोष्टीप्रमाणे म्हणीमध्येही मर्म असते. कानडी भाषेत एक म्हण आहे की, “प्रेतावर केलेला शृंगार नव्हे आणि गावावर केलेला उपकार नव्हे.” सार्वजनिक कल्याणाची चर्चा चालू असलेल्या आधुनिक काळात पुष्कळदा आमची अशी समजूत होऊन चुकते की, गावावरील उपकार, हा सर्वांत मोठा उपकार पण वस्तुतः आध्यात्मिक दृष्टीने पाहू गेल्यास कोणतेही दान लहान असो किंवा मोठे असो, एका व्यक्तीस असो किंवा सर्व जगतास असो, ते नुसती मागील ऋणाची फेड ह्या बुद्धीने करणे उचित आहे. आमचे परलोकवासी भाई बलदेव ह्यांनी नवविद्या भक्तीतील शेवटची भक्ती जी आत्मसमर्पण ती आचरीत असताना आमरण मनाची अशी उन्नत भावना ठेविली की, आपण जे जे करतो ते ते मागील उपकाराची फेड करण्यासाठीच करतो.
माझा सर्व भाव तुमचिया पायी ।
झालो उतराई देवराया ।।
- तुकाराम