पुराणातील ही कथा शुकाने परिक्षित राजाला सांगितलेली आहे. पुराणे चांगली का वाईट हाच वाद सध्या माजून राहिलेला आहे. एक पक्ष म्हणतो, पुराणामध्ये पावणे सोळा आणे गाबाळ आहे व पाव आणा ग्राह्यांश आहे. दुसरा पक्ष म्हणतो, पुराणे सोळा आणे बरोबर आहेत. पण कोणी असे सांगत नाही की पुराणामध्ये वाईट गोष्टी आहेत, चांगल्याही आहेत. चांगले असेल ते घ्या, वाईट असेल ते टाकून द्या. यःकश्चित क्षुद्र पदार्थदेखील तिखटमीठ लावून रसभरित करता येतो मग पुराणामध्ये गोडी नाही असे कसे म्हणावे ? पुराणांनी सुधारणा सोपी केलेली आहे, मात्र त्यामधील चोथा टाकून देऊन रस घेतला पाहिजे. ‘कालियामर्दन’ ही पुराणातीलच गोष्ट आहे.
श्रीकृष्ण हा आपल्या सोबत्यांबरोबर यमुनातीरी खेळत असता त्याने बळेच तो चेंडू यमुनेच्या तिरावरील कळंबाचे झाडावर उडविला. त्या झाडावरून तो काढण्याकरिता त्याने आपल्या सोबत्यांना बोलाविले. त्यांपैकी काही त्याच्याबरोबर गेले व काही मागच्या मागे पळाले, पण कोणाच्याने त्या झाडावर चढण्यास धीर होईना, एवढेच नव्हे तर श्रीकृष्ण जेव्हा झाडावर चढू लागला तेव्हा त्यांनी त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणू लागले-
नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देईल शिव्या ।।
आपुलिया काना ठेवूनिया हात । सकळी निमित्त टाळियेले ।।
निमित्ता कारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ।।
खांदीवरी पाव ठेवियला देवे । पाडाव त्या भावे चेंडु तळी ।।
तळीला नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ।।
आपल्या बुद्धीला जे योग्य वाटले ते श्रीकृष्णाला करावयाचे होते, म्हणून कोणाची पर्वा न करिता तो झाडावर चढला व मुद्दामच त्याने तो चेंडू यमुनेच्या डोहात पाडला व तो काढण्याकरिता त्याने आत उडी घेतली. तेव्हा सर्वत्र फार हाहाःकार झाला. गोपांनी ही बातमी नगरात जाऊन सांगितली, तेव्हा सर्व गोप, गौळणी वगैरे नदीकिनारी येऊन, अहाहा, उहूंहूं, अगाई करून रडू लागले. श्रीकृष्ण कधी मरणार नाही म्हणून बलरामाने त्यांचे खाली लिहिल्याप्रमाणे समाधान केले-
बळ तयासि म्हणे तुम्ही आयका । सकळ गोवळ गौळणि बायका ।।
भय कदापि न या व्रजनायका । असुख कोण करी सुखदायका ।।
अशा रामशद्वासि घेऊन कानी । यशोदादि संपूर्ण त्या गोपिकांनी ।।
दिले प्राण नाही तया बायकांही । गमे धैर्य त्या रामवाक्येचि काही ।।
हा बळरामाचा उपदेश ऐकून रडे बंद करून सर्वजण घरी गेले. श्रीकृष्णाला त्यांची ही भावना कळून चुकली. तो पाण्याच्या आतही गेला नव्हता व बाहेरही नव्हता, पण आडून कोण कसा रडतो हे पाहत होता. आईबाप, भाऊबंद तटाजवळच येऊन तटस्थ होत असतात, त्याच्या पलीकडे जाण्याचे कोणाला सामर्थ्य होत नाही. स्वबचावाकरिता जो तो सावध असतो. कृष्णाचा जीव धोक्यात आहे असे त्यांना वाटत असूनही त्याला सोडविण्यास कोणी तयार झाला नाही.
दूर देखोनिया यमुनेचे जळ । काठीच कल्होळ करिताती ।।
मागे सरे माय पाऊला पाउली । आपलेच घाली धाके अंग ।।
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरी जाणवले ।।
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ।।
जो मनुष्य काळाची पर्वा न करता सुधारणा करू इच्छितो, त्याने कृष्णाप्रमाणेच कोणाची वाट न पहाता आपल्याच बलावर सुधारणा केली पाहिजे. म्हणजे त्याला काळ म्हणजे कःपदार्थ आहे असे कळून येईल. त्या कामी मदत करण्यास तर कोणी तयार नसतात, पण उलट त्याच्या मार्गामध्ये विघ्ने उत्पन्न करणारे बरेच असतात, पण खरे सुधारक आपल्या मताप्रमाणेच वागून आपल्या बुद्धीचे समाधान करीत असतात. काळावर नजर देऊन स्वस्थ न बसता काळ म्हणजे कःपदार्थ आहे हे श्रीकृष्णाने कालियाचे म्हणजे काळाचे मर्दन करून स्पष्टपणे लोकांचे दृष्टोपत्तीस आणून दिले. अशा रीतीने ख-या सुधारकाचे लक्षण श्रीकृष्णामध्ये किती पूर्णपणे दिसून येत होते आणि त्याने आपल्या बालक्रीडेमध्ये ते वेळोवेळी कसे दाखविले हे वरील कथेत स्पष्ट दिसून येते. डोहातून वर आल्यावरही कोणावर न रागावता कृष्णाने सर्वांना आलिंगन दिले.