बेन लोमंड शिखरावरील समाधि

ऑगस्ट महिन्यांत एके दिवशीं सकाळीं लगबगीनें न्याहारी आटोपून, लोमंड सरोवराच्या काठी हार्बेट बंदरावर आगबोटीची वाट पहात मी उभा होतो. जिच्या मुद्रेत सायंकाळचे प्रसंगी एक प्रकारच्या आध्यात्मिक औदासिन्याची आणि चिंतनगांभीर्याची शोभा दिसत असे ती ही ‘स्कॉच सरोवराची राणी’ आज सकाळी आपल्या सर्व परिवारासह अत्यंत सुप्रसन्न दिसत होती. आज दिवस इतका स्वच्छ व सोज्वळ होता की, ह्या उन्हाळ्यातला हा अगदी पहिल्या प्रतीचा असे लोक म्हणू लागले. पैलतीरावर ‘बेनलोमंड’ प्रवताचे निमुळते शिखर इतरांहून उंच आकाशात गेले होते. येथून सुमारे ५ मैलांवर पर्वताचे पायथ्याशी रॉबर्टनान नावाच्या एका कोप-यातील बंदरावर मी एकटाच उतरलो आणि हळूहळू चढण चढू लागली. येथे एकांत म्हणजे अगदी पूर्ण प्रतीचा होता. जिवलग माणसे व देशबांधव हजारो कोसांवर, एतद्देशीय मित्र, ओळखीचेही शेकडो कोस दूर, आसमंतात माणसांची कोठेही चाहूल दिसेना, प्रदेश अनोळखीचा, वाट गैरमाहितीचा, इतके असूनही मी अपरिचित स्थळी आहे असे वाटेच ना. जंगली हिंस्त्र पशूंची तर गोष्ट राहोच, पण साप, विचूं इत्यादी क्षुद्र किड्यांची येथे वार्ताही नाही. फार तर काय पायात काटाही मोडण्याची भीती नाही, अशी येथील डोंगर व राने अगदीच माणसाळून गेली आहेत. एकदोन शतकांपूर्वी ज्या प्रसिद्ध व बाणेदार रॉबरॉय रामोशाने हा सारा प्रदेश दणाणून टाकला होता त्याचीच गुहा व कबर पाहण्यास आता कॉलेजातील तरूण मुली बायसिकलवरून शेजारच्या पहाडात एकट्याच हिंडत आहेत! असो, ह्या प्रकारे ह्या स्थळाचा आता उग्रपणा जरी सर्वस्वी नाहीसा झाला आहे तरी येथील एकांतवासाला व जंगली शोभेला अद्याप तिळमात्र बाध आलेला नाही.

मी रान तुडवीत वरवर चाललो. एक टेकडीच्या माथ्यावर जावे तो अवचित पुढे दुसरी टेकडी दत्त म्हणून उभी राही. तरी चढण्याचा कंटाळा येईना की थकवा वाटेना. भोवताली प्रदेश अगदी उघडा, झाड ना झुडूप, पायाखाली मात्र हिरवेगार गवताचे दाट आणि दमट हांतरूण हांतरले होते. नजरेत कोठे पशू येईना की पाखरूही येईना. केव्हातरी एकाद्या दगडाच्या मागे रवंथ करीत पडलेले एकादे स्कॉच मेंढरू दिसे. पण ह्या सत्त्वशून्य प्राण्याच्या अशा क्वचित दर्शनामुळे माझ्या एकांतात म्हणण्यासारखा व्यत्यय येत नव्हता. सहज चुकून मागे नजर गेल्यास, खाली लांबवर पसरलेला अप्रतिम देखावा दिसे. २५ मैल लांब त्रिकोणाकृती लॉखलोमंड सरोवर अगदी क्लाईड नदीला जाऊन भिडले होते; जणू एक भले मोठे पिंपळाचे पानच कोठूनतरी तुटून ह्या विस्तीर्ण प्रदेशात पडले आहे! पण ते पाहूनही माझ्या आत्मचिंतनाचा भंग होईना की ऊर्ध्वगतीत खंड पडेना.

‘आत्मैवात्मनो बंधु:’ ही वाणी मला आजच्या इतकी पूर्वी कधीच कळली नव्हती; आपल्या खोल कपाटात अनुभव आणि अनुताप, ज्ञान आणि दर्शन बोध आणि प्रेरणा, इ. एक का दोन अनेक त-हेचे दैवी भांडार भरले असता आम्ही एकमेकांपुढे आपले दैन्य आणि दारिद्र्य किती तरी दाखवितो. भोवतालच्या वनस्पती-पायाखालचे गवतही नाही का आपल्या बळावर वाढत! मग आम्हीच का अशी स्वत:ची हेळसांड आणि पुष्कळदा असा दुरूपयोगही करतो? मदत मागावयाची ती दुस-याला का? ज्ञान धुंडावयाचे ते बाहेर का? पुस्तकाचे प्रामाण्य, माणसाचे माहात्म्य, मातीधोंड्याची आवश्यकता, वगैरे वगैरे कोण हे समजुतीचे व आग्रहाचे प्रकार आणि अशा हट्टाने किती डोईफोड! हा जो आमचा असा छळ होतो तो कोणी कोपलेला देव करीत नाही किंवा देवाचा कोणी प्रतिस्पर्धी सैतानही करीत नाही. तर आम्हीच आमच्या स्वत:चे न ऐकता असे आत्मशत्रू बनतो. लाज आणि संतोष, शिक्षा आणि शिफारस, बंधन आणि मोक्ष ह्या सर्व बाबतीत आमचे आम्हीच कारण आणि याला साक्षही स्वत:चीच, अशा ह्या आत्मसंभाषणात मी गुंतलो होतो. मजबरोबर जणू कोणी तरी पोक्त माणूस चालले आहे. आणि मी जर इकडे तिकडे पाहीन अगर मध्येच थांबेन तर ह्या माणसांचा जणू मोठा उपमर्द होईल अशा काही भावनेमुळे मी आजूबाजूस वाजवीपेक्षा फारसे लक्ष न पोहोचविता सारखा सरळ चढत होतो. अखेरीस अशा नादातच बनलोमंडच्या माथ्यावरील सर्वात उंच टोकावर मी आलो.

येथे दोन तरूण विद्यार्थी भेटले. आश्चर्याचा पहिला झटका निघाल्यावर, व अशा परक्या स्थळी अशा तीन परक्यांचे जे साहजिक स्वागत व संभाषण व्हावयाचे ते झाल्यावर ते दोघेही डोंगर उतरून दरीत दिसेनासे झाले. मी मागे माझ्याच समागमात राहिलो. बेन नेव्हीसचे शिखर खेरीज करून, सर्व ग्रेटब्रिटन देशातील अत्यंत उंच स्थानी एका शिळेवर मी आपले आसन मांडले. क्षुद्र पण क्षमय् गर्वाची थोडी झुळूक वाहिल्यावर, लगेच आतबाहेर निवांत झाले.

बारा वाजले होते, वारा वाहत नव्हता, थंडी वाजत नव्हती, उष्मा वाटत नव्हता, बाजूस शेदोनशे कदम कोरडी आणि सपाट जमीन होती. शेवटी एकदम कडे तुटले होते. वर पसरलेले आकाशाचे अवीट घुमट खाली भोवतालच्या विस्तीर्ण क्षितिजवलयावर टेकले होते. त्यावर मध्यंतरी ढगाचा कोठेही डाग लागला नव्हता. दिनमणी मधोमध तळपत होता. त्या प्रकाशात चाळीस मैलांवरचा ग्लासनो शहरातला धूर आणि धुरळा दिसत होता. (समुद्रसपाटीपासून हे स्थान ३१९२ फूट उंच आहे.) पर्वत, नद्या, सरोवरे, बेटे, माळराने वगैरे आसमंतातील सुमारे १०० मैलपर्यंतची कारागिरी चर्मचक्षूपुढे दिसू लागली. अनंत स्थळ आणि अनंत काल हे दोन भिन्नजातीय गोल परस्परांच्या पोकळीत तरंगत आहेत, असा देखावा चित्तचक्षूला दिसू लागला. खाली लोमंड सरोवरावरून एकादी आगबोट केव्हातरी दुरून तरंगत जात असताना लहानशा हंसीसारखी दिसे. पुढे पसरलेल्या एवढ्या अफाट चित्रपटात त्या हंसीशिवाय चैतन्याची इतर खूण म्हणून दिसेना! तसेच चित्तचक्षूपुढे पसरलेल्या स्मृतिपटात केव्हातरी एकादे व्यक्तिचरित्रातील पापपुण्य अगर मानवी इतिहासातले सुखदु:ख ह्याची नुसती ओझरती आठवण होऊन जाई, ह्यापेक्षा जास्त येथेही हालचाल घडेना, हळूहळू हे दोन्ही बाहेरचे व्यापार बंद पडू लागले. आत काय व्यापार चालला होता ते कोण लिहू शकेल! काही काळाने सर्वच सामसूम झाले !!

दोन वाजता ही समाधी आटोपली. नंतर मी वनातून परत जनाकडे हळूहळू उतरू लागलो. मोठ्यांची एकदोन वाक्ये आठवली आहेत ती येथे देतो :

I had heards of Thee by hearsay;
But now my eye seeth Thee,
Book of job XLII Old Test

कां जे ध्यौर्लोक आणि पाताळ | अथवा पृथिवी आणि अंतराळ| अथवा वशदिशा समाकुळ| दिशाचक्र ||१५|| हे आघवेची तुवां एके| भरले देखत आहे कौतुके| परी गगनाही संकट भयानके| आल्पविजे जेवि ||१६|| नातरी अद्भुत रसाचीया कल्लोळी| जाहाली चवदाही भुवनासि कडियाळी| तैसे आश्चर्यचि मग मी आकळी| काय एक ||१७|| नावरे व्याप्ति हे असाधारण | न साहवे रूपाचे उग्रपण | सुख दूरी गेले तरी प्राण |विपाये धरी जग ||१८||

ज्ञानेश्वरी गीता अ. ११ श्लोक २०.

वरील पत्रात मी माझ्या निरनिराळ्या खासगी अनुभवास ‘प्रार्थना’ ‘भेट’ ‘समाधी’ अशी मोठी नावे दिली आहेत. त्यावरून वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल आणि केलेले वर्णन अतिशयोक्तीचे आहे असा आरोप येईल. पण खरा प्रकार तसा नाही. वरील प्रसंगी कोणाही य:कश्चित् मनुष्याची वरील अवस्था होणे साहजिक आहे. फार तर काय, खालील प्राण्यातही जेथे जेथे चैतन्याचा अधिक विकास झालेला असतो तेथे तेथे वरील सौंदर्यदर्शनाचे प्रसंगी वरील समाधीचा म्हणजे चैतन्याच्या एकीकरणाचा प्रकार सहज घडतो. मेघास पाहून मोर नाचून नाचून तटस्थ होतो. वसंतगामी कोकिळा गाऊन गाऊन स्तब्ध बसते. “सर्प भुलोनि गुंतला नादा | गारूडिये फांदा घातलासे |” हे तुकाराम सांगतात. असा जर सर्वत्र सृष्टीनियम आहे तर त्याला माझेच मन का अपवाद असेल !

आता, वरील अनुभव सर्वसाधारण मानाने सर्वच माणसांस होण्यासारखा असून, किंबहुना होत असूनही जर काहीजण तिकडे तादृश लक्ष पुरवीत नसतील अगर लक्ष पुरवूनही त्या त्या अनुभवांचा तादृश्य अर्थ करीत नसतील तर ती त्यांची खुशी. पण ह्या बाहेरच्या खुशीच्या भिन्नत्वामुळे आतील स्वाभाविक अनुभवास बाध येत नाही किंवा भिन्नत्वही येत नाही. अनुभव तो प्रकृतीच्या आणि प्रसंगाच्या मानाने सर्वत्र सारखाच यावयाचा. त्या अनुभवाचा झटका केव्हा केव्हा इतका जबर बसतो की, काव्य, कादंबरी, साहित्य ही सर्व बापुडी त्याच्या यथार्थ वर्णनाचे कामी केवळ पंगू ठरतात मग अतिशयोक्तीची गोष्ट कशाला !