गुरूशासन

(रविवार ता. २३-१०-१० रोजीं मुंबई प्रार्थनामंदिरामध्यें केलेल्या उपदेशाचा सारांश.)

मागें पितृशासनासंबंधीं विचार करीत असताना असे सांगण्यात आले होते की, प्राचीन काळी शासनासंबंधी सर्व अधिकार पित्याकडेच होते. पित्याची सत्ता पुत्राच्या मालमत्तेवरच होती, इतकेच नव्हे तर प्राणावरही चालत असे. समाज अधिकाधिक उन्नत दशेप्रत जसजसा जाऊ लागला, तसतशी मनुष्याच्या कर्तव्याची व्याप्ती आणि गरजा अधिकाधिक वाढून व साहजिकच वरील शासनाची विभागणी होत जाऊन, एका पित्याच्या ठिकाणी पिता, गुरू आणि राजा असे तीन शासनाचे अधिकारी झाले. तथापि सर्व शासन पितृमूलक आणि पुत्रवात्सल्याच्या उदार हेतूनेच प्रेरति असते आणि असावयास पाहिजे असेही सांगितले. तसेच मनुष्येतर खालील प्राण्यांमध्ये बाल्यावस्थेचा काळ फार अल्प असून, मनुष्याचे बाळपण मात्र दीर्घकालचे असते, ह्याचे कारण पशूपेक्षा मनुष्यामध्ये अधिक उन्नत स्वत्व अथवा पौरूषाचा विकास व्हावयाचा असतो, म्हणून त्याला आपल्या पितरांच्या शासनाखाली अधिक काळ रहावे लागते, असे सांगितले. बाल्यावस्थेची शेवटची पायरी किशोरदशा पंधरा वर्षापर्यंत असते, असे शास्त्र सांगते. पण इतक्या अवधीत मनुष्याची शासनाची आवश्यकता संपत नाही. ह्यापुढील दहा पंधरा वर्षांचा यौवनावस्थेचा काळही त्याला शिष्यदशेत घालवावयाचा असतो. हे पुढील शासन अधिक विशिष्ट अधिकाराचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे, शिष्यास पितृकुलातून गुरूकुलात जावे लागते. आणि तेते गुरूच्या आज्ञेत राहून त्यांच्यावर निश्चल श्रद्धा आणि आदरभाव ठेवून भावी स्वत्वसंपत्तीकडे मजल मारावयाची असते.

निरनिराळ्या देशांतील प्राचीन धार्मिक वाड्मयामध्ये मुक्ती अथवा मोक्ष (Salvation) असा शब्दप्रयोग आढळतो. पण आधुनिक वाड्मयामध्ये ह्या शब्दयोजनेचे महत्त्व कमी कमी होत जाऊन स्वातंत्र्य आणि स्वत्वाची अभिवृद्धी अशी योजना अधिकाधिक आढळण्यात येते. यद्यपि हे दोन्ही प्रयोग शब्दश: भिन्न आहेत तथापि सूक्ष्म विचार केला असता अर्थत: ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे, असे दिसून येईल. एकूण मनुष्यप्राणी उत्तरोत्तर परिस्थितीच्या गुलामगिरीतून सुटका पावून त्याच्या आत्म्याच्या ठायी ज्या गूढ आणि थोर शक्ती आहेत, त्यांचे संपादन करून तो पूर्ण स्वतंत्र व्हावा हाच हेतू मनुष्यजीवनाच्या विकासाचा आहे आणि म्हणून गुरूशासनाची आवश्यकता आहे. मातेच्या अंगावर केवळ शरीराचे पोषण होते. पितृगृही मनाची पूर्वतयारी होते आणि गुरूगृही बुद्धीचा विकास होतो, असे होईपर्यंत मनुष्यप्राणी नागरिकत्वाचे हक्क संपादन करून राजाची प्रजा म्हणविण्यास पात्र होत नाही.

अशा प्रकारे बुद्धीचा विकास करण्याचे कामी गुरू कसा असावा व त्याचे लक्षण काय? हे वामन पंडितांनी प्रल्हादाचे तोंडी घालून मार्मिक रीतीने वदविले आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादास पुष्कळ दिवसांनी गुरूगृहातून बोलावून तेथे जे शिकलास त्याचे सार काय, असे विचारिता प्रल्हादाने ‘हरिभक्ती’ असे चमत्कारिक उत्तर दिले. हे शिक्षण कोणत्या गुरूने दिले असे हिरण्यकश्यपूने विचारिता प्रल्हादाने उत्तर दिले, ‘ज्या गुरूकडे मला ठेवण्यात आले होते त्यांच्यामधे गुरूपणाच नव्हता.’

सार मानित असे विषयाते | विष्णुभक्ति गमते विषयाते ||
न स्वये हरि तया प्रिय वाटे | बोधिला तरि  येचि सु-वाटे ||
सर्व प्रयत्ने भवती गृहाते | न सेविती भागवता महा ते ||
गहव्रती ते, मति त्या जनांची | न गोष्टिही घे भव-भंजनाची ||
हे तो गुरू पापतरू  म्हणावे | अंधासवे अंध तसे गणावे ||
दे  प्रीति कृष्णी गुरू तोच साच | श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच ||
पशू जसे चाविति चाविल्याते | पुनः पुन्हा सेविति सेविल्याते ||
कृष्णी नव्हे प्रीति कदापि त्याला | प्रल्हाद इत्यादि वदे पित्याला ||

एकूण ज्या गुरूमुळे ईश्वराचे ठायी प्रीती उत्पन्न होते तेच गुरू साच. बाकी सर्व अंध किंवा पापतरू असा स्पष्ट निवाडा केलेला आहे. गुरूचे काम म्हणजे शिष्यास ध्येयदर्शन करून द्यावयाचे, पण गुरू जर स्वत: केवळ ‘गृहव्रती’. म्हणजे आपलेच पोट भरणारा असेल, तर ध्येयाची गोष्टही काढावयाला नको वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान करून देणारे काही कुशल गुरू असतात. पण ते त्यांच्या कुशलतेमुळे केवळ कुशल कारागीर होत. केवळ त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना गुरूत्व येते असे नव्हे. वस्तुस्थितीतून (Realism) वर उंच ध्येयाकडे (Ideal) शिष्याचा लय जो लावील-साध्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ईश्वरपदी जो प्रीती उत्पन्न करून देईल-सांत जीवनातून अनंत जीवनाकडे, तात्पुर्तिक कर्तव्यातून चिरकालच्या कर्तव्याकडे, नैमित्तिक धर्मातून सनातन धर्माकडे जो नेईल, तोच गुरू. पण ‘न गोष्टीही घे भवभंजनाची’ असे जे पोटार्थी पंतोजी त्यांच्याकडून हे महत्कार्य कसे होणार? हल्लीच्या काळी धर्म आणि नीतिशिक्षणाविषयी जगभर शाब्दिक चळवळ चालली आहे. कित्येक लोक कित्येक उपाय सुचवीत आहेत. पण हा प्रश्न कोणत्याही बाह्य उपायांनी सुटण्यासारखा नाही. गुरू हे उपजत गुरू असावयास पाहिजेत. त्यांना ध्येयदर्शन झाल्याबरोबर त्याचे प्रतिबिंब शिष्यांत:करणामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. एरवी लिहिणे, वाचणे आणि बोलणे ह्याची कला शिकविणारे आणि तसेच इतर संसारोपयोगी हुन्नर शिकविणारे कारागीर मिळतील. पुष्कळ वेळां हेही मिळत नाहीत.

पिता, गुरू आणि राजा ही जी शासनाधिकाराची परंपरा आहे तिच्यामधील साम्यभेद लक्षात घेण्यासारखे आहेत. पिता हा केवळ त्या त्या व्यक्ती-पुरताच असतो. उलटपक्षी राजा हा कधीही एकाच व्यक्ती-पुरता नसतो. तो नेहमीच सार्वजनिक असतो. मध्यंतरी गुरू हा व्यक्ती-पुरता किंवा अनेक व्यक्तिसमूहाचा एक, असा असतो. त्याच्याशी शिष्याचा व्यक्तिश: संबंध असतो किंवा केव्हा केव्हा नसतोही. किंबहुना गुरूच्या ठिकाणी कोणती एकादी विशिष्ट व्यक्ती मुळीच नसून तेथे एकादे विद्यापीठ किंवा कोणती तरी एकादी संस्था असते. पिता आणि गुरू ह्यांमध्ये जरी हा भेद आहे तथापि त्यांच्यामध्ये हे साम्य आहे की, ज्याप्रमाणे पितापुत्राच्या मनाचा प्रत्यक्ष संबंध जडतो त्याचप्रमाणे गुरूशिष्याचाही प्रत्यक्ष संबंध (Personal touch) जडला पाहिजे. तरच गुरूशिष्याचे नाते सार्थ होते. ह्यावरून आपल्याला झालेले ध्येयदर्शन शिष्यास करून देण्याचे कामी प्रत्यक्ष संबंधाशिवाय अन्य उपाय नाही हे दिसून येईल, आणि आपल्यात ध्येयदर्शन नसेल तर शिष्याशी कितीही निकट संबंध जडला तरी त्याला प्रत्यक्षता येत नाही.

ह्या प्रत्यक्ष संबंधाच्या दोन बाजू आहेत. जसा गुरूकडून तसाच शिष्याकडूनही प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ असे म्हणणारे सारे प्रल्हादच असतात असेही नव्हे. भल्या गुरूची कदर न ओळखणारे फटकळ उनाड विद्यार्थी पुष्कळ आढळतील. उलपक्षी प्राचीन काळी होऊन गेलेले सॉक्रेटीस, प्लेटो, शंकराचार्य आणि बुद्ध ह्यांच्याशी तन्मयता पावून त्यांचा आदर्श तो आपलासा करून घेऊन स्वतंत्र अथवा मुक्त होणारेही काही भले शिष्य आढळतील. ह्यावरून प्रत्यक्ष संबंध जोडून ध्येयदर्शन करून देणे आणि घेणे हा परस्परावलंबी व्यवहार आहे. गुरूचे शासन आणि शिष्याची निष्ठा ही एकमेकांची कार्यकारणे आहेत.

ह्या ठिकाणी ब्राह्मसमाजाची एक सूचना ध्यानात ठेवण्यासारखी आहे. योग्य गुरूशी गाठ पडून शिष्याचे कल्याण झाल्याबरोबर त्या शिष्याकडून किंवा त्याच्या अनुयायाकडून ह्या गुरूच्या स्वरूपाविषयी गैरसमज होण्याचा पुष्कळ वेळां संभव आहे. आणि ज्या ज्या मानाने हा गुरू जास्त अलौकिक असतो त्या त्या मानाने हा वरील गैरसमजाचा संभव जास्त वाढतो. हा गुरू म्हणजे ईश्वर आणि मनुष्य ह्यांमधील कोणी अद्वितीय आणि अपरिहार्य मध्यस्थ किंवा ईश्वराचा कोणी अवतार किंवा प्रतिनिधी किंबहुना त्यास प्रतिईश्वरच समजून ईश्वर आणि तो हे दोन असून एक, आणि एक असून दोन अशा प्रकारच्या अनेक गूढ तत्त्वज्ञानाचा सुकाळ होऊ लागतो. ब्राह्मसमाजाचे सांगणे एवढेच आहे की, ईश्वराच योग्य असलेली पूजा ईश्वरास द्यावी आणि गुरूस द्यावयाचा मान तोच गुरूस द्यावा. गुरू कितीही अलौकिक असला तरी त्याचे मनुष्यत्व हिरावून घेऊन त्याला उंच ईश्वरपदाची दक्षिणा दिल्याने, ना कधी शिष्याचे, ना गुरूचे, ना जगताचे कल्याण होईल.