(सु. प. १-२-१९०३)
इंग्लंडच्या उत्तरभागीं कंबर्लंडशायरमध्ये सरोवर प्रांत (Lake District) नावाचा प्रदेश आहे. उंच पहाड, विस्तृत सरोवरे, दाट वनराजी इ. बहुविधा सृष्टिसुंदरी तेथे नटली आहे. तशात वर्डस्वर्थ, कोलरिज्, साउदे इ. प्रासादिक कवींच्या सहवासाने हे शांतिस्थळ अधिकच पवित्र झाले आहे. उष्णकाळी इंग्लंडचे किंबहुना सा-या सुधारलेल्या जगाचे हे एक हवा खाण्याचे ठिकाण आहे. गेल्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रो. कार्पेंटर साहेबांनी आमच्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांस आपल्याबरोबर आपल्या कुटुंबात पंधरा-पंधरा दिवस सदर ठिकाणी रहावयास बोलाविले होते. कॉलेजातील व्याख्यानपीठातून व मंदिरातील व्यासपीठातून दिलेल्या ईश्वरविषयक ज्ञानाची पुरवणी वरील उदात्त स्थळी प्रकटलेले स्वरूप प्रत्यक्ष दाखवून करून देण्याचाच जणू ह्या गुरूवर्यांचा हेतू होता.
गेल्या जुलैत मी तिकडे ऑक्सफर्डहून निघालो. पुढे मिळणारा धडा मनावर नीट बिंबावा म्हणूनच की काय वाटेत निराळाच अनुभव आला. आमची गाडी लांब पल्ल्याची असल्या कारणाने ती एक्स्प्रेस होती. वाटेत बर्मिंगहॅम पासून तो लँकेस्टरपर्यंत अगदी निराळा मुलूख लागला. इंग्रजाने बहुतेक सगळ्या जगाचे कंत्राट आपल्याकडे घेतले आहे. म्हणून अर्थात एवढा प्रदेश म्हणजे जगाची एक मोठी वखारच! बर्मिगहॅम, स्टॅफर्ड, शेफिल्ड, मॅचेस्टर अशी अचाट घडामोडीची शहरे आणि त्यांच्या दरम्यान इतर कारखान्यांची गावे ह्यांची कशी येथे खेचाखेची झाली आहे. दाट जंगलातून एकादी चेतलेली वाघीण जशी सुटावी तशी आमची एक्स्प्रेस हजारो जीवांना घेऊन, अशा दाट वस्तीतून लांब लांब झापा टाकीत सुटली. स्टॅफर्डहून लॅकेस्टरपर्यंत सुमारे दीडशे मैलांचा पल्ला तर तिने एकाच उडीसरशी मारला. त्यास पुरे दोन तासही लागले नाहीत.
लहान वस्तु ती स्थूल विसली| तुटकी वाटे कुणी जुडली|
सहज कुटिला सरला झाली| जवळी न बाजुस अथवा आता|
दूर न मज काही||१||
असे झाल्याने मी दुष्यंत राजाच्याच रथात बसलो आहेसे वाटू लागले. शहरे, खेडी, नद्या, नाले इ. आमच्या पायाखालून पार निघून जात. अशा वेगाने आम्ही जात असता समोरून एकादी अशीच राक्षसी आमच्या अंगावर एक मोठा फुत्कार टाकून बिजलीसारखी चमकून जाई! वाटेने मोठी स्टेशने आली म्हणजे आमच्यापुढे रूळांच्या जाळ्याचा गुंता पसरलेला दिसे, पण त्यातूनही ही नेमकी निसटून पार होई!
बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळच दिसत. घरे, देवळे, झाडे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती. म्हणून त्या प्रदेशास ब्लॅक कंट्री म्हणजे काळा देश असे नाव आहे. अशा वातावरणात अष्टौप्रहर राहून निर्जीव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल! आमच्या कवीनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र ते चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे! प्रगतीची ही काळी खरबरीत बाजू पाहून माझ्या तोंडातून आपोआपच हे उद्गार निघाले :-
“अहागे सुधारणे! तू दिवाणखान्यात येताना कशी नटून येतेस! तुझ्या पदरावर माशी देखील बसलेली खपत नाही. तुझा नाजूक बांधा, कोमल गात्रे, उंची पोषाक व जडजवाहीर पाहून आम्हा पौरस्त्यास कितीही कौतुक केले तरी पुरेसे होत नाही! पण हे गे काय तुझे एथळे स्वरूप! किती हे तुझे कष्ट, कोण ह्या घामाच्या धारा आणि हे हातापायाला घट्टे! येथे तुला नुसते श्वासोच्छवास करण्यालाही वेळ मिळेना. तीच तू मंडळीत बसलीस म्हणजे काय काय ढंग करतेस! येथे तुला नुसती मोकळी हवाही मिळत नाही. दुसरीकडे काय तुझ्या क्रीडा, करमणुकी, चैनीचे प्रवास, रूचीच्या आलटापालटी! नाही आम्हांला हे तुझे बहुरूपी प्रकार कळत. कार्यालयातून क्रीडालयात व क्रीडालयातून पुन: अशा कार्यालयात जाणारी जर तूच असशील तर असे वेश पालटण्यात तला किती शरम वाटत असेल? हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे, असे तू किती वेळां तरी म्हणतेस, पण नाही सुधारणे! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे. ते कसे ते सांगण्याची आमच्यातही शक्ती नाही, तोवर तुला तरी नावे ठेवून काय फळ! तरी दिसला तो प्रकार कळविण्याचे तूर्त आमचे काम आहे.”
ज्या सुधारणेने आपल्यावर इतके जब्बर मोहिनी-अस्त्र टाकिले आहे तिची अशी कोणती व किती व्यंगे दिसली की मी तिला इतके टाकून व टोचून बोललो? मी तर अग्नीरथातून वा-याच्या वेगाने चाललो होतो. पण तशातच ह्या सुंदरीचे कृष्ण आणि कठोर स्वरूप असे दिसून आले की वरील उद्गार मला नकळतच निघाले! एकाद्या भयंकर स्वप्नाचा काळ फार तर एक दोन पळेच असतो, पण तेवढ्यात कितीतरी स्थितींचा आपल्यास अनुभव येतो! इतकेच नव्हे तर जागे झाल्यावरही त्याचा परिणाम मनावर घडत असतोच! ह्याचे कारण हे की स्वप्नातले देखावे आपण जागृतीत आधीच निरनिराळ्या वेळी पाहिलेले असतात. फक्त त्यांचे एकीकरण मात्र मनाच्या केंद्रस्थानी एक-दोन क्षणांतच झाल्याने आपली अशी कासाविशी होते. अशातलाच काहीसा प्रकार ह्यावेळी माझा झाला. दम न घेता सारखा दोन तास धावत होतो तरी खिडकीतून बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहावयाला सापडेना. व्यापाराची घडामोड व उद्योगाची धडपड किती लगट केली तरी मागे राहीनात. एकादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि सांती ह्यांमुळे माणसे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना. काही हौसेने, काही केवळ निरूपायाने ती अशी दिवसेदिवस अधिकाधिक गर्दी करून राहत आहेत. एकाद्या आधुनिक मोठ्या शहरात सावकाशपणे हिंडू लागल्यास त्यातील मातबर चौक, उपवने, संग्रहालये, चित्रालये इत्यादी मोहक स्थळे नजरेस येतात आणि त्या झुरक्यासरशी शहरातील इतर ठिकाणच्या नानाविध यातनांचा विसर पडतो हे खरे. पण त्याच शहराकडे असे विहंगम दृष्ट्या पाहू गेल्यास त्याचे रूप तितके मोहक दिसत नाही. ह्यावरून मला असे वाटू लागले की,काही गोष्टी सावकाश पाहिल्याशिवाय कळत नाहीत; तर काही झटक्यासरशी पाहिल्याशिवाय कळत नाहीत. असो! अशा रीतीने मी पेनरिथ स्टेशनावर येऊन पोहोचलो. येथे दगदगीचे जग संपले आणि पुढे निराळेच जग दिसू लागले.