(सु. प. ५-२-१९०५)
(गु. डॉ. भांडारकरांना मुंबई युनिव्हर्सिटीची एल्. एल्. डी. ही पदवी मिळाली, त्या वेळीं त्यांचें अभिनंदन करण्याकरितां जी सभा भरविली होती त्या सभेमध्यें झालेल्या भाषणाचा सारांश.)
आजच्या प्रसंगी मी माझ्या मनाच्या कलाप्रमाणेच वागावयाचे झाल्यास मी मुळीच बोलावयास उठलो नसतो. कारण आम्हा पौरस्त्यांमध्ये मर्यादेचे व विनयाचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे एकाने दुस-याचा आणि विशेषेकरून लहानांनी वडिलांचा बहुमान करावयाचा झाल्यास तो शब्दांनी व्यक्त करू नये, तर वर्तनानेच दाखवावा असे आहे. एकाद्यास कोणी म्हटले की, तुझ्या आईवर तुझी प्रीती आहे, हे शब्दांनी सिद्ध कर किंवा पित्यासंबंधी तुझी पूज्यबुद्धी असल्याचे आम्हांस उघड प्रत्ययास आणून दे, तर त्याला काय वाटेल ? त्याचप्रकारे, आज मला प्रत्यक्ष आमच्या गुरुवर्यांचे पुढे उभे राहून त्यांचेविषयी आम्हांला असे वाटते, तसे वाटते इ. म्हणावे लागत आहे. ह्यात एका दृष्टीने मजवर मोठा जुलूम होत आहे. पण असो. ज्याअर्थी, मी त्यास वश झालो आहे त्याअर्थी मला आपले काम बजावले पाहिजे.
प्रथम कोणी अशी शंका घेतील की, डॉ. साहेबांस हा अपूर्व मान मिळून आज किती दिवस तरी झाले आणि ही समाजातील तरुण मंडळी त्यांच्या अभिनंदनास अगदी सर्वांच्या मागून अशी रेंगाळत का आली आहे ? पण खरा प्रकार असा आहे की, जरी ह्या मंडळीने सर्वांच्या मागून अभिनंदन उघड रीतीने केले आहे, तरी ते करण्याचा विचार ह्यांच्या मनात सर्वांच्या आधी आला आहे. मला पक्के आठवते की, डॉ. साहेबांस ही पदवी मिळाल्याबरोबर लगेच एक सामाजिक तरुण मजकडे आला आणि विचारू लागला, की आता आम्ही काय करावयाचे ? आम्हांस तर फारच आनंद होत आहे. मी तेव्हा इतकेच म्हणालो की, आम्ही तूर्त हेच करावयाचे की लोकांत कोण बडी बडी मंडळी आमच्या गुरुवर्यांचे कसकसे अभिनंदन करतील ते कौतुकाने पहावे. आणि खरोखर आमचा समाज म्हणजे एक कुटुंब. डॉ. साहेबांशी आमचे घरगुती नाते. तर बाहेर लोकांकडून अनेकवार सन्मान व अभिनंदन पाहून डॉ. साहेब अखेरीस घरी आले असता आम्ही घरातील लहान मंडळींनी त्यांचे असे उल्हासाने स्वागत करावे ह्यात काहीच वावगे नाही, तर ते यथायोग्यच झाले.
ह्या प्रसंगी मी डॉ. मजकुरांची मोघम स्तुती किंवा त्यांचे काही सामान्य गुण गात बसत नाही. आता जी फुलांची माळ आम्ही त्यांच्या गळ्यात घातली आहे, ती जशी ते थोडाच वेळ केवळ उपचारासाठी घेऊन शेवटी येथल्या येथेच ठेवून ते व आम्हीही निघून जाणार आहो, तशीच गत अशा स्तुतीच्या माळेची होईल. म्हणून डॉ. साहेबांचे एक दोन विशेष गुण जे अगदी माझ्या अनुभवासच आले ते मी सांगत आहे. आणि तेही आमच्या फायद्यासाठी, त्यांच्या बढाईसाठी नव्हे. समाजाचे गुणदोष समाजास सांगण्यात डॉ. साहेब अगदी निस्पृह आहेत हे तर आता बहुश्रुतच आहे, पण ह्याहूनही एका दृष्टीने दुर्लभ जो गुण खासगी व्यवहारातही आपले कर्तव्य बजावतेवेळी निर्भय व निर्भीडपणा ठेवणे, हा त्यांच्यात आहे. एका व्यक्तीसंबंधी आपले मत त्याच्या समक्ष अगदी सरळपणे व सात्त्विकपणे सांगून टाकण्यात ते मुळीच कसूर करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समागमात राहणा-या तरुणांस फार लाभ होण्यासारखा आहे. दुसरी विशेष गोष्ट मी पाहिलेली त्यांची नित्याची कौटुंबिक उपासना ही होय. स्वाशयनिवेदन व आत्मपरिक्षणांनी परिपूर्ण भरलेल्या त्यांच्या व्यक्तिप्रार्थना, आम्हांला पान उलटण्याचीही फुरसद न मिळता त्यांना समयोचित सुचणारे तुकोबांचे अभंग अगदी विनीत भावाने त्यांच्या भोवताली बसलेली त्यांची मुले, नातू व नाती व त्यांचे भजन हे सर्व पाहून परक्याचे मनावर देखील फार खोल व शुभ परिणाम होण्यासारखा आहे.
बंगाल्यातील महर्षी देवेंद्रनाथ हे आता परलोकवासी झाले. पण आमचे महर्षी आमच्यात अद्यापि आहेत ही किती भाग्याची गोष्ट ! हे महर्षीही त्याप्रमाणेच आमच्या समाजाचे प्रधान आचार्य आणि महनीय उपाध्याय आहेत. उपासना व उपदेश ह्याशिवाय कौटुंबिक विधिसंस्कार ह्यांनीच ग्रथित करून ठेविले आहेत. इतकेच नव्हे तर उपनयन, विवाह, नामकरण, आदिकरून घरगुती विधी ह्यांच्या हस्ते जितके झाले आहेत, तितके समाजात इतरांकडून झाले नसतील. शेवटी गुरुवर्यांजवळ एकच मागणी मागून मी रजा घेतो. आमच्या समाजाच्या मतासंबंधी एकाद्या वजनदार ग्रंथाची हल्ली मोठी उणीव आहे. बाह्य ग्रंथाचे प्रामाण्य समाज मानीत नाही, तेव्हा अशा ग्रंथास पुढे भलतेच महत्त्व येईल अशी भीती कोणास बाळगण्याचे कारण नाही. तर डॉ. साहेबांच्याच हस्ते असा ग्रंथ होईल तर आम्ही फार आभारी होऊ.