वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा

मूर्तिपूजक आणि सौंदर्योपासक असे जे प्रकृतीचे भक्त आहेत, त्यांचे हा सरोवर प्रांत म्हणजे एक मोठे क्षेत्रच आहे. ह्या क्षेत्रातील उपाध्यायाची कायमची नेमणूक वुइल्यस वर्डस्वर्थ ह्यजकडे आहे. ह्या कवीचा लौकिक-जीवनकाळ जरी १७७०-१८५० ह्या अवधीतच आटपला तरी ह्या क्षेत्रात उपाध्येपणाचा धंदा तो अद्यापि चालवीत आहे असे म्हणण्यास फारशी हरकत येणार नाही. ह्या प्रांती पदोपदी कोणातरी मोठ्या पुरूषाचे स्मारक पाहाण्यात येते अगर पुण्यकथा ऐकण्यात येतेच. झाडी, माळ, रस्ते, वाटा एकंदरीत सर्व वातावरणच ह्या पवित्र आत्म्यांनी गजबजून गेले आहे. ह्यामुळे येथे येणा-या परकीयांची, विशेषत: मजसारख्या पौरस्त्याची मोठी चमत्कारिक स्थिती होऊन जाते. मूळ देश पहावा तर तळहाताएवढा. भूगलातच नव्हे तर इतिहासातही, आकृती लहान पण हल्ली पराक्रम भूमंडळी मावेनासा झाला आहे. पराक्रम खोटा आहे, असे कोणीही समंजस मनुष्य म्हणत नाही. गुणांचा मक्ता काही ह्याच राष्ट्राला दिलेला नाही. ते सर्वात कमीजास्त आहेत. पण गुणांचे चीज, किंबहुना बोभाट देखील करण्याची इकडच्या लोकांना जी हातोटी साधली आहे ती पाहून निदान पौरस्त्याला तर फार फार कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. मोठा पुरूष जन्मला की पुरे, तो सर्व राष्ट्राचे धन होऊन बसतो. त्याच्या पश्चात त्याचे स्मारक काय करू, कसे करू, असे सर्व राष्ट्राला होऊन जाते. मोठमोठ्या शहरांत जेथे माणसांची गर्दी फार तेथे स्मारकांचीही गर्दी जमलेली असते, हे सांगावयाला नकोच, पण अशा निर्जन व निवांत स्थळीदेखील कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने स्मारकेही पुढे येतातच. हे पाहून ह्या राष्ट्राची मोठी धन्यता वाटते. ह्यावरून पाहता वर्डस्वर्थला येथे जो आदर मिळत आहे तो त्याच्या थोरवीला मुळीच जास्त नाही. जास्त असो, कमी असो, जो मिळतो तो असा बिनबोभाट मिळत आहे की, एकांतप्रियता हा त्याचा मोठा गुण त्याच्या स्मारकात विशेषच खुलून दिसत आहे.

वर्डस्वर्थची कविता म्हणजे सायंकाळच्या चिंतनासारखी शुद्ध आणि उदात्त, गंभीर आणि प्रसन्न आहे. तिचे सेवन केल्याने मनाला क्षोभ होत नाही की माज येत नाही, किळस वाट नाही किंवा आळस वाटत नाही. ह्याची कृती म्हणजे खासगी अनुभवाची लहान लहान पद्ये, जणू रामबाण मात्रेच्या गोळ्याच! इतरांचे सूर नुसते कानांतच राहतात. पण ह्याच्या सुरांचे ठसे अंतरातल्या फोनोग्राफवर तात्काळ उठून पुन: कधी तसा बाह्य प्रसंग आल्यास ते आपोआप आत वाजू लागतात! फ्रेंच ग्रंथकार व्हॉल्टेअर म्हणतो की, ‘काव्यमध्ये नीतीचा उद्गार इंग्रजी कवींनी जितक्या जोराने केला आहे त्याहून जास्त इतर कोणीही केला नाही.’ आणि वर्डस्वर्थने अस्सल नीतीची जी कामगिरी बजावली आहे, तशी इतर कोणत्याही इंग्रज कवीने बजावलेली नाही. नीतीच नव्हे तर त्याच्या काव्यात धर्माचीही जिवंत आणि जागती ज्योत जळत आहे. त्याचे पद्य म्हणजे परमात्म्याचे परंपरया स्तोत्रच. परंपरया म्हटले म्हणून त्याची प्रत्यक्षता कमी असे मुळीच नव्हे, उलट अनेक रूढ धर्मात देवाच्या ज्या सहस्त्र नामावळीचा घोष चालू आहे, त्यावरूनही परमेश्वराचा संबंध इतक्या प्रत्यक्षपण जडण्याचा मुळी संभव नाही. वर्डस्वर्थची नीती आणि धर्म ही दोन्ही नवीन जन्मलेल्या बालकाच्या उल्हासासारखी ताजी आणि नेणती आहेत, आणि तितकीच तंतोतंत निकट प्रत्यक्ष आहेत! ह्याचे कारण हेच की, मुलाप्रमाणे वर्डस्वर्थनेही आपला सृष्टीशी अगदी अव्यभिचरित आणि अखंडित संबंध राखला होता. तो म्हणतो:

The World is too much with us,-late and soon;
Getting and spending,-we lay waste our powers;
Little we see in Nature that is ours;
We have given our hearts away,-a sordid boon.

ज्या फुलाजवळून आम्ही सहज न पाहता जाऊ त्यातच भ्रमर येऊन तासानुतास अडकून पडतो तीच स्थिती वर्डस्वर्थची होत होती हे त्याच्या खालील चरणावरून दिसते.

To me the meanest flower that blows
Can give thoughts that do often lie deep for tears.

असा हा सृष्टीचा भक्त आणि भोक्ता ईश्वराचे गुण डोळ्याने पाहून, तोंडाने गात मरेतोपर्यंत ह्याच प्रदेशात राहून गेला. बॉरोडेलहून सुमारे २५ मैलांवर डोंगराच्या कुशीत ग्रासमिअर नावाच्या सुंदर सरोवराच्या काठी ग्रासमिअर खेड्यात डव्हकॉटेज नावाच्या कुटिकेत वर्डस्वर्थ राहत असे ती पाहण्यास आम्ही एके दिवशी गेलो.

स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हन ह्या गावी शेक्सपियरच्या स्मारकाचा जो भपका, थाटमाट आणि गोंगाट दिसला तशातला येथे मुळीच प्रकार नव्हता. एक झोपडी केवळ साधेपणाची आणि शांतीची मूर्तीच! दगडमातीचे हे माणसांनी बांधलेले घरकुल, पण भोवतालची सर्व भोवतालची सर्व सृष्टी त्याकडे कशी आदरपूर्वक पहात बसली होती. झोपडीच्या भिंती मजबूत पण ठेंगण्या होत्या. त्यांना आत बाहेर चुन्याची सफेती फासली होती. (हल्ली ह्या देशात अशा सफेत भिंतीत क्वचित एकाद्या जुन्या खेड्यात आढळतात). खपरेल अगदी खालपर्यंत येऊन नम्रता दाखवीत होते. इंग्लिश घराचे मुख्य लक्षण जे धुराडे ते तर फारच जुन्या चालीचे, त्यावर शेकडो हिवाळ्यांच्या खुणा दिसत होत्या. घराभोवती पुराणपद्धतीचे पण हल्ली दुरूस्त राखलेले वळणदार कंपौंड होते. त्यातून आत जाण्यास १८ व्या शतकातले फाटक होते. आम्ही प्रत्येक ६ आण्याचे तिकीट घेऊन आत गेलो.

आत गेल्यावर १०० वर्षांमागची इंग्रजी साधी रहाटी आणि उच्च विचार ह्यांचे दाखले खाली फरशीवर, बाजूस भिंतीवर, वरती पाटणीवर भरपूर दिसू लागले. कवी १८०२ मध्ये एकदा लंडनला गेला असता त्याचे असे उद्गार निघाले होते:-

...       ...     ...     ....    I am opprest
To think that now our life is only drest
For show mean handy work of craftman, cook
Org groom-we must run glitting like a brook
In the open sunshine or we are unblest,

Rapine avarice, expense,

१८०२ साली जर बिचा-याला ही स्थिती दिसली तर १९०२ साली परवा झालेला राज्याभिषेक समारंभ पाहून त्याला काय वाटले असते! ते काही असो. पण हा समारंभ आणि ही झोपडी दोन्ही एकाच देशात, एकाच काळी कशी असू शकतात, ह्याचे मला मोठे कोडे पडले. ही झोपडी पाहण्यास वर्डस्वर्थचे भक्त म्हणविणा-या हजारो खुशालचंदांची जी येथे गर्दी येते त्यांच्यात वर्डस्वर्थचा साधेपणा दशांशानेही नसतो, तरी ते ह्या झोपडीचे कौतुकच करीत असतात! तिचे फोटो घेतात, तिच्या प्रतिकृती बनवितात! कवीला लंडनातली मूर्तिपूजा सोसली नाही. मला तर ग्रासमिअरमधील मूर्तिपूजा अधिक दु:सह झाली! असो.

या खोपटीत कवी आणि त्याची जिवलग आणि चहाती बहीण डोरोथी अशी दोघेच रहात असत. तळमजल्यात काळ्या दगडाची फरशी होती; ती अगदी झिजली होती. ती पहात पहात आम्ही जेव्हा भिंतीतील मोठ्या व ओबडधोबड चुलीजवळ आलो, तेव्हा कवीच्या एकंदर रहाटीचे चित्र पुढे दिसू लागले. चुलीजवळ रिकाम्या चकाट्या पिटण्यात कधी आनंद होत नसे. तो म्हणतो:
Better than such discourse, doth silence long,
Long, barren silence, square with my desire,
To sit without emotion hope or aim,
In the loved presence of my cottage fire,
And listen to the flapping of the flame,
Or kettle wispering its faint under song.

वरच्या मजल्यात बसावयाच्या खोलीत कवीच्या काही वस्तू, चित्रे वगैरे दोन जड खुर्च्या आणि इतर काही सामान ठेविले आहे. निजावयाचे खोलीत त्याचे अंथरूण तसेच राखून ठेविले आहे. दुस-या एका खोलीत त्याच्या पुस्तकाच्या सर्व आवृत्ती व हस्तलिखिते तावदानात व्यवस्थेने मांडून ठेविली आहेत. काही महत्त्वाची हस्तलिखिते भिंतीवर काचेतून टांगली आहेत. त्याने जी सृष्टीतील निरनिराळ्या देखाव्यांवर गाणी (Sonnets) रचली आहेत, त्यांचे विषय हुबेहूब दाखविण्याकरिता काही वास्तविक व काही काल्पनिक फोटोग्राफ एका चौकटीत एकीकडे टांगले आहेत.

ही झोपडी डोंगराच्या अगदी पायथ्याशी चिकटलेली असल्यामुळे दुस-या मजल्यातून मागच्या बाजूने बाहेर पडले की आपण परसात येतो. हे परसू म्हणजे डोंगराची सरळ उतरणच आहे. बागेत सृष्टीवर कोठेही बलात्कार केल्याचे चिन्ह दिसत नाही, पण तिच्या संमतीने जी साफसफाई आणि वेणीफणी करावयाची तितकीच केली आहे. बागेतील आसने म्हणजे खडकातल्या पाय-या, झाडांच्या वाकलेल्या फांद्या वगैरे. आगंतुक जड एकच बाक जे ठेविले आहे त्याचीही भोवतालच्या परिस्थितीशी पूर्ण संगती आहे! हल्ली येथे कोणी राहत नाही, फक्त दाखविण्यासाठी एक दोन बाया मात्र असतात.

नंतर आम्ही ग्रासमिअर खेड्यातील देवळाच्या स्मशानभूमीतील कवींचे कबरस्थान पाहिले, ते तळ्याच्या अगदी काठालाच आहे. त्याचे आणि त्याच्या प्रिय बहिणीचे थडगे एकमेकाला चिकटून आहेत. दोन लांब चौकोनी भुईसपाट निराळ्या फरशा आणि त्याभोवती दाट हिरवे गवत ह्याशिवाय तेथे काही नाही. देवळाची इमारत किंचित मोठी जुन्या ओबडधोबड नॉर्मन घाटाची आणि भक्कम बांधणीची आहे. देवळात एका खांबावर कवीचा संगमरवरी मुखवटा ठेविला असून खाली या अर्थाचा लेख आहे:-
To the memory of W. Wordsworth…who,
By the special gift and calling of God, was raised
Up to be the chief minister not only of the noblest
Poetry but of high and sacred truth….

असो, ह्या प्रकारे आमचे ह्या प्रांतात १५  दिवस अगदी नकळत गेले. ह्यांपैकी बहुतके दिवस, सकाळी ८ वाजता न्याहारी करून संध्याकाळी ८ वाजता जेवणाचे वेळेपर्यंत खांद्यावर फराळाच्या पडशा टाकून जंगलातून हिंडत, पाण्यावरून तरंगत, पर्वतावरून सरपटत काळ घालविला म्हणावयाचा. ऑक्सफर्डचे प्रोफेसर व विद्यार्थी म्हणजे केवळ पुस्तकातील किडे नव्हेत. लीथस् कॉटेजमध्ये निघणा-या आमच्या एका गमतीच्या पाक्षिक पत्रिकेत प्रोफेसर कार्पेंटर साहेबाबद्दलचा जो उल्लेख आहे तो अगदी खरा आहे आणि मासलेवाईक आहे.

Each day he does a mountain climb,
A ten mile row, theree meals, a witticism
And fills the intervening time with
Pali texts and hebrew criticism.

खरोखरच आम्हा सर्वात प्रोफेसरच अधिक बळकट व काटक ठरले. किती चालले तरी तोंडावर थकल्याचे चिन्ह नसे. वाट शोधून काढणे, लहानसान माहिती देणे, श्रमाची सर्व कामे स्वतः हौसेने व काळजीने करणे वगैरेंची कशी अगदी त्यांना सवयच जडलेली. कोणी थकून मागे राहिल्यास पुन्हा त्याचेसाठी मागे जात. कोणी फार पुढे गेल्यास वाट चुकतील म्हणून पुढेही जात, घरीही निरनिराळे खेळ खेळून व नाना सुभाषिते सांगून सर्वांस उल्हासात ठेवीत.

अशा भल्या गुरूची, गुरूपत्नीची व आनंदी सहाध्यायाची शेवटी रजा घेऊन मी एका स्कॉच सरोवराची वाट धरली.