लंडन
ता. २७-६-१९०२
आजचा दिवस म्हणजे इंग्लंडच्या इतिहासात अत्यंत बहारीचा होणारा होता. पण विलक्षण दैवदुर्विलासामुपे त्या बहारीचा तूर्त पूर्ण विरस झाला आहे! त्यामुळे ह्या राष्ट्रास किती खेद वाटत आहे आणि काही लोकांचे किती खासगी नुकसान झाले आहे, ह्याचा नुसता अंदाज लागणेही अशक्य आहे.
ह्या राज्यारोहणाचा डंका आज जवळजवळ वर्षभर सा-या जगभर गाजत होता. तेव्हापासून त्याची सारखी जय्यत तयारी चालली होती. नुकत्याच संपलेल्या बोअर युद्धामुळे तर इंग्रजी साम्राज्याचा अगदी कळस होऊन गेला आहे. लढाई मिटविण्याच्या कामी स्वत:बादशहांनी खटपट केल्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. ह्या अनेक कारणांमुळे हा समारंभ अपूर्व होणार होता. ह्याआठवड्याचे आरंभी जगातील देशोदेशींचे राजे अगर त्यांचे प्रतिनिधी लंडन शहरी दाखल झाले. पाहुण्यांची इतकी गर्दी झाली की ह्या अफाट शहरीदेखील ह्या आठवड्यात जागा मिळण्याची मारामार पडू लागली. दिवसा लंडनमध्ये समारंभ पाहून राभी ऑक्सफर्डमध्यें निजावयास जाण्याची देखील काही लोकांस योजना करावी लागली!
गेल्या आठवड्यातच बाशहांची प्रकृती किंचित नादुरूस्त झाली होती. पण ती इतक्या विकोपास जाईल असे कोणास वाटले नवह्ते. गेल्या सोमवारी दोनप्रहरी आमची गाडी ऑक्सफर्डहून लंडन येथील पाँडिगटन् स्टेशनावर १२|| वाजता पोहोचली असता तेथे काही विशेष गडबड दिसू लागली. शहराचे स्वरूप तर अगदी पालटलेले होते. माळा, निशाणे आणि तोरणे ह्यांनी सर्व शहर जणू हासत होते. आळीती गोजिरवाणी मुले आपले चिमुकले बावटे कंटाजनांच्या आत खुपसून आगगाडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उभी होती. इतक्यात वुइंडसर किल्ल्यातून एक गाडी मोठ्या तो-याने फुसफुसत स्टेशनात आली. तिच्या एंजिनवरचा दैदिप्यमान मुकूट पाहून हिला इतका गर्व का झाला होता हे सहज कळले. भाग्यशाली एडवर्ड बादशहांची स्वारी आगगाडीतून घोड्याच्या गाडीत बसताना त्यांच्या राजनिष्ठ प्रजेने एकच आनंदाचा टाहो फोडिला!
शहराच्या रस्त्यातून ह्याच दिवशी इतकी गर्धी उसळलेली होती की, पायवाटेने कोठे जाऊ लागल्यास अतिशय वेळ लागू लागला. ता. २६-२७ रोजी छबिन्याचा रस्ता सकाळी ८ पासून बंद होईल असे शहर पोलीसाने जाहीर केले. ज्यांच्याजवळ बसावयाच्या जागेचे तिकीट होते त्यासच रस्त्यात येण्याची परवानगी होती. सुमारे ७ मैल लांबीच्या रस्त्यात नानात-हेची शोभा व रोषणाई केली होती. जागोजाग ३-४ मजले उंच प्रेक्षक बसण्याकरिता सुंदर पाय-या केया होत्या. प्रेक्षकांच्या जागेचे तिकीट १ पासून तो ७ गिनीपर्यंतचे (समारे १०० रूपये) होते. निरनिराळ्या वसाहतीमार्फत जागोजाग भव्य व सुंदर कमानी उभारिल्या होत्या. अमेरिकेतील कानडा देशातून इंग्लंडास धान्याचा मुख्य पुरवठा होत असतो म्हणून कानड्याचे कमानीवर त्या देशात पिकणारी सर्व धान्य, भाजीपाला, फळफळावळ आणि खाद्य प्राणी ह्यांचे प्रदर्शन केले होते.
मंगळवारी (ता. २४) दोनप्रहरी लंडनच्या रस्त्यात विपरीत देखावा दिसला. भराभर जादा पत्रकांचे अंक खपू लागले! जो तो कोप-यावर उभा राहून आतील मजकूर आधाशासारखा वाचू लागला! घटकेपूर्वी ज्या राष्ट्राचा आनंद पोटात मावेनासा होऊन त्यास काय करू आणि काय न करू असे झाले होते, त्यासच आता निराशेचा असा जबर धक्का बसला की, त्याने ते काही वेळ सुंद होऊन गेले. आदले दिवशी बादशहाच्या आजाराने उलट खाल्यामुळे आज त्यावर अत्यंत कठीण शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली. बादशहास आपल्या आजारापेक्षा आपल्या प्रजेची अशी खडतर निराशा झाली आणि त्यांचे इतके जबर नुकसान झाले ह्याची वेदना अधिक दु:सह झाली. आणि “मी मेलो तरी बेहत्तर पण वेस्टमिनिस्टर मठापर्यंत जाईन” असे त्यांच्या तोंडचे वाक्य पार्लमेंमध्ये ना. वाल्फर साहेबांनी सांगितले! समारंभाची तर गोष्ट राहिलीच. पण बादशहाच्या प्रकृतीकडे सर्वांचे चित्त लागले आहे. आज दोन दिवस सर्व कामे तशीच तहकूब पडली आहेत, काय करावे हे कोणासच सुचत नाही. पुष्कळ पाहुणे व प्रेक्षक आणि राजांच्या स्वा-या विन्मुख परत गेल्या, असो, आता ही निराशेची कहाणी ह्यापुढे मी शब्दांनी सांगण्यापेक्षा आपण कल्पनेने जाणावी!
जुन्या युगातील एकछत्री राजसत्ता व खासगी स्वामीनिष्ठा आणि नव्या युगातील सार्वजनिक प्रजासत्ता व स्वातंत्र्यप्रीती ह्या परस्पर भिन्न वस्तूंचे बेमालूम मिश्रण इंग्लंडच्या हल्लीच्या राज्यघटनेत आहे! ही घटना आमच्या रामराज्याहून जशी निराळी आहे तशीच हल्लीच्या युनायटेड स्टेटसमधील केवळ लोकनियुक्त राज्याहूनही निराळी आहे. राजकीय मानसशास्त्रातील हे एक अपूर्व कोडेच आहे म्हणावयाचे! हे कोडे आज एक दोन दिवसांत जेस नजरेस आले तसे कधीच आले नसेल. कित्येक अमेरिकन लोक ही धेडगुजरी राज्यपद्धती पाहून हासतात. पण एवढी गोष्ट निर्विवाद आहे की, इंग्रजी साम्राज्याची बळकटी ह्या कोड्यातच आहे. येथवर तर शहाण्या इंग्रज मुत्सद्यांनीं हें गाडें सुरळीत आणलें. पुढें काय ठेविलें आहें तें हरी जाणें !