* डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
घ्यारे भाई घ्यारे भाई । कोणी कांहीं थोडें बहू ॥ - तुकाराम
(* डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था मुंबई येथें स्थापन होऊन चार वर्षें झालीं व बलिप्रतिपदेच्या दिवशीं तिला पांचवें वर्ष लागलें, म्हणून मिशनच्या परळ येथील इंग्रजी शाळेंत ता. २ नोव्हेंबर सन १९१० रोजीं पाडव्या दिवशीं सकाळीं आठ वाजतां ईश्वरोपासना झाली. ती रा. विठ्ठलराव शिंदें यांनीं चालविली. त्या वेळीं प्रार्थनासमाजांतील आणि बाहेरील मिशनचे हितचिंतक मंडळीनीं आणि अस्पृश्य वर्गांतील स्त्रीपुरुष मंडळींनीं शाळेचा हॉल भरला होता. शाळेंतील पुष्कळशीं मुलें स्वच्छ स्नान करून आणि नीटनेटका पोशाख करून बसलीं होतीं. त्यांना दिवाळीचा खाऊ वाटल्यानंतर थोडीशी प्रार्थना करून त्यांना पाठविण्यांत आलें. नंतर उपासनेस आरंभ झाला. उपदेशाच्या वेळीं रा. शिंदे यांनीं 'अभय दान मज देई गा उदारा' आणि - 'घ्यारे भाई घ्यारे भाई । कोणी कांहीं थोडें बहु' ॥ हे दोन अभंग घेतले होते.)
डिप्रेस्ड क्लासेस मिशन काढून काल चार वर्षें संपली. आज नूतन वर्षारंभीं 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी' या नांवाचा खोल अर्थ काय आहे आणि त्या अर्थाची खरी सिद्धी कशी होणार या दोन गोष्टींचा विचार करणे अवश्य आहे. मिशन हा शब्द आमच्याकडे अद्यापि नवीन आहे. तो आमच्या अंगवळणी न पडल्यामुळे त्यामध्यें कांहीं न रुचणारी अशी परकीयता भासते. पौरस्त्य धर्मांतील मोक्षाचा मार्ग हा व्यक्तिविषयक आहे. प्रथम प्रथम तर ज्ञान आणि समाधि यामध्यें त्यांचा नीरस लय होऊन पुढें त्यांत भक्तीची जोड मिळाली तरी प्रत्येकानें एकाकी ईश्वराकडे जावें हेच धोरण बराच काळ होतें. पुढे भक्तिमार्गाचा विकास होत जाऊन रामानुजादि यांनीं त्याला सामाजिक स्वरूप दिले. तथापि या भागवत धर्मास साधेंभोळें प्राकृत रूप देऊन अभयाची सुवार्ता सर्व मनुष्यप्राण्यांस पोहोंचविण्याचें श्रेय तुकारामसारख्यांनीं ''यारे यारे लहान थोर । नारि भलते नारी नर ॥'' , ''आम्ही वैकुंठवासी'', ''पिटूं भक्तीचा डांगोरा'' इत्यादी प्रकारें दवंडी पिटून संपादन केलें. तथापि मिशन, गास्पेल, इव्हांजेल इत्यादी शब्दांस अन्वर्थक शब्द आमच्या भाषेंत न मिळण्याइतका त्यांतील अर्थाचा आमच्यांतील सामाजिक आणि धार्मिक चळवळींमध्ये कमी प्रचार झाला आहे. इतकेंच नव्हे, तर अजूनही हे शब्द आमच्या कानाला कडू लागतात. मिशन स्थापन झाल्यावर दोनतीन वर्षें वरील नांवांतील 'मिशन' हा शब्द काढून टाकण्याविषयीं कित्येक हितचिंतकांकडून कळकळीच्या सूचना वेळोवेळीं आल्या. याचें कारण या संस्थेचें खरें स्वरूप कळले नाहीं एवढेंच. मनुष्याचा कोणताही वर्ग किंबहुना कोणीहि व्यक्ति कायमची पतित नाहीं, अस्पृश्य नाहीं, निराश्रित नाहीं, स्वर्गीय आशेचा तंतु कोणीही तोडण्यास समर्थ नाहीं. तात्पुरतिक निराशेने खिन्न झालेल्यांना, दुःख, दैन्य आणि दारिद्रय यांच्या संवयीनें जड झालेल्यांना अभयाची सुवार्ता पोहोंचविणें हे मिशनचें काम आहे. मिशन म्हणजे प्रेषित संस्था; केवळ ऐहिक कल्याणासाठीं झटणारी मंडळी नव्हे; यशापयशाकडे न पाहतां प्रेरणेच्या प्रवाहावर यत्न करणारी मंडळी होय. पण ही सर्व भाषा आमच्या देशबंधूंस परकीय वाटते. हिच्या योजनेंत नुसतें पोकळ अनुकरण दिसतें. खाणें, पिणें, पेहराव आणि बोलणें चालणें या वरवरच्या क्षुल्लक गोष्टींमध्यें पाश्चात्त्यांचें अनुकरण राजरोस सर्वच करीत आहेत. परंतु आध्यात्मिक अनुभवाच्या भरींवपणानें समाजसेवा घडत असतांनाही तद्दर्शक शब्द ऐकल्यावर मात्र कित्येक लोक कानांवर हात ठेवतात. असो. मिशनचा खरा अर्थ हा आहे. एवढा थोर अर्थ आमच्या नांवामध्यें आहे म्हणून तशी लायकी आम्हांमध्यें आहे असें आम्हां कोणांसही वाटत नाहीं. या कामास स्वतःस कायमचीं वाहून घेतलेलीं जीं चार-दोन माणसें असतील तीं जवळ जवळ पूर्णपणें कामास नालायक आहेत, हें उघड करून दाखविण्याची आवश्यकता नाहीं. काहींना तर आपल्या नालायकीचीही जाणीव नाहीं इतकी ती साधीं भोळीं आहेत. मिशन सुरू झाल्यानंतर एकदोन वर्षांनींच मिशनची कान्स्टिट्यूशन (सनद) तयार झाली. त्या वेळी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' असा नांवाचा विस्तार होऊन उद्देशामध्यें असें म्हटलें आहे कीं, शिक्षण, कामधंदा, समतेची आणि ममतेची वागणूक, धर्मनीति आणि नागरिकता इत्यादि संबंधीं उपदेश ह्यांच्या द्वारां हिंदुस्थानांतील अस्पृश्य वर्गांना साह्य करण्याचा हें मिशन यत्न करील आणि ह्या मिशनचा योगक्षेम ही सोसायटी चालवील. ह्यावरून प्रतयक्ष यत्न करण्याचें काम मिशनचें आहे. आणि द्रव्यबळ, व्यावहारिक अनुभव, नियंत्रण, सल्लामसलत, शिफारस इत्यादी ऐहिक सर्व अनुसंधानांच्या योगें हें मिशन जिवंत राखणें हें सोसायटीचें काम. मिशनरी आपल्या कामाला जसे नालायक आहेत तशीच सोसायटीही नालायकच आहे. कारण जबाबदारीच इतकी कठिण आणि जड आहे. तुकारामासारख्यांनाही सेवाभक्ति भावाच्या आदर्शाकडे नजर गेल्याबरोबर आपण पतित आहों असें वाटतें तर तेथें आमच्या मिशनचा आणि सोसायटीचा पाड काय ? आम्ही वरपासून खालपर्यंत नालायक आहो हें उघड दिसतें. पण नांवाचा अर्थ आणि पुढील आदर्श हीं फार खोल असल्यामुळें आपल्या स्वतःची व सर्वांची नालायकी उघड आणि स्पष्ट केल्याशिवाय राहिल्यास पदरीं अहंपणाचा आरोप येणार म्हणूनच केवळ स्वतःची नालायकी आम्हीं सर्वांनीं स्वतः सांगण्याची जरूरी आहे.
मिशन आणि सोसायटी याशिवाय एकत्र सामाईक काम करण्याची तिसरी एक योजना आहे. अशा मंडळीस कंपनी असें नांव असतें. तिचा उद्देश परार्थांस बाधक न होईल अशा सर्व कायदेशीर बाजूंनीं आपला समाईक स्वार्थ साधावा असा असतो. या तिसऱ्या अर्थांचा नुसता स्पर्शही आमच्या मिशन सोसायटीस आज चार वर्षें झालेला नाहीं आणि पुढें होणार नाहीं असा विश्वास आहे. कोणत्याही एका मताचा स्वीकार करून त्या मताचा प्रसार करण्यासाठीं म्हणजे त्या मतानुयायांची संख्या वाढविण्यासाठीं मिशनाची स्थापना होत असते. अशा निरनिराळ्या मिशनांना कंपनी हें नांव दिल्यास वावगें होणार नाहीं. मुंबईच्या किंवा कोणत्याही प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या कमिटीनें केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याच्या हेतूनें ही मिशनसोसायटी आपल्या हस्तगत करून घेतलेली नाहीं. यद्यपि ह्या मिशनची प्रेरणा वरील समाजाच्या उदार तत्त्वामुळें झाली आहे इतकेंच नव्हे तर मिशनच्या कार्यांतही समाजाच्या सभासदांचाच पुढाकार आहे, तथापि हें मिशन आपल्या हस्तगत करून घेऊन आपली संख्या वाढविण्याचा स्वार्थ - मग तो कितीही उदात्त असो - या सभासदांच्या मनांत वागत नाहीं. समाजाच्या बाहेरील मंडळीकडून मात्र वेळोवेळीं अनेक प्रकारच्या सूचना येतात. मिशनच्या कार्यांतून धर्मतत्त्वांला अजिबात फाटा द्यावा किंवा त्यांस एकदेशीयत्वाचें वळण द्यावें, असा या सूचनांना भिन्नभिन्न दिशांनीं रोख असतो. व दोन्हीही या परस्पर भिन्न सूचनांचा शांतपणें विचार करून मिशनच्या चालकांवर सर्वदेशीय सनातन धर्मतत्त्वाची व स्वतःस झालेली प्रेरणा सांभाळून आपलें तारूं सुरक्षितपणें हाकारावयाची जबाबदारी आहे आणि ती त्यांनीं आजपर्यंत राखिली आहे.
याप्रमाणें डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी या नांवाचा अर्थ आहे. त्याची सिद्धि होण्यासाठीं त्याला चिकटून रहाणें आवश्यक आहे. प्रत्यक्ष सेवा करणारी मिशनरी मंडळी आणि त्यांचा योगक्षेम चालविणारे सोसायटीचे सभासद यांनीं या नांवाचा खरा अर्थ आपल्या डोळ्यांपुढे ठेवून, परस्परांतील संबंध शुद्ध आणि प्रेमाचा राखून नंतर आपल्यापुढे असलेल्या असंख्य निराश्रित वर्गांना 'घ्यारे भाई घ्यारे भाई' अशी हाक मारावयास पाहिजे. हाकेचा स्वीकार होण्यापूर्वीं तिला जोम येण्यास मिशनरींचे स्वतःचें धर्मसाधन आणि सभासदांचे परस्परांतील आणि सर्वांचें इतर देशबंधूंशी जें वर्तन व्हावयास पाहिजे त्यावर अवलंबून आहे. ईश्वरापासून प्रथम अभयदान मिळवून त्याच्या जोरावरच ही हाक मारावयाची आहे. ज्या मानानें तो जोर कमी होईल त्या मानानें ऐहिक अडचणींचा जोर वाढणार आहे. म्हणून सेवकांनीं आपलें ईश्वराशीं अनुसंधान कायम राखलें पाहिजे; आणि मग आपल्या निराश्रित बंधूंस ''भरणी आली मुक्त पेठा । करा लाठा व्यापार ॥ उधार घ्यारे उधार घ्यारे । अवघे थोर जातीचे ॥ येथे पंक्तिभेद नाहीं । मोठें मोठें कांहीं लहान ॥ तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥'' असें सांगितल्यास त्यांस त्याचा अर्थ आणि जोर कळून ईश्वरी नांवाचा जयजयकार होईल.