हिंदुस्थानांतील उदार धर्म

(सप्टंबर १९०३ मध्यें आमस्टरडाम येथें भरलेल्या उदार धर्मांच्या अनुयायांच्या सभेपुढें झालेलें व्याख्यान.)

धर्म ही बाबत प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणाची असल्यामुळे आस्थेवाईक मनुष्याचा खरा धर्म सर्वत्र सारखाच असणार. जसजशी मनुष्याची सुधारणा होत जाते तसतशी धर्माच्या प्रगतीची दिशाही सारखीच असते. म्हणून कर्मठपणा आणि हटवाद ह्यांस न जुमानता व्यक्तीचा धर्म, त्याचा उगम जे अंत:करण आणि अंतर्याम ह्यांना अनुसरूनच आहे. ह्या दृष्टाने पाहता पाश्चात्य देशांतील प्रसिद्ध विद्वान मनुष्यांनी हिंदुधर्माची तत्त्वे आणि आदर्श जितक्या मानाने समजून घेतलेले आहेत, तितक्या मानाने पाश्चात्य देशांतील धर्मशास्त्रवेत्त्यांनी घेतलेले नाहीत. परंतु ह्या सभेचा उद्देश व्यक्तीच्या धर्मापेक्षा सामाजिक धर्माविषयी विचार करण्याचा असल्यामुळे किंबहुना, धर्माच्या निरनिराळ्या संस्था होता होईल तो व्यक्तीच्या अनुभवाला आणि अंत:करण-प्रवृत्तीला अनुसरून रहातील असे करण्याचा आहे असे मला वाटते. म्हणून हिंदुस्थानातील नव्या आणि उदार धर्माच्या चळवळीचे वर्णन करण्यापूर्वी तेथील पुरामधर्माची स्थिती कशी आहे ह्याविषयी दोन शब्द सांगतों.

हिंदुस्थानांतील जुन्या धर्माची व्यंगें आणि त्याचे दुष्परिणाम पाश्चात्य देशांतल्याहून निराळे आहेत. मागे किंवा आता हिंदुस्थानामध्ये विशिष्ट आणि ठराविक मतांविषयी आग्रह फारसा आढळून येत नाही. धर्मग्रंथांची प्रमाणता मानण्यात येत आहे, परंतु ते सर्व धर्मग्रंथ पुष्कळ वर्षांपूर्वी मृत झालेल्या भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे आणि त्यांच्या अर्थाची ओढाताम पाहिजे तशी करता येत असल्यामुळे साधारण माणसाच्या मार्गामध्ये धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासनेच्या प्रकाराविषयी पाहू गेले असता ती एक स्थानिक बाब होऊन बसलेली आहे, म्हणजे विशिष्ट काही स्थळे आणि प्रतिमा ह्यांनाच महत्त्व आलेले आहे. देशामध्ये प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली निरनिराळी क्षेत्रे आहेत. शहरोशहरी शृंगारलेली भव्य देऊळे आहेत, इतकेच नव्हे तर घरोघरी देवघर म्हणून एक स्वतंत्र खोली असते, व त्यामध्ये काही निवडक देवांचा देव्हारा असतो. धर्मनियंत्रणाच्या दृष्टीने धर्मसंघ आणि राजकीय संस्था ह्यांचा पाश्चात्य देशांतल्याप्रमाणे राजकीय दृष्ट्या संबंध जुळलेला नाही. किंबहुना, पाश्चात्य देशांतल्याप्रमाणे हिंदुधर्माची संघसंस्था (Church) कधीच बनलेलीही नाही. हिंदुधर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातीचा जो मोठा एक व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचलेला आहे. बुद्धधर्मास हिंदुस्थानातून काढून लावल्यावर ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकाच्या सुमारास धर्माचे पहिले मोठे आचार्यपद स्थापण्यात आले असावे असे दिसते. परंतु त्याची कामगिरी आध्यात्मिक गरजा काय आहेत त्या समजून घेऊन त्या भागविण्याची नसून केवळ जातिबंधनाच्याद्वारा हिंदुधर्माच्या ज्या जुन्या समजुती आणि विधी ह्यांची परंपरा शाबूत ठेवणे एवढीच आहे. फक्त ब्राह्मणांना विशेषेकरून त्यातल्या त्यात भिक्षुक मंडळीनाच धर्माची काही विहित कर्मे आचरावी लागतात. इतर चालू वहिवाटीच्या गोष्टी आपापल्या आवडीप्रमाणे करीत असतो. हिंदुस्थानामध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय. थोडे पैसे देऊन उपाध्येबोवाचे तोंड बंद करता येते, थोड्याशा विचारचापल्याने धर्मपुस्तकाची आडकाठी नाहीशी होते, परंतु ख-या धर्माच्या प्रबळ प्रेरणेचे पाठबळ असल्याशिवाय शेवटची जी राक्षसी चालरीत तिला कोण तोंड देऊ शकेल! हिंदू आचार्यांनी थोडीशी स्वतंत्रता दिली आणि सुधारणेला अनुकूल असे एकादे आज्ञापत्रही काढळे तरी बहुजन समाजाने जणू एकाद्या जादूने भारल्याप्रमाणे, जुन्या चालीला जी एकदा दृढ मिठी मारली आहे ती काही केल्या सुटत नाही.

ख्रिस्ती आणि महमदी हे दोन धर्म बाहेरून हिंदुस्थानात आले आहेत; पण त्यामुळे जुन्या घोटाळ्यामध्ये नवीन गोंधळाची भर मात्र पडली आहे. जेथे तद्देशीय साधू-संतांना व सुधारकांना यावे तसे यश प्राप्त झाले नाही, तेथे ज्यांचा कल साहाय्य करण्यापेक्षा जय मिळविण्याकडे विशेष आहे त्यांचे आध्यात्मिक बाबतीत काय चालणार? हिंदूंचा देश दोनदां जिंकला गेला आहे. पण हिंदूंचा धर्म आपली शुद्धी आणि उद्धार कधी होईल ह्याची अद्यापि वाट पहात आहे. ती व्हावयाची म्हणजे कोणत्याही बाहेरून आलेल्या धर्मामुळे होणार नाही, तर आत्म्याच्या खास उत्पत्तिस्थानात उगम पावून सर्व मनुष्यजातीचा जो एक साधारण धर्म निघणार आहे त्यातच होईल.

ह्या भावी साधारण धर्माची वाट खुली करणारी हिंदुस्थानातील ब्राह्म समाज एक मोठी वैभवशाली शक्ती आहे. ह्या समाजाचा संस्थापक राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३) हा आधुनिक हिंदचा ज्येष्ठ पुत्र होय. “तो जेव्हा जेव्हा सनातन धर्माविषयी बोलत असे तेव्हा तेव्हा गहिंवरून डोळ्यांतून अश्रू गाळीत असे” असे सांगतात. त्याचा धर्म म्हणजे केवळ एकमत किंवा मनोवृत्तीच नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवनही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युद्य, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठई त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली. त्याच्या जिवंत धर्माच्या ह्या निरनिराळ्या आज्ञात जणू होत्या. त्याचा देशाभिमान हे एक त्यांच्या सर्वात्मक वृत्तीचे अंगच होते. ऑस्ट्रियाच्या सैन्याचे नेपल्स येथील लोकांच्या स्वातंत्र्याची आहुती घेतली, तेव्हा १८२१ साली त्यांनी लिहिले आहे की “नेपालिटन लोकांचे हित ते माझे हित व त्यांचे शत्रू ते माझे शत्रू होत.” त्याने ब्रिटिश पार्लमेंटपुढे जो शेवटचा खलिता वाचला त्यात पूर्व आणि पश्चिम ह्यांचा भरतभूमीत जो संगम झाला आहे त्याचे अगदी दूरचे परिणाम कायकाय घडतील ह्याचे भविष्य वर्तवून ठेविले आहे. पूर्व आणि पश्चिम, प्राचीन आणि अर्वाचीन ह्यांचा मिलाफ त्याच्या स्वत:मध्येच चांगलासा झालेला दिसतो. आधुनिक संस्कृतीत जे काय उत्तम आहे. ते शोधून घेण्याचे भरतभूमीत जे कार्य हल्ली घडत आहे त्या कार्याची राममोहन रॉय ही एक मंगलमूर्तीच होय. आणि ब्राह्मसमाज हे त्याचे स्मारक आहे.

कलकत्ता येथे जे पहिले ब्राह्ममंदिर उघडण्यात आले त्याच्या ट्रस्टडीडमध्ये पुढील उल्लेख आहे, “सनातन ईश्वराच्या उपासनेकरिता कोणताही भेद न राखता सर्वांनी जमण्याची जागा..................अचिंत्य परमेश्वर, विश्वाचा कर्ता आणि भर्ता, कोणा मनुष्याने किंवा राष्ट्राने कोणाही विशिष्ट व्यक्तीस दिलेले कोणतेही विशेष नाव असो, त्याने ओळखला न जाणारा”.

ब्राह्मसमाजात कडकडीत सत्य आणि न्याय व सहिष्णुता ह्यांची एकवाक्यता कशी आहे हे जगास जाहीर करण्यास जणू पुढील कलमही त्या डीडमध्ये आढळते, ‘जी एकादी जिवंत अथवा जड वस्तू दुस-या कोणाची तरी उपास्यविषय झालेली असेल तिची, ब्राह्मोपासना चालली असताना कोणीही आपल्या उपदेशात, प्रार्थनेत अथवा पद्यात, निंदा अथवा थट्टा करू नये’.

ज्याअर्थी धर्मबाबतीत ठराविक मते आणि त्यांचा उगम जे उपाध्यायांचे अधिकारी मंडळ ह्या दोन्हींपासून ब्राह्म समाज दूर रहात आहे, त्याअर्थी त्यांची मते काय आहेत व काय नाहीत हे सांगण्याची येथे आवश्यकता उरली नाही. पण त्याच्या धर्म जीवनाची व प्रगतीची जी ढोबळ तत्त्वे आहेत त्यांचा मात्र मी उल्लेख करीत आहें.

(१) सनातनता - “राजा राममोहन रॉय हा तुलनात्मक धर्मशास्त्राचा जगातला पहिला शोधक होय.” असे सर मॉनीयर वुईल्सम्सने म्हटले आहे. जगातील बहुतेक सर्व मुख्य धर्मग्रंथांचे त्यांच्या मूळ भाषेतून परिशीलन केल्याने त्या सर्वांत आपल्या सनातन धर्माची बीजे आढळली. त्याच्या सनातनवाद त्याच्यामागे त्याच्या अनुयायांनी अधिकाधिक प्रचीतीस आणिला आहे. सन १८५० साली महर्षी देवेंद्रनाथाच्या प्रमुखत्वाखाली वेद अभ्रांत आहेत, हे मत समाजाने निखालपणे पण आदरपूर्वक सोडून दिले. आणि त्याचवेळी जगातील सर्व पवित्र वाड्मय ही मनुष्यमात्राची देवाने दिलेली समाईक देणगी असे समजून तिचा स्वीकारही केला. मागाहून २५ वर्षांनी ब्रह्मानंद केशवचंद्र ह्यांनी आपल्या नवविधान शिक्षेत जगातील सर्व देवर्षी, धर्मग्रंथ आणि धर्मसंघ ह्यांची एकवाक्यता कशी होण्यासारखी आहे ते दाखविले. अद्यापिही निरनिराळ्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवांतून निरनिराळ्या धर्मसंस्थापकांच्या चरित्रावर सहानुभूतीची व्याख्याने होत असतात. समाजाची ही सर्वात्मकता म्हमजे एकप्रकारची भिक्षुक वृत्ती आहे व समाजाला स्वत:चे असे काहीच नाही असाही आक्षेप बाहेरच्या मंडळीकडून वेळोवेळी येतो. पण त्याची पर्वा न करिता ब्राह्म मंडळी, सर्व धर्मविभूतींशी सहवास आणि त्यांचे शिष्याशी सख्य साधण्यास तत्पर असते.

(२) सयुक्तिकता - वरील सर्वात्मकता ही केवळ एक मनोवृत्ती किंवा विचार न करता सापडेल ते स्वीकारण्याचा प्रयत्न आहे असे नव्हे. आपल्या स्वत:च्या विवेकशक्तीचा उपयोग करण्यास कोणीही ब्राह्म कधी मागे घेत नाही. धर्माध्ययनाच्या सर्व प्रदेशात आधुनिक शोधाचे किती महत्त्व आहे हे तो जाणून असतो व त्याचा स्वीकारही करतो. त्याचे शास्त्र व त्याचा धर्म (विवेक आणि विश्वास) ह्यांच्यामधअये कधी लढा पडत नाही किंवा ही दोन्ही कधी परस्परांपासून अलग राहत नाहीत.

(३) आध्यात्मिकता - परंतु ब्राह्माच्या जाणिवेचा मुख्य उगम आणि आधार म्हटला तर चैतन्यच आहे, त्याचे मन नव्हे, पाश्चात्य बुद्धिवादाचा त्याच्यावर कितीही परिणाम झाला असला तरी त्याला धर्मबाबतीत भाव आणि भक्ती हीच तत्त्वे प्रधान वाटतात. ह्याबाबतीत श्रीमान केशवचंद्र सेन ह्यांच्या चारित्र्याचा परिणाम समाजावर विशेष घडला आहे. ते आपल्या अंतर्मार्गानेच धर्माचा ठाव घेण्याचे कामी एकाद्या नुसत्या भाष्यकारापेक्षाही खोल बुडी मारू शकले किंवा एकाद्या पंडितापेक्षाही वर मजल मारू शकले.

(४) व्यावहारिकता - पूर्ण ब्राह्म व्हावयाचें तर नुसत्या विचाराने किंवा मनोवृत्तीच्या द्वारेच होत येणार नाही. प्रथम स्वतःला व नंतर जगाला प्रत्यक्ष सेवा करून आपल्या धर्माची प्रतीती दाखवावयाची असते. ब्राह्मांची वेदी म्हणजे आपल्या मनोवृत्तीचे सोहाळे उपभोगावयाचे क्रीडाभुवन, किंबहुना अचिंत्य वस्तूविषयी तर्कवितर्काचे च-हाट वळण्याचे किंवा वादविवादाचे जाळे विणण्याची वखार नव्हे, तर भरतभूमीच्या अभ्युदयाला हल्ली अत्यंत आवश्यक असलेल्या सामाजिक सुधारणेच्या सर्व प्रकारच्या युद्धाचे उघडे समरांगमच होय.

कार्यपद्धती
(५) तडजोड नाहीं - कित्येक हिंतचिंतकांकडून ब्राह्मांना वेळोवेळी असे भासविण्याचा प्रयत्न होत असतो की ब्राह्मांनी आपली मते हल्लीपेक्षा कमी निस्पृहपणाने प्रतिपादली असता आणि जुन्या लोकांचे जे आचार वरवरचे आहेत त्यांच्याशी अधिक तडजोडीने वागले असता त्यांच्या कामात अधिक यश येण्याचा संभव आहे. पण मूर्तिपूजा आणि विधीचे अवडंबर ह्याचे दुर्भेद्य कवच फोडून आत अडकून राहिलेले धर्मबीज मोकळे करण्याची आज्ञा ब्राह्मसमाजाला वरून झाली आहे अशी जोवर त्याची भावना राहील तोवर त्याला सर्व प्रकारच्या गुळचट मिथ्यावादाला शांतीने व धैर्याने तोंड दिलेच पाहिजे. आपल्या देशाच्या राष्ट्रीयतेचा विध्वंस करणारे असाही आरोप ब्राह्मांवर लादण्यात येतो. तथापि उज्ज्वल सत्य आणि उच्चतर हित ही साधण्यासाठी त्यांना सुधारणे आपले कठीण व्रत निश्चयाने पाळलेच पाहिजे. जैन, लिंगायत, शीख इ. पुष्कळ सुधारक पंथानी प्रथम प्रथम पुराणधर्मावर आपले जोराचे हल्ले केले पण अखेरीस तेही आता त्याच गर्तामध्ये रूतून एकजीव होऊन गेले आहेत. ह्याचे कारण त्यांची मते पूर्वी उदार नव्हती असे नव्हे तर पुढे आपल्या उदार बहाण्यास कायमचे जीवन प्राप्त होईल असा कडकडीतपणा त्यांनी अखेरपर्यंत राखला नाही हेच होय. ब्राह्मसमाजाने आपल्या पुढे हा धडा चांगला ठेविला आहे.

(६) हटवाद नाही – जुन्या मतांविषयी ब्राह्मांची इतकी कडकडीत खबरदारी आहे तरी त्यांच्या स्वत:च्या मतांविषयी त्यांचा दुस-यावर जुलूम किंवा आग्रहही नाही. धार्मिक जीवन आणि त्याची प्रगती ह्यांसाठी कोणत्याही हटवादाची विधित: अथवा निषेधत: आवश्यकता नाही असा ब्राह्मांचा अनुभव आहे. जडशास्त्रांचा अतिशयित नकार आणि धर्मशास्त्रांचा अतिशयित होकार ह्या दोहोंचा अडथळा धर्ममार्गात सारखाच कसा येतो हे ते पूर्ण ओळखून आहेत. एकाद्या घोर कड्याच्या काठाशी एकादे भयचकित अर्भक जसे उबे रहावे, तसाच ब्राह्मही वाचातीत आश्चर्य व आनंद ह्यांनी युक्त अशा अदृश्य ईश्वराचे द्वारी तटस्थ उभा आहे.

(७) पंथ नाही - मताप्रमाणेच संघामध्येही सर्वत्र मोकळेपणा आहे. समाजाची द्वारे सर्वाला सर्वदा खुली आहेत. आत येण्याला कोणास संकोच वाटत असल्यास त्याचेच नशीब!

कार्य
सर्व हिदुंस्थान देशभर शंभराहून अधिक समाज आहेत. समजांतील प्रमुख गृहस्थ साप्ताहिक उपासना चालवितात. धंदेवाईक पुरोहित नाहीत. प्रचारक तयार करण्यासाठी सादनाश्रम नावाची एक मध्य संस्था कलकत्त्यास आहे. तत्त्वांचा प्रसार करण्याचे कामी गृहस्थी मंडळीही बराच हातभार लावते. जातिभेद नाहीसा करणे, बालविवाह बंद करणे, स्त्रीशिक्षण वाढविणे आणि विधवाविवाहाची आडकाठी काढणे ह्या व इतर गृहय आणि सामाजिक सुधारणांचा नेटाने ही मंडळी पुरस्कार करिते.

इंग्लंड व अमेरिका येथील युनिटेरिअन लोकांनी ब्राह्मांची पूर्वीपासूनच फार सहानुभूती आहे. अलीकडे लंडन येथील ब्रिटिश अंड फॉरेन युनिटेरिअन असोसिएशन आपल्या खर्चाने हिंदुस्थानातील ब्राह्म विद्यार्थ्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक धर्माध्ययनाची सोय करून व आपले प्रतिनिधी हिंदुस्थानात पाठवून उदारधर्माचे कार्य व राष्ट्राराष्ट्रांतील सख्य बरेच वाढवीत आहेत.

आर्यसमाज
ही एक दुसरी एकेश्वरी धर्माची मोठी चळवळ आहे. ह्याची संस्थापना स्वामी द्यानंद सरस्वती (१८२४-१८८३) ह्यांनी १८७५ त केली. ह्यांनी आधुनिक हिंदुस्थानाचा लूथर असे म्हणता येईल. ह्यांनी पुराणमतवादी पंडितांशी कडाक्याचा वाद चालविला, आणि मूळ वेदांच्या चार संहितांशिवाय इतर सर्व हिंदुधर्मग्रंथांचे प्रामाण्य झुगारून दिले. ह्या चार वेदांवरच त्यांनी आपल्या एकेश्वरी मताची मदार रचिली. वेदांचा अर्थ लावायचा तो यास्काचार्याच्या अनुसारेच (इ.स. पूर्वी ५००) लावावा, असा ह्यांचा आग्रह होता. मागाहून ह्या अर्थाचा कसा घोटाळा करण्यात आला आहे, हे त्यांनी निर्भयपणाने प्रतिपादले. स्वामी द्यानंद सरस्वतींचे अनुयायी आपल्याला आर्य म्हणवीत आहेत, ते जरी वेदांच्या प्रामाण्याला अद्यापि चिकटून आहेत तरी त्यांचा ते अशा खुबीने अर्थ लावितात की, आधुनिक विचाराशी त्यांचा कसा तरी जम बसेलच. मूर्तिपूजेचा निषेध, ईश्वराचे ऐक्य व शुद्ध स्वरूप आणि सामाजिक सुधारणेची सर्व अंगे ह्यांमध्ये आर्यांचा ब्राह्मांइतकाच जोराचा व निष्कपट पुढाकार आहे. ते जरी वेदप्रामाण्य मानतात, तरी केव्हा केव्हा त्यांची मजल सार्वत्रिक धर्माच्या अगदी उच्च शिखरापर्यंत जाऊन पोहोचते, हे लाला रालाराम ह्यांच्या पुढील उद्गारावरून दिसून येण्यासारखे आहे, “ ख्रिस्ताने सांगितलेले धर्माचे उदात्त आदर्श-ख्रिस्त्यांनी नव्हे, आर्यसमाज स्वीकारीत आहे. तलवारीने पसरण्यात आलेला इस्लाम नव्हे तर सर्व विश्वासियांसी शांतीने व प्रीतीने राहणारा व ईश्वरास शरण जाण्यास लावणारा इस्लामी धर्म आर्यसमाज अगदी आपला असा म्हणत आहे. बुद्धाची अंत:शुद्धी, वैराग्य आणि उच्चनीती ही तर आर्यसमाजाची वारशाची मिळकतच आहे. एकंदरीत दैवी पितृत्व व मानवी बंधुत्व हाच धर्म आर्यसमाज सांगत आहे.”

वेदांसंबंधी त्यांचा जो विशेष कटाक्ष आहे. त्यामुळे, आर्याच्या ज्या प्राचीन ग्रंथांची आज कित्येक शतके हेळसांड होत आहे, त्याकडे राष्ट्राचे आता नवीन लक्ष लागू लागले आहे. व त्याचे नीट अध्ययन होऊ लागले आहे. २५ वर्षांच्या थोड्या अवकाशात विचारसंघटना, आणि प्रचार इ. बाबतीत आर्यांनी अगदी आश्चर्यकारक मजल मारली आहे. हल्ली २५० आर्यसमाज आहेत. तरूणांना शिकविण्यासाठी व प्रचारक तयार करण्यासाठी त्यांच्या दोन मोठ्या संस्था आहेत. ख्रिस्ती व महमदी लोकांतूनही ते आपले सभासद करून घेतात.

थिऑसॉफिकल सोसाईटी

ही एक तिसरी मोठी चळवळ आहे. जरी ही चळवळ प्रथम अमेरिकेत निघाली, तरी हीची मूळ प्रेरणा पूर्वेकडूनच आली हे. व आता तर हिचे मुख्य ठाणे हिंदुस्थानच वसविण्यात आले आहे. हिची गूढ मते व हटवाद एका बाजूस ठेवून पाहिले असता हिच्याकडूनही प्रगतीचे शुभ कार्य बरेच होत आहे, असे आढळून येईल – (१) विश्वबंधुत्व, (२) वर्तुलात्मक धर्म, तत्त्वज्ञान व शास्त्र ह्यांचे अध्ययन वाढविणे ह्या दोन हेतूंना अनुसरून ह्या मंडळीत असंख्य हिंदू, पार्शी, मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध ह्यांचा शिरकाव झाला आहे, व त्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. ह्या मंडळीत दाखल झाल्यावरही ह्या निरनिराळ्या शिष्यांना आपापले पूर्वाश्रम जसेच्या तसेच शाबूत राखता येत आहेत ही एक ह्या मंडळीची प्रौढी आहे व बाहेरच्यांना कोडे आहे. तथापि ज्या अर्थी ह्या मंडळीच्या प्रयत्नामुळे निरनिराळ्या मनुष्यवर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, धर्मसंबंधी सहिष्णुता आणि परस्पर परिचय वाढत आहे, त्याअर्थी प्रगतीचा अभिमान बाळगणा-या सर्वांनी ह्या मंडळीचे स्वागतच करणे योग्य आहे. पुराणमतांचे जे शुष्क सांगाडे पडून राहिले आहेत, त्यांवर ह्यांनी चालविलेली हातचलाखी व अतींद्रिय प्रदेशातील त्यांच्या धाडसी भरा-या आणि सुलभ संचार ही सर्व पाहून जरी बरेच वेळां ह्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मन साशंक होते, तरी ह्या मंडळीचे हिंदुस्थानातील पुढारी मिसेस बिझांट आणि कर्नल ऑलकॉट ह्यांच्या हेतूविषयी शंका घेण्यास जागा दिसत नाही. उलट काशी येथील सेंट्रल हिंदू कॉलेज आणि मद्रासेतील पारिया मुलांकरिता काढिलेल्या शाळा वगैरे ह्यांचे लोकोपकाराचे व्यावहारिक आणि कळकळीचे प्रयत्न पाहून सर्वांना आदर वाटण्यासारखा हे. गेल्या २० वर्षांत सर्व जगांत ह्या मंडळीचीं ७१४ ठाणीं स्थापण्यांत आलीं आहेत, पैकीं २२२ हिंदुस्थानांत आहेत. ह्या तिन्ही चळवळींचा उगम आणि ह्यांचे चालू कार्यही एकमेकांपासून अगदी अलग आहे. ह्यांपैकी ब्राह्मसमाजाची दिशा प्रस्तुत (युनिटेरिअन) महासभेच्या धोरणाला अगदी अनुकूल आहे असे मला वाटते. दुस-या दोन्ही चळवळीदेखील ज्याअर्थी आमच्या विरूद्ध नाहीत त्याअर्थी आमच्याच पक्षाच्या आहेत, असे समजण्यास हरकत नाही. आमच्या परस्परांतील ऐक्य जे आज आम्हांस  दिसत नाही, ते पुढे दिसून येईल.

मध्यंतरी माझा भरंवसा असा आहे की, हल्लीपेक्षा ब्राह्मसमाजाची संघटना अधिक नेटाने झाल्यास, पौरस्त्य खंडात अधिक विस्तृत प्रमाणावर शुभ कार्य साधण्यासाठी ब्राह्मसमाज ही एक उत्तम भूमिका मिळेल. हे शुभ कार्य म्हणजे एका बाजूस ब्रह्मदेश, सयाम, सिलोन आणि जपान येथील उदार बौद्ध व दुस-या बाजूस हिंदुस्थानातील उदार मुसलमान आणि इराणातील बाबी पंथानुयायी ह्यांच्यामध्ये घडवितायेणारे सख्य व सहकार्य हे होय. आता देखील ह्या उदार चळवळी आशिया खंडात आपापले कार्य अलग राहून करीत आहेत, न जाणो भावी ऐक्याकडेच त्या मार्ग शोधीत आहेत! आमची तशी इच्छा असल्यास, हे दिव्य स्वप्न सफल करण्याकरिता पूर्व आणि पश्चिम ह्यांचे सहकार्यच झाले पाहिजे. जुन्या ख्रिस्ती धर्माने दुस-या तितक्याच, किंबहुना जास्त जुन्या व हट्टी धर्माशी विनाकारण डोईफोड चालविली आहे. ह्यापुढे उदार ख्रिस्तीधर्माने निरनिराळ्या तद्देशीय उदार प्रयत्नामुळे नवीन हुरूप धरून त्यांच्या खांद्याला खांदा लावावा. पुढे होणारे युद्ध हे अमुक वाद व तमुक धर्म ह्यांमध्य नसून एकापक्षी सर्व जुन्या धर्माची शुष्क हाडे व दुस-या पक्षी धर्माचे रसभरीत व उचंबळणारे जीवन ह्यांमध्ये होणार आहे. प्रस्तुत महासभा ही आगामी युगाची मोठी पताका आहे, असा आमचा भरंवसा आहे.