भाग पहिला : ब्राह्म आणि प्रार्थना समाजाचें प्रचारकार्य
प्रकरण १ लें
दक्षिण प्रांतांतील दौरा
माझी मनोरचना :
माझ्या सार्वजनिक कामाच्या आठवणी आणि अनुभव देण्यापूर्वी माझीं ध्येयें आणि मनोरचना याविषयीं थोडासा सामान्य विचार करणें जरूर आहे. त्याशिवाय पुढील आयुष्यामध्यें ज्या क्रांत्या आणि वळसे पडले त्यांची वाचकांना नीटशी कल्पना येणार नाहीं. कोणाहि व्यक्तीच्या सार्वजनिक जीविताचा जो परिपोष होतो त्याचे दोन अगदीं भिन्न प्रकार आहेत. एकाचा उदय विश्वात्मकतेमध्यें होऊन हळूहळू स्थानिक प्रश्नाकडे उतरत असतो; तर दुसर्याचा उदय अगदींच स्थानिक प्रयत्नांत होऊन त्यांचे वलय विश्वात्मकतेकडे विस्तृत होऊं लागतें. उदाहरणार्थ, एखादा आपल्या जातीच्या सुधारणेकडे लक्ष्य घालून किंवा जातिभेदावर त्याचा मुळींच विश्वास नसला तर त्याच्या नागरिकसेवेंत तो लक्ष्य घालून हळूहळू राष्ट्राकडे आणि अखेरीस विश्वाकडेहि त्याचा लय लागतो. याच्या उलट दुसरी व्यक्ति एकदम धर्मसुधारणेकडे म्हणजे विश्वधर्मापासून सुरवात करून त्याचीं भिन्न भिन्न प्रतीकें, समाजसुधारणा, समाजसेवा, राष्ट्रोद्धार, त्यांतील निरनिराळ्या वर्गांतील उन्नति, किंबहुना अखेरीस आपल्या स्वतःच्या कुटुंबांतील आतांची काळजी, इकडे उतरूं लागते. माझा जीवितविकास यांपैकीं दुसर्या प्रकारें घडला.
पूर्वार्धांत माझ्या मनोविकासाचें वर्णन करीत असतां मीं म्हटलें आहे कीं, मी ब्राह्मसमाजांत गेल्यानें सुधारक झालों असें नसून मी सुधारक होतों म्हणून ब्राह्मसमाजांत गेलों. माझ्या उदार ध्येयामुळें मीं मनामध्यें जीं वेळोवेळीं मानवी आयुष्याचीं चित्रें रेखाटलीं तिला तंतोतंत जुळेल अशी ब्राह्मसमाजाची ठेवण मला दिसली. त्यामुळें मी एकदम ब्राह्मसमाजांत (मुंबई प्रार्थनासमाजांत) शिरलों. एवढेंच नव्हे तर लवकरच त्याच्याशीं इतका तादात्म्य पावलों कीं, स्वतःला पूर्णतः वाहून घेऊन त्याचें प्रचारकार्य करावें ही तळमळ लागली.
दोन पक्ष :
त्यावेळीं हिंदुस्थानांत, विशेषतः महाराष्ट्रांत, सार्वजनिक चळवळ करणार्यांचे दोन भिन्न पक्ष होते. एक स्वतःला राष्ट्रीय ऊर्फ जहाल म्हणवीत असे; तर दुसरा स्वतःला प्रागतिक ऊर्फ उदार म्हणवीत असे. पण एकाचा जहालपणा आणि दुसर्याचा उदारपणा प्रतिपक्ष्याच्या कार्यांत मात्र दिसून येत नसे. म्हणून हे एकमेकांच्या कार्याचा हेवादावा आणि वेळप्रसंगीं एकमेकांस उघडउघड विरोध करण्यासहि कचरत नसत. त्यामुळें त्यावेळच्या माझ्यासारख्या तरुणांची फार ओढाताण होत असे. अर्थातच सार्वजनिक सेवेंत पदार्पण करण्याची जेव्हां वेळ आली तेव्हां प्रत्यक्ष काम चालविण्यास मला फार जड जाऊं लागलें. उदाहरणार्थ, सर डॉ. भांडारकर व नामदार गोखले हे दोघेही प्रागतिक पक्षाचे मेरुमणी होते ना ? पण डॉ. भांडारकरांचा आपले सर्व प्रयत्न धर्माच्या पायावर करण्याचा अट्टाहास; तर गोखल्यांना धर्माबद्दल पूर्ण औदासिन्य असून राजकारणाचा जेथें तेथें मोह पडत असे. विलायतेहून परत आल्यावर एकदां नामदार गोखले यांनीं, ''आपण आस्तिक झालेले बरें'' असे उद्गार मजजवळ काढले. उलटपक्षीं मी प्रार्थनासमाजाचा प्रचारक असूनहि वेळोवेळीं राजकारणांत डोकावतो हें पाहून डॉ. भांडारकर मला प्रेमानें आणि विनोदानें टोमणा मारीत कीं, ''अरे, तूं कांहीं झालें तरी गोखल्यांचाच शिष्य.'' मीहि मग तितक्याच विनोदानें उत्तर देत असें कीं, ''दादासाहेब, नामदार गोखले आपले शिष्य; मग मी आपला नातशिष्य ठरत नाहीं काय ?''
भांडारकर व गोखले यांच्यामध्यें जर अशी तेढ तर चंदावरकर आणि टिळक यांच्यामध्यें किती सलोखा असावा ह्याची कल्पनाच केलेली बरी. आणि मला तर माझ्या कामासाठीं या दोघांशींहि जोड राखावी लागत असे. पण ही ओढाताण अखेरपर्यंत राहिली नाहीं. भारतीय चळवळीचा विकास होऊन आज ही ओढाताण महात्मा गांधींच्या अष्टपैलुत्वामुळें बरीच कमी झाली आहे.
गंगा व यमुना ह्या दोन्ही नद्यांचा उगम हिमालयांत आहे. पण त्या बर्याच प्रदेशांवरून एकमेकीपासून अलग वहात येऊन प्रयाग येथें पुन्हां एकत्र होतात. तोच प्रकार आमच्या भारतीय चळवळीचा झाला आहे. ह्या दृष्टीनें पहातां राजा राममोहन राय हा हिमाचलाप्रमाणें आणि महात्मा गांधी प्रयागाप्रमाणें भारतीय इतिहासांत अखंड शोभत राहतील. राष्ट्रीयतेची यमुना आणि प्रागतिकतेची गंगा ही राजा राममोहन रायच्या चरणापासून निघून महात्माजींच्या अंगुलीमध्यें पुन्हां एक झाल्या आहेत हें किती गोड दृश्य ! पण हें दृश्य मला माझ्या कार्याच्या सुरुवातीला दिसण्यासारखें नव्हतें; कारण ह्या गंगा व यमुना त्यावेळीं एकत्र झाल्या नव्हत्या. म्हणून वाजवीपेक्षां अधिक त्रासाला मला तोंड द्यावें लागलें.
प्रयोगाचें नाविन्य :
१९०३ च्या नोव्हेंबरमध्यें मुंबई प्रार्थना समाजानें एकमताने ठराव करून मला आपला प्रचारक नेमलें. अल्लड तरुण असतांना ज्या मुंबई प्रार्थना समाजाला मी वरवर पाहून इतरेजनांप्रमाणें नांवें ठेवित होतों त्याचाच मी आतां एकनिष्ठ सेवक झालों. त्यावरून अंगांत थोडासा पोक्तपणा येऊं लागला असा अंदाज करण्यास हरकत नाहीं. प्रार्थना समाजाचें प्रचारकार्य हा एक त्यावेळीं अननुभूत प्रयोग होता. माझ्यापूर्वी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनी हें प्रचारकार्य केलें होतें. तथापि ह्या प्रचाराची घटना माझ्यावेळीं अगदीं नवीन होती असें म्हणावयास हरकत नाहीं. प्रचारकार्यासाठीं योग्य संस्थेंतून तयार होऊन येणें, आल्यावर तें कार्य जीविताचा एकमेव हेतू म्हणून पत्करणें, आपल्या व कार्यांच्या योगक्षेमासाठीं केवळ ईश्वराशिवाय इतरांवर अवलंबून न राहणें, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामुग्री हातास कशी येते याची प्रचिती घेणें वगैरे गोष्टी अगदीं नवीन होत्या. हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांचीं तत्त्वें आणि ध्येयें जशीं निरनिराळीं आहेत तशीच त्यांची प्रचारकार्यपद्धतिहि तत्त्वानुसार वेगवेगळी आहे. ब्राह्मसमाजानें ह्या निरनिराळ्या धर्मतत्त्वांचा व ध्येयांचा जसा समन्वय केला आहे तसा कार्यपद्धतींतहि त्याला समन्वय करणेंच भाग आहे.