प्रकरण १. दक्षिण प्रांतांतील दौरा-२ (2)

पद्धतीचे भेद :
मुसलमान पद्धति लोकसत्तात्मक (Democratic), तर ख्रिस्ती पद्धति पितृवात्सल्याची मेंढपाळाची (Pastoral), हिंदु प्रचारपद्धति भिन्न जाती व वर्गांमध्यें विभागलेली, राजकारणी (Political)  तर बौद्धांची निस्संन उदासीन वृत्तीची (Supreme Indifference).  ब्राह्मसमाजानें ह्या आंवळ्यांची किंवा भोपळ्यांची मोट कशी बांधावी ?  बंगाल्यांतील ब्राह्मसमाजाचें कार्य मोठ्या प्रमाणावर चाललें असल्यामुळें राममोहन राय, देवेन्द्रनाथ, केशवचंद्र सेन ह्या विभूतींच्या अवतारकार्यामुळें गेल्या शतकांत त्या प्रांतीं आजीव प्रचारकांची वाण भासली नाहीं.  केशवचंद्रांच्या प्रभावळींत घरदार टाकून किंबहुना तें घेऊनहि लहानथोर ताकदीचीं माणसें बेहोष होऊन पडत असत.  त्या मानानें गेल्या शतकाच्या शेवटपर्यंत ब्राह्मधर्माचें प्रचारकार्य तेजस्वीपणानें पार पडलें.  केशवचंद्रांचे दोन प्रभावी शिष्य पंडित शिवनाथशास्त्री आणि प्रतापचंद्र मुझुमदार यांनी त्यांच्यामागूनहि प्रचारकांची उणीव भासूं दिली नाहीं.  पण बंगालमधील प्रकार वेगळा आणि बंगालबाहेरचा प्रकार वेगळा.  बंगाल म्हणजे ब्राह्मधर्माचें सरोवर आहे.  त्यांतील पाणी कालव्यानें काढून अखिल भारतावर बागाईत करावयाची आहे.  बंगाल बिहार प्रांतांत साक्षात् बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झाला असल्यानें तेथें जातिभेद आणि मूर्तिपूजा यांचें विष इतर प्रांतांप्रमाणें रुजलें नाहीं.  हा प्रांत आर्यावर्ताच्या बाहेरचा मोंगली सीमेजवळचा अर्धमोंगली असल्यामुळें ह्याच्यावर आर्यांचे राजकारणी हल्ले दक्षिण दिशेप्रमाणें झाले नाहींत.  रामायणाचें कार्यक्षेत्र द्राविड देशांत सताड पसरलें, पण रामाने पूर्वेकडे महाकोसलाची सीमा देखील ओलांडली नाहीं.  मध्ययुगांत अळवार नांवाच्या भक्तांनीं वैष्णव धर्म पसरविला.  महाराष्ट्रांत वारकर्‍यांनीं वाढविला.  तें काम चैतन्यानें बंगाल्यांत केलें.  त्यामुळें ब्राह्मसमाजाची वाढ इतर प्रांतांपेक्षां बंगाल्यांतच अधिक खुली कां झाली त्याचीं वर कारणें दिलीं आहेत.  ब्राह्मसमाजाची उपासनापद्धति देवेन्द्रनाथानें घालून दिली.  ती ख्रिश्चन पद्धतीप्रमाणें आहे, अशी निंदाव्यंजक टीका होत असते.  ती टीका विशेष निरीक्षण करून केली जाते असें नाहीं.  देवेन्द्रांचें इंग्रजी शिक्षण विशेषसें न झाल्यानें व हिंदुस्थानाबाहेर प्रवासहि न घडल्यानें त्यांनीं प्रणीत केलेल्या उपासनापद्धतीला वेदोपनिषदांचेंच आवरण फार पडलें.  त्यांच्यामागें केशवचंद्र सेनावर चैतन्याच्या भक्तिमार्गाचें दडपण पडल्यानें टाळ, मृदंग आणि पताका यांचा कहर ब्राह्मसमाजांत झाला.  तरी टीकाकार म्हणतो कीं ब्रह्मोपासना ख्रिस्ती पद्धतीचीच.  उपासनेचें कसेंहि असो प्रचारकपद्धतींत ख्रिस्तांचा जोरकसपणा, सहानुभूति आणि व्यावहारिकता हे गुण येतील तितके कमीच म्हणायचे.  व्यापार करण्याच्या पद्धतींत जर ख्रिस्त्यांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्यानें उचलतों तर धर्मप्रचाराबाबत ती कां हेटाळावी ?   


मुंबई प्रार्थना समाज :
मुंबई समाजाची १८६७ सालीं स्थापना झाली.  एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं मुंबई समाजाची पहिली पिढी कालवश झाली होती.  डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रानडे वगैरे वृद्ध मंडळी धर्मसंस्थापनाच्या दृष्टीनें खरोखर वरच्या दर्जाची होती.  म्हणूनच त्यांचे हातून समाजस्थापनेचें महत्कार्य झालें.  पण चालू युगाच्या आरंभीं डॉ. भांडारकरांखेरीज आद्यप्रवर्तकांपैकीं कोणी उरला नाहीं.  सर नारायण चंदावरकर हे पहिली पिढी व दुसरी पिढी साधणारे महत्त्वाचा दुवा होते.  त्यांची गणना वृद्धापेक्षां तरुणांतच करणें बरें.  भांडारकर पुण्यास येऊन राहिल्यामुळें मुंबई समाजाच्या नेतृत्वाचें जूं चंदावरकरांच्याच मानेवर पडलें.  त्यांना अनुयायांचा भरणा देखील अगदीं तरुणांचाच मिळाला.

१९०३ सालच्या अखेरीस प्रत्यक्ष कार्यास सुरुवात कशी करावी या बाबतींत आकाश फाटल्याचा अनुभव येऊं लागला.  मी जरी एका प्रांतिक समाजाचा प्रचारक होतों तरी मुंबई प्रार्थना समाजाचें कार्य मुंबई शहरापुरतेंच चाललेलें होतें.  पुणें, नगर, सातारा ह्या ठिकाणीं जरी समाज होते तरी आर्थिक दृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र आणि तुटक वागत.  परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नसे.

नाताळांतील धामधूम :
ब्राह्मधर्माचें विश्वव्यापी कार्य, या प्रांतीं त्याचें असंघटित क्षेत्र, पहिली सगळी पिढी दिवंगत झालेली आणि मी स्वतः एक सामान्य अननुभवी तरुण, अशी परिस्थिति होती.  पण ह्यांत मला अनपेक्षित असें कांहींच नव्हतें.  सुरुवातीचे वेळीं डिसेंबर महिना आला होता.  त्याचा शेवटचा नाताळचा आठवडा म्हणजे भरतभूमीचा जागृतीचा काळ.  नाताळांत ख्रिस्त जन्मला ही गोष्ट ऐतिहासिक असो वा नसो; नाताळ म्हणजे आधुनिक ज्योतिष दृष्ट्या मकरसंक्रमणाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशीं उत्तरेकडील आकाशांत सूर्य जन्म घेतो ही गोष्ट खरी.  ह्या आठवड्यांत भारतीय सभेची धामधूम त्यावेळीं देशभर चालत असे.  काँग्रेसचा पुढारी असो, सभासद असो, नुसता बघ्या तमासगीर असो, किंबहुना तिला हसणारा किंवा प्रत्यक्ष विरोध करणारा असो, हे सर्व प्राणी त्या अधिवेशनाचे जागीं हमखास जमावयाचेच.  ह्या वर्षीची काँग्रेस दक्षिणप्रांतीं मद्रास शहरीं भरणार होती.  अर्धे युरोप पायाखालीं घालून नुकताच आलेला मीं महाराष्ट्राचे बाहेरील भारत अद्यापि पाहिलेलें नव्हतें.  म्हणून मुंबईंतील स्थानिक कामाच्या जंजाळांत पडण्यापूर्वी भारतीय यात्रा करण्याचा चालून आलेला प्रसंग मीं आनंदाने स्वीकारला आणि प्रवासखर्चाची तमा न बाळगतां दक्षिणेची वाट धरली.  तत्त्वानें बेहोष झालेल्याला तपशीलाची कदर नसते अशांतला मी एक.  प्रथम मी बेळगांवला उतरलों.  सुबोधपत्रिकेंतल्या माझ्या विलायतेहून लिहिलेल्या पत्रांवरून माझा निदान महाराष्ट्रांत तरी परिचय झाला होता.  बेळगांवांतील एका वृद्धांच्या क्लबामार्फत माझें व्याख्यान ठरलें.  पण व्याख्यानाचा विषय ठरवितांना वाद माजला.  वृद्धांचा क्लब असल्यानें राजकारणावर बहिष्कार होता.  धर्मकारण तर सर्वांनाच नावडतें होतें.  समाजसुधारणा वादग्रस्त होती.  व्याख्यान करवणारांचें एकमत होईना तेव्हां मी त्यांस सांगितलें कीं, ''व्याख्यान करवणारे तुम्ही असला तरी करणारा मी आहें ना ?  विषयाचें नांव तुम्ही कांहींहि घ्या.  वक्ता आपल्याला सांगावयाचें तें सांगितल्याशिवाय राहणार नाहीं.''  आधुनिक जगांत तौलनिक धर्माच्या अध्ययनानें विचारी जगांत काय काय फरक पडला आहे, हें मीं सप्रमाण व सविस्तर सांगितलें.  त्याला म्हणण्यासारखा कोणीं आक्षेप घेतला नाहीं.


बंगलोर :
कर्नाटकांतून मी पुढें तामीळ प्रदेशीं गेलों.  त्या प्रांताची प्रवेशभूमि बंगलोर ही होय.  तेथें दोन तीन ब्राह्मसमाज होते.  येथून मला नवीन सृष्टि निरीक्षण्यास मिळाली.  युरोपांत ग्लासगोपासून नेपल्सपर्यंत प्रदेश आक्रमिला तरी भाषेशिवाय भिन्न असें मला कांहींच दिसलें नाहीं.  खाणे-पिणें, वस्त्रप्रावरण, वगैरे लहानसहान गोष्टींपासून सामाजिक चालीरीति, राजकारणीय घटना, शेवटीं धर्मासारखी निर्वाणाची गोष्ट ह्या सर्वांत मला एकसूत्रीपणा दिसला.  ते देखावे माझ्या डोळ्यापुढें अजूनहि तरंगत होते.  तो मी बंगलोरसारख्या शहरांत आल्याबरोबर मला द्राविडी संस्कृतीची ध्वजा स्पष्ट दिसूं लागली.  नुसती भाषाच नव्हे तर सर्वच गोष्टींत पडदा पालटला.  आर्यसंस्कृतीहून भिन्न असणारी द्राविडी संस्कृति आणि त्यावर पांघरूण घालणारी पाश्चात्य संस्कृति असें कांहींतरी विचित्र दृश्य माझ्यासमोर दिसूं लागलें.  बाजारांत गेलों तर भाजी विकणारी माळीण तुटक्या इंग्रजी शब्दांत बोलते तर एकादा कॉलेजांतील अंडरग्रॅज्युएट तरुण इंग्रजी भाषाच तामीळ स्वरांत बोलतो, पायांत पाटलोण असली तरी अनवाणीच चालतो, गळ्यांत कॉलर, नेक्टाय असतांनाहि डोक्यावर काहींच न घेतां शेंडीचा मोठा बुचडा मानेवर टाकतो.  अशीं अनेक दृश्यें पाहून माझ्या निरीक्षण शक्तीवर ताण पडूं लागला.

मद्रास :  शेवटीं नाताळांत मी मद्रासला पोंचलों.  काँग्रेसची जय्यत तयारी चालली होती.  जॉर्ज टाऊन या भागांत ब्राह्मसमाजाचें मंदिर आहे.  ह्याला ब्लॅक टाऊन असेंहि दुसरें नांव आहे.  सगळें मद्रास काळें असतांना ह्या भागालाच काळें शहर हें नांव कां दिलें हें समजत नाहीं.  मी ब्राह्ममंदिरांत उतरलों.  समाजाची स्थिति खालावलेली दिसली.  काँग्रेसच्या अधिवेशनाच्या जागीं दुसर्‍या राष्ट्रीय परिषदाहि भरत असत.  राष्ट्रीय सामाजिक परिषदेसाठीं सर नारायण चंदावरकर हे आले होते.  ब्राह्मसमाजाची एकेश्वरी धर्माची परिषद होणार होती म्हणून तामीळ, तेलगु, मल्याळम् वगैरे प्रांतांतील ब्राह्मबंधूंच्या गांठीभेटी होऊं लागल्या.  आंध्र साहित्यसम्राट् वीरेशलिंगम् पतंलु, विद्वदरत्‍न डॉ. व्यंकटरत्‍न नायडू, तिनेवल्लीचे कैलासन् पिल्ले वगैरे धुरीणांच्या गांठीभेटी झाल्या.  सामाजिक परिषदेचें अधिवेशन फार चांगलें पार पडलें.  विशेषतः चंदावरकर यांचें वक्तव्य आणि पवित्रा फार उठावदार दिसला.  प. वा. न्या. मू. रानडे हयात असेपर्यंत सामाजिक परिषदेचें उद्धाटन त्यांच्याच हातून व्हावयाचें.  ती माळ आतां सर नारायणरावांच्या गळ्यांत पडली.  ती फार शोभूं लागली.  पण मुख्य सभा जी राष्ट्रीय सभा तिला मुहूर्त चांगला लागला नाहीं.  सभेच्या दिवशींच जोराची पर्जन्यवृष्टी होऊन विस्तीर्ण सभामंडप जणूं काय वाहूनच गेला.  आयतेवेळीं दुसरी व्यवस्थाच करणें अशक्य झाल्यानें सभेचें काम जवळ जवळ बंदच पडलें.  ह्या प्रांतांत वळीवाचे पाऊस मोठ्या जोरानें पडल्यानें असा विरस कित्येक काँग्रेसचे वेळीं झाला आहे.  मद्रासकडील कार्यच नव्हे तर अखिल भारतांत ब्राह्मसमाजाच्या कामाला विस्कळीतपणा कसा आला होता याची चुणूक मला प्रथम या दक्षिण राजधानींत दिसून आली.  आणि माझें प्रथम राष्ट्रकार्य म्हणून मीं एकेश्वरी परिषदेची पुनर्घटना करावी ही प्रेरणा मला येथें झाली.  पुढची काँग्रेस कर्मधर्मसंयोगानें मुंबई शहरांत होणार होती म्हणून या प्रेरणेचें पुढें निश्चयांत रूपांतर झालें.  मी मद्रासचें काम आटोपल्यावर परत मुंबईस न येतां बंगालच्या वाटेस लागलों. याचें एक कारण असें होतें कीं, पुढील जानेवारींत कलकत्त्यास माघोत्सव या नांवाचा ब्राह्मसमाजाचा महोत्सवाचा काळ आला होता.  म्हणून वाटेवरील आंध्र, ओरिसा या प्रांतांत दौरा काढण्याचा मीं निश्चय केला.  वाटेंत नेलोर, बेझवाडा, राजमहेंद्री, कोकोनाडा, पार्लाकिमडी, कटक, जगन्नाथपुरी वगैरे मोठीं व मुख्य शहरें व तेथील ब्राह्मसमाज यांचें मीं निरीक्षण केलें.  या दौर्‍यांत प्रवासाची दगदग, खाण्यापिण्याची आबाळ, कामाचा ताण वगैरे अनेक कारणांनीं कलकत्त्यास पोंचण्यापूर्वी मी बराच थकून गेलों होतों.

मद्रासचें तिखट :
युरोपांत असतांना तेथील तिखट मसाल्याविरहित खाण्याची संवय लागल्यानें आणि परत आल्याबरोबर दक्षिण प्रांतांतल्या तिखटाचा वर्षाव मजवर झाल्याने माझी अगदींच तारांबळ उडाली, प्रत्येक ठिकाणीं माझ्यासाठीं बिनतिखटाचा स्वयंपाक करा असें गृहिणीला किती जरी बजावलें तरी तिखटाशिवाय स्वयंपाक करणें म्हणजे जन्मांत मोठी अपकीर्ति करून घेणें, या समजुतीनें तिच्या दृष्टीनें अत्यंत थोडें तिखट घातलें असलें तरी तें मला सात दिवस पुरेल इतकें असें.  त्यामुळें मी अर्धपोटी जेवी.  त्या अर्ध्या जेवणांतलें अर्धे तिखटहि मला भारी होई.  शिवाय या प्रांतींचा हिवाळा मला युरोपांतल्या उन्हाळ्यापेक्षां कडक भासला.  युरोपांतून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे तयार करण्याचेंहि आर्थिक सामर्थ्य माझ्यांत नसल्यानें तेच युरोपियन कपडे मला कांहीं काळ वापरावे लागले.  त्यामुळें वरून जरी मी मोठा साहेब दिसत होतों तरी आंतून नेहमीं पुढच्या प्रवास खर्चाची व प्रकृतीला न मानवणार्‍या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगाल फकीर होतों.  तामीळनाड व बंगाल यांचे मधील आंध्र प्रांत हा मोठा भावनाशील दिसला.  या प्रांतांत खेड्याखेड्यांतून देखील ब्राह्मसमाजाची चळवळ चालू आहे असें मीं ऐकलें.  पुढें महात्मा गांधींची बहिष्काराची चळवळसुद्धां याच भावनाशील प्रांतांत विशेष जोराची झाली. परंतु भावनाशीलतेच्या बरोबर प्रयत्‍नांचा दमदारपणा व टिकाऊपणा नसल्यानें नदीला पूर येऊन गेल्याप्रमाणें या प्रांतांतील चळवळीची लागवड अस्थिर ठरते.  आंध्र देशांतील पुढार्‍यांनी मागील इतिहासांतहि धाडसाचीं मोठमोठीं कृत्यें केल्याचा पुरावा आहे.  इकडील राजांनीं आणि लष्करी पुढार्‍यांनीं पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, जावा, सुमात्रा, बाली, वगैरे दूरदूरच्या ठिकाणीं आर्यसंस्कृतीचा फैलाव केला आहे.  पण आतां तिचा मागमूसहि उरला नाहीं.  ब्राह्मधर्माच्या प्रचाराची तशीच पुनरावृत्ति होणार नाहीं अशी आशा आहे.