प्रकरण ७. स्थानिक समाज

 मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रांत पुणें, सातारा, अहमदनगर, गुजराथेंत अहमदाबाद, बडोदें, आणि माळव्यांत इंदूर वगैरे ठिकाणीं प्रार्थना समाजाचे स्थानिक समाज आहेत. ह्यांचे सालोसाल वार्षिक उत्सवाचे समारंभ होत असतात. ते जवळ जवळ आठवडाभर चालत असतात. त्यांत भाग घेण्यास मला जावें लागे.

१९०५ सालच्या उन्हाळयांत सातारा येथील उत्सवासाठीं मी गेलों. रा. सीतारामपंत जव्हेरे हे ह्या समाजाचें काम कळकळीनें चालवीत असत. रा. रा. काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत. भजन, उपासना, व्याख्यानें ही कार्यक्रमांतील ठराविक कामें झाल्यावर तेथील लष्करांत अस्पृश्य लोकांच्या सैनिकांकरतां एक विशेष व्याख्यान झालें. गांवांत अस्पृश्यांसाठीं एक शाळा उघडण्यांत आली. साता-याहून पांच मैलांवर वणें नांवाचें एक खेडें आहे. तेथील सबरजिस्ट्रार रा. बापुजी बच्चाजी शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गणपतराव शिंदे यांनीं मुद्दाम बोलावून नेलें. खेडयांतील लोकांसाठीं भजन, उपासना करविल्या. लोकांमध्यें वाटण्यासाठीं पोस्टल मिशनचें वाङ्मय पाठविण्यांत आलें. पुढील एक वर्षी डॉ. भांडारकर, गणपतराव आंजर्लेकर, स्वामी स्वात्मानंद, गणतराव कोटकर, श्रीमती जनाबाई शिंदे वगैरे मंडळींसह साता-यास गेलों. उत्सव थाटाचा झाला. यवतेश्वराच्या डोंगरावर वनोपासना झाली.

१९०६ सालीं अहमदनगर समाजांत उत्सवासाठीं गेलों. तेथील ताळी समाजाचे प्रमुख पुढारी रा. सहदेवराव बागडे या समाजाचा पुढाकार घेऊन काम चालवीत. यांच्या वजनामुळें समाजांत बरेच साळी जातीचे लोक येत असत. शंकर पांडुरंग पंडित, लालशंकर उमियाशंकर वगैरे विद्वानांच्या प्रोत्साहनानें नगर येथें स्वतंत्र मंदिरबांधण्यांत आलें होतें. इ. स. १९०५ सालापासून पुढें मी या समाजाला मधून मधून जाऊं लागलों. त्यावेळीं व पुढें संत, हिवरगांवकर, धनेश्वर, ॠषि वगैरे तरुण मंडळींनीं समाजाचें काम नेटानें चालविलें होतें. फ्रेंड्स लिबरल असोसिएशन नांवाची संस्था स्थापन होऊन तिच्या विद्यमानें समाजाबाहेरहि व्याख्यानें देण्याचा उपक्रम तेव्हां झाला. पण समाजाचा मुख्य भार त्यावेळीं प. वा. सहदेवराव बागडे यांच्यावरच पडला होता. त्यांच्या साह्यानें एक स्पृश्यांसाठीं व एक अस्पृश्यांसाठीं अशा दोन रात्रींच्या शाळा काढण्यांत आल्या. पुढें कांहीं वर्षांनीं त्या बंद पडल्या.

पुढें १९०८ सालीं अहमदनगरास गेलों असतां सोनई येथें मोठी चळवळ झाली. तेथील खेडयांतील लोकांचें एक शिष्टमंडळ मला तेथें नेण्यास आलें. ही सत्यशोधक मंडळी होती. तेथील स्थानिक ब्राह्मण मंडळीशीं कांहीं वाद माजून आसपासच्या ब-याच  खेडयांत असंतोष उत्पन्न झाला होता. जातीजातींत सामाजिक बाबतींत वैमनस्य माजलें असतां त्यांच्यांत सलोखा घडवून आणून उदार धर्माच्या चळवळीकडे लक्ष लावणें हें प्रार्थना समाजाचें ब्रीद आहे म्हणून मी सोनई येथें गेलों. तेथील ओढयाच्या कांठीं वाळवंटांत प्रचंड जाहीर सभा भरली. निरनिराळया खेडयांतून सर्व जातीची हजारों मंडळी जमली होती. प्रत्येक जातीचे दोन दोन प्रतिनिधी घेऊन एक साधारण समिती बनविण्यांत आली. त्यांत ब्राह्मणांचेहि दोन प्रतिनिधी घेण्यांत आले. सत्यसमाज हें नांव ह्या नवीन चळवळीला देण्यांत आलें. एक दोन वर्षें काम चालल्यावर सोनई येथील दोन पाटील घराण्यांत वितुष्ट आल्यानें ह्या नवीन चळवळीचा लोप झाला.

१९०७ साली मी इंदूरास समाजाचे उत्सवास गेलों. बरोबर माझी पत्नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते. इंदूर समाजाचें नांव मध्यभारतवर्षीय ब्राह्मसमाज असें आहे. डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रो. देसाई, तेथील प्रसिध्द पाटकर-जाधव यांचें घराणें, चित्रकार मिटबावकर ह्यांचां या समाजांत मोठा पुढाकार असे. ही सर्व मंडळी अनुष्ठानिक असून समाजाचें कार्य जोरांत चाललें होतें. रा. सदाशिवराव केळकरहि तेथेंच होते. ह्या उत्सवांत नगरसंकीर्तनाचें कार्य थाटाचें झालें. शेवटीं नगराबाहेर वनोपासनेंत प्रीतिभोजनाचा समारंभही गोड झाला. ता. २४ एप्रिल १९०७ रोजीं तेथील कांहीं पुढारी मंडळींच्या मदतीनें एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठीं ता. ५ मे. १९०७ रोजीं एक संस्था उघडण्यांत आली. होळकर कॉलेजचे प्रो. गोखले हे व्हाइस प्रेसिडेन्ट, रामचंद्रराव मिटबावकर हे सेक्रेटरी होते. ह्या समाजाचें एक सुंदर ब्राह्ममंदिर आहे. तेथील पाटकर जाधव घराण्यांतील मंडळीची समाजाला फार मदत होती. त्यांचें होळकर दरबारांत वजन असल्यानें श्रीमंत तुकोजीराव महाराजांचें व विशेषतः सीताबाई होळकर यांचें समाजाकडे लक्ष लागलें. महाराजांकडून या समाजास दरमहा ३० रु. चें वर्षासनहि मिळत असतें.
उत्सव आटोपल्यावर जाधव मंडळींनीं धार, मांडवगड, महू वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहण्यासाठीं बैलगाडींतून सफर काढली. माझ्या पत्नीलाही घेऊन मी त्या सफरीस गेलों. धार येथील प्रसिध्द किल्ला आणि तेथील प्राचीन राज्याचे अवशेष पाहून आनंद झाला. विंध्याद्रीच्या शिखरावर मांडवगड ही मध्ययुगीन मुसलमान बादशहांची राजधानी होती. तेथें दहा वीस मोठमोठया मशिदी, देवळें आणि राजमहाल हीं फार प्रेक्षणीय दिसलीं. मध्ययुगीन राजा बाज्ञबहादूर व रूपमती यांच्या प्रेमाचीं स्थळें पाहण्यांत आलीं. यानंतर नर्सिंगचें शिक्षण घेण्यासाठी सौ. रुक्मिणीबाईस कांहीं महिने इंदूरास जाधव मंडळीकडे ठेवून मी मुंबईस आलों. तुकोजीराव महाराजांची दाई व बाळकृष्णपंत जाधव यांची पत्नी सौ. अहिल्याबाई या फार चारित्र्यवान व थोर मनाच्या बाई होत्या. त्यांच्या प्रेमळ सहवासांत रुक्मिणीबाईंना मोठा लाभ घडला.

रा. ब. हरी रामचंद्र शिंदे, बडोदा स्टेट इंजिनियर यांनीं ३० ऑक्टोबर १८९८ रोजीं नवसारी येथें प्रार्थना समाज स्थापला. त्यांत रा. ब. शिंदे आणि रा. मोतीलाल ए. मुनशी, हायकोर्ट वकील यांनीं पुढाकार घेतला. प्रथम पंधरा सभासद होते. ते १९०४ सालीं चाळीस झाले. प्लेगमुळें या समाजाचे कामांत दरवर्षी चार चार महिने खंड पडतो. पहिला जाहीर उत्सव १९०० सालीं, दुसरा १९०३ सालीं झाला. चवथा १९०४ ऑगस्टमध्यें जाला व त्यांत मीं भाग घेतला होता. १९०३ सालांत श्रीमंत सयाजीराव महाराजांचे बंधु श्रीमंत संपतराव गायकवाड यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. १९०४ च्या उत्सवांत शनिवार-रविवारीं उपासना व व्याख्यानें मीं केलीं. समाजाचे हेतू व कार्याचें स्पष्टीकरण केलें. सुभासाहेब रा.ब. खासेराव जाधव यांनीं सुंदर भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता सांगितली. मीं समाजाला एक ग्रंथालय असावें अशी सूचना करून तिची सुरुवात म्हणून मुंबईहून कांहीं पुस्तकें पाठविलीं.

नवसारी प्रांतांतील जंगलामध्यें सोनगड म्हणून एक गांव आहे. तेथें एक समाज चांगला चालला होता. त्यांतील कित्येक प्रतिनिधि खास आमंत्रणावरून येथून नवसारीच्या उत्सवास आले होते. पुढील वर्षी सोनगड येथील समाजास मीं भेट दिली. येथें बडोदा संस्थानचे शेतकी खात्याचें एक केंद्र आहे. या प्रांतांतील ढाणके नांवाच्या जंगली जातीच्या लोकांच्या शिक्षणाची येथें सोय आहे. श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं कृपावंत होऊन ह्या जातीच्या मुलांसाठीं व मुलींसाठीं दोन नमुनेदार वसतिगृहें उघडलीं होतीं. तीं पाहून महाराजांच्या उदार अतःकरणांची साक्ष पटली. प्रत्येक वसतिगृहांत ५० विद्यार्थ्यांची सोय केली होती. मागासलेल्या लोकांसाठीं शिक्षण देतांना मुलांप्रमाणेंच मुलींची व्यवस्था करण्याला महाराज कधीं विसरत नसत. मुलांना शिकवून मुलींना अडाणी ठेवण्यांत त्या त्या समाजाला धोका आहे हें महाराजांनीं प्रथमच जाणलें. या वसतिगृहाचे चालक रा. फत्तेखान नांवाचे मुसलमान गृहस्थ मोठया कळकळीनें काम करीत होते. हे प्रार्थना समाजाचे सभासद असून या गांवीं एक स्वतंत्र प्रार्थना समाजहि चालवीत होते. त्यांनीं या चळवळीचा कसा आरंभ झाला याविषयीं एक मनोरंजक गोष्ट कथन केली. श्रीमंत सरकार सर सयाजीराव महाराज या प्रांतांतील ढाणके नांवाच्या मागासलेल्या जातीची परिस्थिति स्वतः निरीक्षण्यास आले असतां ठिकठिकाणीं त्यांच्यापैकीं कोणीच महाराजांना दिसेनात. हें गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष, बायका व मुलें हीं सर्व झाडावर उंच चढून बसलेलीं दिसलीं. महाराज आणि त्यांच्या परिवाराला पाहून ते आपल्यास धरून नेतील या भीतीनें, त्या बिचा-यांनीं असें केलें होतें. हे दृश्य पाहून ह्या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे असा त्यांनीं निश्चय केला. त्याचें फळ या संस्था आहेत असें फत्तेखानांनीं गहिंवरून सांगितलें. धन्य महाराज !!