१९०३ सालीं मी विलायतेहून परत येण्यापूर्वी श्रीमंत सयाजीराव महाराज यांचेकडून पत्र आलें होतें कीं, स्वदेशीं आल्यावर प्रथम त्यांना भेटावें. याप्रमाणें मी त्यांना स्वदेशीं आल्यावर १९०३ च्या आक्टोबरांत भेटण्यास गेलों. त्यावेळीं अस्पृश्यांसाठीं बडोद्यांत चार प्राथमिक शाळा होत्या. त्या मीं तपासून पाहण्यासाठीं तजवीज करावी असें महाराजांनीं विद्याधिका-यांस फर्मावलें. तपासून कांहीं सूचना करावयाच्या असल्यास महाराजांना समक्ष करावयास सांगितलें. सर्व शाळा जोरांत चालल्या होत्या. परंतु प्राथमिक शिक्षण संपल्यावर मुलांना पुढें वाव नसल्यानें तीं मोकळीं हिंडत होतीं. पुस्तकी शिक्षणामुळें तीं आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास असमर्थ आणि नाखूष होतीं. मीं ही गोष्ट महाराजांचे कानीं घालून मुलांच्या नोकरीविषयीं कांहीं झाल्यास करावें, अशी सूचना केली. धोरणी महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्यानें तूर्त हें शक्य नाहीं असें सांगितलें. पण शिष्यवृत्या देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचें कबूल केलें, आणि त्याप्रमाणें तशी व्यवस्था पण झाली.
बडोदें गांवांतील मराठे मंडळींनीं माझें स्वागत करून पानसुपारीचा एक जाहीर समारंभ केला. श्रीमंत खासेराव जाधव यांचा या बाबतींत पुढाकार होता. पण एकामागून एक जीं वक्त्यांचीं भाषणें झालीं त्यांतून प्रतिकूल सूरच निघूं लागले. माझें सर्व शिक्षण मराठा समाजाचे खर्चांतून झाल्यानें व विलायतेला जाण्या-येण्याचा खर्चहि महाराजांकडून मिळाला असतां मी मराठासमाजाच्या सेवेला हजर न होतां प्रार्थंना समाजांत शिरलों हें बरें केलें नाहीं. अशीं भाषणें करून माझ्या गळयांत माळ गालावयास मंडळी जेव्हां पुढें आली तेव्हां उत्तर देतांना मीं म्हटलें कीं, ''असें जर आहे तर मी ही माळ घालण्यास लायक नाहीं, म्हणून मी हातांतच घेत आहे. प्रार्थना समाज सर्वांसाठींच आहे, आणि त्यासाठीं मला तयार केलें हें मराटयांस, विशेषतः महाराजांना भूषणावह आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठयांकरितां नाहींत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊं ?''
१९०४ सालीं काँग्रेसचें अधिवेशन मुंबईस ठरलें. सामाजिक परिषदेचें अद्यक्षस्थान या वर्षी महाराजांना द्यावयाचें ठरलें होतें. ह्याच वेळीं एकश्वरी धर्माच्या परिषदेची पुनर्घटना करून तिचें अधिवेशन मुंबईस करण्याचे कामीं मीं पुढाकार घेतला होता. त्या वेळीं मुंबई प्रार्थना समाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षिस-समारंभामध्यें अध्यक्षस्थान स्वीकारावें म्हणून महाराजांना आमंत्रण करण्यासाठीं मी बडोद्यास डिसेंबर १९०४ मध्यें गेलों. त्यावेळीं तेथील हायकोर्टचे जज्ज डॉ. भांडारकर यांचे बंधु श्री. वासुदेवराव गोपाळराव भांडारकर हे होते. त्यांचेकडे मी उतरलों. हे प्रार्थना समाजाचे सभासद होते. शेठ हरगोविंददास कांटावाला वगैरे जुन्या पुढा-यांच्या नेतृत्वाखालीं बडोद्यास एक प्रार्थना समाज चालविला होता. पण त्याचें काम हल्लीं बंद होतें. बडोद्यांतील जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें महाराजांच्या आज्ञेनें माझें जाहीर व्याख्यान करविण्यांत आलें. महाराजांनीं मुंबईस समाजाचे परिषदेच्या कामांत भाग घेण्याचें मान्य केलें.
सन १९०७ च्या आक्टोबर अखेरीस हिंदुस्थानच्या नैॠत्य किना-यावरील मंगळूर शहरांतील ब्राह्मसमाजाकडून मला तिकडे नेण्यासाठीं त्या समाजाचे एक सभासद रा. व्यंकटाप्पा कांताप्पा मुंबईस आले. मी व चि. जनाक्का श्री. व्यंकटाप्पाबरोबर आगबोटीनें निघालों. मंगळूरला पोहोंचल्यावर समाजाचे अक्षरशः सर्व सभासद स्त्रीपुरुष आणइ मुलें माझें स्वागत करण्यासाठीं बंदरावर आले होते. मंगळूर हें बंदर उतरण्यास कठीण असल्यामुळें आगबोट बंदरापासून लांब थांबते. लहानशा मचव्यांतून उतारूंना बंदरावर पोहोंचविण्यांत येतें. ही सर्व मंडळी माझ्यासाठीं कितीतरी वेळ उन्हांत तिष्ठत होती. त्यांचें हार्दिक स्वागत पाहून आम्हांला गहिंवर आला. वृध्द अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या, चिटणीस के. रंगराव, खजिनदार कृष्णराव गांगुली, कर्नाड सदाशिवराव व आणखी कांहीं थोडी सारस्वत ब्राह्मण घराणीं होतीं. बाकी सर्व तिकडील प्रांतांतील बिल्लव जातीचे सभासद होते. ही जात तिकडे अस्पृश्य मानलेली होती. पण तो आश्रम पालटून ब्राह्मसमाजांत प्रवेश झाल्यावर हे सर्व समासद सर्रास वरिष्ठ वर्गात मोडूं लागले. यामुळें ह्या ब्राह्मसमाजाच्या प्रसारामध्यें या प्रांतांतील कामानें फार वरचा नंबर पटकावला आहे.
ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानींत त्यांचे पट्टशिष्य प्रतापचंद्र मुझुमदारांनीं ह्या कामीं पुढाकार घेतला होता. त्यावेळी बिल्लव जातीचे पुढारी आलसाप्पा नांवाचे वजनदार गृहस्थ हे होते. पांच हजार बिल्लव ब्राह्मसमाजाची दीक्षा घेण्यास तयार आहेत अशी तार त्यांनीं केशवचंद्र सेन यांना केल्यामुळें प्रतापचंद्र यांना पाठविण्यांत आलें. त्यांचें स्वागत करण्यासाठीं बंदरावर ह्या जातीचा प्रचंड समुदाय जमला होता. पण प्रतापचंद्र मुझुमदार महाशय अस्सल इंग्रजी पोशाखांत जेव्हां मचव्यांतून बंदरावर उतरले तेव्हां त्यांना पाहून हा जमलेला समाज बिचकला.हे कुणीतरी ख्रिस्ती मिशनरी आपणांस बाटविण्यांत आले अशी वास्ती घेऊन सगळया गर्दीची पांगापांग झाली. आणि बिचा-या आलसाप्पाजवळ कोणी उरला नाहीं. प्रतापचंद्रांनीं धीर सोडला नाहीं. आलसाप्पा यांच्या घरीं जाऊन उतरले. दुसरे दिवशीं सकाळीं ब्रह्मोपासनेत प्रतापबाबू बसले त्यावेळीं त्यांनीं आपली साधी शुध्द बंगाली शाल अंगावर घेतली होती. ती त्यांची शुभ्र विपुल दाढी, मोकळया डोक्यावरील लांब आणि कुरले केस हा अस्सल देशी देखावा पाहून आदले दिवशीं उधळून गेलेल्या लोकांस थोडा थोडा धीर येऊं लागला. आपलें इंग्रजींतील अमोघ वक्तृत्व आणि मायाळू प्रचाराचे जोरावर त्यांनीं लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गावर छाप बसविली. ब्राह्मसमाजाची स्थापना केली. त्यानंदतर नवविधनसमाजाचे अनेक प्रचारक, विशेषतः अमृतलाल बोस, बलदेव नारायण, साधारण ब्राह्मसमाजाचे हेमचंद्र सरकार वगैरेंनीं अमोलिक कामगिरी केली. अमृतलालची शिस्त, बलदेव नारायणाचा भक्तिभाव, हेमचंद्रांचें घटनाकौशल्य ह्यांचे ठसे अद्याप दिसत आहेत. या परंपरेंत मीं या पवित्र भूमीवर पाय टेवला. सुमारें एक महिना अत्यंत सुकासमाधानानें आम्हीं या बालबोध समाजाची सेवा केली, आणि ती त्यानें गोड करून घेतली. विशेषतः आम्हठ दोघां भावंडांना या प्रांताची कानडी भाष येत असल्यानें या समाजांतील लहान थोर मंडळी आम्हाशीं अगदीं आपुलकीनें बिलगली. आम्हांपासून त्यांना लाभ झाला व त्यांच्यापासून आम्हाला झाला.
ह्या प्रांतीं कोंकणी या नांवाची ब्राह्मणांची एक पोट जात आहे. त्या जातीचे प्रतिनिधी विद्येंत, व्यापारांत व सरकारी नोकरींत पुढारलेले आहेत. त्यांना मराठी भाषेचा फार अभिमान वाटत असे. त्यांनीं माझीं मराठींत व्याख्यानें, उपासना व कीर्तनें मोठया आवडीनें करविलीं. रा. सुब्बराव पै या नांवाचे एक प्रेमळ गृहस्थानें एक लहानशी मराठी शाळा काढण्यांत पुढाकार घेतला.
समाजाचे उत्साही चिटणीस के. रंगराव ह्यांनीं अस्पृश्यांच्या उध्दरासाठीं मुंबईच्या निराश्रित मंडळींची सुरुवात होण्यापूर्वीच १८९७ सालीं सुरवात केली होती. मुंबईत गेल्या वर्षी मी अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची ( All India Depressed Classes Mission) सुरुवात केली होती. म्हणून के. रंगराव यांनीं विशेष उत्साहानें मला बोलावून नेले होते. आजपर्यंत ह्या कामीं ते एकटेच खपत होते. मीं ह्या कामाची पुनर्घटना केली. गांवांतील पांच प्रमुख पुढा-यांची एक कमिटी नेमून के. रंगरावांच्या जोडीला दिली. आणि अखिल भारतीय निरिश्रत साह्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून त्या मंडळीशीं ही संलग्न केली. पुढें हिची वाढ झपाटयानें झाली. ह्या नैॠत्य किना-यावरील द्राविड संस्कृति,लोकरिवाज, आश्चर्यकारक इतिहास यांचें निरीक्षण करण्यास बरीच मोठी संधि मिळाली. ब-याच वेळां मी या प्रांतीं पुढें निरनिराळया कामानिमित्त येऊन गेलों.
आम्हा दोघां भावंडांची उतरण्याची सोय या बिल्लव मंडळींनीं एका स्वतंत्र बंगल्यांत केली होती. तरुण स्वयंसेवक नेहमीं कामाला हजर असत. बिल्लव मंडळीची माझ्यावर अपूर्व भक्ति होती. मला ते आपले गुरु मानून ते आमच्या अर्ध्या वचनांत रहात असत. नरसाप्पा व नारायणाप्पा या नांवाचे दोघे बंधू आमच्या बंगल्यांत सहकुटुंब राहात असत. आमच्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांच्यावर असे. तो करण्यामध्यें त्यांची केव्हां केव्हां अशी चुरशीची चढाई लागे कीं, ''देवा आमचे ह्या शिष्यांपासून रक्षण कर'' असें म्हणण्याची आम्हावर पाळी येई. एकदां आमचीं कामें करण्यासाठीं ह्या दोघां भावांचें अक्षरशः मल्लयुध्द जुंपलें. मी तें सोडविण्यास गेलों असतां त्या दोघांचे आघात माझ्या पाठीवर पडून ती बरीच तिंबूल गेली. कारण ही वेळ पहाटेची असल्यानें अंधारांतच हा प्रकार चालला होता. त्या दिवशींचा स्वयंपाक कोणीं करावा याबद्दल वाद उप्सथित झाला होता. जो तो मी करणार असें अट्टाहासानें म्हणें. उजाडल्यावर माझ्या पाठीवरचे वळ पाहून दोघे भाऊ लहान मुलासारखे स्पुंच्दून स्पुंच्दून रडूं लागले. त्यांची समजूत घालण्यास बरीच शक्ति खर्च करावी लागली.
मंगळूरभोंवतीं सृष्टिसौंदर्य अपूर्व आहे. नद्यांचीं रुंद पात्रें, दोन्ही बाजूला सुंदर रेती व त्यापलीकडे लाल मातीच्या टेकडया, व त्यावरील गर्द झाली वगैरे शोभा सर्व ॠतूंत अपूर्व दिसते. अडयार नांवाच्या जवळच्या एका खेडयाला मीं बोटींतून सफर काढली. बिल्लव जातीचे पुढारी व समाजाचे सभासद व श्रीयुत व्यंकटाप्पा बोळार या नांवाचे पोलीस अधिकारी बरोबर होते. त्यांनीं ह्या सफरीची सर्व सोय केली होती. आम्ही जंगलांत राहणा-या बिल्लव जातीच्या गृहस्थितीचें निरीक्षण करण्यासाठीं एका घरांत शिरलों. मोठमोठया जमीनदारीच्या जमिनीवर राबण्यासाठीं हे लोक वंशपरंपारगत कुळें म्हणून खपत असत. ह्यांची स्थिति जवळ जवळ जनावरासारखीच असे. झाडाखालच्या क्षुद्र झोंपडींत राहणें, ताडीमाडीच्या लाकडांचीं कांहीं क्षुल्लक उपकरणें एवढीच यांची संपत्ती. अंगारच्या पोशाखाशिवाय बदलावयाला कपडे नसत. मी एका म्हाता-या स्त्रीला तिचें वय विचारलें. तिनें लाजून म्हटलें, “मला काय माहीत? माझ्या जमिनीच्या मालकाला ठाऊक असेल.” अशा लोकांसाठीं रा. रंगरावांनीं मिशन काढलें यांत काय नवल? या लोकांचीं मुलें दिवसभर कुठें तरी झाडावरील चिंचा, बोरें व केव्हां झाडपाला खाऊन पोट भरीत. रात्रीं थोडीशी कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खात. औषधपाण्याची त्यांना गरजच लागत नसे. पुढें चार सहा आठवडयांनीं आम्हीं मुंबईस परत आलों.
१९०६-७ च्या सुमाराला चि. जनाक्का कोंकणांतील पनवेल या गांवीं तेथील म्युनिसिपल शाळेंत मुख्य शिक्षक या नात्यानें काम करीत होती. सुधारक म्हणून हिला तेथें फार विरोध होऊं लागला. तिचेबरोबर आई, बाबा आणि माझा मुलगा प्रताप हे रहात होते. प्रार्थनासमाजाचीं तत्वें तेथील लोकांस कळवून दिल्यास गैरसमजूत कमी होऊन विरोध कमी होईल या आशेनें स्वामी स्वात्मानंदजीला बरोबर घेऊन मी पनवेलास गेलों. ज्या द्रव्यामुळें प्रकृतींत बिघाड होतो तींच द्रव्यें शरीरांत लहान प्रमाणावर घालून रोग बरा करण्याच्या प्रकाराला होमीओपथी म्हणतात. सुधारणेमुळें लोकांना चीड आलेली होती. त्याच सुधारणेच्या लहान गुटिका लोकसमाजाला देण्यांत ही आमची आध्यात्मिक होमीओपथी होती. स्वात्मानंदजी हे मूळचे आर्यसमाजिस्ट असल्यानें साधकबाधक कोटिक्रम आणि जुन्या ग्रंथांचे आधार देऊन वाद करण्याच्या पध्दतींत स्वामिजींचा हातखंडा असे. वादाचे मुद्दे संपल्यावर स्वामिजी केव्हां केव्हां आल्या हातांतला दंडाहि उगारीत. तुलनात्मक धर्मपध्दति, आधुनिक धर्मविवेचन, अखिल जगताचें हळू हळू पालटणारें लोकमत, राजकारणासारख्या ऐहिक प्रश्नावर होणारा त्याचा परिणाम वगैरे विषयावर माझें विवेचन होत असें. या जोडगोळीनें पनवेलच्या वरिष्ठ वर्गावर थोडाबहुत परिणाम झाला, आणि चिरंजीव जनाक्काच्या मुलींच्या शाळेंत मुलींची हजेरी पण सुधारली. अशा स्थितींत पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार हे महार गृहस्थ लष्करी पेन्शनर होते. त्यांना माझे बाबांनीं आपल्या घरीं चहाला बोलाविलें. त्यामुळें आम्हीं मुंबईस परत आल्यावर लोकमताला पुन्हां ऊत आला. बराच त्रास भोगावा लागला. इतका कीं आमचे घरची मोलकरीण काम सोडून गेली, बाबांना हजामतीची पंचाईत पडली. तेथील मामलेदार रा. बेंदूरकर नांवाचे एक प्रागतिक सज्जन गृहस्थ होते. म्युनिसिपालिटींत एक सभ्य व सज्जन मुसलमान होते. ह्या दोघांचें साहाय्य न मिळतें तर चिरंजीव जनाक्काला ही नोकरी सोडून मुंबईस परतावें लागलें असतें. ह्यापुढें कोंकणांत अलिबाग, मालवण, सावंतवाडी, गोवें, आंबोलीचा घाट, दापोली वगैरे ठिकाणीं प्रचारकार्यास मी वेळोवेळीं जाऊन आलों. मालवण ही डॉ. भांडारकरांची मायभूमि. त्यावेळीं तेथें इंदूर समाजाचे सभासद आत्माराम सदाशिव केळकर हे रहात असत. त्यांचे साहाय्यानें तेथील प्रार्थना सभेची पुनर्घटना केली आणि अस्पृश्यांसाठीं देखील बरींच महत्वाचीं अशीं कांहीं कामें केलीं.
विलायतेला जाण्यापूर्वीपासूनच मी कोल्हापुरीं माझे मित्र गोविंदराव सासने, डॉ. कृष्णाबाई केळवकर यांचेकडे वेळोवेळीं जात होतों. त्यावेळीं तेथील ग्रंथांलयांत माझीं व्याख्यानें होत असत. मी विलायतेला जाण्याच्या प्रवासखर्चाबाबत श्रीमंत शाहू महाराजांकडून तीनशें रुपयांची मदत मिळाली होती. १९०९ सालच्या उन्हाळयांत कोल्हापूर येथें माझें एक महत्वाचें व्याख्यान झालें. त्यापूर्वीं मी मुंबईस अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना केली होती. कोल्हापुरांत गणपत कृष्णाजी कदम, वकील यांचें लक्ष प्रार्थना समाजाच्या कार्याकडे लागलें होतें. प्रार्थना समाजाचे कांहीं प्रसिध्द पुढारी घेऊन कोल्हापुरास प्रचारकार्यासाठीं यावें म्हणून त्यांचा आग्रह पडला. छत्रपति शाहू महाराजांचीहि तशी इच्छा दिसली. आर्यसमाजाला तर त्यांनीं भरपूर साहाय्य दिलेंच होतें; आणि आपल्या समाजकार्यांत प्रार्थना समाजाचाहि त्यांना प्रयोग करून पहावयाचा होता. सिंधचे प्रसिध्द प्रोफेसर टी. एल्. वास्वानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्याचे प्रमथलाल सेन, मुंबईचे प्रसिध्द प्रो. वेलिनकर या चौघांना घेऊन मी १९०९ च्या ऑक्टोबरच्या अखेरीस पुणें, सातारा मार्गें कोल्हापुरास गेलों. मराठा वसतिगृहाची इमारत गांवाबाहेर होती. तिच्या जवळील एका स्वतंत्र बंगल्यांत सरकारी पाहुणे म्हणून आमची उतरण्याची सोय करण्यांत आली होती. तेथील राजाराम कॉलेजांतील दिवाणखान्यांत प्रो. वास्वानी व वेलिनकर यांचीं व्याख्यानें व बाबू प्रमथलाल सेन यांची उपासना आणि माझें हरिकीर्तन वगैरे प्रसंग करविण्यांत आले. पण सर्वांत अधिक लोकमताचें आकर्षण डॉ. रुबेन यांच्या एकतारीनें केलें. आम्ही पाहुणे मंडळी सरकारी गाडींतून बसून गांवांत निघालों असतां डॉ. रुबेनला एकदम स्फूर्ति येऊन त्यांनीं खाली उतरावें, आणि भर बाजारांत आपल्या एकतारींत तल्लीन व्हावें, भोंवताली प्रचंड गर्दी व्हावी, आमच्या गाडीला वाट मिळूं नये, असें वारंवार होऊं लागलें. डॉ. रुबेनला एकटें सोडावें तर आम्हाकडे कोण येणार! घेऊन जावें तर गर्दी वाटच सोडेना. असा वेळोवेळीं पेंच पडे. एकंदरींत कुणीकडून तरी प्रचाराचें कार्य होवो म्हणून आम्ही हा पेंच मुकाटयानें सहन करीत असूं.
कोल्हापुरांत या भेटीमुळें एक नवीन प्रार्थना समाज सुरू करण्याची तयार झाली आहे असें रा. कदम यांना वाटूं लागलें. बळवंत कृष्णाची पिसाळ या नांवाच्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन रा. कदम यांनीं ह्या कामास हळूहळू सुरुवात केली. रा. सावंत, रा. खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. गोविंदराव सासने वगैरे मंडळींचें या कामास प्रोत्साहन मिळालें.
पुढें सन १९११ सालच्या में महिन्यांत पुण्याचे रा. गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर, चि. जनाक्का व तिच्या शालेंतील मैत्रिणी श्रीमती सीताबाई मराठे व सौ. गुलाबबाई वैद्य या मंडळींसह मी कोल्हापुरास पुन्हां गेलों. मुंबईचे बलभीमराव केसकर हे आपल्या घरांतील मंडळींसह अगोदरच तेथें जाऊन राहिले होते. कोल्हापुरच्या समाजाचा त्या वेळीं कार्यक्रम ठरला होता, व त्यांत आम्हीं भाग घेतला. सरकारांतून योग्य ती मदत कोल्हापूर प्रार्थना समाजास मिळाली. याच प्रसंगीं करवीर मठाचे जुने शंकराचार्य (डॉ. कूर्तकोटींच्या पूर्वींचे) यांनीं माझें एक खास हरिकीर्तन आपल्या मठांत करविलें. श्री स्वतः श्रवणास हजर होते. रिवाजाप्रमाणें त्यांनीं नारळ आणि धोतरजोडा देऊन माझी यथोचित संभावना केली. याच भेटींत रा. बागल आणि त्यांचे नातेवाईक रा. बाबासाहेब सावंत वकील यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या. गांवाबाहेर एका सृष्टिसौंदर्याचे ठिकाणीं एक वनोपासना झाली. तींत डॉ. कृष्णाबाई केळवकर यांनीं पुढाकार घेतला होता. हा समाज पुढें कांहीं वर्षें चालून बंद पडला. रा. ब. कृ. पिसाळ यांनीं ‘विश्वबंधु’ या नांवाचें साप्ताहिक पत्र तसेंच कांही वर्षें चालविलें. पोस्टल मिशनचें कामहि तेच करीत होते.