प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (५)

यावेळी मी माझे मित्र प्रसिध्द बिपिनचंद्र पाल यांचे घरीं उतरलों होतों. हे मँचेस्टर कॉलेजमधून ब्राह्मोप्रचारक होऊन आले होते. पण स्वदेशीं येतांच ते राजकारणाकडे वळले. तरी देखील ब्राह्मसमाजाच्या कार्यांत अत्यंत सहानुभूतीनें भाग घेत होते. ह्यावेळीं कलकत्त्यास समाजांत एका महत्वाच्या प्रश्नावर मोठा वाद माजला होता. तो विषय म्हणजे ब्राह्मसमाजांतील तरुणांनीं रंगभूमीवर नाटकांतील कामें करावींत किंवा नाहीं हा होय. ब्राह्मसमाजांतील तिन्ही पक्षांतील सर्व वृध्द मंडळी विशेषतः कृष्णकुमार मित्र आणि हेरंबचंद्र मैत्र यांचा या कामीं फार विरोध होता. पण प्रसिध्द कलाप्रिय रवीन्द्रनाथ टागोर हें या कामीं फार अनुकूल होते. बहुतेक सारा तरुण वर्ग त्यांच्याच मताचा होता. डॉ. रवींद्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजाचे सन्मान्य सभासद करावे असा आग्रह तरुणांनीं घेतला. वृध्दांना याची फार चीड आली. बिपिनचंद्र पाल हे टागोर यांच्या मताचेच होते. त्यांच्याकडूनच मला ह्या रणसंग्रामाची बरीच हकीकत कळली. पुढें बरींच वर्षें हा तंटा विकोपाला गेला तरी रवीन्द्र बाबूंचाच अखेर जय झाला. १९११ सालीं ब्राह्मसमाजाच्या माघोत्सवांत रविवारच्या नीति शाळेचा जो बक्षिस समारंभ झाला, त्यावेळीं तरुण मुलांमुलींनीं एक सुंदर नाटयप्रयोग केला. पण तो पाहण्यास वृध्दांचीच अधिक गर्दी जमली होती. पुढें पुढें तर रवीन्द्रनाथ टागोर हे माघोत्सवाच्या वेळीं आपल्या घरीं आपल्या लेकी सुना नातवंडें यांना घेऊन आपण केलेल्या नाटकाचे प्रयोग जाहीरपणें करून दाखवीत आणि १९२३ च्या सुमारास मी कलकत्यास गेलों असतां डॉ. रवीन्द्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजानें आपल्या वेदीवरून उपासना करण्यास बोलाविलें. तरुण वर्गांचा हा मोठा विजय; पण वृध्द हेरंबचंद्र बाबूंना हा शेवटपर्यंत कधींच खपला नाहीं. त्यांचीच एक चमत्कारिक गोष्ट सांगतात कीं, बाबू महाशय एकदा रस्त्यानें जात असतां त्यांच्याकडे एक तरुण विद्यार्थी येऊन त्यानें अमूक एक नाटकगृह कोठें आहे म्हणून विचारलें. बाबूजींना अत्यंत संताप येऊन, “मला ठाऊक नाहीं जा”असें त्यांनीं रागारागानें सांगून त्याला झिडकारलें, विद्यार्थी गेला, पण बाबूजींना आपण खोटें बोललों याचा पश्चाताप होऊन त्यांनीं त्या विद्यार्थ्यांस परत बोलाविलें, “अरे मला ठाऊक आहे, पण मी सांगत नाहीं जा” असें म्हणून पुन्हा झिडकारलें.

१९०७ च्या नाताळांत सुरतेस या परिषदेची बैठक झाली. रवीन्द्रनाथ टागोरांचे वडील बंधू व हिंदुस्थानांतील पहिले आय् .सी. एस्. सत्येंद्रनाथ टागोर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. अहमदाबाद समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमियाशंकर हे स्वागत मंडळाचे अध्यक्ष या नात्यानें त्यांनीं प्रतिनिधींचें स्वागत केलें. सुरतेस समाज नसतांहि ही बैठक समाधानकारक रीतीनें तेथील टाऊन हॉलमध्यें पार पडली. पहिली उपासना मुंबई समाजाचे स्वामी स्वात्मानंदजी यांनीं हिंदींत चालविली. जाहीर सभेंत डॉ. भांडारकर, गुजराथचे प्रसिध्द कवि नानालाल, लाहोरचे प्रो. रुचीराम सहानी यांचीं भाषणें झालीं. ठरावाचे वेळीं ह्या परिषदेचे मार्फत लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालीं दुष्काळ निवारणाचे कामीं घटना व्हावी असा एक विशिष्ट ठराव पास करण्यांत आला.

राष्ट्रीय सभेचा मात्र या वेळेस फारच गोंधळ उडाला. ही सभा आजपर्यंत मवाळांच्या हातांत होती. लोकमान्य टिळकांनीं ह्या वर्षी ती उधळून लावून पुढें कित्येक वर्षें तिला आपल्या मुठींत ठेवलें होतें. गेल्या वर्षी मुंबईंत स्थापन झालेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक जाहीर सभा याच वेळीं झाली.

१९०८ च्या नाताळांत मद्रास शहरीं ही परिषद भरली. मी मद्रासला निघालों त्या वेळीं माझी प्रकृति किंचित् नादुरुस्त होती म्हणून बंगलोरपर्यंत मीं सेकंड क्लासांतून प्रवास केला. वेळ नाताळची असल्यामुळें व्यापारी वगैरे मंडळींची डब्यांत बरीच गर्दी होती. गुंडकल स्टेशनवर तार करण्यासाठीं मी खालीं उतरून परत डब्यांत येऊन पाहतों तों तीन नवे आडदांड युरोपियन गृहस्थ बसले असून बाकीची सारी हिंदी मंडळी उतरून दुसरीकडे गेली होती. माझें सामान एकीकडे ठेवण्यांत आलें होतें. मी माझ्या जागेवर जाऊन बसलों व तेथून कांहीं हाललों नाहीं. उतरून गेलेल्या मंडळींत एक मोंगलाईंतला मुसलमान आडमुठया अधिकारी होता. मी बसलेला पाहून थोडेसें धैर्य आल्यामुळें उतरून गेलेले व्यापारी परत येऊन बसले. युरोपियनांनीं मला कोणताहि त्रास दिला नाहीं. दारू पिणें, चिरूट ओढणें आणि पत्ते खेळणें ह्यांतच ते गुंग झाले होते. पण पुन्हां आलेले कानडीअप्पांनीं त्यांच्या खेळण्यांत मुद्दामच लक्ष घालून फाजील आगंतुकपणा दाखविल्यानें त्या युरोपियनांना तो असह्य होऊन त्यांना फार चीड आली.  त्यांचें इंग्रजी व ह्यांचें कानडी परस्परांस न कळल्यानें प्रकरण अधिक विकोपाला जाऊं नये म्हणून मला मध्यस्थी करणें भाग पडलें. प्रसंगविशेषीं आम्हां हिंदी एतद्देशियांना आपला आब राखून घेतां येत नाहीं म्हणून असले खटके उडतात.

लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार हे या परिषदेचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष मंगळूर समाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांनीं सुंदर भाषण केलें. ही जाहीर बैठक  Anderson Memorial Hall मध्यें झाली. सौ. सरोजिनी नायडू, अहमदाबादचे रमणभाई नीलकंठ, लाहोरचे धर्मदास सूटी यांचीं व माझीं जाहीर भाषणें झालीं. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे प्रतिनिधि प्रो. टी. डेव्हिस हे कोलंबोहून मुद्दाम आले होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची जाहीर सभा ३० डिसेंबर रोजीं करविण्यांत आली. त्या वेळीं रा.ब.एम्. आदिनारायणय्या यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें. परिषदेंतील मुख्य प्रवचन करण्याचें काम मजकडे होतें. या परिषदेच्या खर्चाप्रीत्यर्थ ब्राह्मसमाजाचे प्रसिध्द हितचिंतक पिठापुरचे महाराज यांनीं ५०० रु. दिल्यामुळें परिषदेच्या यशांत भर पडली. याच वेळी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची मद्रास शाखा उघडण्यांत आली. तिच्यासाठीं मला ५।६ दिवस मद्रासेंत राहावें लागलें. त्यानंतर कोइमतूर, कालिकत, फ्रेंचांचा गांव माही, कानानारे या गांवीं भेट देऊन शेवटीं मंगलोर येथें दोनतीन दिवस थांबून मी मुंबईस परतलों.
१९०९ सालीं लाहोर येथें ही परिषद झाली. या परिषदेचे दुय्यम चिटणीस अविनाशचंद्र मुझुमदार यांनीं परिश्रम घेऊन स्वागताची जंगी तयारी ठेवली होती. कलकत्त्याचे विनयेंद्रनाथ सेन ह्यांचें अध्यक्षीय भाषण फारच परिणामकारक झालें. पंजाब येथील दोन्ही पक्षाच्या ब्राह्मसमाजिस्टांनीं मिळूनमिसळून काम केलें. या परिषदेतील एक विशेष म्हणजे बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं आपल्या संस्थानचे विद्वान माणसांना प्रतिनिधी म्हणून लाहोरास पाठविलें होतें. परिषदेचें काम पाहून त्यांना आनंद झाला, आणि उदार धर्माच्या कार्याचें महत्व त्यांना कळलें. मुंबईचे गिरिजाशंकर त्रिवेदी हे लाहोरास जातांना व परत येतांना माझ्याच बरोबर प्रवास करीत होते. जातांना वाटेंत अहमदाबाद, पालनपूर, जयपूर, आग्रा, मथुरा, वृंदावन आणि दिल्ली हीं शहरें आम्हीं उतरून बारकाईनें पाहिलीं. परिषद आटोपल्यावर अमृतसर येथें जाऊन शीखांचें सुवर्णमंदिर पाहिलें. ह्या वेळीं कांहीं कारणांवरून पंजाबांतील आर्यसमाजावर पतियाळाच्या संस्थानाधिपतींचा फार रोष झाला होता. लाला मुनशीराम, स्वामी श्रध्दानंद यांचेवर या रोषाचा घाला पडला होता. पतियाळाच्या आर्यसमाज मंदिराचें रुपांतर संस्थानच्या घोडशाळेंत करण्यांत आलें होतें. लालाजींना आम्ही भेटण्यास गेलों तेव्हां ते खिन्न मुद्रेनें पण उदात्त वृत्तीनें या शाळेंत बसलेले दिसले. सौ. हेमंतकुमारी चौधरी या ब्राह्मभगिनीकडे आम्ही एक दिवस उतरलों. उपासना वगैरे आटोपून आम्ही निघालों. परत येतांना अजमीर जवळील अबूच्या पहाडांत आम्हीं दोन दिवस धर्मचिंतनांत घालविले. तेथील सुप्रसिध्द जैन मंदिर, दिलवारा आणि प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. या मंदिराचें सर्व काम संगमरवरी दगडाचें असून तेथें कलाकुसरीची इतकी कमाल झाली आहे कीं, तशी सुबकता व साजुकता जगांत इतरत्र क्वचितच आढळेल. मोंगलांच्या तडाक्यांतून हें रत्न कसें वांचलें याचें आम्हांला मोठें आश्चर्य वाटलें. हें स्थळ इतकें अपूर्व असून त्या मानानें त्याची प्रसिध्दि कां नाहीं याचें अधिक आश्चर्य वाटलें. कदाचित् त्याच्या अप्रसिध्दपणामुळेंच हें सुरक्षित राहिलें असेल अशी भोळी समजूत आम्हीं करून घेतली.

ह्या प्रवासास निघण्यापूर्वी माझी वृध्द मातोश्री कॅन्सर (व्रण) च्या व्यथेनें अत्यवस्थ होती. तिला सोडून मला प्रवासास निघवेना आणि गेल्याशिवाय राहवेना असा पेंच घडला. पण मातोश्रींनीं मला धीर दिला. जावयास अनुज्ञा दिली आणि ‘तू परत येईपर्यंत मी तुला सोडून जात नाहीं’असें आश्वासनहि दिलें. हा जुन्या माणसांचा कारारीपणा! पण मी परत आल्यावर ता. ८ फ्रेबुवारी १९१० रोजीं माझ्या प्रेमळ मातोश्री सुमारें ७० वर्षांच्या होऊन निवर्तल्या.

१९१० सालीं ही परिषद अलाहाबाद येथें भरली. तेथें पूर्वी एक ब्राह्मसमाज होता; पण अलिकडे तो बंद पडला होता. लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार या प्रांतांतील माहितगार होते म्हणून त्यांना माझ्या जोडीला चिटणीस म्हणून नेमण्यांत आलें होतें. परिषदेच्या पूर्वी तीन आठवडे जाऊन त्यांनीं पूर्वतयारी चालविली. जागा मिळण्यास कठिण जाऊं लागलें. कर्नल गंज, बंगाली स्कूलच्या अधिका-याला त्यांच्या शाळेला २०० रुपयांची मदत देऊन परिषदेसाठीं तेथें जागा मिळविली. अध्यक्ष कोणास नेमावें हाहि प्रश्न बिकट झाला. शेवटीं पं. शिवनाथशास्त्री यांनीं कबूल केल्यावर हा प्रश्न सुटला.