प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (६)

मी तेथें एक आठवडयापूर्वी गेलों. प्रत्येक परिषदेपूर्वी सर्व ब्राह्म आणि प्रार्थना समाजांत सर्क्युलर काढून खर्चाची तरतूद करणें हें माझें काम असें. केव्हां पुरेसे पैसे मिळत आणि केव्हां मिळतहि नसत. माझ्या प्रवास खर्चाचीहि नेहमीं रडच असे. एकच महिन्यापूर्वी (नोव्हेंबर १९१० मध्यें) मुंबई प्रार्थना समाजाशीं प्रचारक या नात्यानें मीं संबंध सोडला होता. अर्थात् प्रवास खर्चच नव्हे तर घरखर्चाचाहि प्रश्न मजपुढें आ पसरून उभा होता. नाताळचे थंडीचे दिवस, आगगाडींतून भयंकर गर्दी, थर्ड क्लासची दगदग अशा स्थितींत मध्यरात्रीं मी अलाहाबादेस उतरलों. प्रो. बाबू रामानंद चतर्जी यांचेकडे मी उतरणार होतों. पण गाडीवाल्याला तें ठिकाण माहीत नसल्यामुळें तास दोन तास अपरात्रीं इकडे तिकडे भटकल्यावर नाइलाज म्हणून त्यानें मला शेवटीं म्युइट कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणांत माझें सामान टाकून तो निघून गेला. थंडी भयंकर पडली होती. सामानाला डोकें टेकून त्या माळयावर ती रात्र मीं कसीबशी मोठया कष्टानें काढली. प्रवासांत हे सोहाळे माझ्या नित्याचेच असत. कलकत्त्याचे बाबू हेमचंद्र सरकार ह्या परिषदेला हजर होते. ह्या परिषदेचें विशेष काम म्हणजे परिषदेच्या संघटनेला खलिता तयार करून मंजूर करुन घेणें. हा मसुदा तयार करण्यासाठीं एक पोट समिती, हेमचंद्र सरकार, नृत्यगोपाळ राय, लाहोरचे लाला रघुनाथ सहाई आणि मी स्वतः यांची नेमण्यांत आली. खलित्यांत खालील मुद्दे होते (१) नावं थिइस्टिक कॉन्फरन्स असें असावें. (२) उद्देश-एकेश्वरी धर्माचा प्रसार. (३) एकेश्वरी धर्माचे कोणीहि अनुयायी, रीतसर निवडून आलेले हे सभासद. (४) परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष, चार सभासद, एक किंवा दोन चिटणीस यांची स्टँडिंग कमिटी. या सर्वांची निवडणूक दरवर्षी परिषदेंत होणें. वर्षभर काम करून शेवटीं अहवाल सादर करणें. (५) ठरावांचा अंमल करणें वगैरे स्टँडिंग कमिटीचीं कामें. (६) परिषदेच्या ठिकाणीं स्थानिक सभासदांची स्वागत कमिटी नेमून आपले अवश्य ते अधिकारी स्टँडिंग कमिटीनें या कमिटीस तात्पुरतें देणें. या नियमांत बदल करण्याचा असल्यास परिषदेच्या उघडया जाहीर सभेंत दोनतृतीयांश सभासदांच्या अनुमतीची जरूरी. इत्यादि. लवकर एकमत होईना म्हणून अध्यक्षानें हा खलिता निरनिराळया ब्राह्म आणि प्रार्थना समाजांच्या अभिप्रायासाठीं सर्व देशभर फिरविण्यांत यावा आणि कलकत्त्यांत पुढच्या वर्षीच्या परिषदेंत हें सर्व प्रकरण सादर करावें, असा ठराव मांडल्यावर तो पास झाला.

प्रचाराचें काम चोहीकडे फार अव्यवस्थित रीतीनें चाललें होतें आणि तत्कालीन प्रचारक आपापलीं कामें सोडून बाहेरगांवीं फारसा संचार करीत नसत. म्हणून मीं एक ठराव आणला कीं, देशांतील मुख्य मुख्य ब्राह्मसमाजानें आपल्या प्रचारकाला निवडक प्रांतांतून निदान तीन महिने तरी संचारास पाठवावें. अर्थात् बंगाल्यांनीं हा ठराव हाणून पाडला. एकच काम करा म्हटलें कीं, त्यांचा मस्तकशूळ उठत असे. मीं दुसरा ठराव बहुजन समाजांत ब्राह्मधर्माचा प्रचार करावा हा आणल्याबरोबर मात्र तात्काळ एकमत झालें. कारण ठरावच तसा मोघम होता. हेमचंद्र सरकारनें ठराव आणला कीं, सन १८७२ चा तिसरा कायदा मिश्रविवाहासंबंधी होता तो सुधारावा. कलकत्त्यांतील ब्राह्मसमाज कमिटीनें या बाबतींत काय प्रयत्न केले ह्याची हकीकत त्यांनीं सांगितली. ठराव एकमतानें पास झाला. पुढील सालाकरितां वि. रा. शिदें, बाबू अविनाशचंद्र मुझुमदार, विनयेंद्रनाथ सेन व्यंकटरत्नम् नायडू, गुरुदास चक्रवर्ती आणि नृत्य गोपाळ राय ह्यांची स्टँडिंग कमिटी नेमण्यांत आली. हेमचंद्र सरकार ह्यांना मुख्य चिटणीस नेमण्यांत आलें.

१९११ च्या नाताळांत कलकत्यास सिटी कॉलेजमध्यें ही परिषद भरली. मगंळूर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांना अध्यक्ष नेमण्यांत आलें. जर्मनींतील गॉटिंजन युनिव्हर्सिटीचे प्रख्यात प्रोफेसर डॉ. रुडॉल्फ ऑटो हे परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. पहिली उपासना सत्येन्द्रनाथ टागोर यांनीं संस्कृतमध्यें चालविली. स्वागतमंडळाचे अध्यक्ष प्रिन्सिपाल हेरंबचंद्र मित्र यांनीं भाषण करून स्वागत केलें. निरनिराळया ठिकाणच्या अनेक प्रसिध्द सभासदांनीं महत्वाचीं भाषणें करून निबंध वाचले. बारा महत्वाचे ठराव पास झाले. तिसरा ठराव परिषदेच्या संघटनेबद्दल होता. मागल्या परिषदेंतील मसुदा आणि समाजांच्या अभिप्रायाचा अहवाल वाचल्यावर अविनाशचंद्र मुझुमदारांनीं तो ठराव पुढें मांडला. परिषदेच्या अध्यक्षांच्या नेमणुकीबद्दल एक जादा नियम घातला होता तो हा कीं, स्टँडिंग कमिटीनें स्वागत कमिटीचा अभिप्राय घेऊन अध्यक्ष निवडावा व तो परिषदेच्या बैठकींत मंजूर व्हावा. हा ठराव पास झाला. कलकत्ता ही देशाची राजधानी आणि ब्राह्मसमाजाचें मुख्य केंद्र असल्यानें हा सर्व समारंभ त्या मानानें थाटाचा झाला. नंतर एक सुंदर स्नेहसंमेलन मेरी कार्पेंटर हॉलमध्यें झालें. त्यांत जर्मन प्रोफेसर रुडॉल्फ ऑटो यांचें सहानुभूतिपर भाषण झालें.

१९१२ सालीं ही परिषद बांकीपूरला भरली. अध्यक्षस्थान सर नारायण चंदावरकर यांस देण्यांत आलें होतें. या ठिकाणीं कलकत्त्यांतील दोन्हीं शाखेचे (साधारण व नवविधान) ब्राह्मसमाज असल्यानें आणि बाबू हेमचंद्र सरकार हे मुख्य चिटणीस असल्यानें पूर्वतयारीचा त्रास पडला नाहीं. माझ्याबरोबर डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे एक आस्थेवाईक कार्यकर्तें अमृतलाल ठक्कर हे बांकीपुरास आले होते. मिशनची एक जाहीर सभा झाली. राष्ट्रीय सभेचें अध्यक्ष नामदार आर. एन. मुधोळकर ह्यांनीं सभेचें अध्यक्ष स्थान स्वीकारलें होतें, अमृतलाल ठक्करनीं माहितीचे आंकडे वगैरेंची जय्यत तयारी ही सभा यशस्वी रीतीनें पार पाडली. पुढील अधिवेशन कराची येथें ठरलें. तेथें नवविधान पक्षाचा फार जोर असल्यानें परिषदेचे जनरल सेक्रेटरी मलाच नेमण्यांत आलें. १९१३ सालीं नाताळांत ही परिषद कराचीस नव्यानेंच भरविण्यांत आली. हैद्राबाद समाजाचे अध्यक्ष दिवाण कौरामल वगैरे पुढा-यांनीं कराचीच्या सभासदांच्या मदतीनें कराचीच्या टाऊन हॉलमध्यें परिषदेच्या जाहीर बैठकीची सोय केली होती. अमेरिकेचे जे. टी. संडरलंड हे या परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. त्यांनाच अध्यक्ष नेमण्यांत आले. युनिटेरियन लोकांच्या नेतृत्वाखालीं एक उदार धर्ममतवादी लोकांची जागतिक परिषद आजपर्यंत युरोप आणि अमेरिकेंतील निरनिराळया ठिकाणीं करविण्यांत येत असे. १९०३ सालीं ऍम्स्टरडॅम येथें भरलेल्या परिषदेंत हिंदुस्थानचा प्रतिनिधि म्हणून हजर राहून मीं भाग घेतला होता. १९०५  सालीं जिनीव्हा येथें भरलेल्या परिषदेंत डॉ. सुखटणकर हे हजर होते. १९११ सालीं कलकत्ता येथें भरलेल्या परिषदेंत ह्या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेचें अधिवेशन लवकरच हिंदुस्थानांत भरावें असा ठराव पास करण्यांत आला होता. म्हणून अमेरिकेंतील युनिटेरियन असोसिएशननें डॉ. संडरलंड यांस जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरविण्याची पूर्व तयारी करण्यास मुद्दाम पाठविलें होतें. डॉ. संडरलंड हे १८९५ सालीं काँग्रेस पुण्यांत भरली असतां तिला हजर होते आणि पुण्यांत भरलेल्या एकेश्वरी परिषदेंत त्यांनीं भागहि घेतला होता. शिकागो येथें १८९२ सालच्या सुमारास पार्लमेंट ऑफ रिलीजन ह्या पहिल्या परिषदेंत हिंदुस्थानच्या ब्राह्मसमाजाच्या वतीनें बाबू प्रतापचंद्र मुझुमदार, बळवंतराव नगरकर आणि हिंदुधर्माच्या वतीनें स्वामी विवेकानंद ह्यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता. म्हणून हिंदुस्थानाला ही जागतिक परिषद अगदीं अपरिचित होती असें नव्हे.