१०-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. २६ एप्रिल १८९८ सोमवार
काल श्रीशिवजयंतीचा एथील उत्सव संपला.२५ पुण्याचे मानाने हा उत्सव व्हावा तसा होत नाही. तरी दुष्काळ, प्लेग व सरकारच्या मूर्खपणाचे प्रताप याकडे लक्ष दिले असता हा उत्सव असा तरी साजरा झाला (यासाठी) मंडळीचे आभार मानले पाहिजेत. पहिल्या दिवशी (२३ तारखेस) एक निबंध वाचला; नंतर प्रो. जिन्सीवाल्याचे२६ व्याख्यान झाले. त्यात विद्यार्थ्यांस त्यांनी चांगला उपदेश केला. विद्यार्थ्यांनी कृतीच्या भानगडीत पडू नये, नुसते ज्ञान मिळवावे, मनाची समता ठेवावी, Politics चा शिक्षणाशी काहीच संबंध नाही, असे चुकीचे आहे - वगैरे त्यांनी सांगितले. पण उपदेश करिताना जी एक दोन महत्त्वाची उदाहरणे घेतली ती कुत्सित व खोडसाळ असल्याने उपदेशावर पाणी पडले. आमकेच मत खरे आगर खोटे असा आग्रह धरू नका व पोक्तपणा आल्याशिवाय व पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका असे सांगत असता `तुम्ही आपली सोय पाहिली पण लोक मला हळदी कुंकवाला बोलावीत नाहीत ना, असे एक पुनर्विवाहिता आपल्या नव्या नव-यास बोलल्यावर मग त्यास पश्चाताप होतो`, असे उदाहरणार्थ सांगणे म्हणजे समतेचा उपदेश करणा-यांनी स्वतः आपल्याच असमतेचे (प्रदर्शन) करण्याप्रमाणे आहे. हा कडू उपदेश ऐकूच कांहींची तोंडे कशीशीच झाली होती तर का... हे उदाहरण ऐकिल्याबरोबर खुलली व टाळ्याचा गजर झाला. टाळ्या ज्या होत होत्या त्या असल्याच प्रसंगी. पुण्याच्या सार्वजनिक सभातून एकाद्या वक्त्यास टाळ्या मिळाल्या की त्याने काही तरी पोरकटपणा [केला] असावा असे बाहेरच्याने समजावे अशी स्थिती झाली आहे.
दुसरे दिवशी प्रो. परांजपे२७ यांचे पुराण झाले. हे फारच मासलेवाईक झाले. पुराणिकांची कीव येते. बिचा-यात एक म्हणजे एकच गुण दिसला. तो हा की तो `सुधारक' नाही ! टाळ्या मिळण्याला इतकेच बस्स आहे ! लेखाप्रमाणेच यांचे भाषणही बुळबुळीत, निःसत्व, असंबद्ध, अशुद्ध, तुटक, विपुल व पोकळ शब्दांनी भरलेले असे असते. कोणत्याही शास्त्राची ह्यास व्युत्पत्ती झाली आहे असे दिसत नाही. अलंकार व वक्तृत्व याचे तर हे शत्रूच भासतात. स्वर, उच्चार व अभिनय इत्यादिकांतही हे फार चुकतात. पांडव विराटाचे घरी जात असताना धौम्यांनी त्यास राजदरबारी कसे वागावे ह्या विषयी त्यास केलेला उपदेश हा पुराणाचा विषय होता. त्यास त्यांनी तोंडपुजेपणाचे... शास्त्ररूप दिले. अगोदर सुमारे अर्धा तास सत्याचाच महिमा गाइला. नंतर अर्धा पाऊण तास तोंडपुजेपणा, हांजीहांजीपणा या शब्दाचा खुलासा करण्यास हे भाषानिरुक्तीशास्त्रात शिरले. व त्यातल्या आपल्या शोधाचे विवरण करून स्तुतीपाठकपणा हा शुद्ध बारामासी शब्द आहे, व तोच नेहमी योजावा असे सांगितले. नंतर श्लोक वाचून अर्थ सांगू लागले. इतके व्हायलाच वेळ फार झाला. प्रो. जिन्सिवाल्यास ह्यावर दम धरवेना म्हणून त्यांनी स्पष्ट अशी विनंती केली की पुराणिकांनी फक्त भारतातल्याच श्लोकाचा अर्थ सांगावा. मध्यंतरी त्याची टीका नको. नंतर ते भराभर श्लोक सांगू लागले. मग यानंतर काही चमत्कार दृष्टीस पडणार नाही व वेळही झाला म्हणून मी व हुल्याळ घरी आलो. दोघांची मते जुळली. पुराणाची गोष्ट काढून आज दोन दिवस हासत आहे. पुराण संपल्यावर जिन्सिवाल्याने खरमरीत टीका केली असे सांगतात. तेव्हा पुराणिकाने मग सगळ्यांना समजावून सांगितले की आपले पुराण केवळ Satyre म्हणजे विनोदात्मक होते. ह्या प्रमाणे सुदैवाने आम्हाला कोठे हासावे हे मागाहून का होईना पण कळल्यावर तर आम्हाला जे हासू आले ते काही केल्या आवरेना !!
कालच्या जिन्सिवाल्याच्या व्याख्यानाला मी गेलो नव्हतो. कारण ते रात्री ९ वाजता सुरू होणार होते. आमचे तर सकाळी कालेज. ह्या उत्सवास प्रत्यक्ष शिवाजी महाराजाचे जातीबांधव कोणी येत नाहीत म्हटले तरी चालेल. हा कोणाचा दोष हे सांगवत नाही. शिवाजीचेच कमनशीब झाले ! त्याचे शिपाई मावळे यांना तर `शिवाजी`चा अर्थ तरी कळेल की नाही शंकाच !! जातिभेदाशी याचा संबंध काही तरी लागेल का ?
२७ एप्रिल १८९८
आज कंत्राटदारच्या वाड्यातून जमखंडीकरांच्या वाड्यात बि-हाड बदलेले. मालकास कळवण्यास मी गेलो तर नुसते `बरे आहे` इतकेच म्हणाले. मला चमत्कार वाटला.
ता. २ मे १८९८ सोमवार
श्रीमंत सयाजीराव महाराजास माझी स्कॉलरशिप यावर्षा चालू ठेवण्यास अर्ज केला.२८ हा अर्ज लिहू नये म्हणून ४।५ दिवस बराच विचार केला. शेवटी लिहिणेच बरे वाटले.
ता. ३ मे १८९८ मंगळवार
सकाळी कॉलेजात गेलो तो जुनियर बि. ए. तील मि. टिकेकर नावाचा विद्यार्थी क्वार्टर्समध्ये काल रात्री ३ वाजता मरण पावला असे कळले. क्वार्टर्समध्ये त्याचे प्रेत पाहून फार वाईट वाटले. आईबाप ५०।६० वर्षाचे म्हातारे आहेत. एकुलता एकच हा त्यांचा मुलगा. नुकतेच लग्न झालेले! प्रि. राजवाडे येऊन पाहून विचारपूस करून गेले. `येथील पाणी दूषीत आहे असे वाटत असल्यास तापवून प्या पण भिवून जाऊ नका, असल्या अशक्त मुलांनी आपल्या आई-बापाजवळच राहावे हे बरे` असे म्हणाले. सुमारे ९ वाजता ओंकारेश्वरावर नेले. क्वार्टर्सचे सर्व विद्यार्था प्रो. गोखले, राजवाडे, कर्वे व मि. मोतीबुलासा,२९ ही मंडळी शेवटपर्यंत होती. पण मयताचा नातलग कोणीच नसल्यामुळे अन्त्यविधी काहीच झाला नाही. काॅलेजला सुटी होती.