१४-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. ६ जून सोमवार १८९८
चि. जनाक्काची शाळा सुरू झाली. शाळा प्लेगमध्ये बंद होण्याच्या पूर्वी जनाक्कास आठच दिवस जमखंडीस जावे लागले म्हणून तिची आठ महिन्याची ऐंशी रुपये स्कॉलरशिप बुडाली. तिला बोर्डिंगात घेईनात. मला परीक्षेला जाण्याची घाई, बि-हाड बदलले तरी आजूबाजूस प्लेग केसेस होऊ लागल्या. अशा प्रसंगी तिला मागे एकटीला सोडवेना. मला येथेही अभ्यासामुळे राहवेना. म्हणून घेऊन गेलो. तिची चौथ्या इयत्तेची गेल्या सप्टेंबरमध्ये परीक्षा पास झाली होती. तिचा नंबर पहिला-दुसरा इतक्यात असे. तरी तिला आता पाचव्या यत्तेत घातले नाही, याबद्दल तिला फार वाईट वाटत आहे. व मलाही मदरची फाजील नियमबद्धता व सारासारविचारशून्यता (याची) फारच चीड आली आहे. पण इलाज नाही. लवकरच मी यासंबंधाने विचारपूस करणार आहे. पण मडमेच्या हेकेखोरपणापुढे माझे काहीच चालणार नाही, हे मी जाणून आहे.
आज कोणी बॅरिस्टर भट३७ यांचे इंग्लंडातील तीन वर्षाचे अनुभव यावर निबंध वाचणे झाले. काही विशेष अर्थ नव्हता. भटांचा पोशाख मात्र पाहाण्यालायक फ्यॅशनेबल होता.
ता. ९ जून १८९८ गुरुवार
सकाळी डा. नायडूच्या दवाखान्यात आमच्या रेसिडेन्सीतले दोन आजारी विद्यार्थी रा. कुकनूर धारवाडचे व रा. पोटे जमखंडीचे यास पाहण्यास गेलो तो कुकनूर वारल्याचे ऐकून उरात धस्स जाले. एका वर्षात आमच्या रेसिडंट विद्यार्थीपैकी हा सहावा मृत्यू. कॉलेजचे दुर्दैव !! कोणी म्हणतात पाणी वाईट, कोणी म्हणतात खोल्यातून हवा फार खेळते. कोणी म्हणतात विद्यार्थ्यांचा अडाणीपणा व निष्काळजीचे वर्तन. ह्यांतून कोणतेही कारण घेतले तरी तेथील देखरेख ठेवणा-या प्रोफेसरांकडून आपली जबाबदारी पूर्णपणे ओळखून ती पूर्णपणे पाळली जात आहे काय हा प्रश्न सहज उभारण्यासारखा आहे. मोठमोठे मिशाळ बी. ए. च्या वर्गातले विद्यार्थी असून ते आरोग्यशास्त्रातले केवळ आडाणी असे दुःखाने कबूल करावे लागत आहे. युरोपियन खेळ खेळण्यास युरोपियन खेळणी असली की काम झाले असे आम्हा सा-यास वाटत आहे. त्यांचे व्यायामास योग्य पोषाख, नियमितपणा, नेमस्तपणा व इतर बातबेत यांचे अज्ञान तरी असते किंवा मुळीच महत्त्व वाटत नाही. फर्ग्युसन रेसिडन्सीमधले बहुतेक विद्यार्थी काही श्रीमंताची मुले नसतात. मोकळ्या हवेत राहण्याचा हा त्यांचा पहिलाच किंबहुना शेवटलाही प्रसंग असल्यामुळे ती नवीनच बाहेर काढलेल्या वासरांप्रमाणे वेड्यासारखीच वावरू लागतात. नाहीतर चांगले अन्न, स्वच्छ हवा, व्यायामास मुबलक साधने व सुखाचे राहणे इतके असून रेसिडन्सीत सहा मरावेत व गावातला (अपमृत्यू सोडून) एकही मरू नये, याचा अर्थ काय ? आणि गावातल्याची संख्या निदान दीडपट आहे ! प्रोफेसरांचे लक्ष इकडे जावे तितके गेलेले दिसत नाही. कायमचा दवाखाना व कंपाँउडर असा तेथे नुकताच ठेवला आहे. शिवाय मुलांच्या नेहमीच्या वर्तणुकीवर त्यांनी यापेक्षा जास्त दाब का ठेवू नये, हे मला कळत नाही. गुराप्रमाणे फुटबॉल काही वेळ लाथाडून घाम गळतच पानावर बसणे, जेवल्याबरोबर वा-यात पुलावर गप्पा मारीत बसणे, मग व्हरंड्यात निजणे, सापडली वेळ की अनवाणी शेंडी उडवीत टेनीस ग्राउंडवर हुदडणे अगर काही क्रिकेटचे सामान सापडल्यास ते खराब करणे इ. इ. गोष्टींकडे नजर पुरवण्यास प्रोफेसरांस वेळ होत नसेल काय ?
काही असो, फर्ग्युसनवाल्यांस आपल्या सहाध्यायांचा अंत्यविधी पाहण्याची जणू चटच लागली आहे ! कुकनूरचे प्रेत डा. नायडूने दुसरीकडेच एकीकडच्या घरात ठेवून दिले होते. जवळ कोणीच नव्हते. सुमारे तासभर मी एकटाच त्या प्रेताजवळ बसलो होतो. नंतर सुमारे आठाचे सुमारास क्वार्टर्सची मंडळी आली. दहन होऊन घरी येण्यास १२।। वाजले. त्या निर्जीव सोबत्याशी माझा एकांतवास फारच उदासवाणा झाला. तो मरून चार तास झाले होते तरी त्याचे अंग हातास किंचीत गरम लागत होते. मी त्यास दोनदा शिवलो. व प्लेग डाक्टरने त्याची तपासणी केल्यावर जेव्हा आपले हात स्वच्छ एक प्रकारच्या साबणाने धुतलेले मी पाहिले तेव्हा मात्र माझ्या कृतीचा पश्चाताप झाला. घरी आल्यावर देखील मी जेवल्यानंतर काही वेळाने स्नान केले. कारण फार भूक लागली होती. मला फार घाम आला होता. तशात स्नान करणे मला बरे वाटले नाही.
ता. १० जून १८९८
आज वालुताईच्या३८ लग्नाकरिता आमचे वाड्यात जमखंडीचे व-हाड आले. सुमारे ३० पुरुष व ५।६ बायका आहेत. आम्हाला किंचित स्थानांतर करावे लागले. आठ एक दिवस आमच्या अभ्यासात व एकांतात व्यत्यय आहे. आमच्या स्वयंपाकाची व चि. सौ. जनाक्काची निजण्याचीही बरीच अडचण आहे.
ता. ११ जून १८९८ शनिवार
मालेत आज रा. खापर्डे३९ यांचे व्याख्यान झाले. प्राचीन व अर्वाचीन मताचे अखेर सिद्धान्त (ईश्वरवाद इ.) कशी जुळतात हे दाखवले. व प्राचीन मतांची महती सांगितली. प्राचीन समाधीविसर्जनाचे वेळी intuitively जो सिद्धान्त सहज काढीत असत तेच सिद्धान्त अर्वाचीन युगाची युगे खर्चून induction चे योगाने काढितात वगैरे सांगितले. खापर्डे हे नवीन मताचे सुधारक असून यांच्यामध्ये आता बरीच Reaction निवृत्ती झाली आहे असे दिसले. आपण मुग्धावस्थेत या पाश्चात्य ज्ञानाने कसले दिपलो हेही प्रांजलपणे कबूल केले. परवाचे व्याख्याते रा. ब. मराठे यांचीही अशीच स्थिती दिसते. किंबहुना प्रथम प्रथमच्या तरुण सुधारकांची अशी स्थिती होणे काही अंशी स्वाभाविकच आहे, व काही अंशी अज्ञानाचे तर काही अंशी केवळ अल्लड उतावळेपणाचे कार्य आहे. पण विरुद्ध पक्ष ह्या निवृत्तीचा फाजील फायदा घेतात ह्याचेही मुख्य कारण सुधारकांचा नेभळेपणा व केव्हा केव्हा फाजील आत्मनिंदा हीच होत. नवीन विचारांचे कुलुलीत४० सुधारकांनी पारमार्थिक धर्माच्या बाबतीत काही चुका केल्या किंवा त्या केल्या असे त्यांनी कबूल केले म्हणून त्याचे खापर अैहिक समाजिक बाबतीत त्यांनी ज्या आवश्यक सुधारणा सुचवल्या आहेत त्यावर का फुटावे हे मात्र काही कळत नाही. यंदाच्या सर्व मालेचा रोख बहुतेक निवृत्त मार्गाकडेच दिसत आहे. पहिले व अर्थशास्त्रावरील दोन व्याख्यान वगळून बाकीची सर्व पाहिली, तर आमचे पूर्वीचेच चांगले असे प्रतिपादलेले दिसेल. आजपर्यंत जरी कधीही येथील श्रोतृमंडळाने आपले स्वरूप प्रकट केले नाही तरी न रुचणारा असा स्वतंत्र विचार बाहेर पडतो न पडतो तोच सभा आपले उग्र स्वरुप धारण करील ही भीतीही वर सांगितलेल्या मालेच्या रोखाचे कारण आहे असे वाटते. शिवाय त्या गोष्टीस सार्वजनीक सभेत हल्ली झालेले स्थित्यंतर हेही जबर कारण आहे. एकंदर आमच्यात स्वतंत्र विचार मुळी कमी व असलाच जर काही तर तो पुण्याच्या लोकापुढे उघडपणे येण्याचा संभव मुळीच नाही.
पांघारकर व ताटके कोणी हायस्कुलातला विद्यार्थी यांची भाषणे मला फार आवडली.४१ पण एकंदरीत मला मालेचा तिटकारा आला आहे. तोंडाची वाफ दवडण्यापलीकडे या मालांनी काही होईल असे मला वाटत नाही. नवीन शास्त्रीय शोध सांगून बहुसमाजाचे ज्ञानात भर घालावी. विनाकारण आत्मस्तुती पुरे.