१६-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. १ सोमवार आगष्ट स. १८९८
उद्या श्रावणीसंबंधी सुट्टी होती म्हणून गोविंदराव डेक्कनमधून संध्याकाळी आमचेकडे आले. दर शनिवारी येऊन रविवारी जात असतात. दर शनिवारची रात्र बोलण्याखालीच बहुतेक जावयाची. पण लवकर निजावयाचा आज अगदी निश्चय करून १० वाजता दोघेही निजलो. हळूच गोविंदरावानी आपल्या प्रकृतीसंबंधाने बोलणे काढले. ते शेवटी इतके वाढले की सकाळी ४।। वाजता आम्ही झोपी गेलो. भाषणाचे बहारात दोघाचे जागरणाचे काहीच वाटले नाही !
ह्या रात्रीचा मला कधीही विसर पडणार नाही. कदाचीत असा एक दिवस येईल की त्या दिवशी आजचा गोड भाषण प्रसंग पूर्ण रितीने फलद्रूप होऊन त्यापुढे आजच्या रात्रीची आठवण होऊन माझे अंगावर आनंदाचे रोमांच सतत४२...
ता. ३१ मार्च १८९९ शुक्रवार
रा. गोविंदरावकडून पुण्याहून पत्र आले की त्यास सुट्टी झाली म्हणून. मी, जनाक्का व गोविंदराव मेच्या सुट्टीत काही दिवस पन्हाळ्यास जाण्याचे पूर्वीच ठरले होते. गोविंदरावाबरोबर बहुत करून जनाक्का येईलच असे समजून मी आज दोन प्रहरी जमखंडीहून निघालो. तेरदाळपर्यंत गाडी ठरवली.
ता. ३ सोमवार एप्रिल १८९९    
आमचे बरोबर विष्णू तू येशील म्हणून आजपर्यंत तेरदाळास राहिलो. शेवटी तुला बरोबर नेण्या(ची) परवानगी मीच स्वतः तुझे वडिलास विचारणेचे धाडस केले आणि खात्रीपूर्वक निराशा करून घेतली. कष्टी होऊन सकाळी कुडचीस निघालो. कुडचीस पत्रावरून कळले की गोविंदराव एकटेच शिरोळ क्वारंटाइनात आले. जनाबाई आली नाही, हे पाहून फार वाईट वाटले. शिवाय मला कुडचीवर अगर मिरजेवर शिरोळचे तिकीटच मिळेना. संध्याकाळी मिरजेस गेलो व क्वारंटाइनात निजलो.
ता. ४ सोमवार एप्रिल १८९९
सुमारे तीन वाजता मिरज क्वारंटाईनात माझा शोध करीत गोविंदरावाकडून शिरोळाहून भिवा गडी आला. मला फार आनंद झाला. लगेच त्याजवर माझा बोजा देऊन मी शिरोळास पायवाटेने अंकलीवरून निघालो. ७ वाजता सायंकाळी शिरोळास पोचलो. दादासाहेब व रखमाबाई केळवकर४४ माझी वाट पाहून परवा दिवशी गेली होती. मागे कुमारी कृष्णाबाई, यमुनाबाई व अहल्या ह्या क्वारंटाइनात होत्या. मला गोविंदरावांनी डाक्टर धनवडे ह्यांचे बंगल्यात जेथे कुमारिका राहत होत्या तेथेच नेले. लवकरच अहल्येने चहा व थोडेसे उपाहाराचे पुढे ठेविले. नंतर जनाबाईला आणण्याविषयी कृष्णाबाईसी थोडा वेळ बोलणे झाले. कुमारींच्या आदराने मी फार उपकृत झालो. मदरकडे जनाबाईस पाठविण्यासंबंधी स्वतः कृष्णाबाईनीच एक मसुदा करून दिला. ही बहुतेक सारी रात्र अंतस्थ विचारांत, कल्पनांत गेली. ह्दय किती विकारकलुषीत झाले !!
ता. ५ एप्रिल १८९९
गोविंदराव व तिघी कुमारिका सकाळी कोल्हापुरास गेल्या. बंगल्यात मला करमेचना. सकाळच्या देखाव्याने चित्त फार व्यग्र झाले.
ता. ७
विष्णू, तुला एक अंतःस्थितीचे पत्र लिहिले.४५ चैन नाही.
ता. ८ शनिवार
जनाक्का पुण्याहून शिरोळपर्यंत एकटीच आली. माझ्या मनाची वृत्तीच पालटली. आजचा दिवस बोलण्यातच गेला. बोर्डींगच्या अन्नाचा कंटाळा आल्यामुळे जनाक्कास अन्नच जाईना. तिला शक्तिही फार कमी होती. वाईट वाटले.