११-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. ४ बुधवार मे स.....
संध्याकाळी रा. माधव हुल्याळ यांच्याशी त्यांच्या गृह (संबंधी) सुमारे तास दीड तास भाषण झाले. हुल्याळांनी आपल्या गृहस्थितीसंबंधी व आपल्या कुटुंबाच्या सर्व माणसासंबंधी आपली फारच स्तुती व पूज्यभाव प्रकट केला. विशेषकरून आज्याची, आईची व सास-याची अतीशयच स्तुती केली. "My grand father was an able, influential and economical man. My mother a model of womanly virtues. I am fortunate that I am born of such parents ! In that notorious neighbourhood of Hulyalkars our house a temple ! Oh the religion of my mother. Her excellent frugality and management of the household. She is a living Lakshmi indeed in our house!! I owe much to my home education and the influence of my mother on me. My father-in-law a truly generous man” असले कित्येक त्यांनी मोठ्या कळकळीने उद्गार काढिले. पण कुलकर्णी करकंबकर व पांडाच... याजकडून मला जे कळले आहे त्याच्याशी (ह्या) उद्गारांची कशी संगती जुळवावी हे मोठे कोडे आहे. हे कोडे कसेही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी कोणत्यातरी पक्षास (दोन्ही पक्ष माझे मित्रच) घाणेरडा कलंक लागणार ! म्हणून मी हे कोडे येथेच या पानाखाली पुरून टाकितो. मनाची खंबीर समजूत असल्याविना कोणीही हे कोडे सोडवण्याचे धाडस करू नये.
ता. ११ मे १८९८ बुधवार संध्याकाळ
जीवलगा विष्णू३० - माझी विधुरावस्था३१ मला कोण खडतर ताप देत आहे. अविवाहीत राहण्याचा माझा विचार तर ह्या तुफानात फुटून तुकडे तुकडे होतो. किती दिवस तरी ही अवस्था मला जाळीत आहे म्हणतोस ! प्रेमाचा पहिला अंकूर माझ्या काळजात उद्भवल्यापासून तो (जिच्यावर माझ्या पत्नीत्वाचा केवळ आळ आला होता) तिने त्याचा खुजट रोपा उपटून टाकेपर्यंत माझ्या उरात प्रेमाच्या पिकाऐवजी भावी सुखाच्या कल्पनेचे नुसते गवतच वाढत होते ! आणि जेव्हा तो रोपा व त्याचेबरोबर ते सारे गवतही पार जळून खाक झाले तेव्हापासून तर माझे अंतःकरण, वणव्याने जळलेल्या कुरणाप्रमाणे रणरणत आहे. ही आतील आग माझ्यात काय चमत्कार घडवीत आहे बघ ! माझ्या पूर्वीच्या महत्त्वाकांक्षी परार्थपरतेला हल्ली हळू हळू आळशी स्वार्थपरता हुसकून देत आहे.  नैसर्गिक उत्साहाचा नकळत -हास होत आहे. माझ्या सणसणीत अज्ञेयात नेभळा दैववाद डोकावीत आहे ! एका बाजूस माझ्या उच्च नीतीच्या कल्पना व मानसिक विचार व दुस-या बाजूस पाशवी राक्षसी वासना यांचे केव्हा केव्हा घनघोर घर्षण होते ! ह्या चित्-जड द्वंदाची कटकट नाही असे सुखी क्षण मला फार थोडे मिळू लागले आहेत. धन्य ते की ज्यांत नेहमी ह्यांचा Stable equilibrium असतो. त्यांच्या unstable equilibrium चेच मला जे एक दोन क्षण मिळतात ते अनुपम (सुख) देतात ! केव्हा केव्हा अतृप्त वासनेचा प्रकोप इतका होतो की माझी अंगे तापतात किंचित ज्वर आल्याचा भास होतो. आता तशीच स्थिती झाली होती म्हणून बागेतून नुकतीच उमललेली व पाण्याने थबथबलेली ओंजळभर चमेलीची फुले आणून उघड्या उरावर ठेऊन दिली व घटकाभर उताणा पडलो. खरोखर ऊर गार झाले. व संस्कृत कवींनी वर्णलेल्या उपायाची प्रचीती पटून थोडा शरमलो, अथवा रमलोही म्हणावयाचा.
अरे पण माझे हे हाल, तर कुलीन विधवांचे काय होत असेल !! सुखाची त्यांची पूर्ण निराशा झाली असेल तर होता होईल तो लवकर त्यांचा खून करणे हे कायदेशीर, नीतीचे, सोईचे, पुण्याचे व सनातन धर्माचे कृत्य आहे हे शपथेवर सांगतो. सती जाण्याची चाल बंद केली हा बेंटिंकने मोठा अधमपणा केला असे अशा विधवांनी का म्हणू नये ?!!!
ता. १५ रविवार मे १८९८
आज ५।। वाजता संध्याकाळी येथील वसंत मालेचे १ ले व्याख्यान रा विष्णु वामन मोडक३२ यांनी इंग्रेजीत  The Vanishing Century `संपणारे शतक यावर दिले. वक्तृत्वाचे बाबतीत मोडकाने प्रो. गोखल्यावरही ताण केली. इतिहास बराच वाचला आहे. विचाराच्या नवेपणात अगर खोलीत काही विशेष दिसत नाही. प्रसाद, माधुर्य व ओजस व विनोद हे पुरेसे आहेत. आवाज मात्र कोता हावभाव सुरेख. अभ्यास करील तर हिंदुस्थानात उत्तम वक्ता होईल.