१५-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. १२ जून १८९८ रविवार
सकाळी ९ वाजता वालुताईचे लग्न लागले. समारंभ मोठा कडाक्याचा होईल असे वाटले होते, पण तसे झाले नाही. वराकडचे लोक कंजूष दिसतात.
रा. सास्नेशी काही भाषण झाले त्याबद्दल फार वाईट वाटते. ब-याच वेळा आमचे भाषण रागाचे होऊन गोष्ट विकोपास जाते. मी लवकर चिडतो व त्यांची काही बाबतीत कायमची मते ठरल्याने ती केव्हा कशी लावावीत याचा नीट विचार करीत नाहीत व आपल्या मताचा व भाषेचा वेग मुळीच कमी करती नाहीत. ह्यामुळे त्यांचा केव्हा केव्हा सहवास फार त्रासदायक होतो. He is not as good a companion as a friend.
ता. १९ जुलै सन १८९८ मंगळवार
आज बरेच दिवस लिहिले नाही. ता. २५ जूनपासून माझ्या प्रकृतीत एकदम फरक झाला. सकाळी भयंकर क्षीणता भासू लागली. तेव्हापासून आतापर्यंतही कंबर दुखत आहे. न कळत शक्तिपात होऊ लागलला. मी फारच भिऊन गेलो, कारण काही कळेना. ता. २६ रोजी जबर स्वप्नावस्था झाली. फार क्षीण झालो. क्षय झाल्यासारखे वाटू लागले. सुमारे ७ दिवस म्युनिसिपल दवाखान्यातले औषध घेतले. हाळीवाची खीर घेतली. सुमारे पावशेर हाळीव खपविले ! संध्याकाळी ६ चे आत जेवण आटपू लागलो. डाक्टराने दिवसा नुसते चांगले जेवण जेवण्यास सांगितले होते. म्हणून रोज पुरणाचे जेवण होत असे. होता होईल तो लक्ष वाईट गोष्टीकडे न जाईल असा प्रयत्न करी. एकंदरीत हा माझ्या विधुरावस्थेचा परिणाम. अभ्यासाकडे अद्यापी नीट लक्ष लागत नाही. लागले तर लवकर शीण येतो. माझी मला अतिशय लाज व खंती वाटू लागली. ही स्थिती मी माझे मित्रास कळविली. तेणेकरून मनावरचे ओझे कमी होई. अगोदर हा आजार मला फार भयंकर वाटू लागला. मी फार रडलो होतो म्हणून कळसकर मला फारच विचारू लागले. पुष्कळदा डाक्तर च्छत्रे याजकडे जावेसे वाटले पण त्यास पैसे देण्यापेक्षा चांगले अन्न खावे आणि फार सावधपणे राहवे असाच निश्चय चालविला. ६।।७ वाजल्यावर जेवून फिरायला जाई. आता जरा प्रकृती बरी आहे. चित्तास थोडी शांती मिळत असते. लवकरच अगदी बरा होऊन झपाट्याने अभ्यास करू लागेन असे वाटते. पुस्तकाचा (परीक्षेच्या) मला आताप्रमाणे कधीच तिटकारा आला नसेल. पण इलाज नाही. माझ्या प्रेमाची अशी खडतर निराशा झाली नसती तर अशी दैन्यावस्था झाली नसती. अद्यापीही थोडक्याच दिवसात (वर्षात) माझ्या अमोघ प्रेमाचे चीज करणारी कोणी जन्ममैत्रीण न भेटल्यास मी फार दिवस टिकत नाहीसे मला वाटू लागले आहे. आणि जरी भेटल्यासही मागे झालेला त्रास व तोटा कितपत भरून येईल याची शंका आहे. यापेक्षा मी अनीतीचा मार्ग स्वीकारला असता तर अधिक सुखी झालो असतो काय ? च्छे माझ्या शरीरयातनापेक्षा मनाच्या यातना कष्टतर झाल्या असत्या.
ता. ३० शनिवार माहे जुलै १८९८
रा. दौलतराव विचारे हे आमच्या येथे येऊन १५ पंधरा दिवस होत आले. ते आज गेले. त्यांनी आमच्या भिडस्तपणाचा वाजवीपेक्षा अधिक फायदा घेतला. काही अंशी त्यांचाही नाइलाज झाला. एक दोन दिवसात काम आटपेल म्हणून आमच्याकडे जेवले. पण आठ दिवसांनीही ते आटपले नाही म्हणून मग दुसरीकडे जाणेही त्यास बरोबर वाटेना, कारण शेवटी जाताना काही तरी आम्हास द्यावे असे त्यांचे मनात होते. जाताना ते दोन २ रुपये देऊ लागले. असे करणे व्यवहाराला बिलकुल शोभत नाही अशी त्यांची समजूत घालून मी ते नाकारले.
ता. ३१ जुलै १८९८
आता दर रविवारी प्रार्थनासमाजास सकाळी प्रार्थनेला जाण्याची कायमची सवय लागली आहे, असे म्हणावयाला काही हरकत नाही. किंबहुना चटकच लागली आहे. गेले ५।६ रविवार मी नियमाने व मोठ्या आवडीने जात आहे. जनाक्काचा भाव तर अगदी दृढ बसला आहे. प्रार्थनेत ती तल्लीन होते. आज तर ती परमानंदाने डुलत होती. माझेही लक्ष ते दोन तास धार्मिक विचारातच गुरफटले (ले) असते. गीते म्हणत असता व प्रार्थना ऐकत असता ब-याच वेळा मी श्रद्धाळू होतो. शुद्ध भावाने उपासना करणा-यास पाहून मला फार आनंद होतो. एकंदर त्या जागेत त्यावेळी माझी भावना काही विलक्षणच होते. कल्पना शक्ती व उच्च मनोवृत्ती ह्या जोराने उचंबळतात. इतर बाबतीप्रमाणे धर्मबाबतीतही केवळ बुद्धीच्या जोरावरच विचारण्याचा माझा पूर्वीचा आग्रह थोडा ढिला पडत चालला आहे व त्यासरशी श्रद्धा बळावत आहे. पण ह्या धांदलीत मनाची शांतता वाढत आहे ! जनाक्काची श्रद्धा बळावत आहे. जनाक्काची श्रद्धा, आनंद, अनन्यभाव पाहून मला अमोघ आनंद होत आहे. ता. २९ मे पासून ती काय ते दोनदाच गेली नाही. तेही विटाळशी होती म्हणून. प्रथम जेव्हा गेली नाही ते दिवशी रात्री निजली असता `सकळ मनुज मंदिरात भाव धरुनी या हो` असा भक्त मंडळीने तिचे कानांत टाहो फोडल्याचा तिला भास झाला व ती खडबडून उठली. तेव्हापासूनच समाजात तिचे मन जडले. जणू देवाने तिला हात धरून नेले. काय ती भाग्यवान. पापाचा लेशही तिला आता शिवणार नाही. पण अद्यापी आम्ही समाजाचे सभासद झालो नाही आणि ते कसे व्हावे तेही माहीत नाही.
संध्याकाळी डेक्कनला गेलो होतो. येताना तेथून जमखंडीकराचे वाड्यात एक तासात आलो. मिस् तर्खडकरच्या स्मरणार्थ बांधलेल्या टेकडीवरच्या सांबाच्या देवळाला पाय-या आहेत. तेथे रा. सास्नेच्या घड्याळात ७ वाजून ३२ मिनिटे झाली होती. जलद निघालो. घरी आलो तेव्हा आठ वाजून २५ पंचवीस मिनिटे झाली होती.