१२-फर्ग्युसनमधील रोजनिशी

२२ मे १८९८
आज आमच्या बि-हाडी बारामतीचे रा.रा. कळसकर,३३ तेथील महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे स्थापक आले आहेत. त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग ऐकतच होतो. ह्यांचे स्वतः भाषण ऐकून तर ह्यांनी म्हार मांग ह्या अतिनीच जातीची किती किती कळकळ दाखविली, त्यांनी काय काय केले पण आणखी किती तरी करण्यासारखे आहे हे सर्व मनात येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाटली व तिटकारा आला.
प्रार्थनासमाज
ता. २९ रविवार मे १८९८
आज सकाळी ८ आठ वाजता रा. कळसकर, हुल्याळ व मी हे प्रार्थनासमाजातली उपासना पाहावयास गेलो होतो. पुण्यातील मंदिरातील उपासना मी आजच प्रथम पाहिली. गेल्या डिसेंबरात मुंबईतील देवळातील ढंग पाहून मला मुळीच बरे वाटले नाही. पूज्यभाव दूर राहून समाजाविषयी तेव्हापासून माझा किंचित दुराग्रह झाला होता. समाजाचे उद्देश, भाषण व मेंबराची कृती अथवा वागणूक यांमधील विरोध पाहून तर मला अद्यापही चीड येते आहे. समाजात कसल्याही प्रकारे जातिभेद असता कामा नये असे असता इतर सुधारकांत व समाजात मला काही भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.
मंदिरातील उपासना पाहून माझ्या मनात मोठा पूज्यभाव उत्पन्न झाला ह्याचे एक कारण हे की मुंबईतल्यापेक्षा हे मंदीर फारच साधे आहे. दुसरे कारण हे की मुंबईतले माझे जाणे पहिलेच असल्याकारणाने तेथल्या उपासनेत ख्रिस्ती चर्चमधल्या प्रेअरची हुबेहुब नक्कल उतरलेली दिसली. माझ्यासारख्या गावढळास जर नव्याने दीक्षा घ्यावयाची असली तर माझी खात्री आहे की तो मुंबईच्या रंगमहालात कधीच दीक्षा घेणार नाही. किंबहुना ह्या नख-याचा त्याला तिटकारा येऊन आपल्या जुलमी पण साध्या अशा रूढ हिंदू धर्मातच खुशीने राहील. पण असल्या गावढळांचीच बहुसंख्या आणि त्यांना आपल्यात घेतल्याशिवाय समाजाचा खरा प्रसार कधी होणार नाही. उपासनेचे चालक रावबहादूर का. बा. मराठे,३४ सातारचे सबजज् ह्यांची प्रार्थना व व्याख्यान ह्यांनी माझे मन फारच वेधले. ह्यावेळी माझे मन श्रेद्धेने मृदू धर्माचे निर्मळ व उज्जवल स्वरूप दिसले. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याची मराठे ह्यांनी चित्तवेधक रीतीने फोड केली. चि. सौ. जनाबाई ही आपल्या मैत्रिणीबरोबर आली होती. तिलाही उपासना फार आवडली, तिला दर रविवारी जावे असे वाटते आहे. मीही जाईन. रा. हुल्याळ ह्यास हा प्रकार पसंत पडला नाही असे ते म्हणाले. नंतर दोन प्रहरी ह्या विषयी बरेच भाषण झाले.
पुणे वसंत व्याख्यानमाला
ता. ३० सोमवार मे १८९८
यंदा मालेची फार दैना दिसत आहे. दुष्काळ व प्लेग यामुळे फुले का महाग व्हावीत हे कळत नाही. पण `वरजाती` पुष्पे मिळाली नाहीत म्हणून कण्हेरीची व बाभळीचीही फुले मालाकारांनी ओवण्याचा सपाटा चालविला आहे. यावरून एक नुसती लांबलचक माळ तयार झाली की काम आटपले असे यांना वाटते असे दिसते.
पुण्यास जर आपण विद्वतेचे आगर आहे अशी खरी प्रौढी मिरवायची असेल तर असल्या प्रसंगी त्याने आपली जबाबदारी यापेक्षा फारच चांगल्या रीतीने जाणिली पाहिजे. उठल्या सुटल्याने लेक्चर दिल्याने महाराष्ट्राची किंबहुना हिंदुस्थानाची अब्रू जाणार आहे. माझ्या मते असल्या मालेच्याद्वारे काही ख-या विद्येचे विलास लोकांपुढे आले पाहिजेत. नुसते वक्तृत्व पाजळणे किंवा शाळेच्या चार पोरांकडून टाळ्या घेणे, किंवा सर्वांस माहीत असलेल्याच चालू चळवळीचे पाणचट चर्वितचर्वण करणे वगैरेकरिता ही माला नव्हे. महाराष्ट्रातल्या चार विद्वान डोक्यात ज्या काही विचारांची वर्षभर घालमेल होत असले ती सर्व ह्या मालेच्या रूपाने लोकांपुढे आली पाहिजे. म्हणजे माला ही ह्या अंतस्थ उलाढालीचे कार्य झाले पाहिजे. असे न होता ह्या मालेची संस्थाच ही सुरू होण्यापूर्वी फार झाले तर महिनाभर काही महत्त्वाकांक्षी व अधिक प्रसंगी तरुणांच्या डोक्यात आपण काय बोलावे व कसे बोलावे ई. विषयीचे विचाराचे काहूर उठविण्यास कारण होते. लोकांपुढे काही महत्त्वाच्या गोष्टी यावयाच्या असतात म्हणून माला होते असे नाही तर मालासंप्रदाय आहे म्हणून काही तरी शिळोप्याच्या गप्पा होतात. आमच्या व्याख्यानमाला व आमचे विवाह ह्यांत बरेच साम्य आहे. विवाह झाला म्हणून जोडप्यास एकमेकांवर प्रीती करणे भाग आहे. प्रीती असते म्हणून विवाह होत नसतो.
आजपर्यंत सुमारे १२ व्याख्याने झाली. पण त्यात फार तर २।४ च नावाला योग्य झाली. कोणी थट्टेखोरांनी सारी जर छापून काढली तर त्यांची खरी योग्यता कळेल. व्याख्यानाची वेळ ५।। p.m. असता २।३ खेरीज करून बाकीची ६।। (ला) सुरू झाली. व्याख्यानाची जागा भर वस्तीत आहे म्हणून बरे आहे.३५ नाहीतर पूर्वीप्रमाणे हिराबागेत असती तर श्रोते कोणी न आल्यामुळे व्याख्यात्याला सहजच पर्वतीचे दर्शन घेऊन यायला सापडले असते. असो. ह्यापुढे काही चांगले व्याख्याते व विषय येतील अशी आशा आहे. परवा एका व्याख्यात्याने असे शेवटी सांगितले, की माझे व्याख्यान लहान मुलांकरिता आहे. पण ह्या अर्भकांच्या कनवाळूने एखाद्या शाळेत आपले गु-हाळ लावायाचे होते. व्याख्यानमाला व क्रमिक पुस्तके यांत जोपर्यंत अंतर आहे तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या वालीने मालेपासून दूर असावे व मालेचा एकादा विषय दुर्बोध असेल तर मुलांनीही आपण तितका वेळ खेळण्यात खर्चलेला बरा !