वत्सला साहित्य प्रकाशन मालेचे ''माझ्या आठवणी व अनुभव'' हें सहावें पुस्तक आम्ही आज वाचकांस सादर करीत आहोंत. मौलिक लिखाण, माफक किंमत व मोहक छपाई या मालेच्या ध्येयाला हेंही पुस्तक ओतप्रोत उतरलें असल्याचा वेगळा निर्वाळा देण्याचें कांहीं प्रयोजन नाहीं.
मराठमोठा या प्रासंगिक पुस्तकास प्रस्तावना देतांना गुरुवर्य शिन्दे यांनीं जो बहुमोल उपदेश केला त्याचेंच 'माला' हें दृश्यफल होय. चटोर वाङ्मयामुळें भारदस्त वाङ्मयाची गळचेपी झाली आहे आणि म्हणूनच मोहक छपाईत व माफक किंमतींत भारदस्त वाङ्मय प्रकाशित करणारी संस्था निघाली पाहिजे, असा त्यांनीं पटवून दिलेला उपदेश, ध्येय म्हणून पुढें ठेवून आम्हीं त्वरीत मालेच्या कार्यास सुरुवात केली. मालेनें पहिल्या वर्षी जीं चार पुस्तकें प्रकाशित केलीं ती सर्व तंतोतंत याच ध्येयाप्रमाणें निघाली असल्याचें ग्राहकांच्या निदर्शनास आलें असेलच.
याच सुमारास गु. शिन्दे यांनीं स्वतः लिहिलेल्या चरित्राबद्दलची गुणगुण आम्हांस लागली. बृहन्महाराष्ट्रास आपल्या कर्तृत्वानें, स्वभावानें व वाणीनें प्रिय झालेल्या गुरुवर्यांसारख्या विभूतीचें चरित्र प्रकाशित करण्याचा मान मालेला मिळावा म्हणून आम्हीं लगेच त्या लिखणाची मागणी केली. आमचे उभयतांचे पूर्वसंबंध पितापुत्रवत् प्रेमानें निगडित झाल्यानें अर्थातच आमची इच्छा ताबडतोब पूर्ण झाली. या कामीं आम्हाला आमचे गुरुबंधु श्री. रविंन्द्र शिन्दे यांची फारच मदत लाभली. किंबहुना त्यांच्या मदतीविना हें पुस्तक प्रसिध्दच झालें नसतें. त्यांनीच हें लिखाण उजेडांत आणून त्यांत अण्णासाहेबांकडून बरीचशी भर घालवून पूर्ण स्वरुपांत आम्हांला दिलें. चरित्रासारखी महत्त्वाची बाब मजसारख्या अननुभवी प्रकाशकाचें स्वाधीन केल्याबद्दल व लिखाण पूर्ण करून दिल्याबद्दल अनुक्रमें पितापुत्रांचें आम्ही मनस्वी आभारी आहोंत.
साध्या व सोप्या भाषेंत अगदीं लहानपणापासूनचच्या बारीकसारीक गोड आठवणी गुरुवर्यांनीं दिल्या आहेत. त्यांत अर्थातच कसल्याही प्रकारचा आडपडदा नाहीं. सोपी वाक्यरचना, सखोल अर्थपूर्ण योग्य शब्द आणि मार्मिक विनोद यामुळें लिखाण वाचनीय झालें आहे.
तथापि दुर्दम शारीरिक परिस्थितींत सध्या गुरुवर्य असल्यानें, नोकरीमुळें रविंद्र यांना पुणें सोडावें लागल्यानें व बी.टी.च्या अभ्यासास्तव आम्हासही कोल्हापुरास जाणें भाग पडल्यानें आम्हां तिघांपैकीं एकासही संपूर्णतेनें मुद्रितें पहातां आलीं नाहींत. या व अशा अनेक कारणांमुळें मजकुराच्या प्रकरणांचा विस्कळीतपणा फारच राहिला आहे आणि नजरचुकीनें महत्त्वाची अशुध्देंही उरलीं आहेत म्हणून वाचकांनीं कृपा करून शुध्दीपत्रक अवश्य पाहावें अशी आमची त्यांना नम्र विनंति आहे. मुद्रणदोष, वाक्यदोष, सुसंगतपणाचा अभाव, अपूर्णता वगैरे दोघांबद्दल अर्थातच आम्ही कारणीभूत आहोंत. त्याबद्दल गुरुवर्यांना दोष देणें म्हणजे उपरिनिर्दिष्ट परिस्थिति नजरेआड करणें होय. बृहन्महाराष्ट्रांतील लहानथोरांनीं या कृतीचें भरपूर स्वागत केलें तरच या पुस्तकांचा महत्त्वाचा उत्तरार्ध — गुरुवर्यांच्या सार्वजनिक जीवनकार्याचा वृत्तांत वाचकांपुढें सादर करण्यास आम्हांस उत्साह नि हुरूप येणार आहे. गुरुवर्यांच्या चहात्यांनीं आम्हांस या कामीं सहानुभूति व मदत करावी अशी विनंति आहे.
प्रस्तुत पुस्तकाचीं मुद्रितें श्री. मा. र. कारले, शिक्षक श्रीशिवाजी मराठा हायस्कूल, पुणें यांनीं तपासून दिलीं आहेत. श्री. कारले यांच्यामागें कामाचा व्याप मोठा असतांना देखील आमचें काम झटपट करून दिलें व तसेंच माझे मित्र श्री. शंकरराव पंडीत यांनीं हें पुस्तक पूर्ण होण्याचें कामीं बरीच मदत केली. याबद्दल आम्ही ह्या दोघांचें आभारी आहोंत.
मालेच्या ग्राहकांनीं पूर्ववत् आपुलकीच्या भावनेनें कार्याविषयीं सहानुभूति दाखवावी व आर्थिक साहाय्य करावें अशी आशा प्रगट करून तूर्त रजा घेतों.
वाचकांचा नम्र,
जयवन्त बाबुराव जगताप.
१२४८ शुक्रवार पेठ,
पुणें शहर.
श्रावण वद्य ७ शके १८६२.