प्रकरण १३ वें
जमखंडी गांव हा खेडेवजा आणि इंग्रजी शाळा नुकतीच झालेली. तेथें अलिकडच्या हायस्कूलाप्रमाणें क्रीडांगणें, व्यायामाचे निरनिराळे प्रकार, ड्रिलमास्तर हे कोठून यावयालाॽ आम्ही आपल्याच मनानें कोठेंतरी गांवाबाहेर जाऊन खेळून येत असूं.
सोंगट्यांचा खेळ
अगदीं प्रथम माझा वडील भाऊ असतांना आमच्या घरीं बैठा खेळ म्हणजे सोंगट्यांचा. गंजिफा, बुद्धिबळें, सोंगट्यांचे हस्तिदंती फासे वगैरे खेळांची सर्व साधनें आमच्या बाबांनीं घरीं करून ठेविली होती. पण ते स्वतः कधीं खेळतांना आम्ही पाहिलें नाहीं. हें सामान मात्र भरपूर घरीं होतें. हा एक बाबांचा, रसिकपणाचा मासलाच म्हणावयाचा. दिवाळीच्या सणांत तर आमच्या घरी सोंगट्यांची मजलसच भरे. नरकचतुर्दशीच्या आदले रात्रीं पासून तो भाऊबिजेची रात्र उजाडेपर्यंत कवड्यांचा खळखळाट अष्टौप्रहर चालत असे. हा खेळ मोठ्या ईरेचा. मनुष्य कितीहि शांत असला तरी तो चिडून भांडल्याशिवाय ह्या खेळाची समाप्ति म्हणून व्हावयाची नाहींच. एका एका बाजूला दहा-दहा बारा-बारा गडी बसलेले, संध्याकाळी सुरू होऊन उजाडेपर्यंत आम्ही खेळांत गढून जात असूं. भांडण केव्हां केव्हां हातघाईवरहि यावयाचें.
एक मल्लयुद्ध
माझा स्वभाव विशेष तापट असे. एकदा आलगूरचे आमचे मामा ( हे वयानें माझ्या वडील भावाहून फार तर १।२ वर्षांनीं मोठे असतील) एकीकडे आणि मी व माझा भाऊ एकीकडे असें सोंगट्या खेळत होतों. मामा फार विनोदी, रडी खेळणारे, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारे अगदीं पहिल्या नंबरचे. खेळ बाजूसच राहून आमचें भांडण जुंपलें. शब्दयुद्ध संपून मल्लयुद्ध सुरूं झालें. मामा म्हणजे पट्टीचा पहिलवान! आम्ही दोघेच काय, दहा असलो तरी ते दाद कसची देतात. दुस-याला चिडवून स्वतः कधींच चिडत नसत. हे पाहून तर आम्ही अधिकच चिडूं. शेवटीं प्रकरण अगदीं निकरावर जाऊन स्वयंपाक घरांतून आईला आमचेकडे यावें लागलें. गलीव्हरच्या अंगावर लिलिपुटाप्रमाणें आम्ही दोघे बंधु मामांच्या पाठीवर चढून लाथा व बुक्यांचा मारा चालविला आहे. तो खालीं तसाच वाकून हांसत आम्हांला अधिकच खिजवीत आहे. हा प्रकार पाहून आई म्हणाली, ‘अरे हा कसला नवीनच डाव आज काढला आहे रे!’ तीही आपल्या भावाचें पाठबळ न घेता आमचीच बाजू घेऊन मामाला म्हणे, ‘तूं मोठा असून तुला कळत नाहीं काय रे, लहान मुलांशीं असले प्रसंग करायलाॽ’ खरे पाहातां चूक आम्हांकडेच असावयाची. पुढें मी हायस्कुलांत गेल्यावर अगदीं मॅट्रिक होईपर्यंत आमचे घरीं ह्या खेळाचा अड्डाच जमत असे.
पटाईत वृत्ति
दिपवाळी आली कीं माझ्या अभ्यासाच्या खोलीला चुना, रंग वगैरे मी स्वतः व माझे सोबती लावीत असूं. वर छत, झालर आणि रोषनाई आमच्या ऐपतीप्रमाणें करीत असूं. दुस-यांच्या घरींही असे अड्डे होत, तेव्हां अरसपरस जावें यावें लागे. रात्रीं किती भांडणें झालीं, बोलाचाली केली, तरी उजाडल्यावर रात्रीचा प्रकार जणूं काय स्वप्नांत झाल्याप्रमाणें आम्ही सर्वच विसरून जात असूं! सहाव्या सातव्या यत्तेंत असतांना, तेरदालचे विष्णु देशपांडे, रामु पाटील, अंतु हनगंडी, ममलीचे हणमंत कुलकर्णी, त्याचा भाऊ रामू शिवाय जमखंडीचे भिमु निवर्गी, व्यंकू कुलकर्णी, सीनु करकंबकर, रामु जासूद वगैरे १५।२० जण ह्या खेळांत जमूं. मी व तेरदालचे देशपांडे हे नेहमी विरुद्ध पक्षाला असूं. दोघेही सारखेच चिडखोर आणि हेकेखोर. खेळापेक्षां भांडणांतच वेळ आणि शक्ति जास्त खर्चत असूं. शेवटीं शेवटीं जुळवून कवड्या टाकण्याची पद्धत निघाली. व्यंकू कुलकर्णी म्हणजे प्रत्यक्ष शकुनीमामाच. कवड्या जुळवून वाटेल तो फासा हमखास टाकण्यांत त्याचा हातखंडा. त्याच्या खालोखाल मीही जुळवण्यास शिकलों. दहा, पंचवीस, सहा, बाराच काय पण साधे तीन आणि चार हेही आम्ही जुळवून नेमके पाडीत असूं. केव्हां केव्हां बाहेरचे लोक डाव पाहावयाला बसत असत. रंग बहारीचा चढे. पत्ते, गंजीफा फार क्वचित् खेळत असूं. बुद्धिबळाला तर हातच लावीत नसूं. तो गर्दीचा खेळ नव्हे. तितकी गंभीरताही आमच्यांत नव्हती.
‘किर्र’ खेळ
मैदानी खेळ आट्यापाट्या, हुतूतू, खो खो वगैरे खेळत असूं. शिवाय किर्र म्हणून एक खेळ विशेष चुरशीचा असे. यांत हारलेली बाजूचे गडी एकामागें एक कंबरेला धरून वाकून उभे राहात आणि विजयी बाजूचे गडी लांबून धांवत येऊन त्यांच्यावर स्वार होत. ते बराच वेळ बसले आणि भार सहन होईनासा झाला म्हणजे खालच्यापैकीं कोणी तरी “किर्र” म्हटलें कीं खालीं उतरून पुनः उडी घेत. पण जर कां वर बसलेल्यापैकीं एकाचा जमिनीला पाय लागला कीं त्यांच्यावर डाव येऊन त्यांच्या पक्षाला खाली वांकावें लागे. ब्राह्मणांचीं मुलें हा खेळ खेळावयाला किंचीत् कचरत असत.
सुरपारंब्या
झाडावरचा सूर हा खेळ फार मौजेचा वाटे. जमखंडी गांवाभोंवतीं डोंगराच्या दरींतून तळ्यांच्या कांठीं ब-याच रम्य आंबराया असत. तेथें सायंकाळच्या वेळीं निवांत असे. आमची वानरसेना हा खेळ खेळावयास एकादे विस्तीर्ण शाखेचें ठेंगणें आंब्याचें झाड गाठीत असे. सर्वांनीं झाडावर चढावयाचें. एकानें खालीं उतरून, एक दांडकें आपल्या उजव्या तंगडीखालून दूर फेंकावयाचें. ज्याच्यावर डाव आलेला असे तो तें आणीपर्यंत टाकणारा झाडावर चढे. तें दांडक ठरलेल्या कोंडाळ्यांत ठेवून डाव आलेला गडी झाडावरच्यांना शिवण्याचा प्रयत्न करी. त्याची नजर चुकवून कोणीतरी दांडक्यावर नेमकी उडी टाकून तें दांडकें पुनः पूर्वीप्रमाणें फेकून तो झाडावर चढे. कोणातरी एकाला शिवेपर्यंत त्याच्या वरचा डाव जात नसे. हा खेळ मुख्यतः गुराखी मुलांचा असे. ह्याला वडाचें झाड चांगलें. त्याच्या फांद्या लांबवर गेलेल्या, लाकूड चिवट असल्यानें मोडण्याची भीति नाहीं. आंब्याचें पोकळ झाड असतें. शिवाय आंब्याच्या मोसमांत आंबराईत राखण बसे. वडाला नेहमीं मुक्तद्वार. शिवाय पारंब्या खालीं लोंबत असल्यामुळें त्या धरून खालीं उड्या घेण्यास किंवा खालूनच उलटें झाडावर चढण्यास फार सोयीचें हेंच झाड. मात्र घरीं येईपर्यंत अंगावरचे कपडेच काय, पण कातडेंही जागजागीं फाटलेलें असल्यामुळें घरच्या मंडळीपासून फाटका आणि ओरखडलेला भाग लपवून ठेवण्यांत दुसरा एक खेळच खेळावा लागत असे. हात पाय मुरगळलेला, डोकीला खोंक पडलेली, पाठ खरचटलेली, शिरा ताणलेल्या व हाडें न् हाडें खिळेखिळीं झालेलीं - अशा स्थितींत घरीं आलेल्या गड्याला पुनः एक आठवडा तरी आंबराईच्या दिशेने पाहाण्याची सुद्धां इच्छा होते कशालाॽ पण दुस-या आठवड्यांत पुनः हीं माकडें झाडावर आहेतच तयार! जित्याची खोड मरे तोंपर्यंत जात नाहीं. पण आमची खोड मॅट्रिक झाल्यावर पार गेली. कॉलेजांत जाणें म्हणजे बालपणालाच नव्हे तर जन्मभूमीलाही मुकणें होय! जळो तें कॉलेज आणि मरोत ते प्रोफेसर!!
सुरपाट्या
सुरपाट्या हा तर अगदीं राजमान्य राष्ट्रीय खेळ. तो आम्हां खेडवळांचा क्रिकेटच. जमखंडीच्या पूर्वेस नंदिकेश्वराचें एक जुनें देऊळ आहे आणि वायव्येस सुमारें एक मैलावर अबुबकराचा दर्गा आहे. ह्या दोन ठिकाणच्या प्रशस्त पटांगणांत आमची टोळी सुरपाट्या खेळण्यास जात असे. एकदां जाण्याची घडी पडली म्हणजे तीन तीन महिने ती मोडत नसे. त्या आंगणांत खेळून खेळून पाटीचे आडवे आणि सुराचा एक लांब उभा असे खाचरच पडत. ह्या दोन जागा म्हणजे आमच्या वतनाच्या झाल्या होत्या. तेथें दुसरे कोणी फिरकावयाचें नाहीं. इंग्लंडमध्यें ज्याप्रमाणें ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा वचक व दबदबा असतो; तसें जमखंडीस आम्हा विद्यार्थ्यांच्या कळपांचें वजन असे. ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे. गांवचे लोक विशेषतः आमची शिक्षक मंडळी आमच्या खेळाचें कौतुक करीत असत. एकदां जमखंडीचे वृद्ध यजमान श्रीमंत अप्पासाहेबांनीं उन्हाळयांत साखरपाणी करून मोठ्या आवडीनें आम्हां विद्यार्थ्यांना आपल्या हातांनीं साखरपाण्याचे पेले पाजले!
आमचा कंपू
आमचा कंपू घेऊन मी दरसाल उन्हाळ्यांत आणि पावसाळ्यांत कोठेंतरी नदीच्या कांठीं किंवा डोंगरांच्या दरींत वनभोजनाला जात असे. आमच्यांत लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान सर्व जातींचे विद्यार्थी असत. जातीभेद कसला तो आमच्या गांवीही नव्हता. तसलीं सोवळीं पोरें आमच्या वा-यालाही उभीं राहत नसत. आणि आम्ही त्यांना आमच्यांत घेत नसूं. जनुभाऊ करंदीकर असल्या सोंवळ्याचा होता. तो आमच्यांत फारसा मिसळत नसे. आमचा सर्व कंपू नेहमीं आमच्या वाड्यांत रात्रंदिवस पडलेला असे. बाहेरच्या मोठ्या अंगणापासून आंत स्वयंपाकघर व देवघरापर्यंत ह्या टोळांचा धुडघूस चाले. मात्र बाबांला सर्व भीत. त्यांचेसमोर पुस्तकांत नाक खुपसून बसूं. ते बाहेर गेले कीं घेतला वाडा सर्व डोक्यावर अन् काय. माझ्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान अल्लड असत. त्याही आमच्या धांगडधिंग्यांत सामील होत. माझ्या आईला कोणीच भीत नसत. तिला सर्व आपलींच पिलें वाटत. तिला स्वतः वीस झालीं. ही बाहेरची वीस! कित्येक वेळां स्वयंपाक घरांतील खाण्याच्या पदार्थांवर हल्ला होई. आमच्या गरिबींतले शिळे तुकडे तेरदालचा विष्णु आणि जमखंडीचा सीनु ही श्रीमंतांचीं मुलें असूनही मिटक्या मारीत खात. मग आईला मायेचें भरतें कां येऊं नये! हे माझ्या भावी सामाजिक सुधारणेचे पाळण्यातले पाय बरें! भावी चारित्र्याचे नमुने पुस्तकांतील रेखीव धड्यांत अगर वर्गांतल्या निर्जीव बाकावर बनत नसून, ते आंगणांतल्या जिवंत धांगडधिंग्यांत आणि समानशील सवंगड्यांच्या धसमस्करीच्या जिव्हाळ्यांत जन्म पावत असतात.
चित्रकला नाद
आमचा सर्व वेळ अभ्यासांत, किंबहुना खेळांतच जाई असें नव्हे. नित्य कांहींतरी नवीन कल्पना निघे, आणि आम्ही सर्वच त्यांत रमत असूं. चित्र काढण्यांत आमच्यांतला रामू रानडे याचा हात चांगला चाले. आमच्या टोळीला लागला चित्रें काढण्याचा नाद! आमच्या सोप्यांत आणि तुळशीकट्यावरच्या भिंतीवर चमकावयाला लागली रामाची, मारुतीची, देवदेवींची चित्रें. तुळशीकट्यावरची भिंत चुन्याची होती. तिचेवर मी लाईफ साईज रामपंचायतन रंगीत काढलें होतें. तें बरींच वर्षें राहिलें होतें. घरांत आलेत्यांना तें दर्शनी भागीं असल्यामुळे दिसे. आतां आठवल्यावर मला त्याची लाज वाटते (कारण त्याच दर्जाची ती आमची कला होती!). पण त्या वेळीं मला त्या चित्राचा मोठा पोरकट गर्व वाटत होता. ह्यावरून मी लहानपणीं किंचित् बढाईखोर असेन असें वाटतें.
कारागिरी
दुस-यांदा एक वेळ गणेश चतुर्थी आली. आणि आमच्या टाळक्यानें घेतलें, गणपती प्रत्येकांनें स्वतः करावयाचा! मग चाललें हें माकडमंडळ जमखंडीच्या पूर्वेस २–२॥ मैलांवर एक डोंगर आहे, तेथून शाडू माती आणावयाला. बरीच शाडूं आणून जो तो चढाओढीनें गणपती करूं लागला. ‘विनायक प्रकुर्वाणो रचयामास वानरम्’ असाही प्रकार अर्थात पुष्कळांचा झाला. तरी प्रत्येकाला आपलीच कृति पसंत पडून आपापली पाठ आपणच थोपटून घेतली. खरें पाहातां रामू रानड्याचा गणपती मात्र त्यांतल्यात्यांत गणपतीसारखा दिसत होता. कांहीं असो. त्या गणेशचतुर्शीतं सर्वांनीं स्वकृत गणपतीचीच पूजा केली ही कांहीं थोडी गोष्ट नव्हे!
आमचे कारखाने
आणखी एकदां साबण करण्याची टूम निघाली. जो तो चुना आणि तेल ह्यांत हात घालून बसला. वड्या तयार केल्या पण त्या वाळेचनात! वाळल्या तर पुनः ओल्याच होईनात. कपड्याला लावूं गेलों तर कपडा फाटे पण डाग कांहीं जाईना. साबणाचे नवे डाग कपड्याला पडूं लागले. चहूंकडे छीथू झाली आणि आमच्या पियर्स सोप कंपनीचें दिवाळें निघालें. ह्याचप्रमाणें शिसपेन्सिली, दगडीपेना ह्यांचे आमचे कारखाने जसे निघाले, तसेच बुडाले. भागीदार आमचे आम्हीच असल्यानें कोण कोणावर फिर्याद करतो. केली तरी पुनः हसेंच होणार नाॽ तरी एका गोष्टींत आमचा हातखंडा असे. आमची शाई नेहमीं आम्हीच करीत असूं. बाभळीच्या शेंगा शिजवून त्यांत हिरडा व हिराकस घालून आम्ही शाईच्या बाटल्या कोनाड्यांत शिल्लक असतच. मात्र ह्या शाईच्या कारखान्याच्या भरभराटीमुळें, शाई वेळोवेळीं घरभर सांडे आणि यामुळें बिचा-या आमच्या आईला सारवणाचा नवीनच त्रास उद्भवे. असो! ह्या गालबोटामुळें आमच्या यशाची शुभ्रता जास्त उठावदार दिसूं लागली. मग आईच्या त्रासाला कोण जुमानतोॽ