भाग दुसरा : 'प्राथमिक शिक्षण'
येथपर्यंत माझ्या पूर्वजांचा वृत्तांत संपला. येथून पुढें माझ्या स्वतःच्या पिढीचा वृत्तांत सुरू झाला.
तीन लग्नें
माझा भाऊ, मी, आणि माझी धाकटी बहीण ह्या तीन भावंडांचीं लग्नें एकाच वेळीं जमखंडींत बाबांनीं केलीं. बहुतकरून हीं लग्नें कोल्हापूरच्या यात्रेनंतर इ.स.१८८२ च्या सुमारास मे महिन्यांत (वैशाखांत) झालीं असावीं. सालाची खात्री नाहीं. १८८२ हें साल नक्की अंसेल तर माझें वय त्यावेळीं ९ वर्षांचें, भाऊचें १४ वर्षांचे आणि बहिणीचें ४ वर्षांचें होतें. हें लग्न करण्यांत बाबांचा फार अव्यवहारिकपणा व अविचार दिसतो. तो असा - माझ्या भावाचें वय फार तर शोभण्यासारखें होतें; पण माझें वय व माझ्या बहिणीचें वय अगदींच अक्षम्य होतें. वधूची पारख म्हणावी तर माझ्या भावाची वधू फार तर ५—६ वर्षांची होती. ती जमखंडींतील नातलगांची होती. माझी वधू माझ्या आत्या आंबाबाईची सर्वांत धाकटी मुलगी ही पुरी एक वर्षाची तरी होती कीं नव्हती ह्याची शंकाच आहे. आई तर म्हणत होती कीं, ती सहा महिन्यांची होती. लग्नाचे वेळीं तिला नीट बसतांहि येत नव्हतें. तीन लग्नें एका वेळीं करूं नयेत अशी आमच्या आईची समजूत होती. पण तिचें कोण ऐकतोॽ मला आपली मुलगी द्यावी असा माझ्या आतेचा आग्रह होता. मी तिचा फार लाडका होतों. माझा वडील भाऊ १३—१४ वर्षांचा झाला म्हणून त्यावेळचे समजुतीप्रमाणें तो लग्नाला योग्य झाला होता. तशांत आमच्या घरांत बरेच वर्षांत लग्नकार्य कधीं होण्याचा प्रसंग आला नव्हता. त्यावेळीं जरी आमच्या घराण्याला पूर्ण दारिद्र्य आलें नव्हतें तरी कर्ज काढल्याशिवाय लग्न होणें शक्य नव्हतें. लग्नाचे वेळीं घरांतील जे कांहीं दागिने उरले होते, तेही पण गहाण ठेवणें शक्यच नव्हतें, म्हणून त्यांनीं आमचा वाडा गहाण ठेवून प्रथम कर्ज काढलें. तें चिंतोपंत भिडे ह्या नांवाच्या त्यांच्या एका मित्राकडून अस्सल मुद्दल ५०० रुपयांचें होतें. धान्य वगैरे घरचें असावें.
सालंकृत कन्यादान
ह्या तिन्ही लग्नाचा खर्च बाबांच्याच अंगावर पडला. कारण माझ्या भावाचा सासरा हा गरीबच होता. माझा सासरा रामजी माने हा दुष्काळांत आमचेकडेच होता असें वर सांगितलेंच आहे. तेव्हां हीं दोन्ही लग्नें आमच्याच खर्चानें करावीं लागलीं. माझ्या बहिणीचें सालंकृत कन्यादान केलें. तिचें सासरचें घराणें आसंगीचें चांगलें खाऊन पिऊन सुखी होतें, तरी सर्व खर्च बाबांनीं कर्ज काढून केला. यावरून आमचे बाबांचे जवळ जरी स्वतःची फारशी माया उरली नव्हती, तरी त्यांची पत बरी होती म्हणावयाची. आसंगीचे व्याही गोपाळबाबा कामते नांवाचे सभ्य गृहस्थ आणि समजूतदार रयत होते. पण वराला लिहितां वाचतां येत नव्हते. सुखवस्तु बापाचा तो एकुलताएक लाडका मुलगा होता. त्याचें वय माझ्याच इतकें म्हणजे ८—९ वर्षांचें होतें. नांव कृष्णराव होतें. गोपाळरावांची बायको द्वारकाबाई, ही स्वभावानें खाष्ट व मत्सरी होती. या लग्नाचे वेळीं माझे आईचे पायाला नारु होऊन ती फार आजारी होती. मुख्य वरमाई अशी आजारी, घरीं दुसरें कोणी कर्ते वडील माणूस नाही. अशा वेळीं हीं लग्नें बाबांनीं कर्ज काढून उभारलीं ! ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मुहूर्त व लग्नपत्रिका वर्तवली असेल. पण यांपैकीं एकही स्थळ माझ्या आईला मान्य नव्हते.
व्याह्यांचा धिंगाणा
सर्व लग्नांत तिची फार हेळसांड झाली. आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण अंगणांत मोठा मांडव घातला होता. अर्थात् याच मांडवांत माझ्या बहिणीचें लग्न लोकरीतीप्रमाणें आमचे घरीं झालें. पण माझ्या आत्येची घरची गरिबी फार म्हणून माझेही लग्न याच मांडवांत झालें. आणि तीन लग्नें एकाच मांडवांत करूं नये म्हणून माझ्या भावाचें लग्न मात्र त्याच्या सास-याच्या घरीं झालें. पण जेवणाखाण्याचा सर्व खर्च बाबांचा. खर्च आमचा पण देखरेखीला आमचेकडचें कोणी नसल्यामुळें एकंदर लग्न समारंभांत चार दिवस एकसारखी अंदाधुंदी चालली होती. मी लहानपणीं फार खेळकर होतों. हळदी लागल्यावर नव-या मुलानें बाहेर जाऊं नये, असें असतां मी लग्नाचे वेळीं तळ्यावर खेळत होतों. तेथून मला धरून आणिलें. माझ्या बायकोला तर पाळण्यांतून आणून माझेच मांडीवर बसविलें. ती माझी आतेबहीण असल्यामुळें पूर्वीपासून माझा तिचा लळा होताच मग लाजावयाचें कसें तें आम्ही शिकावयाचें पुढेंच होतें. सर्व खर्च आम्ही करून व्याह्यांनी म्हणजे माझ्या व माझ्या भावाच्या सास-यांनी बाबांला लग्नांत फार त्रास दिला. वरपक्षानें हिणवावयाचें तें उलट वधूपक्षांचीच कारवाई फार चालली. शेवटीं गांवजेवणाचे दिवशीं रात्रीं बारा वाजतां पानें पडलीं, पण कांहींतरी भांडण काढून जेवावयाला आलेली बरीच मंडळी पानावरून अभद्रध्वनि काढीत निघून गेली. ही हकीकत माझी आई पुढें किती दिवस तरी सांगून आमची करमणूक करीत असें.
केळवण
आमचीं हीं तिन्ही लग्नें सायंकाळीं गोरज मुहूर्तावर झालीं. लग्नसमारंभ ४।५ दिवस यथासांग झाला. हळदी, रुखवत, रासन्हाणी, अक्षता, लग्नानंतरचें नवरानवरीचे खेळ, नव-याला बागेंत नेणें वगैरे सर्व सोहळे झाले. लग्नांत केळवणासाठीं इतक्या घरीं जेवणास जावें लागलें कीं, मला फारच कंटाळा आला होता. सर्व ओळखीचीं माणसें एकाच दिवशीं जेवणास बोलावणार! मग जेवण कसचें होतें. नुसता भात किंवा शेवयाचें ताट पुढें ठेविलें कीं त्यावरचा गूळ किंवा साखरेला थोडा हात लावला कीं झालें जेवण! आणि प्रत्येक घरीं वाजंत्रीं लावून जावयाचें असे. बेजारून गेलों.
आसंगीचें व-हाड
याप्रमाणें हा लग्नाचा धांगडधिंगा संपल्यावर आम्ही सर्व माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला म्हणजे आसंगी गावाला निघालों. हें खेडें जमखंडीच्या पश्चिमेस कुडची स्टेशनच्या वाटेवर ११ मैलांवर आहे. सुमारें चार पांच गाड्यांच्या भरतीचें व-हाड निघालें. आमचेबरोबर आमचे आलगुरचे मामा रामजीबावा हे होते. फक्त बाबा आणि आई मात्र आलीं नाहींत. कारण कन्यादान केलें असतां कन्येच्या घरीं आईबापांनीं कन्येला मुलें होईपर्यंत अन्नग्रहण करावयाचें नसतें. आसंगीचें व्याह्याची शेती मोठी व घरही प्रशस्त होतें. रात्रीच्या वेळीं आम्ही गांवांत प्रवेश केला. आमची थाटानें वरात निघाली. दारुकाम वगैरे चांगला थाट झाला.
पेंढारधाड
आसंगीस नदी आहे. नदीवर व विहीरींत पोहणें; यथेच्छ जेवणें आणि रस्त्यांतून धिंगाणा घालणें हाच काय तो आमचा कार्यक्रम होता. बरोबर आमचे आई-बाबा नव्हते, मग व्याह्यांच्या घरीं आम्हांला कोण दाबांत ठेवणारॽ आमच्या धुडगुशीला ताळच उरला नाहीं. आम्ही जमखंडीचीं बरींच मुलें होतों. त्यांत आसंगीच्या मुलांची भर पडली. मग काय आम्ही चार दिवसांत ह्या खेड्यांत कहर उडवून दिला. गांवांत एक पेंढारधाड आल्याप्रमाणेंच झालें. सर्वांत हाल आसंगीच्या गांवडुकरांचे झाले. आम्ही जमखंडीस असा डुकरांचा जमाव कधींही पाहिला नव्हता. बोळाबोळांतून डुकरांना आडवून त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून एक मोठें भारतीय युद्धच आरंभिलें. शेवटीं वृद्धमंडळी बरीच त्रासली. या खेडेगांवांत आम्ही शहराचे पाहुणे शिकलेले म्हणून आलों होतों, म्हणून प्रथम प्रथम कोणीच बोलूं शकले नाहींत. शिवाय व्याही मोठे वजनदार होते. पण खेड्यांतील वडील लोकांकडून शेवटीं आमची कानउघडणी झालीच. अशा रीतानें आठ दिवस मेजवान्या झोडून आणि मजा करून आम्ही परत जमखंडीस आलों.