मृदुना दारुणं हंति मृदुना हंत्यदारुणम् ।
नासाध्यं मृदुना किंचित् तस्मात्तीव्रतरं मृदु ॥३२॥
—वनपर्व २८ अध्याय.
धर्म —द्रौपदी संवादांतील बळी आणि प्रल्हाद ह्यांच्या संवादांत, प्रल्हाद आपला नातू बळी ह्याला म्हणतो :— ''मऊपणा (दये) नें कठिणाला जिंकतां येतें; मऊपणानें अकठिणाला तर जिंकितां येतेंच. मऊपणाला असाध्य असें कांहींच नाहीं. म्हणून मऊ (दया) हें तीक्ष्णाहूनही अधिक तीक्ष्ण होय !''
आतां मी सत्तराचें घरांत जाऊं लागलों आहें. जगाच्या दोन पिढ्या तर माझ्या पाहून झाल्या. तिसरी किती पाहीन तें भविष्य मात्र जाणें. माझ्या आयुष्याचें सार जर काढावयाचें असेल, तर महाभारतकारांनीं प्रल्हादाच्या तोंडीं जो उद्गार घातला आहे, तोंच सार माझ्या आयुष्यांतील अनुभवाचा आहे. महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसावादाची ही तन्मात्राच होय. असा कठीण अनुभव मला कळूं लागल्यापासून — निदान माझ्या सार्वजनिक कामांत तरी मला पदोपदीं आला. ह्यावरून मी स्वभावतः मृदु आहें, असें सांगण्याचा माझा हेतु नाहीं. जी वस्तुस्थिति नाहीं ती आहे असें मी कसें सांगूं ? तसें मी म्हणेन तर पुढें ज्या आठवणी व अनुभव मीं लिहिले आहेत, तीं सर्व असत्यमिश्र आणि म्हणून कवडी मोल ठरतील. माझा जन्म — स्वभाव मृदु नसून कठीण होता. दारुण नसला तरी कठीण होता हें खरें. निदान वरील श्लोकांतल्याप्रमाणें मृदु तरी नव्हताच हें खास. पण माझ्या आयुष्यांत विशेषतः माझ्या प्रौढपणांत जीं जीं कामें मीं केलीं, सत्याचीं, धर्माची आणि निर्मळ प्रेमाचीं म्हणून त्यांची धुरा माझ्या दुर्बल खांद्यावर घेतली त्यांत मला कठीण अनुभव आला ! त्यामुळें आतां मी पूर्णपणें नाहीं तरी अंशतः बराच मऊ झालों आहें. आणि ह्यांत माझ्या सेवेचें फळ मला मिळालें, असें समजून मी जगच्चालकाचाच नव्हे तर जगाचाही आभारी आहें.
माझ्या कामांत मला यश मिळालें नाहीं म्हणून मला कठीण अनुभव आला असें नव्हे. यशाची मला आकांक्षाच नव्हती. यशाची मला नीट व्याख्याच करितां येत नाहीं तर मी त्याची इच्छा तरी कशी करूं ? माझ्या कामांत माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठीं मी घरदारही कमी समजून तीं तीं कामें करीत होतों, त्यांचाही माझ्यासंबंधीं गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधही झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. ह्यामुळें माझ्या मनाची शांति ढासळली आणि अकालीं बहुतेक स्वीकृत कामांतून मी विराम पावलों. मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामांतून मी विराम पावणें शक्यच नाहीं; कारण मी धर्माचा स्वीकार केला हें खरें नसून, धर्मानेंच माझा स्वीकार केला, अशी माझी समजूत असल्यामुळें ह्या शरीरांतून विराम पावेपर्यंत तरी धर्मानें मला पछाडलें आहेच व पुढेंही तो मला अंतरणार नाहीं, ही मला आशा आहे.
माझ्या अनुभवांतून मी वाचलों आहें व मला निर्वाण जरी नाहीं तरी मनाला थोडीबहुत अलीकडे शांति मिळत आहे. कारण मी मृदु होऊं लागलों हेंच होय. माझीं कामें कठीणपणानें होण्यासारखीं नव्हतींच. पण मीं जर प्रथमपासूनच मृदुपणानें हीं सर्व कामें केलीं असतीं तर इतके कठीण अनुभव आले नसते, ते स्वभावदोषामुळें आले. त्या सर्वांतून मी पार पडलों ह्याचें कारण मी माझ्या कामामुळें मृदुतेचे धडे — मला कळत, किंबहुना नकळतही— शिकलों हें खास. जी मृदुता माझ्यामध्यें स्वभावतः नव्हती, केवळ कामामुळें आली, ती माझ्या आईमध्यें मूर्तिमंत होती; आणि तिच्याद्वारें ती मजमध्यें मला नकळत कां होईना आली होती. येरवीं तिचे धडे मी कामामुळें तरी शिकण्यास कसा पात्र झालों असतों ? ह्याप्रमाणें ह्या विश्रांतीच्या गेल्या ७ वर्षांत माझें लक्ष माझ्या पूर्वजांच्या चरित्राकडे गेलें.
माझ्या कांहीं पक्षपाती मित्रांनीं मला स्वतःचें चरित्र लिहिण्याची सूचना व आग्रह बराच वेळा केला होता. पण तशी माझी पात्रता व लौकिक दृष्ट्या जरूरी मला वाटेना. जगांत ग्रंथ — प्रकाशनाचें काम आतां इतकें बेसुमार वाढलें आहे कीं त्यांत आणखी एका गबाळ ग्रंथाची भर टाकण्याचें धैर्य मला अद्यापि येत नाहीं. असो.
ह्या इ. स. १९३० वर्षी चालूं झालेल्या भारतीय धर्मयुद्धांत मी कसाबसा पडलों. तो तपशील सांगण्याचें हें स्थळ नव्हे. शेवटीं त्याचें फळ म्हणून माझ्या सुदैवानें ता. १२ मे १९३० सोमवारीं सायंकाळीं ७ वाजतां मी येरवड्याच्या तुरुंगांत जाऊन पडलों. तेथें मी सुखी होतों. ज्या दिवशीं मी तेथें गेलों त्या दिवशीं वैशाख पौर्णिमा— श्रीगौतमबुद्धजयन्ति—होती ! ह्या सुमुहूर्तावर मी ह्या शांती मंदिरांत आलों. मला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा मिळाली होती. रोज ८ तास काथ्या वळण्याचें काम करावें लागलें. त्यामुळें माझी प्रकृति बरी होऊन माझी खरी कुरकुर कांहींच उरली नाहीं. पण सायंकाळीं अंधार्या खोलींत कोंडल्यावर दुसरे दिवशीं सकाळीं पुनः कामासाठीं दार उघडेतोंपर्यंत माझा वेळ जात नव्हता. मी लिहिण्याचें सामान घरून मागितलें. रात्रीं दिवा असेल अशा खोलींत मला कोंडण्याची विनंती केली. पण हें सर्व होण्यास २॥ महिने गेले ! केवळ माझ्या करमणुकीसाठीं म्हणून मी ह्या माझ्या आयुष्यांतील ''आठवणी व अनुभव'' तुरुंगांतील खोलींत लिहिल्या आहेत. बोध तर दूरच राहो, पण नुसती करमणूकही इतरांची होईल, असें मला वाटत नाहीं. तसा माझा हेतूच नाहीं.
पुढील प्रकरणें म्हणजे माझीं केवळ असबंद्ध टिपणें आहेत. विशेष माझ्या पूज्य मातापितरांचें व इतर पूर्वजांचें पुण्यस्मरण ह्या एकांतवासांत व्हावें, व मनाची लाडकी हळहळ मिटावी म्हणून मी लिहिण्यास सुरुवात केली. पुढें पुढें माझ्या केवळ आठवणीपेक्षां माझ्या लहानपणींच्या अनुभवाचे महत्त्व चरित्रशास्त्राच्या दृष्टीनें मला भासूं लागलें म्हणून माझे चरित्राच्या गोष्टी लिहूं लागलों. आतां ह्या लेखाचें तारूं कोणीकडे भडकतें आणि कोणत्या बंदराला पोचतें— कां मध्येंच लहरीच्या वार्यावर हेलकावे खात एकाद्या खडकावर आपटते ह्या पुढच्या गोष्टी. तोंपर्यंत प्रस्तावनाही येथेंच पुरें करणें बरें नव्हे ?
''यल्लभसे निजकर्मोपात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तं ॥''
वि. रा. शिन्दे
रामविहार, १२९२ शिवाजी नगर, पुणें ५.
ता. २३ एप्रिल, १९४०