माझें वाचन

प्रकरण १७ वें
खाजगी वाचन
आधुनिक विद्यार्थ्यांच्या मनाची वाढ शाळेबाहेरच्या वाचनावर अवलंबून आहे. आधुनिक शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या खासगी वाचनाची जोड मिळाल्याशिवाय तें सर्व निरुपयोगी किंबहुना त्याहून वाईट ठरतें, हें आतां सर्वमान्य तत्त्व झालें आहे. पण माझ्या हायस्कुलच्या काळांत हे तत्व आमच्या शिक्षकाला नुसतें माहीतही नव्हतें, मग मान्यता बाजूसच राहिली. आमची शाळा बहुतेक खेडवळ मग तेथें पुस्तकालय कोठून असणारॽ त्यावेळीं मराठींतील वाङ्मयच मुळीं जर संपुष्टात होतें तर माझ्या वाचनाचा मुद्दा कसा निघणारॽ तरी मी इंग्रजी तिस-या चौथ्या यत्तेंत जाईपर्यंत ब-याच मराठींतल्या त्यावेळच्या अद्भुत कथानकाच्या व उघड श्रृंगाराच्या कादंब-या वाचल्या होत्या. माझ्याइतक्या कादंब-या त्या वेळच्या माझ्या सोबत्यांपैकीं कोणींच वाचल्या नव्हत्या; ह्या गोष्टींचा मला तेव्हां मोठा क्षम्य अभिमान वाटत होता, हें मला आतां नीट आठवतें. ह्याचें एक कारण असें कीं मला अगदीं लहानपणीं तोंडी गोष्टी ऐकण्याचा फार नाद असे. हा नाद माझ्या आईनेंच मला अगदीं बाळपणीं अद्भुत व करुण रसाच्या गोड गोड गोष्टी सांगून लावून ठेविला होता. पुढें घरीं कोणी आल्या गेल्याजवळ गोष्टी सांगण्याचा मी तगादा लावीत असें. ह्या बाहेरच्या लोकांनीं मला ज्या गोष्टी सांगिंतल्या त्या मात्र सर्वच लहान मुलांनीं ऐकण्यासारख्या नव्हत्या. कांहींत बीभत्सपणा उघड असे. त्यावेळचें गांवढळ जगच तसें होतें.

कादंबरी वाचन
पुढें मराठी ४।५ यत्तेंत असतांना गुलबकावली, वेताळ पंचविशी, बत्तीस पुतळी, शुक बहात्तरी वगैरे पुस्तकें माझ्या हातांत येऊं लागलीं. इंग्रजी शाळेंतील खालच्या वर्गांत असतांना, विचित्रपुरी, मंजुघोषा, मदनमंजरी, वसंतकोकिला, श्रृंगारसुंदरी, हीं आणि अशीं कित्येक पुस्तकें मी अधाशाप्रमाणें केव्हांच वाचून टाकीत असें. हीं पुस्तकें मला कोठून मिळत ह्याचेंच मला आतां आश्चर्य वाटतें. ‘इच्छा तेथें वाट सांपडते’ हीं इंग्रजी म्हण माझ्या अनुभवास, तेव्हां ह्या कादंबरी वाचनाच्या बाबतींत फार येत असे. पुढें पुढें ६।७ व्या यत्तेंत गेल्यावर अरेबियन नाइटसचे भाषांतर, नारायणराव गोदावरी, वेषधारी पंजाबी अशा प्रकारचीं पुस्तकें मिळूं लागलीं. हरी नारायण आपटे ह्यांचीं पुस्तकें व ‘करमणूक’ हें पत्र मी पुण्यांत कॉलेजांत जाईपर्यंत मिळणें शक्यच नव्हतें. किंबहुना तीं त्या वेळीं अस्तित्वांतच नव्हतीं. कॉलेजांत गेल्यावर मजमध्यें दुसरेंच युगांतर झालें. पण मराठी शाळेंतील बीभत्स गोष्टी आणि इंग्रजी शाळेंतल्या उघड श्रृंगाराच्या घवघवीत वर्णनाच्या कादंब-यांमुळें माझ्या कोमल आणि जन्मतः भावनाशील मनावर कांहीं अंशीं अनिष्ट परिणाम झाला, हें मला पुढें कळून आलें. १४।१५ व्या वर्षांच्या आंतच माझ्यांत अकालीन श्रृंगाररसाचा प्रादुर्भाव झाला असावा, असें मला वाटतें.

वाचनाचें वेड
करुण, श्रृंगार, वीर, रौद्र इत्यादि रसही समजूं लागून माझ्या बुद्धीप्रमाणेंच हृदयाचाही परिपोष होऊं लागला ह्यांत कांहीं वावगें झालें नाहीं. तरी पण त्या काळच्या वाङ्मयातील तुटपुंजेपणामुळे मी अकालीं श्रृंगारमय होणें साहजिक होतें तरी इष्ट नव्हतें. शिमग्यांतील हुरूट मुलांच्या नादीं लागून चांदण्या रात्रीं वेश्यांचीं दारें ठोठावून बीभत्स गाणीं म्हणण्यांत जरी मला तादृक अपाय झाला नसला; तरी पुढें प्रतिष्ठितपणें वसंत कोकिला आणि मदनमंजरी असल्या तीनतीनशे पानांच्या संस्कृत पूर्ण मराठी भाषेंतल्या एकरंगी कादंब-या वाचून मला अपाय झाला. ह्याच सुमारास जमखंडीस नवीन अलल डुरर नाटकेंही येऊ लागलीं होतीं. पुढें वरच्या यत्तेंत गेल्यावर वाईकर संगीत मंडळीची रत्नावलि आणि अण्णा किर्लोस्कराचें शाकुंतल व सौभद्र हीं नाटकें पाहावयास मिळूं लागलीं. तरी माझ्या दारिद्र्यामुळें नाटकें पाहाण्यावर जो आळा बसला, तो कादंब-या वाचण्यावर बसेना. कारण नाटकाला तिकिट काढावें लागे. पण कादंब-या फाटक्या कां असेनात फुकट वाचावयास मिळत. गुळास मुंगी चिकटते त्याप्रमाणें कोठून तरी शोधून आणिलेल्या कादंबरीस मी चिकटलेला दिसे. तरी शाळेंत सगळ्या सातही यत्तेंतून माझा नंबर पहिल्याचा दुसरा कधीं झाला नाहीं. म्हणून माझें कादंब-याचे वेड तेव्हां कोणाच्या डोळ्यांवर आलें नाहीं. शिवाय हेंही लक्षांत घेतलें पाहिजे कीं माझें खाजगी वाचन केवळ फोलकट कादंब-यांतच न संपता श्रीधर, मुक्तेश्वर, महिपती सारख्या मराठी कवींच्या पौराणिक पोथ्याही मी वाचीत असें.

पोथीवाचन
माझे बाबांनीं शाळेंतील अभ्यासविषयीं जरी माझी म्हणण्याइतकी विचारपूस केली नाहीं, तरी त्यांच्या त्या वेळच्या मताप्रमाणें जे धार्मिक लहान मोठे ग्रंथ त्यांना आढळले त्याचे पाठांतर मजकडून बाबा लक्षपूर्वक करून घेत असत, हें मला आतां आठवून त्यांचे मला फार आभार वाटतात. त्यामुळें पुढें हायस्कुलांत गेल्यावर माझ्यामध्यें आपोआप एक भक्तीचा उद्रेक झाला. पण हायस्कुलांत जाण्यापूर्वीं किंवा गेल्यावर आरंभींच्या वर्षीं बाबा माझेकडून रोज आंघोळ केल्यावर जेवणापूर्वी देवीदास कवीकृत ‘व्यंकटेश स्तोत्र’ वाचवून घेत असत. हा लहानसा १०८ ओव्यांचा ग्रंथ अतिशय सुंदर आणि रसाळ आहे. मी नित्य तो आवडीनें वाचीत असें. त्यांतल्या कांहीं ओव्या माझ्या अगदीं मुखोद्गत झाल्या होत्या. दर शनिवारीं विशेषतः श्रावणमासीं संध्याकाळीं दिवा लावल्यावर बाबा स्वतः तुळशीकट्यावर बसत आणि माझेकडून शनिमाहात्म्य वाचून घेत. कदाचित् साडेसातीचा फेरा आला म्हणून शनिग्रहाच्या शांतीसाठीं त्यांनीं हें पठणश्रवण सुरूं केलें असावें. बाबांना ज्योतिषाचा नाद होता आणि विश्वास होता. दर शुक्रवारीं कसली तरी पोथी वाचवून नंतर फुटाण्याचा प्रसाद वाटण्यांत येत असे. आपल्या वडिलांच्या श्राद्धाचे दिवशीं आणि विशेषतः अक्षततृतीयेच्या दिवशीं बाबा मजकडून गयासूर आख्यान नांवाची एक पोथी वाचवून घेत असत.

धार्मिक ग्रंथ
बाबांच्या संग्रहीं जसें शिळा प्रेसवर छापलेल्या हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, करवीर महात्म्य, गुरुचरित्र वगैरे पोथ्या असत; त्याप्रमाणे श्रीज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित मोठी पोथी आणि तुकारामाची रूपावलि, मनचर्येचे अभंग, गौळणी वगैरे हस्तलिखित गाथांचा पुष्कळ संग्रह असे. तसेंच दत्त सांप्रदायाचीं अष्टकें, देवींच्या आरत्या, अनुभविक साधूंचीं पदें, भजनी भारुड वगैरे कानडी किंवा मराठी पदांचा त्यांना जसजसा शोध लागे तसा ते सर्व आमचेकडून लिहून ठेवीत असत. ह्यांमुळे माझ्या धर्मबुद्धीच्या विकासालाच नव्हे तर मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासाला मोठी मदत झाली!