माझे आजोबा

भाग पहिला : 'पूर्वज'

पहिल्या आठवणी

अर्थात् माझ्या घराण्यांतील मीं पाहिलेला सर्वांत वडील मनुष्य म्हणजे माझे आजे बसवंतराव.  त्यांचे मेहुणे व्यंकटराव (व्यंकप्पा) हे माझ्या आजीचे सख्खे भाऊ.  हे माझ्या आजीपेक्षां मोठे होते.  पण हे आजोबांपेक्षां लहान कीं मोठें हें मला ठाऊक नाहीं.  हे आमच्या आजोबांच्या आश्रयाखालीं आमचेच घरीं राहात असत.  त्यांची मला फारच अंधुक आठवण आहे.  आमचे घरी एक मोठा काळा म्हातारा पाठाळ बैल यल्लमादेवीला वाहिलेला (कंठाळीचा बैल) होता.  त्यावरून त्याला कठल्या बैल असें नांव होतें.  त्याचेवर ओझें लादून व्यंकप्पा आमचे मळ्यांतून रोज घरीं येत.  हीच माझ्या आयुष्यांतील अगदी पहिली आठवण होय. व्यंकप्पा फार सात्त्विक, साधे व सहनशील होते.  आमचे आजे बसवंतराव नेहमीं त्यांची चेष्टा करीत व तिकडे केवळ दुर्लक्ष करून व्यंकप्पा केव्हांतरी गंभीरपणानें उत्तर देत.  ह्यावेळीं मी फार तर तीन किंवा चार वर्षांचा असेन.

जमखंडी माझ्या जन्मभूमीचा गांव.  हा कृष्णानदीचे दक्षिणेस ४॥ मैलांवर, विजापूरचे पश्चिमेस ३६ मैलांवर व कुडची (एस्.एम्.आर्.) स्टेशनापासून ३३ मैलांवर आहे.  विजापूरपैकीं लिंगायत तेली जातीच्या देसायांचा हा मूळ गांव.  पटवर्धनांनीं त्यांच्यापासून हा प्रांत जिंकून घेतला.

अप्पा दप्तरदार नांवाचे एक श्रीमंत ब्राह्मण गृहस्थ जमखंडीचे यजमान रावसाहेब (गोपाळराव) पटवर्धनांचे वेळीं होते.  त्यांचा कदाचित् आश्रय आमच्या आजोबांस असावा.  कारण त्यांचाच मळा जमखंडीचे पूर्वेस आलगुरच्या वाटेवर दोन मैलांवर होता.  तो आमच्या आजोबांकडे लागवडीस पुष्कळ वर्षे होता.  आमचे राहाते घराची जागाही ह्या दप्तरदारांनींच दिली असें मी ऐकत होतों.  पण माझ्या जन्मानंतर हा जुना संबंध कदाचित् आधींच पुष्कळ वर्षे तुटलेला असावा.  हा मळा मात्र माझे जन्माचे वेळींही आमचेकडेच होता.  ह्या मळ्याला 'अप्पांचा मळा' असें माझे लहानपणीं म्हणत असत.  आतां तो अगदीं उध्वस्त झाला आहे. 
                      

चंद्रोजीराव : आजोबांचे वडील चंद्रोजीराव हे मारले जाऊन त्यांच्या सर्व घराण्याचा नाश झाला !  ते विजापूरपैकीं सुरापूरचे राहणारे.  ही लढाई परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांनी जिंकली, असे इतिहासकार खरेशास्त्री ह्यांनीं एका केसरीचे अंकातं लिहिलें आहे.  चंद्रोजीराव शिंदे हे जर सुरापूरचे जहागिरदार असतील तर हें शक्य आहे.  पण तें आतां कळण्यास मार्ग नाहीं.  सौंदत्ति येथें १२ व्या शतकांत शिंदे घराण्याचें राज्य होतें.  त्या घराण्यांतील कोणी पुरुष सुरापूरचा जहागिरदार असल्यास चंद्रोजीरावाचा संबंध शोधून काढण्यास जागा आहे.  पण माझे वडील जिवंत असतांना मला आपल्या वंशावळीचा शोध करण्याचा विचारही सुचला नाहीं.  आतां तर गोष्टी फारच जुन्या ठरल्या !

माझे आजोबा एका नदीचें कांठीं अगदीं लहानपणीं पोरके आढळले.  ही नदी कृष्णा असावी.  पुढें त्यांना जमखंडीचें देसायानीं पाळलें.  कारण पोर पाणीदार व होतकरू होतें.  देसाई हे लिंगायत असल्यानें त्यांनीं या मुलाला लिंगायत होण्याला सांगितलें, तेव्हां हा तर मराठा; मांस खाणारा म्हणून ह्याला हें धर्मांतर न आवडून तो देसायांच्या घरांतून निघून कदाचित वर सांगितलेल्या दप्तरदाराचा मळा करून स्वतंत्र राहूं लागला असावा.

आमचे घरीं त्यावेळीं फक्त आमच्या आजोबांना व बाबांना मराठी येत होतें.  बाबांचें मराठी शिक्षण मुलकींत मराठी भाषेंत त्यावेळचे मानानें उत्तम झालें होतें.  आजोबांना लिहतांवाचतां येत होतें असे मला वाटत नाहीं.  कारण मीं त्यांना वाचतांना कधी पाहिलें नाहीं.  ते फार पाणीदार व कर्तृत्ववान् पुरुष होते.  शरीर सडपातळ, उंच, वर्ण चांगला गोरा, डोळे लाल, भिंवया कोरलेल्या, एकंदर उठावदार आकृति होती.  त्यांचा पोशाख अस्सल दरबारी मराठेशाहीचा — तंगदार पांढरी विजार, घोळदार अंगरखा, बत्ती पांढरी बिन पिळाची, मिशा झुपकेदार शुभ्र लांब व ताठ. एकंदर रुबाब मनांत भरण्यासारखा होता.  पुरुष हिकमती व विनोदी होता.

एक हिकमत :  ह्याबद्दलची एक गोष्ट आमची आई सांगत असे ती अशी - आजोबा एकदां प्रवासाला गेले असतां एका घरीं उतरण्यास जागा मागूं लागले. पण त्या घरची बाई मोठी खाष्ट होती.  तरी तेथेंच उतरण्याचा आजोबांनीं निश्चय केला.  नाहीं होय म्हणतांना बाईनें गोठ्यांत उतरण्यास जागा दिली.  सायंकाळी बाईनें आपल्या मुलास न्हाऊं घालून पाळण्यांत निजविलें.  एक झोका देऊन बाई आंत कामास गेली; पण मूल कांहीं केल्या रडण्याचें थांबेना.  बाई झोके देऊन जाई, पण मुलानें केवळ आकांत मांडला.  पुन्हां बाई येऊन मुलास हातांत घेई, आंजारी गोंजारी  पण जशी जशी ती त्यास रंजविण्यास इकडे तिकडे खालवर करी, तसतसें तें पोर अधिकच चरफडूं लागलें.  शेवटीं घाबरून आजोबांकडे मुलास कांहीं उपचार सुचल्यास करण्याकरितां बाई दीन वाणनें आली.  आजोबांनीं मुलास मांडीवर घेऊन त्याचे पोटावरून व पाठीवरून हात फिरविला, तोंच मूल स्वस्थ झालें व हसूं खेळूं लागलें.  हा चमत्कार पाहून बाईला फारच आश्चर्य वाटलें व आनंद झाला.  ती आजोबांच्या पायां पडूं लागली.  तिनें लगेच घरांत चांगलीशी जागा देऊन आजोबांस दोन दिवस सत्कारानें मेजवानी दिली.

आजोबांची करामत अगदीं साधी होती.  न्हालेल्या मुलाला पाळण्यांत घालून बाई आंत गेल्यावर, आजोबा पाळण्याजवळ जाऊन मुलाच्या कुल्यांत अगदीं नाजूक जागीं एक सराट्याचा लहानसा कांटा खोवून ठेवून आल्यानें मुलाची तळमळ उडली होती.  जेव्हां बाईनें मूल आजोबांच्या मांडीवर दिलें, तेव्हां आजोबांनीं मुलाचे पाठीवरून हात फिरवीत असतां बाईची नजर चुकवून तो सराट्याचा कांटा काढून घेतल्याबरोबर मग मूल कशाला रडतें !  बाईला मात्र आजोबा मोठे अवलिया वाटले.

बसप्पा अथणी :  ते मोठे धोरणी व बहुश्रुतही होते.  बसप्पा अथणी नांवाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी गृहस्थ माझ्या बाबांचा मोठा मित्र होता.  व्यापारांत खोट आल्यानें दिवाळें निघण्याची पाळी आली.  म्हणून जंगलांत फांस लावून आत्महत्या करण्यास तो निघाला असतां, माझे वडील रामजी बाबांनीं त्यास आडविलें व त्यास धीर देऊन घरीं आणलें. आणि आमचे घरांतील हजारों रुपये नगद व आमचे आईचे मौल्यवान् दागिने बसप्पाचे पदरांत टाकून त्याचा जीव व अब्रू वांचविली.  पण पुढें हें विश्वासाचें कर्ज संपूर्ण फेडलें नाहीं.  हा सर्व प्रकार वृध्द आजोबांना मुळींच आवडला नाहीं.  एकंदरींत आमच्या वडिलांचा अव्यवहारी, उदार व विश्वासू स्वभाव आजोबांना पसंत नव्हता.  आपला मुलगा संसारांत फसून दुःखांत दिवस काढणार हें त्यांचे भाकीत पुढें अक्षरशः खरें ठरलें.  तरी आजोबा जिवंत असेपर्यंत आमचें घराणें चांगल्या सुबत्तेंत होतें.

बेहिशेबी उधारी :  बसप्पाच्यानें कर्ज फेडवेना म्हणून त्याच्या दुकानांतून आमचे घरीं सर्व वाणसौदा उधार येत होता.  बसप्पा वरचेवर आमचे वडिलांकडे बसावयास येत असत. तेव्हां आजोबा मला जवळ बोलावून माझ्या हातावर साखरी काजू ठेवून खालील स्वकृत कानडींतील एक फटका शिकवीत आणि हा फटका म्हणत बसप्पाजवळ जाण्यास मला सांगत.

ग्यांगड ग्यांगण्णा ।  आडकी संगण्णा ।
वंद क्कोट्टु मूरु बरी उण्णा ॥१॥

ह्याचा थोडक्यांत अर्थ असा आहे कीं, संगण्णा नांवाचा वाणी एक देऊन तीन आपल्या वहींत लिहितो.  हा टोमणा बसप्पाच्या उधारी खात्यावर होता.  अशी खोटी उधारी लिहून बसप्पा कर्ज फेडणार हा ध्वनि त्या फटक्यांत होता.

बसप्पा ज्या ज्या वेळीं घरीं येई त्या त्या प्रत्येक वेळीं तो माझ्या हातावर थोडी खडीसाखर ठेवी.  मी लहानपणीं मोठा गुटगुटीत व गोजीरवाणा होतों, असें सांगतात. घरीं येत ते सर्व माझ्यावर प्रेम करीत.

एके दिवशीं आजोबांनीं शिकविलेला हा नवीन कानडी फटका माझ्या बोबड्या शब्दांत म्हणत वेडेवांकडे हातवारे करीत मी बसप्पाजवळ गेलों. जवळच माझे बाबा बसले होते.  ते रागानें म्हणाले, ''अरे विठ्या, कायरे, हें कोणीं तुला शिकविलें ?  ऑं !'' ''मला आजोबांनीं शिकविलें.''  असें म्हणून मी धूम ठोकून आजोबांचे कुशींत दडून बसलों.

लष्करी पेशा :  आजोबांनीं कधीं कोणाची खाजगी नोकरी केलेली मला माहीत नाहीं.  त्यांचा धंदा शेतकीचा.  पण तीही त्यांनीं प्रत्यक्ष हातानें केली असेलसें वाटत नाहीं.  मात्र ते मान्यतेनें व सुखवस्तु असे राहात असत.  मी जेथें जन्मलों तें राहातें घर आजोबांच्या म्हातारपणीं माझ्या बाबांनीं बांधलें होतें.  आमची जागा व वाडा 'लक्कन केरी' नांवाच्या तळ्याचे कांठी होती.  हें तळें फुटून आमचें जुनें घर त्या पुरांत बुडालें.  नंतर तें पुन्हां कदाचित् आमचे वडिलांनीं माझे जन्माचें पूर्वी बांधलें असावें.  माझ्या आजोबांचा रयतावा चांगला होता.  लोक त्यांना सुभेदार म्हणत.  सन १८५७ सालचे बंडापूर्वी रामचंद्रराव अप्पासाहेब यांचे वेळीं तासगांवाहून मराठ्यांचीं कांहीं घराणीं जमखंडीच्या रिसाल्यांत आलीं होतीं.  त्यांना सुभेदार असें म्हणत.  त्यांतच आमचे आजोबांची गणना होत असावी.  ह्यावरून त्यांनीं लष्करांत कोठेंतरी सुभेदारी केली होती, असा तर्क करण्यास जागा आहे.

आजोबांचे वेळीं आमच्या घराण्यांत लष्करी पेशा होता, ह्याचा एक पुरावा मीं लहानपणीं प्रत्यक्ष पाहिला.  इ.स.१८५७ सालच्या बंडांत इंग्रजी लष्कर जमखंडीस आल्यावर लोकांकडून आपलीं खाजगी हत्यारें जमिनींत पुरून ठेवली.  तशीं आमच्या वाड्यांतही आमचीं हत्यारें पुरलीं होतीं.  पुढें हत्यारांचा कायदा झाल्यानें हीं हत्यारें तशींच पुरलेलीं होती.  आजोबा वारल्यावर मी इंग्रजी शाळेंत असतांना माझ्या वडिलांनीं आमच्या वाड्याच्या एका जुन्या भागाची जमीन उकरून हीं हत्यारें पाहिलीं.  तलवारी व कट्यारी अगदीं गंजून निकामी झाल्या होत्या.  ढाली वगैरेंचे लोखंडी खिळेच गंजलेले सांपडले.  त्या हत्यारांत बंदुकी अजिबात नव्हत्या.

आजोबांविषयीं एक आख्यायिका आमची आई सांगे.  ती अशी कीं, एकदां आजोबांनीं गोसाव्याचें सोंग घेऊन कांहीं महत्त्वाचे कागदपत्र व टपाल दुसरीकडे लांबचा प्रवास करून पोंचविलें.  शिवाय आजोबांच्या लष्करी साहसाच्या, तरुणपणाच्या व फाकडेपणाच्या कांहीं गोष्टी आम्हांला आम्ही लहान असतांना सांगून आई आमची करमणूक करीत असे.

शेवटीं शेवटीं आजोबांना वृध्दपणामुळें अगदीं दिसेनासें झालें.  ते आपल्या खोलींतून बाहेर सोप्यांत जेथें माझा पाळणा बांधला असे तेथें भिंतीला टेकून माझा पाळणा हालवीत बसत.  त्यांना मुळींच दिसत नसे.  मला थोडें थोडें समजत असे.  मी त्यांचा लाडका होतों.  मला साखरफुटाणे व साखरेंतले काजू आजोबा खावयास देत, म्हणून मी नेहमीं त्यांच्या आजूबाजूला लाडीगोडी करीत असें.  त्यावेळीं आजोबा मला कांहींतरी मजेदार गोष्टी व बालगीतें शिकवीत.

माझा जन्म :  आजोबा सुमारें १८७८-७९ इसवींत वारले असावे, असा माझा तर्क आहे.  त्यावेळीं माझ्या बाबांनीं संस्थानाची नोकरी सोडली असें आई म्हणत होती.  मी इ.स. १८७३ एप्रिल महिन्याचे २३ तारखेस जन्मलों असा माझ्या जन्मपत्रिकेंत उल्लेख आहे.

एक स्वप्न :  ह्यावेळची एक गोष्ट आठवते, तिजवरून आजोबांचा मी किती लाडका होतों हें दिसतें.  आजोबा वारण्याचे सुमारास मला देवी काढल्या होत्या.  त्यावेळीं मी ५ किंवा ६ वर्षांचा होतों. अद्यापि शाळेंत जात नव्हतों.  देवी टोचल्यानें माझे दंड सुजले होते.  आजोबांच्या मृत्यूमुळें घराणें शोकांत होतें.  माझ्या दंडांवरील जखमांची हयगय होऊन ते सुजून त्यांत किडे पडलेले कोणीं पाहिलेंच नव्हतें.  दहावे दिवशीं दसपिंडीच्या विधीकरितां आम्ही घरांतील सर्व मंडळी कृष्णानदीवर जाणार होतों.  आदले दिवशीं रात्रभर माझा हात दुखून मला झोंप कशी ती आली नाहीं.  माझी आई दिवसां नेहमीं कामांत असे.  तिला गाढ झोंप लागली होती.  तिला स्वप्न पडलें.  त्यांत आजोबा माझ्या पाळण्याजवळ मला कुरवाळीत म्हणाले, ''पकुल्या, तुझ्या दंडांत किडे पडले.  अजून तुझेकडे लेकाचे कुणीच पाहात नाहीं कीं रें !''  हें वाक्य ऐकून आई जागी होऊन पाळण्यांत मला पाहूं लागली, तों माझे दंडांत खरेच किडे बुजबुजत असलेले दिसले.  तिनें लगेच बाबांना जागें केलें.  नंतर उन्ह पाण्यानें माझे दंड धुवून त्यांत टरपेंटाईन घातल्यावर सर्व किडे बाहेर येऊन माझे हात हलके झाले.  दुसरे दिवशीं सकाळीं आईचे स्वप्नाबद्दल आश्चर्य करीत सर्व मंडळी नदीवर दसपिंडीच्या विधीला गेली.  मीही त्यांच्यांत होतों.

जनाक्का :  आजोबा वारण्यापूर्वी १-२ महिने माझी बहीण जनाक्का जन्मली होती.  आजोबांना दिसत मुळींच नव्हतें.  ते एक दिवस पाळण्याजवळ येऊन तान्ह्या जनाक्काला हातानें चांचपून पाहूं लागले आणि उद्गारले कीं, ''हां !  बिद्री कासव्वाने अदाळ.''  जमखंडीपैकीं बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे.  तेथील कासव्वा (काशीबाई) नांवाची एक ब्राह्मणाची बाई आजोबांच्या ओळखीची असे.  ती फार लठ्ठ असे.  जनाक्का लहानपणी फार बाळशामुळें लठ्ठ असे; म्हणून कासव्वाप्रमाणे आहे असा आजोबांचा उद्गार होता.