प्रकरण ४ थें
[ जन्म (अदमासें )१८३५ — मृत्यु २७ जून १९१० ]
आजे बसवंतराव यांना दोनच अपत्यें. वडील मुलगा माझे बाबा रामजीबावा आणि धाकटी बहीण माझी आत्या (आम्ही तिला अक्का म्हणत असूं) आंबाबाई. माझे बाबांचें रूप व स्वभाव बहुतेक माझे आजीचे वळणावर गेले होते. शेतक-याचें पोर निसर्गाचे मांडीवरच खेळून वाढलेलें. लहानपणीं खोडकर होतें. तथापि पुढें कोणीं एका शास्त्रीबुवांच्याजवळ ते लिहावाचावयाला व हिशेब ठेवायला त्यावेळचे मानानें फारच उत्तम प्रकारें शिकले. ह्याचें श्रेय आजोबाला, बाबांच्या तैलबुद्धीला किंवा त्या शास्त्रीबुवांच्या चांगुलपणाला द्यावें हे ठरविण्याला आतां मार्ग नाहीं. कारकुनी शिक्षणांत तर बावांचा जमखंडीस नंबर पहिला होता ! त्यांचें मोडी अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा! माझ्या वेळेला बाबा तर मुलांना मोडी कित्ते घालून देत. जमाखर्चांत जमखंडी दरबारांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. मामुली शिक्षण संपल्यावर जमखंडी संस्थानांत बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे, तेथें त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी लागली. त्यावेळीं ब्राह्मणी संस्थानांत ह्या मराठ्याच्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळते ही सामान्य गोष्ट नव्हे. ही शाळा सरकारीच असली पाहिजे. एरवीं हा खाऊनपिऊन सुखी मराठ्याचा एकुलताएक लाडका मुलगा, खासगी शाळा काढावयाला जमखंडी हा राजधानीचा गांव सोडून बिद्रीसारख्या पेट्यांत कां जातांॽ ह्या सर्व गोष्टींत त्या शास्त्रीबुवांचे कांहीं तरी अंग आहे. त्या ब्राह्मणाचें लक्ष ओढून घेण्यासारखें कांहीं विशेष पाणी बाबांत असलें पाहिजे. हें पाणी आमच्या आजोबांकडून आलें असावें. तें मजमध्यें किती आलें हें ठरवणें माझें काम नव्हे.
पांढरपेशी शिक्षण
नुसतें कारकुनी शिक्षणच नव्हे, तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे सांस्कृतिक विषयांची तांत्रिक माहिती बाबांना बरीच होती. हें मला समजूं लागल्यापासून माझे नजरेस येऊं लागलें. त्यांना संस्कृत येत नव्हतें तरी मराठींतील संस्कृत तत्सम शब्दाचे कठीण अर्थ त्यांना समजत असत. इतकें त्यांचें प्राकृत पोथ्याचें वाचन झालें होतें. त्या काळच्या प्राकृत पौराणिक सर्व पोथ्यांचा व मूलस्तंभ पंचांगें वगैरे शास्त्रीय वाङ्मयांचाही संग्रह त्यांनीं चांगला केला होता. ह्यावरून त्यांची वाङ्मयभक्ति दिसते. माझे लहानपणीं एक शास्त्री पुराण सांगावयाला आमचे घरीं नेहमीं येत. ह्यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची बाबांची प्रवृत्ति चांगली दिसते. त्यांचा हात सढळ होता. किंबहुना ते बेहिशेबी मराठा होते म्हटलें तरी चालेल. कारकुनी हिशेबांत ते कोणालाहि हार न जाणारे असतां संसारांतील काटकसरींत ते फार मागासलेले होते हें मोठें आश्चर्य! सर्व जातींतील संभावीत माणसांचा ह्यांना स्नेह व लळा होता. पण ह्यांना ब्राह्मणी बहुश्रुत राहणीचेंच वळण जास्त कां लागलें ह्याचें कारण ह्यांचे गुरुजी शास्त्रीबोवाच असावेत. पण ह्या बाबतींत मला निश्चित असें कांहींच सांगतां येत नाहीं. इतिहास शोधनाची आवड उत्पन्न होण्यापूर्वींच माझ्या घराण्यांतील सर्व वडील माणसांचाच नव्हे तर वस्तुंचा, मौल्यवान कागद पत्रांचा व दप्तराचा नाश व्हावा ही मला आतां मोठी खेदाची गोष्ट वाटते ! इतिहास हा कॉलेजांतील आवडीचा विषय असून असें कां झालें याचें कारण माझी फकिरी वृत्ति.
ब्राह्मणी वळण
बैठ्या शिक्षणाचें ब्राह्मणी वळण बाबांच्या अंगांत इतकें भिनलें कीं, आजोबांचा शेतकीचा अगर शिलेदारीचा बाणा त्यांच्यांत मुळींच उरला नाहीं. फार काय तर त्यांच्या पोषाखांतही ब्राह्मणी झांक दिसे ती अशी. माझ्या आजोबांची पांढरी बिन पिळाची बत्ती किंवा पायांतली फार तंग नसलेली पण रुबाबदार विजार मी बाबांचे अंगांत कधींच पाहिली नाहीं. इतकेंच नव्हे तर ब्राह्मणाप्रमाणें ते दहा हात लांब धोतर नेसत असत व तें थोडें जुनें झालें म्हणजे, तेंच दुमडून पांघरण्याचें उपरणें करीत. ही चाल जमखंडीस सभ्य ब्राह्मणमंडळींत कदाचित अद्यापि असावी. आमचे इंग्रजी शाळेचे हेडमास्तर त्रिंबकराव खांडेकरही असेंच जोड उपरणें पांघरीत. आंगरखा मात्र बाबांचा मराठा बाण्याचा असे. तो गुडघ्याच्या खालपर्यंत घोळदार असून छातीवर बंद असत. अस्तन्यावर ब-याच चुण्या असून शेवटीं त्यांना कान असत. ते मणगटाच्यापुढें हाताच्या पंजावर अगदीं बोटापर्यंत पसरलेले असत. रुमाल कर्नाटकी त-हेचा मोठा असून ती बांधण्याची ढब ठरलेली असे. पायांत जोडाही मराठी त-हेचा असे. एकंदर पोषाख शुभ्र आणि साधा असून रुबाबदार असे. ऋतुमानाप्रमाणें ह्यांत कधीं फरक होत नसे. अर्ध्याच पोषाखानें ते कधीं बाहेर पडत नसत.
कडक स्वभाव
बाबांचा स्वभाव फार बोलका होता. ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे मला लहानपणीं ऐकण्याची फार मौज वाटे. त्यांच्या बोलण्यांत म्हणी फार असत. मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईनें बोलत. ऐकणा-यावर त्यांची छाप तेव्हांच बसे. ते स्वभावानें किंचित् शीघ्रकोपी पण खुल्या दिलाचे व मृदु अंतःकरणाचे असत. आम्हांला लहानपणीं रागानें एकदां मारत सुटले म्हणजे बेतालपणानें फारच मारीत व मग राग ओसरल्यावर आपणच अश्रु ढाळीत. बिद्रीचे शाळेंत असतांना मुलांना फार मारत म्हणून त्यांना ती नोकरी सोडून श्रीमंतांनीं आपल्या खासगींत जवळ घेतलें असे मी एकदां ऐकलेलें स्मरतें. ते विशेषतः माझ्या मोठ्या भावाला फार मारीत. त्यांना आम्ही लहानमोठे सर्वजण फारच भीत असूं. इतकेंच नव्हे तर गांवांतही त्यांची जरब फार असे. गांवच्या पोलीस शिपायांनीं एकादी कांहीं चूक केली तर आपल्या पोटच्या पोराप्रमाणेंच त्यांना कित्येक वेळां मारलेलीं उदाहरणें घडलीं आहेत! व्यवहारांत मात्र ते फार भोळसट असत. कांहीं विक्री सौदा करावयास गेले तर व्यापा-यांच्या डोईवर देवाचा प्रसाद ठेवून धमकावून खरी किंमत सांगावयास लावीत. मग त्यांनीं सांगितलेलीच किंमत देत! त्यांनीं कधींही व्याजानें पैसे दिले नाहींत! व्याज घेणें हें मोठें पाप समजत. पण त्यांनीं बिन व्याजीं दिलेलें कर्जही कधीं कोणीं परत फेडलेलें मला आठवत नाहीं. फार तर काय, श्रीमंताशीं भांडून सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हां ते घरीं बसले, तेव्हां ह्यांनीं कांहीं प्रकरणीं स्वतःची तसलमात २५८९ रुपये (पंचवीसशें एकूणनव्वद) सरकारांत खर्ची घातले होते. तेही त्यांनीं १५!१६ वर्षें मागितली नाहीं. पुढें आमच्या घरीं आम्ही दारिद्र्याच्या भयंकर यातना सोशीत असतां, ही तसलमात परत मागण्याच्या याद्या कितीदां तरी श्रीमंत आप्पासाहेबांकडे केलेल्या मीं पाहिल्या; पण एक कवडीही परत मिळाली नाहीं.
तरुणपणीं बाबांच्या हातांत चार पैसे खेळत म्हणून त्यांनीं प्रथम प्रथम ऐषआराम केला. पण त्यांचा धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला, विशेषतः पंढरपूरच्या वारकरी पंथाचा फारच नाद लागला. प्रथमपासूनच त्यांचा स्वभाव प्रेमळ, श्रद्धाळू, उदार आणि करारी असे. त्यांचा प्रामाणिकपणा किंबहुना सर्वच आमच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाचा लौकिक जमखंडी संस्थानांत गाजत होता.
बाबांची रसवंती
मी अगदीं लहान असतांना बाबांच्या मित्रांपैकीं म्हातारबा सुतार, बसप्पा अथणी(लिंगायत) आणि बापू जामदार (मराठे) हे वरचेवर घरीं येत. नंतर मी थोडा मोठा झाल्यावर सटवप्पा सुतार आणि पांडाप्पा टर्की (ब्राह्मण वारकरी) हे येत असत. पण बाबा कांहीं फारसे कोणाचे घरीं जात नसत. आमच्या वाड्यांत सोप्याच्या उजव्या बाजूस एक चारपांच फूट लांबरुंद, स्वच्छ व प्रशस्त चुनेगच्ची कट्टा असे. ह्याला आम्ही तुळशीकट्टा म्हणत असूं. कारण पूर्वीं येथें तुळशीवृंदावन होते. ह्या कट्ट्यावर बाबा आपल्या मित्रांशीं बोलत बसत. मी आपला तेथें घुटमळत असावयाचा. कारण बाबांचें संभाषण मला आवडत असे. मला वाटतें माझे अंगीं जर कांहीं कर्तृत्व आलें असेल तर त्याचें प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीनें केलें असावें. रूपानें, रंगानें व स्वभावानें मी अगदीं बाबांचे वळणावरचा आहें, असें मला लोक म्हणत असत.
जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामीं बाबांचा पुढाकार होता. नरसप्पा नांवाचे एक रजपूत गृहस्थ फार सात्विक होते. मी त्यांना कधीं पाहिलें नाहीं. ते जमखंडीस हा पंथ काढण्यांत मुख्य होते असें मीं ऐकलें होतें.
विठोबाचा सप्ताह
आमचे घराजवळ 'आप्पासाहेबांची विहीर' म्हणून एक पिण्याच्या पाण्याची मोठी विस्तीर्ण व खोल विहीर आहे. तिचे कांठीं सटवाप्पा सुतारांचे घर व सुतारीचा कारखाना आहे आणि त्याचे समोर रस्त्याच्या दुस-या बाजूस विठोबाचा मठ आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून (ही श्रीतुकाराम बोवांची पुण्यतिथी) तों पुढच्या षष्ठीअखेर (ही श्रीएकनाथस्वामींची पुण्यतिथी) पांच दिवस आणि त्यापूर्वीं व नंतरचे दोन दिवस असा दरवर्षीं त्या मठांत भजनाचा मोठा सप्ताह साजरा केला जात असे. सात दिवस विणा रात्रंदिवस खालीं ठेवायचाच नसतो. दररोज काकडआरती, शेजारती सकाळसंध्याकाळ होई. त्यावेळीं मोठी गर्दी जमे. ३०।४० नियमित टाळकरी लंब गोलांत उभे राहात. मध्यें विणेकरी उभे राहात. दोहों बाजूंस या गोलाचे शेवटीं दोन मृदुंग्ये उभे असत. आरतीचे वेळीं भजनाच्या सोहळ्याला फार रंग येई. बीजेच्या व षष्ठीच्या आरतीचा थाट मोठा होई. कुरमुरे, नारळ व बत्तासे ह्यांनीं भरलेलीं खिरापतीचीं ताटें ऐकणारे स्त्रीपुरुष आणीत. आरतीचे वेळीं गुलाल उधळला जाई. बुक्का, उदकाड्या, कापूर यांचा घमघमाट सुटे. टाळक-यांत मुलें उभीं राहात. त्यांत मी व माझा मोठा भाऊही असें. विणेकरी हरीबा कर्जगार नांवाचे जिनगर (वारकरी) असत. आरती धरण्याचा मान बाबांचा असे. तो देखावा माझ्या डोळ्यांपुढें चित्रासारखा आहे. माझ्या धार्मिक विकासांत या भजनाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आरती संपल्यावर सायंकाळीं ६ वाजतां प्रसाद म्हणजे जेवणाच्या पंक्ति बसत. शंभर-दोनशें पात्रें तरी दररोज होत. त्यांत वाणी, मराठे, ब्राह्मण, सुतार, सोनार, जिनगर, शिंपी वगैरे जाति असत. जातीभेदाचे नियम कडक पाळण्यांत येत नसत. शेवटचे दिवशीं मोठी आरती व महाप्रसाद होऊन रात्रीं १० वाजतां दिंडीचा छबिना निघे. तो सर्व रात्रभर गांवांतून व पेठेंतून ब्राह्मण आळींत एक जुनें विठोबाचें देऊळ आहे, तेथें जाऊन सकाळीं ८!९ वाजतां परत मठांत येई.
बबलादीचे स्वामी
बाबांची मानमान्यता सर्व जातींत असे. त्यामुळें आमचे घरीं जातिभेद विशेषतः पाळण्यांत येत नसे. आमचे बाबा मराठे जातीचे सरपंच असूनही आमचे घरीं जातिभेदाची इतकी ढिलाई होती. फारतर काय ब्राह्मण, लिंगायतसुद्धां आमचेकडे येऊन जेवत. मात्र तें फार उघडपणें नसे. इतकेंच नव्हे तर पुढेंपुढें बबलादी या लिंगायत स्वामींचे आमचेकडे येणें जाणें फार झालें. तेव्हां तर उघडपणें आमच्या घरीं सर्व जातीच्या पंक्ति बसत. त्यावेळीं मी इंग्रजी ५।६ इयत्तेंत होतों. ह्या स्वामींच्यापुढें एक शिंग वाजविणारा महार असे. तोही आमचेकडे जेवत असे. बबलादीचे स्वामि एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात. हे उघडपणे दारू पीत व मांसही खात. धर्माच्या नांवावर हे सगळेच उघड चालत असे. आमचें अठरा विश्वें दारिद्र्य असूनही ही टोळधाड आमचे घरीं आठ-आठ दिवस उतरत असे. खर्च कसा चाले ह्याचें मला आश्चर्य वाटतें. त्यावेळीं मला नुसती मौज वाटत असे. पुढें मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास कॉलेजांत शिकूं लागलों. तेव्हां माझे वजन घरीं भासूं लागलें. प्रत्यक्ष बाबाही मला पाहून दबत असत. पुढें या स्वामीमंडळाचें प्रस्थ कमी होऊन शेवटीं येण्याचें अजिबात बंद झालें. तुळजापूरची आंबाबाई, सौंदत्तीची यल्लमा, पंढरपूरचा विठोबा, नरसोबाचे वाडीचा दत्तात्रय, कोल्हापूरची महालक्ष्मी ह्या मोठमोठ्या क्षेत्रांतल्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच. पण शिवाय वरील बबलादीचे स्वामि, रामदासी पंथ, गोसावी, बैरागी, अतिथी अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट आमचे घरीं सारखा चाललेला असे. मिळकत मुळींच नाहीं उलट खर्चालाही ताळ नाहीं. ह्याचा परिणाम ठरलेला झाला तो हाच कीं; शेतें गेलीं, गुरें गेलीं, घर गेलें. दागिने गेलें सर्व सावकाराचें हातीं गेलें आणि एक दिवशीं पांघरलेल्या कपड्यानिशीं आम्ही आमच्या मोठ्या वडिलोपार्जित वाड्यांतून बाहेर पडलों व भाड्याच्या घरांत जाऊन राहिलों. त्या वेळेला मला चांगलें कळत होतें. माझी मॅट्रिकची परीक्षा होऊन मीं कदाचित् पुण्यास शिकतही असेन. या सर्व करुण रसानें भरलेल्या नाटकांत मुख्य नायिकेचें पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. आतां तिच्या आठवणीस सुरुवात करतों.