प्रकरण दुसरे : पुरातन अस्पृश्यतेचे रुपनिदर्शन

बुद्धोदयकालीन अस्पृश्यता
गौतम बुद्धाचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील किंबहुना आशियाखंडाच्या इतिहासांतील एक मोठी मुहूर्तमेढ होय. कोणत्याही ऐतिहासिक विषयांचे विवेचन करावयाचें झाल्यास ह्या मेढीपासून पुढे, म्हणजे अलीकडे ऐतिहासिक काळात, व मागे, म्हणजे पलीकडे प्रागैतिहासिक काळांत, शोध करीत जावें लागतें. आणि आम्हालांही अस्पृश्यतेचा छडा लावण्यासाठी ह्या दोन भिन्न दिशांनी ह्या मेढीपासून आगेमागे गेलें पाहिजे. म्हणून प्रथम प्रत्यक्ष बुद्धोदयकालीं म्हणजे इ. स. पूर्वी ६०० वर्षांच्या सुमारास अस्पृश्यतेची उपरिनिर्दिष्ट व्याख्येच्या दृष्टीने किती प्रतिष्ठा झाली होती ते पाहू या. ह्या काळी उत्तर भारतांत चार वर्णांची आर्योनी तर पूर्ण स्थापना केली होतीच. ती वर्णव्यवस्था जवळ जवळ जन्मसिद्ध मानली जात असे. इतकेंच नव्हे तर ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोन्ही जाती डोईजड झाल्या असून त्यांच्यांत परस्पर वर्चस्वासाठी तीव्र तंटा चालू होता. स्वत: बुद्ध आणि महावीर, तसेंच त्यांचे अनुयायी, क्षत्रिय वर्णाला सर्वश्रेष्ठ मानीत आणि ब्राह्मण वर्गास त्यांचे आश्रित समजत. पुढे जी ब्राह्मणी संस्कृतीची पुराणें झालीं त्यांतही राम, कृष्ण इत्यादि अवतारी पुरुष आणि जनकादि तत्त्वद्रष्टे हे क्षत्रियच होते; म्हणून क्षत्रियांविषयीची पूज्यबुद्धि ब्राह्मणांमध्येही पुढे रुढ झालेली आढळते. तथापि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा जातिमत्सरविषयक तंटा बुद्धाच्या पूर्वीच विकोपाला गेला होता, हें पाली आणि संस्कृत वाद्यावरुन उघड होतें. ह्या दोन डोईजड वर्णेानी वैश्य नांवाच्या सामान्य आर्य वर्गालाही तुच्छ मानिलें होतें; मग आयेंतर शूद्रांची काय कथा?


स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यांति परां गतिमे । - भगवद्गीता, ९.३२ ह्या भगवदगीतेच्या उदार उद्गारावरुनच सिद्ध होतें की त्या काळी शूद्रांप्रमाणे वैश्यांचा दर्जाही ब्राह्मण-क्षात्रियांकडून कमीच मानला गेला होता. आध्यात्मिक बाबतींत स्त्रियांचा दर्जा शूद्रांपेक्षाही कमी होता. प्रत्यक्ष गौतम बुद्धालाही स्त्रीसमाजाविषयीं म्हणण्याइतका आदर नव्हता. अशा वेळी शूद्रत्वाचाही मान ज्यांना मिळाला नव्हता अशा अतिशूद्र वर्गेाची स्थिती वरील व्याख्येप्रमाणे पूर्णपणाने बहिष्कृत होती. मानीव चार वर्णोचा हळूहळू लोप होऊन हल्ली दृढ झालेल्या जाती पोटजाती ह्यांची आर्थिक पायावर झपाट्याने उभारणी चालली होती. आणि ह्या उभारणींत अतिसूद्रांना कोणत्याही वृत्तीचा अधिकार अथवा धंद्याची मान्यता दिली गेली नव्हती. अस्पृश्य जाती ग्रामबाह्य ठरून त्या वंशपरंपरागत नीच आणि व्यवहारवर्ज्य उर्फ अनाचरणीय ठरल्या होत्या. म्हणूनच ह्या सर्व अन्यायाला विरोध करण्यासाठी गौतमाचा शुद्ध बुद्धिवाद उदय पावला. त्याच्या काळीं चंडाल, निषाद, वृषल, पुक्कस(पुल्कस) इत्यादि ज्या अस्पृ्श्य आणि ग्रामबाह्य होत्या त्यांनाही तो उपदेश करी व त्यांतील कोणी योग्य दिल्यास त्यास आपल्या भिक्षुसंघांतही नि:शंक घेई. थोडक्यांत सांगावयाचे तें हें की उत्तर भारतात, म्हणजे आर्यावर्तोत, चार वर्ण आणि त्यांतील सर्व पोटभेदांचाच तत्कालीन ग्रामव्यवस्थेंत समावेश झाला होता. आणि ह्या वर्णव्यवस्थेबाहेरील अतिशूद्रांची किंवा असतूशूद्रांची गावाबाहेर पण जवळच वस्तीची व्यवस्था झाली होती. आपस्तंब धर्मसूत्र मनुस्मृतीपेक्षा आणि भगवद्गीतेपेक्षाही जुनें आहे. तें बुद्धपूर्वकालीन असावें, निदान बुद्धसमकालीन तरी असावें. त्यांत ब्राह्मणादि उच्च वर्णींयाचा स्वयंपाक सतूशूद्रांनी करावा आणि स्वयंपाक करते वेळी आचमन म्हणजे आंघोळ कशी करावी ह्याविषयी खालील नियम आहे.


आर्याधिष्ठीता वा शूद्रा: संस्कतोर: स्यु: ।।४।। तेषां स एवाच
मनकल्प: ।।५।। अधिकमहरह: केशश्मश्रुलोमनखवापनम् ।।६।।
- आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २, खण्डिका ३.


आर्यांच्या घरी स्वयंपाक करतांना त्यांच्या देखरेखीखाली सतूशूद्रांनी आर्यांप्रमाणेंच आचमन करुन म्हणजे हस्तपादादि अवयव धुवून रोज रोज केस, मिशा, नखें काढून कामाला लागावें, असा संप्रदाय होता. हल्लीही अस्पृश्य मानलेल्या बटलरांना युरोपियन साहेबांच्या बंगल्यांत हेच नियम हुबेहूब पाळावे लागतात. पुढे ह्याच आपस्तंब सूत्रांत म्हटलें आहे की..


अप्रयतोपहतमर्त अप्रयर्त न त्वभोज्यम् ।।२१।। अप्रयतेन तु शूद्रेणे उपहृतमभोज्यम् ।।२२।।


रा. सातवेळकरांनी प्रयत शब्दाचा अर्थ स्वच्छ असा केला आहे. त्यांचा अर्थ आर्योच्या नियमनाखाली आलेला किंवा वर्णव्यवस्थेत स्वीकारलेला शूद्र असाही होईल. शिकवून तयार केलेला-ट्रेन्ड-असा अर्थ होईल. अशा शिकलेल्या शुद्राने आणलेलें अन्न घ्यावें, अप्रयत म्हणजे न शिकलेल्या -अन्टे्रन्ड असतशूद्राचें घेऊ नये, आता अर्थ होतो. ह्यावरून अप्रयत शूद्र हेच ग्रामबाह्य अतिशूद्र असावेत असा तर्क होता. अशाच एका बहिष्कृत बाईजवळ तथागताने म्हणजे गौतम बुद्धाने पाणी पिण्यास मागितलें अशी एक बौद्ध कथा वर सांगितलेल्या ख्रिस्ताच्या कथेसारखीच आहे. सोपाक (श्वपच) नांवाच्या एका चांडाळाला भिक्षुसंघांत घेतलें हें प्रसिद्धच आहे. बुद्धकालीन समाजव्यवस्थेसंबंधी साधार ऐतिहासिक माहिती पाली वाड्पयावरुन तयार केलेली प्रसिद्ध बौद्धवाड्यमयसंशोधक प्रो. र्हिस डेव्हिड्स ह्यांच्या 'बुद्धिस्ट इंडिया' ह्या ग्रंथाच्या ४ थ्या भागांत चांगली मिळण्यासारखी आहे. ती पुढे यथानुक्रम आढळेल. असो.


आता आपण प्रथम ह्या बुद्धोदयकालाच्या मागे मागे अस्पुश्यतेचा छडा लावीत, प्राचीन वाड्यप्रयांत मिळतील तितके संदर्भ शोधीत जाऊं. अगदीच गति खुंटल्यावर मागे परंतु. मग तिस-या प्रकरणांत बुद्धोदयकालापुढील बौद्धकालांतील अस्पृश्यतेचें निरीक्षण करूं तदनंतर क्रमाक्रमाने अगदी आताच्या काळाला येऊन भिडू.


बुद्धपूर्वकालीन उर्फ प्रागैतिहासिक अस्पृश्यता


१. पाणिनीचा काल
संस्कृतचा आद्य व्याकरणकार पाणिनि ह्याचा काल नक्की ठरत नाही. सर डॉ. भांडारकर त्याच्या कालाचा सुमार इ. स. पूर्वी ६००-७०० असावा म्हणतात. पाणिनीच्या अष्टाध्यार्यीत पुढील सूत्र आहे.


शूद्राणाम् अनिरवसितानाम् ।
- पाणिनीय अष्टाध्यायी, २.४.१०


ह्या सूत्रावर भट्टोजी दीक्षितकृत सिद्धान्तकौमुदीत पुढील टीका आहे :
अबहिप्कृतानां ( अनिरवासितांना) शूद्राणां प्राग्वत् । तक्षायस्कारम् । पाग्राद्धहिष्कृतांना तु चण्डालमृतपा:।


हाणजे भावार्थ असा की तक्षा=सुतार, अयस्कार=लोहार वगैरे अबहिष्कृत शूद्रांच्या नांवाचा द्वद्व समास पूर्वीच्या नियमाप्रमाणे नपुंसकलिंगी आणि चंडाल मृतप इत्यादि बहिष्कृत शूद्रांच्या नांवाचा द्वंद्व समास पुल्लिंगी असा पाणिनिकृत निर्णय आहे. आमचा प्रस्तुत मुद्दा व्याकरणाचा नसून, पाणिनीच्या कालांत बहिष्कृत उर्फ निरवसित अस्पृश्यता इतकी रूढ झाली होती की तिच्या विधिनिषेधाचा प्रवेश व्याकरणाच्या सूत्रांतही आढळावा, हा आहे. निरवसित ह्या शब्दाचा अर्थ भट्टोजी दीक्षितांनी 'पात्राद् बहिष्कृत' असा केला आहे. पात्राद् बहिष्कृत म्हणजे ज्यांनी वापरलेली भांडी वरिष्ठ वर्गास चालत नव्हतीं ते असा अर्थ होता. अशा अस्पृश्यांना बंगाल प्रांतात 'अनाचरणीय जाती'  अशी संज्ञा अद्यापि आहे. 'ग्रामाद् बहिष्कृत' असा अर्थ केला असता तर आम्ही ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे पाणिनीच्या काळीं आजकालची अस्पृश्यता रूढ झाली होती असा ठाम सिद्धान्त ठरला असता. तथापि बहिष्काराचा उल्लेख, मग तो 'पात्रात्' असा की 'ग्रामात्' असो, इतका स्पष्ट पाणिनीच्या पूर्वी दुसरा मिळेपर्यंत पाणिनीच्या काळांतच आमच्या प्रस्तुत अस्पृश्यतेचें प्रस्थान ठेवणे तूर्त भाग आहे. पाणिनीचा देश हिंदुस्थानचा हल्लीच्या पश्चिम शिवेवरचा पेशावर प्रांत होता. अर्थात् हें प्रस्थान उत्तर हिंदुस्थानपुरतेंच ठरत आहे. दक्षिणेकडील अस्पृश्यतेचा विचार पुढील टप्प्यांत करुं.


२. अव्वल औपनिषद काल


चांडाल आणि पौल्कस
सुदैवाने आपल्यास बृहदारण्यकोपनिषदांतील चवथ्या अध्यायांतील तिस-या ब्राह्मणांतील २२ व्या सत्त्कांत अस्पृश्यांच्या स्थितीसंबंधी मोठा मार्मिक उल्लेख आढळतो तो असा :-


अत्र पिताsपिता भवति माताsमाता लोका अलोका देवा अदेवा वेदा अवेदा अत्र स्तेनोsस्तेनो भवति भ्रूणहाsभ्रूणहा चाण्डालोsचाण्डाल: पौल्कसोsपौल्कस: श्रमणोsश्रमस्तापसोsतापसोनन्वागतं पुण्येनानन्वागतं पापेन तीर्णो हि तदा सर्वानू शोकान्हृदयस्य भवति।


ह्याच्या पूर्वीच्या २१ व्या सूत्क्तांत आत्मस्थितीप्रत पोचलेल्या प्राज्ञ पुरुषांची जी अत्यंत उच्च स्थिती वर्णिली आहे तिचेंच वर्णन ह्या २२ व्या सूत्क्तांत अधिक विस्ताराने केलें आहे. ह्याचा भावार्थ हा कीस ह्या अत्यच्च स्थितीला पोहोचलेला पुरुष बापाला बाप म्हणून अथवा आईला आई म्हणून ओळखीत नाही, ह्या अभेद्य स्थितीत चांडालाचे चांडालत्वं पौल्वसाचे पौल्कसत्वही विलय पावतें, इत्यादि इत्यादि. म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यावहारिक स्थितीत चांडाल व पौल्कस इत्यादि भेद तेव्हा पाळले जात असत असे दिसते. बौद्ध वाक्यप्रयात या स्थितीला प्रज्ञानपारमिता असें पारिभाषिक नावं असे. जुन्या मताचे हिंदु चांडालादि वर्णबाह्य लोकांना दूर ठेवीत, केवळ प्रज्ञापारमितावस्थेंतच त्यांचा अभेद कल्पीत असत. तर उलट पक्षीं बौद्धमतवादी व्यावहारिक स्थितींतही त्यांना स्पृ्श्य मानीत असत, असें सिंद्ध होतें. बौद्ध जरी अस्पृश्यता मानीत नव्हते तरी इतर हिंदु ती मानीत असल्याने बुद्दोदयकाळी ती होती हे आम्ही वर सिद्ध केलेंच आहे. परंतु त्याच्या पूर्वी सुमारे दोनतीनशे वर्षांच्या काळात म्हणजे बृहदारण्यक व छांदोग्य ह्या उपनिषदांच्या काळांत अस्पृश्यता होती की नव्हती हे ठरविणें कठीण आहे. ह्या काळीं चांडाल व पौल्कस ह्या जाती तिरस्करणीय मानल्या जात होत्या असे उल्लेख सापडतात पण त्या आजच्यासारख्या अस्पृश्य व बहिष्कृत होत्याच असा स्पष्ट उल्लेख नाही. निदान तूर्त सापडत नाही.


ह्याच प्रकारचे दोन उल्लेख छांदोग्य उपनिषदांत आढळतात. हें उपनिषदही जवळ जवळ बृहदारण्यकाइतकें जुनें व विस्तृत आहे. ह्याच्या ५व्या अध्यायाच्या १० व्या खंडांतील ७ वा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे :-


तद्य इह रमणीयचरणा अभ्याशो ह थत्ते रमणीयां योनिमापद्येरन् ब्राह्मणयोनिं वा क्षत्रिययोनिं वा वैश्ययोनिं वाथ य इह कपूयचरणा अभ्याशो ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् श्वयोनि वा सूकरयोनिं वा चाण्डालयोनि वा ।।


अर्थ : पुण्यचरण करणारे पितृयानांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादि आर्य उर्फ शुभ योनि प्राप्त करुन घेतात व अशुभ आचरण करणारे कुत्रा, डुक्कर किवा चांडालादि हीन योनीप्रत जन्म घेतात. पुन: ह्याच उपनिषदाच्या ५व्या अध्यायाच्या २४व्या खंडांतील ४था श्लोक असा आहे.


तस्मादु हैवं विद्यद्यपि चण्डालायोच्छिष्टं प्रयच्छेदात्मनि हैवास्य तद्वैश्वानरे हुतं स्यादिति ।

 
अर्थ : ह्या खंडांत अग्निहोत्राचें महत्त्व सांगून शेवटी म्हटलें आहे की जो ब्रह्मविद् आहे त्याने चंडलाला आपले उष्टे दिलें तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुति दिल्याप्रमाणेच पुण्य आहे. ह्या दोन्ही श्लोकांचा भावार्थ बृहदारण्यकोपनिषदांतील भावार्थांप्रमाणेच आहे. एकंदरीत ह्या उपनिषदांच्या काळात आर्यांचे तीनच वर्ण होते आणि हल्लीचा जाति भेद नव्हता. हे वर्ण केवळ जन्मावरच अवलंबून नसून कर्मावरुन आणि ज्ञानावरुनही क्वचित् घडत असत. ह्या तीन वर्णांच्या बाहेरचा मोठा जो आर्येतर समाज त्यांतील कांही जाती आर्यांच्या स्वाधीन होऊन त्यांची परिचर्या करुन रहात. त्यांचा शूद्र नांवाच्या चौथा वर्ण पुढे बनविण्यांत आला ह्या चौथ्या वर्णांत समाविष्ट न झालेल्या चांडाळ व पौप्लकस इत्यादि तिरस्करणीय जाति. वर्णबाह्य अशाच राहात होत्या. यांनाच पुढे अप्रयत शूद्र अशी संज्ञा मिळून पुढे बुद्धोदयकाळीं किंवा त्याच्या आगेमागे आपस्तंब सूत्राच्या काळीं त्यांना हल्लीची अस्पृश्यता प्राप्त झाली असावी. परंतु ह्या अव्वल उपनिषतकाळीं चांडाल पुल्कस इत्यादि जाती जरी हीन मानल्या जात होत्या तरी त्या खरोखरच अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या की नाही हें ठरविण्यास निश्चित पुरावा नाही. तरी बहुतकरुन त्या तशा असाव्यात असाच अंदाज करणें जास्त योग्य होईल.


३. ब्राह्मणकालीन अस्पृश्यता
प्राचीनांत प्राचीन जें बृहदारण्यक उपनिषद त्याच्याही मागे वाडायांत ब्राह्मणकाल आहे. कृष्णजुवेंदीय तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडांत चांडाल व पौल्कस ह्या दोन राष्ट्रांचा केवळ नामनिर्देश मात्र आढळतो. पण त्यावरुन हीं राष्ट्रे अगदी अस्पृश्य व ग्रामबाह्य होतीं. असा तर्क काढण्यास मुळीच जागा नाही. त्रैवार्णिक आर्यांहून त्या भिन्न वंशाच्या होत्या. फार तर त्या किंचित कमी गणल्या जात असाव्यात इतकेंच सिद्ध होते. ह्या तैत्तिरीय ब्राह्मणाच्या कालांत पुरुषमेध करण्याची चाल अद्याप शिल्लक राहिलेली होती. पण ह्या मेघांत पूशंच्या ऐवजी ज्या पुरुषांचा बळी देण्यांत येत असे त्या पुरुषाला ठार न मारतां जिवंत सोडून देण्यांत येत असे. अद्यापि कांही अस्सल मराठ्यांच्या घरीं रानसटवाईची अथवा घोडेसटवाईची पूजा म्हणून एक विधी मूल जन्मल्यापासून त्यांचें जावूळ काढावयाच्या अगोदर करण्यांत येत असतो. हा विधी रानांतच करावयाचा असतो. रानसटवाईच्या पूजेंत बकरें जिवंत मारून त्याचा नैवेद्य सटवाईला दाखवावयाचा असतो. पण घोडेसटवाईच्या पूजेंत एक बकरें आणून त्याचा बळी देऊन ते जिवंतच सटवाईच्या नांवाने सोडावयाचें असतें. नैवेद्य व जेवण पुरणपोळीचेंच असते. माझ्या बाळपणी माझ्यामागून जन्मलेल्या सर्व भावंडांचे जावूळ काढ्यापूर्वी हा घोडेसटवाईचा विधी माझ्या वडिलांनी केलेला मी स्वत: पाहिला आहे घोडेसटवाई या नांवावरुन पूर्वी घोडे जिवंत सोडले जात असावेत पण गरिबीमुळें ती पाळी बक-यावर, कोंबड्यावर व शेवटी अंड्यावर आणि लिंबावरही आली असावी. हाच प्रकार तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडांत वर्णन केलेल्या पुरुषमेधाचाही आहे. हा पुरुषमेध म्हणजे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलांतल्या पुरुषसूक्तांतील विराट्पुरुषाच्या मेधाप्रमाणे रुपकवजाच आहे. ह्या तृतीय कांडांतील ४ थ्या प्रपाठकांत निरनिराळ्या लहान मोठ्या देवतांना निरनिराळ्या जातींच्या पुरुषांच्या बळींची विधि सांगितला आहे. ह्या देवतांच्या महत्तवाप्रमाणे पुरुषांच्या जातीचें महत्त्व अथवा लघुत्व दिसून येते. १४ व्या मंत्रांत "बीभत्सायै ( देवतायै) पौल्कसम" आणि १७ व्या मंत्रामध्ये "वायवे (देवतायै) चाण्डालम्" असे उल्लेख स्पष्ट आहेत. ह्यावरुन पौल्कस जातीचे लोक बीभत्स ( सिश्र-देवतेची) पूजा करीत असावेत व चांडाल वायु देवतेची पूजा करीत असावेत असा तर्क करावा लागत आहे. वायु देवतेचा संबंध रूद्र उर्फ शिव देवतेशीं पोहोचतो. ह्यावरुन चांडाल आणि पौल्कस आताप्रमाणेंच तेव्हाही शक्तीचीं आणि शिवाची उपासक रा्ष्ट्रें असलीं पाहिजेत' इतकेंच सिद्ध होते. ह्या पूजेचे प्रकार तेव्हा बीभस्त असते तरी ह्या जाती तेवढ्यावरुनच अस्पृश्य होत्या असा मुळीच ध्वनि निघत नाही.