प्रकरण अकरावे : राजकारण
ह्या पुस्तकाची मागील १० प्रकरणें १९३२ सालच्या आगष्ट महिन्यांतच तयार करुन छापखान्याकडे पाठविण्यांत आलीं होती. अलीकडे दोन चार वर्षांत अस्पृश्यांच्या राजकारणाला अगदी चुरशीचें स्वरुप आल्यामुळें विशेषत: महात्मा गांधीच्या १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यांतील उपोषणामुळें हें प्रकरण लिहिण्याचें लांबणीवर टाकून कांही काळ वाट पाहावी लागली. पुढे पुण्याचा करार झाला. चालू (१९३३) सालच्या मे महिन्यांत महात्माजींनी पुन: २१ दिवस उपोषण केलें. आता ह्यापुढें हें पुस्तक ताबडतोब प्रसिद्ध झालें पाहिजे. म्हणून हें प्रकरण लिहून संपविलें आहे.
अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे कांही नुसती आजकालची धामधूम आहे अशांतला मुळीच अर्थ नव्हे. हें राजकारण अस्पृश्यतेइतकेंच पुरातन आहे, असें म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति होणार नाही. माझी तर स्वत:ची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय. पहिल्या प्रकरणांत केलेल्या व्याख्येप्रमाणें अस्पृश्यतेचें संघटित स्वरुप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकासच होय. ह्या विकासाची पोलादी चौकट मागे केव्हा एकदा जी घडविली गेली, ती आजवर जशीच्या तशीच जवळ जवळ शाबूत आहे. म्हणून घडविणाराच्या दृष्टीने हिला यशस्वी म्हटलें आहे. मूळ चार वर्णाच्या कालांतराने पुढे हजारो जाती पोटजाती झाल्या, कालमाहात्म्याने त्यांचे आपसांत स्थलांतर व रुपांतरही झालें. पण ह्या चौकटीबाहेरील अस्पृश्यांवर प्रत्यक्ष काळाच्या हातूनही कांही अनुकूल परिणाम घडवितां आले नाहीत. उलट वहिवाटीच्या दाबाखाली जणूं काय ते कायमचेच दडपले गेले आहेत असें दिसतें. 'सवय म्हणजे प्रति सृष्टिच' ही म्हण सार्थ झाली आहे.
ह्या प्राचीन राजकारणाचा खडान् खडा इतिहास उपलब्ध नाही, हें खरें आहे. त्या काळचा प्रत्यक्ष जेत्यांचाच इतिहास उपलब्ध नाही, तेथे जितांचा कोठून असेल? ज्याचें सर्वस्व गेलें, त्या जितांचा इतिहास तरी कसा उरणार? असा कोण जेता आहे की जो आपल्या कृतकर्मांची कथा जशीच्या तशीच लिहून ठेवील? आणि स्वत:चा इतिहास लिहिण्याची अक्कल आणि करामत असती तर हे बिचारे आजचे अस्पृश्य जिततरी कां झाले असते? ह्या प्रकरणीं इतिहास मागणें म्हणजे बाप दाखीव नाही तर श्राद्ध कर म्हणण्याप्रमाणेंच आहे. बिचारे बाप कोठून दाखवतील? मुकाट्याने श्राद्ध करीत आहेत. झाले ! तथापि अगदी तपशीलवार इतिहास नाही तरी त्याचें दिग्दर्शन कांही अशी मागील प्रकरणांतून आलेलेंच आहे. त्यावरुनही ज्यांना अंदाज करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्यापुढे समग्र इतिहास आणून ठेविला, म्हणून तरी काय लाभणार आहे?
ह्या इतिहासाची पुनरावृत्ति जगांत वेळोवेळी पुष्कळदा झाली आहे. गेल्या पांच शतकांत अमेरिका खंडांत ती झाली आहे व हल्ली आफ्रिकेंत, आस्ट्रेलियांत वगैरे चालली आहे. यूरोपांतून सुधारलेलीं म्हणविणारी अनेक राष्ट्रें वेळोवेळीं आली. त्यांनी एतद्देशीयांचा नाश केला, त्यांच्यापैकी कित्येकांना घालवून दिलें व कित्येकांना आपल्या दास्यात ठेविलें. अमेरिकेंतील अत्याचारांचा इतिहास उपलब्ध आहे व तो प्रसिद्धही होत आहे. येथला होण्याची आशा नाही. हाच काय तो फरक. अमेरिका हें नांवही जेत्यांनी आपलें दिलें तसेंच भारत हें नांवही जेत्यांचेंच आहे. अमेरिकेंतील मूळ एतद्देशीयांचा नायनाट झाला आणि ते अगदी थोडे उरले ते उप-या जेत्यांच्या खिजमतीला खुशी अगर लायख नव्हतें, म्हणून नवीन वसाहत करणारांना आपल्या काबाडकष्टासाठी इतर खंडांतून दासांना धरुन जबरीने आणावें लागलें. हिंदुस्थानांत वसाहत करणारांची गरज येथल्या येथेच भागली. पण जोरजबरीचा मामला दोहोकडे सारखाच आहे. अमेरिकेंतील प्रकार निष्ठुर होता आणि येथला फार कनवाळूपणाचा होता असें भासविण्याचा वेळोवेळी आमच्यांतले कांही इतिहासकार प्रयत्न करितात, तो एक नुसता कोडगेपणाचा मासला आहे ह्यापेक्षा अधिक कांही म्हणवत नाही. गेल्या दहा प्रकरणांत, मलबारांत नंबुद्री आणि नायर जातींच्या जमीनदारांनी आज हजारो वर्षें तेथील चेरुमा, पुलया वगैरे अस्पृश्य जातींना किती घोर अवस्थेंत आपल्या मालकीच्या अगर खंडाच्या शेतांवर गुरांप्रमाणे राबविले आहे, ह्याचा उल्लेख आलाच आहे. त्यावरुन, ज्या ज्या काळीं अशा क्रांत्या घडून आल्या त्या काळच्या राजकारणाचें उग्र स्वरुप दिसून येणार आहे.
जगांतील राजकारणाचें मुख्य लक्षण म्हणजे बलिष्ठाने दुबळ्यावर सत्ता चालविणें हें आजकालच्या सुधारलेल्या काळांतही खरेंच आहे. ही सत्ता एकदा आपल्या हाती आल्यावर नामोहरम झालेल्या जातींनी अथवा राष्ट्रांनी पुन: आपलें डोकें वर काढू नये म्हणून त्यांचा राजकीयच नव्हे तर सामाजिक दरजाही खाली दडपून बेपत्ता करण्यासाठी सामुदायिक अस्पृश्यता हें प्राचीन राजकारणांतील एक घोर साधन आहे व हें साधन हिंदुस्थान व सरहद्दीवरील देशांत मध्ययुगांतही उपयोगांत आणिलें गेलें ह्याचा पुरावा ब्रह्मदेशाचा जो मिळतो त्याचें वर्णन सहाव्या प्रकरणांत केलेंच आहे. इतकेंच नव्हे तर बौद्ध धर्मांतून हिंदू धर्मोत, बंगाल व मद्रासकडे परत क्रांति झाली तेव्हा, ज्या पाखंडी समजलेल्या जमाती हिंदु शासनाखाली सहजासहजीं आल्या नाहीत, त्यांना हिंदु धर्मांधिका-यांच्या कारवाईला बळी पडावें लागलें. तत्कालीन हिंदु राजांनी अशा स्पृश्य जमातींना एकजात अस्पृश्य आणि बहिष्कृत कसें ठरविलें तें पांचव्या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. ह्यावरुन प्राचीन राजकारणाचा हा तोडगा, ह्या देशांत अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत बिनदिक्कत चालविण्यांत आला आहे हें दिसून येत आहे. आता आपण ह्या वर्णद्वेषाच्या पायावर उभारलेल्या राजकारणाच्या टप्प्यांचे कालानुक्रमें पुरावे म्हणून वाड्यांतून कांही उतारे मिळाल्यास पाहूं.
वैदिक कालांतील कटकट
ऋग्वेदकालीन आर्यांची शासनपद्धति कशी होती ह्यासंबंधी, कलकल्ता विद्यापीठांतील एक अध्यापक प्रफुल्लचंद्र वसु ह्यांनी Indo Aryan Polity ह्या नांवाचा इ.स. १९९१ साली इंग्रजींत एक प्रबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांतील सहावें प्रकरण, Polity ( राज्यव्यवस्था) मननीय आहे. अर्थात् ही आर्यांच्या किंवा आर्य म्हणविणा-या जमातींशीं मिळतें घेऊन राहणा-या आर्येंतर जमातीपुरतीच होती, हें सांगवयास नको. ह्या काळी आर्यांची समजली जाणारी तीन वर्णांची किंबहुना चार वर्णांची व्यवस्था बनत चालली होती. पण ह्या चातुर्वर्ण्याबाहेर ज्या आर्येतर जमाती हिंदुस्थानांत पूर्वीच ठाणें मांडून राहिलेल्या होत्या, ज्यांच्याशी आर्यांच्या लढाया होत, त्या जमाती सर्व आर्यांहून कमी संस्कृतींच्या होत्या असें मुळीच नव्हे. उलट कांही जमाती तर आर्यांहून पुष्कळ सुसंपन्न व सुसंघटित स्थितींत होत्या. कांही असो; ह्या दोन्ही दर्जांचे आर्येंतर अस्पृश्य किंवा बहिष्कृत स्थितींत मुळीच नव्हते. ते येथील मूळचे रहिवाशी किंवा आर्यांच्या पूर्वी बाहेरुन आलेले व येथे कायम वसाहत करुन राहिलेले, पण भिन्न संस्कृतीचे होते. मात्र त्यांच्याशीं आर्यांचे संधिविग्रह होऊन (१) जे आर्यांशीं समानबल किंवा अधिक सुसंपन्न होते ते आर्यांच्या तीन्ही वरिष्ठ वर्णांत गुणकर्मश: समाविष्ट झाले; (२) जे किंचित् कमी संस्कृतीचे होते ते आर्यांतील चवथा शुद्रवर्ण झणून त्यांच्यांत मिसळले; ह्याशिवाय जो मोठा कमी अधिक संस्कृत वर्ग आर्यांनी अगदी पाडाव केला (३) तोच कालवशाने पुढे अस्पृश्यत्वाप्रत पोचला; आणि (४) जो कधी विशेष संस्कृत नव्हता, आणि ज्यांचा आर्यांशी संबंधच आला नाही, किंवा ते आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर, झाडी, किनारा, बेटें वगैरेंचा आश्रम करुन दूर राहिले, ते अद्यापि त्याच स्थितींत आहेत. पण ह्या चारी प्रकारच्या आर्येतरांना वेदमंत्रांतून दस्यु अथवा दास, हें एकच सामुदायिक नांव आहे. ह्याशिवाय कित्येक विशेषणवाचक नावें ऋग्वेदांतून आढळतात, त्यांच्याशी आर्यांचा किती द्वेष होता व त्यांच्या एकमेकांशी कशा लढाया होत हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या प्रकरणाचे शेवटी ज्या ऋचा अवतीर्ण केल्या आहेत. त्यांवरुन कळण्यासारखें आहे.
ह्या परजातीच्या द्वेषाचें मुख्य एक कारण, त्यांच्या धार्मिक भावना, उपासना व आचार भिन्न असत हें होय. ह्यामुळे परकीयांना अब्रह्मा, अव्रत, अयज्यु, अश्रद्ध, अक्रतु, अकर्म, अमानुष, अदेव्य, अशा अनेक शिव्या दिलेल्या वेदमंत्रांतून आढळतात. ह्याच शिव्यांचा व द्वेषभावनांचा विकास, पुढे ज्या काळी ह्या परकीयांचा पूर्ण पाडाव होऊन ते आर्यांच्या राजकीय व आर्थिक गुलामगिरींत दडपून गेले त्या काळीं आताच्या अस्पृश्यतेंत व बहिष्कारांत झाला हें उघड आहेत.
अच्छा कविं नृमणोगा अभिष्टौ स्वर्षांता मधवन् नाधमानम् ।
ऊतिभिस्तमिषणो द्युन्नहूतौ नि मायावानअब्रह्मा दस्युरर्त ।।
ऋग्वेदसंहिता मं. ४ स्. १६. क्र ९.
ह्यांत मायावान् व अब्रह्मा म्हणजे 'जादूगार' व 'ब्रह्म म्हणजे स्तुति किंवा प्रार्थना न करणारा' अशी निंदा आहे.
न्युकतूनू ग्रथिनो मूधवाच: पनीरश्रद्धाँ अवृधाँ अयज्ञाने ।
प्र प्र तानू दस्यूँरग्निर्विवाय पूर्वश्चकारापराँ अयज्यून् ।।
ह्यांत पणी नांवाचें दस्यूंचे एक निराळेंच राष्ट्र निर्दिष्ट झालें आहे. मद्रासेकडील हल्लीचे पळ्ळ नांवाचे अस्पृश्य किंवा प्राचीन फिनिशयन त्यांच्याशीं ह्याचा संबंध येतो की काय हा संशोधनीय विषय आहे. अग्रीने त्यांचा अत्यंत नाश केला असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.
प्रान्यच्चक्रमवृह: सूर्यस्य कुत्सायान्यद्वरिवो यातवेSक:।
अनासो दस्यूँरमृणो वधेन नि दुर्योण अवृणड् मृधवाच: ।।
ऋग्वेदसंहिता
ह्यांत दस्यूंना अनास असें म्हटलें आहे. अनास=तोंड, भाषा नसलेले= म्लेच्छ, असें सायणाचार्य म्हणतात, अनास = नाक नसलेले = नकटे असें मॅक्स मूलर म्हणतात.
हे दस्यू किती जरी अधार्मिक, कुरूप व दुर्गुणी असले तरी त्यांच्याशी लढण्याची हींच तेवढी कारणें नसून, ते संपत्तिमान्, सुसंस्कृतिवान आणि सुंसघटित होते आणि त्यांच्या संपत्तीचा आर्यांना हेवा वाटत होता, हें दुसरें अधिक बलवत्तर कारण होतें. दस्यू हे किल्ले बांधून शहरांत राहत असत. आर्यांपेक्षाही ते अधिक स्थाईक झालेले होते.
इंद्राग्नी नवर्ति पुरो दासपत्नीरधूनुतम् । साकमेकेन कर्मंणा ।।
ऋग्वेदसंहिता, ३, १२, ६
इंद्र व अग्नि ह्या दोघांनी दासांच्या आधिपत्याखालील नव्याण्णव पुरें म्हणजे किल्ले एकदम पाडून टाकले. असा ह्या मंत्राचा अर्थ आहे.
प्र ते वोचाम वीर्या या मन्दसान आरुज: । पुरो दासीरभीत्य ।।
ऋग्वेदसंहिता, ४,३२,१०
मन्दसानः= सोम पिऊन माजलेला ( इंद्र )
आरुजः = ( किल्ल्याचा ) फडशा उडविला.
आभिः स्पृधो मिथतीररिषण्यन् अभित्रस्य व्यथया मन्युमिन्द्र ।
आभिर्विश्वा अभियुजो विषूचीरार्याय विशोSवतारीर्दासीः ।।
ऋग्वेदसंहिता, ६, २५, २
ह्या मंत्रांत, आर्यांभोवती दासांचा वेढा पडला आहे, किंवा आर्यांच्या वस्तीभोवताली दस्यूंच्या वसाहती आहेत: इंद्राने त्यांचा नाश करुन आर्यांच्या सेनेचें रक्षण करावें, असा अर्थ आहे.
प्र ये गावो ग भूर्णयस्त्वेषा अयासो अक्रमु: ।
व्रन्त: कृष्णामपत्वचम् ।।
ऋग्वेदसंहिता, ९,४१,१
कृष्ण नांवाचा एक काळ्या रंगाचा असूर होता, तो दहा हजार सेनेसह अंशुमती नदीचे काठापर्यंत चाल करुन आला, त्याचा पराभव झाला, त्यांच्या अंगाची कातडी सोलून काढिली, वगैरे कथा आहे. म १ सू. १३० क्र ८ पहा. अमेरिकेंतील हल्लीचा लिंचिंगचा असाच प्रकार आहे.
उत दासं कौलितरं बृहत: पर्वतादधि । अवाहन्निन्द्र शम्बरम् ।।
ऋग्वेदसंहिता ४.३०.१४
कुलितराचा मुलग शंबर ह्याला इंद्राने मोठ्या पर्वताच्या खाली ओढून मारिलें.
त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा क: प्र यच्छता सहस्त्रा शूर दर्षि ।
अव गिरेर्दोस शम्बरं हनू प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ।।
हा शंबरासुर व दिवोदोस (आर्य ) ह्यांच्यामध्यें बरीच कटकट झालेली दिसते. ह्या कटकटीला कंटाळून शंबर डोंगरी किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिला. हा शंबर, वरील कृष्ण व इतर अेक आर्येंतर नायक सुसंपन्न व सुसंघटित नेते होते. त्यांच्या संस्कृतीचा एक विशेष असा होता की ते अभिचार उर्फ चादूक्रिया वगैरे गुढविद्येंत प्रवीण होते. सुमारें २३०० वर्षांपूर्वी लिहिला गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथाच्या प्रलभने भैषज्यमन्त्रयोग: । ह्या १७८ व्या प्रकरणांत ह्या आर्येंतर राजांचा खालील पुन: उल्लेख आढळत -
बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम् ।
भण्डीरपाकं नरकं निकुम्भं कुम्भमेव च ।।
देवलं नारदं वन्दे वन्दे सावर्णिगालवम् ।
एतेषामनुयोगेन कृतं ते स्वापनं महत् ।।
यशा स्वपन्त्यजगरा: स्वपन्त्यपि चमूखला:।।
तथा स्वपन्तु पुरुषा ये च ग्रामें कुतूहला:।।
कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ), पान ४१९ वरील मंत्राचा प्रयोग केला असतां रक्षक व इतर माणसांना झोप लागते अशी समजूत होती. हा प्रयोग करण्यापूर्वी एक श्वपाकी ( मांगीण) कडून हातापायांची नखें विकत घेऊन ती कृष्ण चतुर्दशीला स्मशानांत पुरावींत. ती पुढच्या चतुर्दशीला उकरून कुठून त्यांच्या गोळ्या तयार कराव्यात. त्यामुळें सर्व निद्रिस्त होतात असें ह्याच प्रकरणांत सांगितले आहे. आंध्र देशांत जादूटोणा करणारी एक विशिष्ट अस्पृश्य जात आहे. त्या जातींच्या बायकांची मदत वरिष्ठ वर्गही अशा कार्मी घेतात असें मी त्या प्रांतात फिरत असतांना ऐकिलें आहे. ह्याच प्रकरणांत पुन: खालील श्लोक आढळतात.
बर्लि वैराचनं वन्दे शतमायं च शम्बरम्
निकुम्भं नरकं कुम्भं तन्तुकच्छं महासुरम् ।।
अर्मालवं प्रमीलं च मंडोलूकं घटोद्वलम् ।
कृष्णाकंसोपचारं च पोलोमीं च यशस्विनीम् ।।
अभिमन्त्रय्य गृहामि सिद्धार्थ शवसारिकामे ।।
कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ) पान ४२१
चण्डालीकुम्वीतुम्भकटुकसाराघ: सनीरीभगोसि स्वाहा ।
सदर, पान ४२३
हा मंत्र म्हटला असतां कसलेंही बळकट दार उघडतें आणि सर्वांना झोप लागते ! वरील मंत्रांतील पौलोमी ही चंडाली मोठी यशस्विनी होती ! अशा प्रकारें अस्पृश्यांतील प्रवीण स्त्रीपुरुषांचा गतयुगांतील राजकारणांतही उपयोग होत असें हें ह्या पुस्तकांतील उल्लेखांवरुन दिसतें.
प्रत्यक्ष वेदकाळांत अस्पृश्यता नव्हती. पण त्या काळी ज्या आर्येतर कमकुवत जमातींना आर्यांनी पाडाव केलें त्या पुढे अस्पृश्य व बहिष्कृत झाल्या. बुद्धोदयकालीं त्या पूर्णपणें ह्या हीन स्थितीला पोचल्या होत्या हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या तिस-या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. बौद्ध-जैन-काली अस्पृश्यता थोडी शिथिल झाली. पण अजीबात नष्ट झाली असें मुळीच नव्हे. गौतम बुद्धाने आपल्या भिक्षुसंघात अगदी हीन अस्पृश्यांनाही घेतलें व ते अती अर्हत् पदाला पोचले, असे पाली ग्रंथांत उल्लेख आहेत. ते असे :-
सोपाक (श्वपाक ) नांवाच्या भिक्षूच्या थेरगाथेंत सात पाली गाथा आहेत. त्यांचे मराठी भाषांतर :-
(१) प्रासादाच्या छायेंत चंक्रमण करीत असतांना नरोत्तमाला पाहून मी तिकडे गेलों, आणि त्याला वंदन केलें. (२) चीवर एका खांद्यावर करुन व हात जोडून त्या विशुद्ध सर्वसत्त्वोत्तमाच्या मागोमाग मीही चंक्रमण करु लागलों. (३) तेव्हा त्या कुशल प्रश्न विचारणा-याने मला प्रश्न विचारले आणि न भितां मी त्या गुरुला उत्तरें दिली. (४) प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल तथागताने माझें अभिनंदन केलें, व भिक्षुसंघाकडे वळून तो म्हणाला:- (५) 'ज्या अंगांचे व मगद्यांचे चीवर, पिंडपात, भैषज्य आणि शयनासन हा स्वीकारतो, तो त्यांचा मोठा फायदा समजला पाहिजे जे ह्याचा मानमरातब राखतील, त्यांनाही फायदा होतो. (६) सोपाक तूं आजपासून माझ्या भेटीला येत जा; व हीच तुझी उपसंपदा झाली असें समज.' (७) सात वर्षांचा असताना मला उपसंपदा मिळाली. आणि आता मी हें अंतिम शरीर धारण करीत आहें. धन्य धर्माचें सामर्थ्य !
सुनीत हा भंग्याच्या कुळांत जन्मला. थेरगाथेच्या बाराव्या निपातांत ह्याच्या गाथा आहेत. त्यांत ह्याचें चरित्र आलें आहे. त्याचें मराठी रुपांतर येणेंप्रमाणें :-
(१) मी नीच कुळांत जन्मलो. मी दरिद्री होतों. आणि खाण्यापिण्याचे माझे हाल होत असत. माझा धंदा हलकट होता. मी भंगी (पुप्फ छड्डुक ) होतों. (२) लोक माझा कंटाळा करीत. निदा करीत. तरी मी नम्र मनाने किती तरी लोकांना नमस्कार करीत असें. (३) अशा स्थितींत भिक्षुसंघासहवर्तमान मगघांच्या श्रेष्ठ नगरांत प्रवेश करणा-या महावीर संबुद्धाला मी पाहिलें (४) मी कावड (सोनखताची, मूळ पालींत हिला व्याभंगि असा शब्द आहे ) खाली टाकिली आणि नमस्कार करण्यास पुढे सरसावलो. केवळ माझ्या अनुकंपेने तो पुरुषश्रेष्ठ उभा राहिला. (५) त्या गुरुच्या पायां पडून एका बाजूला उभा राहून त्या सर्वसत्त्वोत्तमाजवळ मी प्रव्रज्या मागितली. (६) तेव्हा सर्व लोकांवर करुणा करणारा तो कारुणिक गुरु " भिक्षु इकडे ते" असें मला म्हणाला, तीच माझी उपसंपदा झाली. (७) तो मी एकाकी सावधानपणें अरण्यांत राहिलों, व जसा त्या जिनाने उपदेश केला, त्याप्रमाणें त्या गुरुच्या वचनाला अनुसरून वागलों. (८) रात्रीच्या पहिल्या यामांत पूर्वजन्मींची आठवण करण्यास मी समर्थ झालों. रात्रीच्या मध्य यामांत मला दिव्य दृष्टि प्राप्त झाली व रात्रीच्या पश्चिम यामांत मी तमोराशीचा (अविद्येचा) नाश केला. (९) तदनंतर रात्र संपत आली असतां व सूर्योदय जवळ आला असला इंद्र आणि ब्रह्मा येऊन मला नमस्कार करुन हात जोडून उभे राहिले. (१०) ते म्हणाले "हे दान्त पुरुषा, तुला नमस्कार असो. ज्या तुझे आसव क्षीण झाले आहेत, तो तूं, हे भित्रा ! दक्षिणार्ह आहेस." (११) नंतर देवसंघाने माझा आदरसत्कार केलेला गुरुने पाहिला, आणि स्मित करुन तो असें बोलला. (१२) "तपाने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने ब्राह्मण होतो, हेंच ब्राह्मण्य उत्तम आहे."
- प्रो. धर्मानंद कोसंबीकृत "बौद्ध संघाचा परिचय" पान २५४-५६. ही उदार वृत्ति बौद्ध भिक्षूंची झाली. केवळ ध्येयदृष्टीने पाहूं गेल्यास हिंदू धर्मांतील कांही परमहंस संन्याशांचीही वागणूक अशीच उदात्त झाली असेल. पण ह्यावरुन अशा काळी सामान्य लोकव्यवहारांतून अस्पृश्यतेचे उच्चाटन झालें होते, किंवा अशा उदार वृत्तीचा फायदा घेऊन अस्पृश्यांनी आत्मोद्धाराचें मोठें बंड उभे केलें, किंवा त्याच्या वतीने स्पृश्यांची मोठी राजकारणी अथवा सामाजिक पुनरुद्धाराची एखादी राष्ट्रीय चळवळ चालविली असे ऐतिहासिक दाखले मुळीच उपलब्ध नाहीत. इ.स. च्या १९ व्या शतकाच्या मध्यसमयी महात्मा जोतीबा फुले ह्यांनी महारामांगांसाठी शाळा काढल्या, त्यांना आपली स्वत:ची विहीर मोकळी केली, किंबहुना आगरकरांनी, त्या शतकाचे शेवटीं सामाजिक समसमानतेची आपल्या "सुधारक" पत्रात मोठी झोड उठविली म्हणून सामान्य लोकव्यवहारांत तेव्हा तादृश खऱीच क्रांति घडली असें झालें नाही; तोच प्रकार बौद्ध जैनांच्या ह्या अपवादक औदार्याचा झाला. इतकेंच नव्हे, तर पुढे जेव्हा प्रत्येक बौद्ध भिक्षुसंघांतच, ज्यांच्या हाडींमासीं वर्णाश्रम भेदभावाची संस्कृति बेमालूम खिळली होती, अशा ब्राह्मणवर्गाचा बेसुमार शिरकाव झाला तेव्हा 'महायान' नांवाचें रुपांतर घडून बौद्ध धर्मांचें हें वैशिष्टय लोपून गेलें. ह्यापुढचाही खेदकारक परिणाम असा घडला की राजकारणांत क्रांति घडून पुन: हिंदु मताभिमानी राजे व बादशहा प्रमुखपदारुढ झाल्यावर त्यांचे मंत्रिपद व गुरुपद ज्या वर्णाश्रम अतिवाद्यांकडे (extremists ) सहजच गेलें त्यांच्याकडून अस्पृश्यांच्या बाबतींत मोठी जोरीच प्रतिक्रिया सुरु झाली हें मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून ह्यांच्यासंबंधी जे निर्घुण दंडक ठरविले गेले त्यावरुन उघड दिसत आहे. ह्या दंडकांचा ऐतिहासिक पोकळपणा व कृत्रिमपणा कसा होता हें वर चवथ्या प्रकरणांत स्पष्ट झालेंच आहे. आता एवढें खरें आहे की जरी बौद्ध काळांतील सामान्य जनतेंत अस्पृश्यांच्या बाबतींत राजकीय अथवा सामाजिक क्रांति घडली असें दर्शविणारीं ऐतिहासिक उदाहरणें उलब्ध नाहीत, तरी तत्कालीन सुशिक्षित व बहुश्रुत लोकमतांत केव्हा केव्हा बरेच उदार व प्रागतिक विचार प्रचलित झाले असावेत हें पाली वाड्मयांतूनच नव्हे तर संस्कृत वाड्मयांतीलही खालील उता-यांवरुन दिसून येण्यासारखें आहे.
बौद्धांचे औदार्य अगदीच नष्टप्राय झालें असें नसून तें भगवद्गीतेसारख्या हिंदूंच्या धर्मग्रथांतूनच नव्हे तर शुक्रनीतीसारख्या राजकारणावर लिहिलेल्या ग्रंथांतूनही केवळ विचारसृष्टींत व उपदेशसृष्टीत अद्यापि चमकत आहे. चातुर्वर्ण्य हें गुणकर्मानुसार आहे. असें गीता म्हणते तशीच शुक्रनीतींत खालील शिकवण स्पष्ट आहे. ही गीता, ही निति वगैरे हल्लीच्या स्वरुपांत आढळणारी जी मनुस्मृति तिच्या काळातल्या म्हणजे बौद्ध धर्मांला उतरली कळा लागल्यावर. म्हणजे गुप्त साम्राज्यानंतरच्या इ.स. च्या ४ थ्या ५ पांचव्या शतकांतल्या किंवा पुढच्या आहेत. शुक्रनीतिसार ह्या ग्रंथांत पहिल्या व चौथ्या अध्यायांत व इतर ठिकाणींही पुढच्यासारखी विधाने स्पष्ट आढळतात.
न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैश्य एव न ।
न शूद्रो नच वै म्लेच्छो, भेदिता गुणकर्मभि: ।।३८।।
ब्रह्मणस्तु समुत्पन्ना: सर्वे ते किं नु ब्राह्मणा:?।
न वर्णतो न जनकादू ब्राह्मतेज: प्रपद्यते ।। ३९ ।।
शुक्रनीतिसार, अ. १
अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेंछ हे वर्ण जातीने झालेले किंवा होणारे नसून केवळ गुण व कर्म ह्यांच्या भेदानेच होणारे आहेत. केवळ ब्रह्मापासून झाले म्हणून काय ते सर्व ब्राह्मण झाले ? ब्राह्म तेज कांही केवळ वर्णापासून किंवा बापापासून ठर नाही.
त्यक्तस्वधर्माचरण निर्घुणा: परपीडका:।।
चंडाश्च हिंसका नित्यं म्लेच्छास्ते ह्यविवेकिन: ।। ४४
सदर , अ. १
अर्थ - ज्यांनी आपलें कर्तव्य सोडलें, जे निर्दय, परपीडक, उग्र, नेहमी हिंसा करणारे, अविवेकी तेच म्लेच्छ होत. चवथ्या अध्यायाच्या तिस-या प्रकरणाच्या आरंभी, जे सनातन देशधर्म, जातिधर्म आणि कुलधर्म आहेत त्यांची धारणा राजाने करावी; कारण तोच एक देव आहे दुसरा देव नाही, असें म्हटलें आहे; व पुढे प्रस्तुत जातिभेदाची मीमांसा अशी केली आहे.
चतुर्धा भेदिता जातिर्ब्रह्मणा कर्मभि: पुरा ।
तत्तत् सांकर्यसांकर्यात् व्रतिलोमानुलोमत: ।।
जात्यानन्त्यं तु संप्राप्तं तद् वत्कुं नैव शक्यते ।।१२
यन्ते जातिभेंद ये मनुष्याणां तु जन्मना ।
त एव हि विजानन्ति पार्थक्यं नामकर्मभि:।।१३
कर्मणोत्तरमनीश्वत्वं कालतस्तु भवेग्दुणै: ।
विद्या कलाश्रयेणैव तन्नाम्ना जातिरुच्यते ।।१५
अर्थ : पूर्वी देवाने चारच जाती निर्माण केल्या. प्रतिलोम अनुलोम संकारमुळें ह्या मूळ जाती आता अनंत झाल्या आहेत. त्यांची आता व्याख्या करणें केवळ अशक्य आहे. जन्माने जे जाती मानतात त्यांनाच पृथक्पणें ह्या जातींचीं नांवे व कामें माहीत असावीत! ( हा औपरोधिक टोमणा दिसतो !) पण खरें पाहतां कर्मापासूनच उत्तमपणा नीचपणा अंगी येतो व कालांतराने ह्या कर्मज संस्कारांचे स्वभावगुणांत रुपांतर होतें. म्हणून विद्या आणि कलांच्या आश्रयामुळेच त्या त्या जातीची घटना तयार होते.
येणेंप्रमाणें शुक्राचार्यांच्या नांवावर विकणारा ह्या मध्ययुगीन ग्रंथाचा कर्ता बराच प्रागतिक मताचा दिसतो व तो स्वत: वर्णाश्रमधर्माभिमानी असूनही बौद्ध विचारांच्या वळणाचा दिसतो. ह्याचीं विधानें नुसती तात्त्विकच नसून राजकारणांतही तो स्पष्टपणें प्रागतिक, शुद्ध बुद्धिवादी आणि निर्विकार आहे. सैन्याची भरती करतांना व सेना पतीची निवडणूक करतांना कोणत्या तत्त्वावर ती करावी हे सांगतांना याने दुस-या अध्यायांत असें स्पष्ट म्हटलें आहे.
नीतिशास्त्रास्त्रव्यूहादिनतिविद्याविशारदा: ।
अबाला मध्यवयस: शूरा दान्ता दृढाड्गका: ।।१३७
स्वधर्मनिरता नित्यं स्वामिभक्ता रिपुद्विष: ।
शूद्रा वा क्षत्रिपा वैश्या म्लेच्छा: संकरसंभवा: ।। १३७
सेनाधिपा: सैनिकाश्र्च कार्य्या राज्ञा जयार्थिना ।। १३९
अर्थ : नीति, शास्त्रें, अस्त्रें, व्यूह ( सैन्याची मांडणी ) जाणणारे, लहान नव्हेत व म्हातारे नव्हत असे मध्यवयाचे, शूर, आत्मसंयमी, बळकट शरीराचे, केवळ आपल्याच कर्तव्यांत निरंतर लक्ष्य घालणारे, स्वामिभक्त व शत्रूला कधीही फितूर न होणारे, अशांनाच जय चिंतणा-या राजाने सैनिक व सेनापति म्हणून निवडावें. मग ते जन्माने शूद्र असोत क्षत्रिय, वैश्य, किंबहुना मिभ्र जातीचे म्लेच्छही असोत ! केवळ लष्करी खात्याचेंच नव्हे तर मुलकी राज्यव्यवस्थेचे धोरण ठरवितांनाही ह्या शुक्राचार्यांनी स्पष्ट म्हटलें आहे :
व्यवहारविद: प्राज्ञा वृत्तशीलगुणान्विता: ।
रिपौ मित्रे समा ये च धर्मज्ञा: सत्यवादिन: ।। १६६
निरालसा जितक्रोधकामलोभा: प्रियंवदा: ।
सभ्या: सभासद: कार्या वृद्धा: सर्वासु जातिषु ।।१६७
शुक्रनीतिसार, अ. २ (पृ. १३६)
लष्करांतील निवडणुकीहून भिन्न तत्त्वांवर दिवाणी आणि मुलकी कार्यसभेंतील सभासदांची निवड सांगितली आहे. पण तींत सर्व जातीतून वरील सद्भणी माणसें निवडावीत असें स्पष्ट म्हटलं आहे. हे सर्व खरें असलें तरी ह्या उदार धोरणाची अम्मलबजावणी प्रत्यक्ष अस्पृश्य मानलेल्या ग्रामबहिष्कृतांच्या वाट्याला कितपत आली होती ह्यांची उदाहरणें दाखविणारें तपशीलवार ऐतिहासिक वाड्मय ह्या मध्ययुगीन काळांतील तूर्त तरी उपलब्ध नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. इतकेंच नव्हे तर ह्या उदारमतवादी ग्रंथांतही मधून मधून मनुस्मृतिकारांना शोभणारे खालच्या प्रमाणें पक्षपाती विचार कालमाहात्म्याने चमकतात हा मोठा चमत्कार आहे ! आणि तेंही ह्या दुस-याच अध्यायांत !! नौकरी आणि पगार देतांना शूद्र आणि ब्राह्मण ह्यांमध्ये तारतम्य कसें राखावें हें निर्भीडपणें ठऱविलें आहे !
अन्नाच्छादनमात्रा हि भूति: शूद्रादिषु स्मृता ।
तत्पापभागन्यथा स्यातू पोषको मांसभोजिषु ।। ४०१
यद् ब्राह्मणेनापह्तं धनं तत् परलोकदम् ।
शुद्राय दत्तमपि यच्चरकायैव केवलम् ।। ४०२
अध्याय २ ( पान १९५)
अर्थ : शूद्र नोकरीस ठेवावयाचा झाल्यास नुसतें पोटाला अन्न आणि पाठीला वस्त्र इतकेंच द्यावें. मांस खाणा-यांना ह्यांहून जास्त वेतन दिल्यास धन्याला पाप लागतें ! ब्राह्मणाने एखाद्याच्या घरचें धन चोरलें तरी ज्याचें धन गेलें त्याला स्वर्गप्राप्ति घडते. पण शूद्राला हात उचलून कांही दिलें तर उलट देणारा केवळ नरकालाच जातो !
"शूद्राला सामर्थ्य असलें तरी त्याने धनसंचय करु नये; असा श्रीमंत झालेला शूद्र ब्राह्णाला बाधा करितो." ह्या मनुस्मृतीच्या शिकवणीची ( मागे पृ. ६० पहा) ही अस्सल नक्कल दिसते. राणीच्या जाहीरनाम्यांत अघळपघळ समसमानता जाहीर करुन प्रत्यक्ष किफायतीच्या कामावर नेमतांना विलायतेहून आलेल्या अस्सल गो-या बाळांची ज्या धोरणामुळे वरणी लागते तें पाश्चात्यांनी ह्या शुक्रनीतींतूनच जणूं उचललें आहे की काय, अशी क्षणमात्र शंका येते !
सुमारे ख्रिस्ती शकाच्या ५०० वर्षांनंतर हिंदुस्थानांत बौद्ध धर्मास कायमची उतरती कळा लागून वर्णाश्रमाच्या पायांवर ब्राह्मणी उर्फ शब्द संस्कृतीच्या सनातनी म्हणविणा-या दुहीप्रिय सोवळ्या हिंदुधर्माची घडी कायम बसल्यावर बहिष्कृत अस्पृश्यतेचें उच्चाटन होण्याची शेवटची आशा नष्ट झाली. इतकेंच नव्हे तर हजारों वर्षांच्या सवयीने मानीव अस्पृश्यांना देखील ह्या सोवळ्या धर्माने ठरविलेली अत्यंत हीन स्थिति आपला स्वभावच आहे असें वाटूं लागलें. त्यांतच तृप्त राहणें हाच आपला स्वधर्म असून त्याच्या उलट प्रयत्न करणें मोठा अधर्म आणि सामाजिक गुन्हा होय अशी त्यांची स्वत:ची मनोरचना झाली. मग अशा अभाग्यांचे स्वतंत्र राजकारण तें काय उरणार? जगाच्या कृत्रिम इतिहासांत जें आजपावेतों चमकत आलें आहे असें राजकारण चट सारें जेत्यांचेंच असणार. जितांच्या राजकारणाला वाव तरी कसा मिळणार !
चुकून माकून अपवाद म्हणून कदाकाळीं वाव मिळालाच, तरी त्याला लेखी इतिहासांत प्रवेश कसा मिळणार ? ही अपवाद घटना जितकी मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे, तितकीच सृष्टिक्रमाच्याही उलट आहे. कारण मानवी स्वभाव हा तरी एक सृष्टिक्रमच आहे ना ? ह्या क्रमाला स्थितीस्थापकतेच्या दडपणाखाली गारद झालेला हिंदुस्थआनच कसा अपवाद होणार ? असो. धर्मक्रांति आणि राजक्रांति हीं जुळी भावंडेच होत. धर्म म्हणून जो शब्द येथे योजिला आहे, त्याचा अर्थ मतलब येवढाच खऱा आहे. शुद्ध अध्यात्मांत क्रांतीला वावच नाही. तें स्वयंभू स्वप्रकाशित आणि निरंतर सरळ उन्नतीच्या मार्गानेच जाणारें असतें. त्याच्या उलट धर्म म्हणून जो रज आणि तमोगुणाचा प्रकार आहे, तो राजकारणाहून मुळीच भिन्न नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि वरुन भिन्न भासणारे किती तरी बैल ह्या धर्म उर्फ राजकारणाच्या गाड्याला जुंपले असले, तरी गाडा एकच आहे. ह्या सर्वांची आपसांत एकी असते, तोंवर हें गाडें सुरळीत चाललेलं दिसतें. वितुष्ट माजलें की क्रांति झाली असें इतिहासांत नमूद होतें.
हिंदुस्थानांत अशा क्रांत्या वेळोवेळी झाल्या आहेत. पण ज्या क्रांत्या वर्णव्यवस्थेच्या अभिमानी चालकांनी घडवून आणिल्या त्यांना बहुतकरुन क्रांति हें नांव मिळत नाही. ज्या वर्णव्यवस्थेच्या उच्छेदकांनी घडवून आणिल्या त्या एक तर यशस्वी झाल्या नाहीत, आणि जो त्यांचा भाग यशस्वी झाला तो इतर सामान्य विकासांत असा बेमालूम समरस झालेला आहे. की त्याला ही क्रांती हें नांव मिळत नाही; कारण त्याची क्रिया हळू व अदृश्य पद्धतीने घडलेली असते. म्हणून ती कोणाच्याही डोळ्यावर येऊं शकत नाही. अर्थात् कृत्रिम इतिहास तर अशा विकासाला बोलून चालून डोळ्यांआडच राखणार. येरवी त्याला तरी कृत्रिम हें नांव कोण देऊ शकेल?
राजपूर, जाठ, गुरखे, मराठे, कुणबी, चित्पावन, नंबुद्री, नायडू, मुदलियार, नायर, पाळेगार (पळ्ळीकार), बेडर (व्याध), इ. कांही उप-या जमाती, आणि येथे अगोदरपासूनच मिरासीचें ठाणें मांडून बसलेल्या कांही इतर जमाती, बरावाईट पराक्रम अथवा निदान अतिक्रम तरी करुन आता हिंदुधर्माच्या पोलादी चौकटींत वरिष्ठ पदवी पटकावून आहेत. पण ह्या सर्वांच्या आधी येथे असलेले. जे एखादा पादाक्रांत झाले त्यांना मात्र पुन: पराक्रम करावयाला वाव मिळावा नाही, म्हणून ते आज ह्या चौकटीच्या बाहेर पण हद्दीवरच गुलामगिरींत दिवस कंठीत आहेत. आणि ज्या प्राचीन जमाती पराक्रम नाही तर नाही पण नुसता अतिक्रम करुनच रानावनांतून अद्यापि आपली पोटें जाळीत आहेत त्यांची गणना "गुन्हेगारी जाती" ह्या सदरांत होत आहे. असो, कसे कां होईना; अनादि किंवा सनातन हिंदु संस्कृतीचा हा गांवगाडा ह्या खंडवजा अवघड देशांत, आरबस्थानांत ७ व्या ८ व्या शतकांत इस्लामी धर्माचा उद्रेक होईपर्यंत, कसाबसा रखडत चालला होता. एकाएकी ह्या इस्लामी परचक्राच्या टोळधाडी ह्या गाड्यावर येऊन आदळूं लागल्यापासून ह्या देशाला आधुनिक युग प्राप्त झालें. ह्या युगांत तरी अस्पृश्यता नष्ट झालीं नाही तें मुळीच नव्हे, जिचें निवारण बौद्धाच्या मवाळी औदार्याने झालें नाही तें मुसलमानांच्या कठोर अत्याचाराने थोडेंच होणार आहे. तलवारीच्या जोरावर मुसलमानांनी आपला धर्म व संस्कृति हिंदूमध्ये पसरली असाही बोलवा आहे. तो खरा असो खोटा असो. येथील मानीव अस्पृश्यतांमध्ये जें इस्लामी जुलमामुळें धर्मांतर झालें. त्याचें प्रमाण उत्तर हिंदुस्थानांन पंजाब, संयुक्तप्रांत, बंगाल वगैरे प्रांतात ज्या मानाने पडतें त्या मानाने नर्मेदेच्या दक्षिणेस मुळीस पडत नाहीं हें खरें. ह्याची कारणें तीन. एक, उत्तर हिंदुस्थानांत, विशेषत: बंगाल्यांत व बहारांत बौद्ध धर्मसंप्रदाय फार दिवस जीव धरुन होता. त्याला शेवटची गचांडी ह्या मुसलमानांच्या स्वा-यांनी दिली. ह्या धामघुमींत जे बौद्ध समाज मुसलमानी संप्रदायांत शिरले ते वाचले.
ज्यांनी मागे बौद्धच राहण्याचा आग्रह धरिला ते नवे अस्पृश्य कसे बनले, तें वर पांचव्या प्रकरणांत सविस्तर सांगण्यांत आलें आहे. दुसरें कारण असें, की उत्तरेपेक्षा दक्षिणेकडील अस्पृश्यता अधिक दृढमूल आणि उग्र स्वरुपाची होती. म्हणून तिला बळी पडलेल्या हीन जातींकडे इस्लामची नजर गेली नाही किंवा तिच्या संख्याबलाची मातबरी मुसलमानांनाही फारशी वाटली नाही. तिसरें कारण असें की उत्तरेइतका जोम व करारीपणा स्वत: मुसलमानांतच दक्षिणेकडे आल्यावर राहिला नाही; म्हणून इकडे आलेल्या मुसलमानांना स्वत: हिंदूंच्या पोलादी चौकटीर्शीच तारतम्याने आणि गोडगुलाबीने वागावें लागलें हें इकडील वहामनी राज्यांतील बादशाहांच्या नरमपणावरुनच उघड होतें. कांही असो, मुसलमानांच्या हादळ आपट अमलाखाली येथील अस्पृश्यांनी मुसलमानी धर्माचा आश्रय घेतल्यामुळें जी त्यांची संख्या कमी झाली असेल, त्याहूनही ह्या निराश्रित व बेबंदशाही धामधुर्मीत घडलेल्या धर्मंक्रांतीमुळे व नवीन हिदुधर्मांच्या जुलुमामुळें नवीन अस्पृश्यांच्या भल्या मोठ्या संख्येचीच अधिक भर पडली हेंच खरें आहे. जे मुसलमान झाले, ते राजमान्य झाल्यामुळें प्रतिष्ठित स्पृश्य झाले. त्यांचे जे राजकारण झालें असेल त्याचा अस्पृश्याच्या राजकारणाशीं ( जो आमच्या प्रस्तुत विषय आहे ) अर्थाअर्थी मुळीच संबंध नाही. आणि मागे जे अस्पृश्यच उरले, ते जितांचे जित ह्या नात्याने दुहेरी गुलामगिरींत रुतून पडले. मग अशांचे राजकारण तें काय करणार? जेथे ह्यांच्यावर आजपर्यंत जय गाजविणारांची तोंडें खाली झाली, तेथे ह्या गरीबांनी तोंडें कशीं वर करावी? अकबरासारख्या प्रथम प्रथम जम बसविणा-या बादशहांनी आपलें बूड जड करण्यासाठी हिंदूंना कितीही लष्करी व मुलकी कामगि-या दिल्या असल्या तरी त्यांनी. अशा ह्या दुहेरी गुलामांपैकी ज्यांनी आपला हिंदुपणा उर्फ अस्पृश्यता कायम राखिली अशांत आचारी, पाणके आणि हलालखोर ह्यापलीकडे फारसें जवळ केलेलें दिसत नाही. ह्यापलीकडे फाजील दया दाखविणें व्यवहाराला जरूर नव्हतें; आणि जरी कोठे अशीं अपवादक व व्यक्तिविषयक उदाहरणें घडलीं असली, तरी बेगुमान बखरकारांना अशा अपवादक उदाहरणांची तमा थोडीच वाटणार आहे? अशा अनेक कारणांमुळे मुसलमानांची कारकीर्दही आमच्या या प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने अगदी सुनीसुनी भासत आहे, हें खरें !
अस्पृश्यांच्या राजकारणाचा माग काढीत काढीत आम्ही येथवर मुसलमानी अंमलाच्या अखेरीस आलों. तरी हें राजकारण मृगजलाप्रमाणे आमच्या डोळ्यांपुढे लांबच दिसत आहे, पण हातांशी प्रत्यक्ष लागत नाही. ह्या वेळीं देशांत आणखी एक राज्यक्रांति घडली. तिला आम्ही आमचे मनाच्या समाधानासाठी क्षणभर स्वराज्य म्हणूं या. हे स्वराज्या जरी शिराळशेटी थाटाचें औढ घटकेचें ठरलें, तरी तें शिराळशेटाप्रमाणें केवळ काल्पनिक नसून खरेंखुरें व ब-याच दृष्टीने अभिमानास्पदही होतें. ह्या पर मिळालेल्या स्वराज्यांत तरी अस्पृश्यांची आर्थिक व राजकीय स्थिती कशी होती तें आता पाहूं या.
ज्याला आम्ही वर स्वराज्य म्हटलें त्याचें एक मुख्य लक्षण, महाराष्ट्रांत देशी उर्फ मराठी वाड्म्याचा उदय, हें होय. ह्या वाड्मयांत मानभावांचे व पुंढरपूर संप्रदायाचे नुसते धर्मग्रंथच नसून ऐतिहासिक बखरी, सनदा, महजर, टिपणें वगैरे अमूल्य महाराष्ट्राच्या इतिहासाचीं साधनें आहेत. ह्या मराटी वाड्मयांचे महत्त्व संस्कृत पौराणिक वाड्मयाहून भिन्न व अधिक भरीव अर्थाचें आहे. हें इतिहासाला तारक व बोधक आहे. पुराणांप्रमाणे इतिहासाला भ्रामक किंबहूना मारक नाही. ह्यांतून मिळतील ते उतारे घेऊन आमच्या विषयाची संक्षेपाने सजावट करणें भाग आहे.
मनुस्मृति, पुराणें वगैरे धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहतां अस्पृश्य मानलेल्या जाती असून नसल्याप्रमाणेंच होत्या. पण खरा प्रकार असा नसून महाराष्ट्राच्या पुरातन ग्रामसंस्थेत ह्या पुरातन जातींचे महत्त्व अद्याप जीव धरुन होते. त्यांतल्या त्यांत महार जात महाराष्ट्रांत मुख्य बलुतेदार म्हणूनच नव्हे तर वतनदार म्हणून नांदत होती; ह्यासंबंधी जे पुरावे अद्यापि तुरळक आढळतात, ते फार महत्त्वाचे आहेत. ह्या संबंधी योग्य संशोधन झाल्यास मी म्हणतों त्याप्रमाणें महाराष्ट्राची पहिली वसाहत महारामांगांची असून पुढे ती मराठ्यांनी बळकावलेली आहे, हें सिद्ध होण्याचा पुष्कळ संभव आहे. मूळ ज्यांनी गांव वसवावा त्यानेच त्या गांवाचा पाटील व्हावें आणि तत्कालीन जी कोणी मध्यवर्ती राज्यसत्ता असेल तिच्याशीं जुळतें घेऊन गांव राखावा. हिला राजवाड्यांनी 'गणराज' पद्धति म्हटलें आहे. ही पद्धति महाराष्ट्राची, मराठे येथे येण्यापूर्वी व आल्यावरही चालत असली पाहिजे. मराठे येण्यापूर्वी जे गांवाचे वतनदार पाटील होते ते मराठ्यांपुढे हार खाऊन त्याचे अव्वल बलुतेदार आश्रित होऊन राहिले. येरवीं आजही गांवाला अगदी लागून असलेल्या अस्सल प्रतीच्या जमिनी मद्दारकी वतनाच्या काय म्हणून असाव्यात? ह्याचें एकच कारण की गांवचे आणि राष्ट्राचें नवीन मालक जरी हे अधिक सुधारलेल्या शिस्तीचे मराठे झाले तरी त्यांनी देशाचे लष्करी संरक्षणाचा अधिकार मात्र आपल्याकडे ठेवून, उरलेले स्थानिक संरक्षणाचे उर्फ पोलिस अधिकार ह्या मूळ मालक लढाऊ जातीकडेच राखिले असावे. म्हणून महार जागला हा नुसता मुलकी बलुतेदार नसून राजकारणी पोलीस-कोतवाली हक्काचा ग्रामाधिकारी-मराठ्याहून पुरातन असावा असें दिसतें. इतकेंच नव्हे तर ब-याच गांवच्या पाटीलक्या ह्या महारांच्या होत्या. त्या इतरांनी कालवशात् कशा बळकावल्या ह्याचें एक उदाहरण खालि दिलें आहे. ह्याचप्रमाणे हवेली तालुक्यांतील देहू गावची पाटीलकी व भीमथडी तालुक्यांतील बाबुर्डी गांवची पाटीलकी मूळ महारांची आहे असे कांही महारांचे म्हणणें माझ्या कानीं आलें आहे. अशा वतनाचा वाद माजला असतां, अव्वल मराठेशाहींत कोणतें तरी दिव्य करुन आपला हक्क दिवाणांत शाबीत करावयाचा रिवाज असे. खालील उता-यावरुन 'धार दिव्य' म्हणजे लढाईत तलवार गाजविण्याचें दिव्य करुन ताब्यांतून गेलेल्या पाटीलकीचे हक्क महारांनी पुन: मिळविले अशी साक्ष पटते.
नानेवाडीचा महार पाटील व किल्ले वैराटगड
भारत-इतिहास-मंडळाचें सप्तम-संमेलन-वृत्त पान ५४ वर संशोधक शकंर ना. जोशी वाईकर ह्यांनी पुढील महत्त्वाच्या एका महजराचा शोध लावल्यासंबंधाचे स्पष्टीकरण प्रसिद्ध झालें आहे.
एका महार वीराचें धारदिव्य
"छत्रपति संभाजीनंतर मराठेशाहींत अव्यवस्था होऊन ती मोडकळीस आली असतां महाराष्ट्रांतील ब्राह्मण, मराठे, प्रभु वगैरे सर्व जातींनी स्वराज्यप्रेमाने एकदिलाने व मृत्सद्देगिरीने नेटाचे प्रयत्न करुन अनेक संग्राम करुन, मराठेशाहीस सावरुन धऱिलें व तीस बळकटी आणिली. त्या कामीं मराठे, ब्राह्मण, प्रभु ह्याप्रमाणेंच स्वराज्यप्रेमी महारांनीही संग्राम, पराक्रम केले.....
"मौजे नागेवाडी प्रांत वाई येथील कदीम पाटीलकी मूळची महाराची. छत्रपती राजारामाचे वेळीं महजूर सेटी बिन नागनाक महार हा पाटील होता. त्याने नागेवाडी येथील नागवड सिद्ध ह्या देवाची पूजा करुन राहण्याकरिता धांडेघर व गौडाली येथील मोरोजी व चिंतामणी हे दोन गुरव आणिले. हे दोन गुरव येऊन राहिल्यानंतर त्यांनी पाटलाशीं 'मारेचुरे' करुन त्याची पाटीलकी बळकावली. तेव्हा सरद पाटलाने गुरवाविरुद्ध परशरामपंत प्रतिनिधीकडे फिर्याद केली. प्रतिनिधींनी गुरवास बोलावले, पण ते आले नाहीत. तेव्हा प्रतिनिधींनी सिवधडे ह्यास (म्हणजे नागेवाडी जवळील गावचे मुकदमास ) विचारलें. त्यांनी पाटीलकीचें वतन महाराचेंच, गुरवांनी देव पूजून असावें; पाटलकीस त्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही असा महार पाटलाचे बाजूचा निकाल दिला. उभयतां गुरवांनी पुन: छत्रपतीकडे फिर्याद नेली. त्यावेळी छत्रपति रांगण्यास होते. तेव्हा ही पाटीलकीची फिर्याद पुन: आलेली पाहून राजारामांनी महारास धार दिव्य करण्यास सांगितले. म्हणजे मोंगलांनी घेतलेला वैराटगड ( हा वाईजवळ आहे ) स्वराज्यास जोडून द्यावा व पाटीलकीचें वतन अनुभवावें असा निकाल दिला. त्या वेळी मोगलांनी एकएक किल्ला घेऊन पुढे जावें व मागून मराठ्यांनी तेते किल्ले स्वराज्यास जोडावे असे चालू होतें. अशांतच वैराटगड हा नागेवाडीच्या महारांनी मोंगलाशी लढून घेतला व पाटीलकीचे वतन मिळविलें. ह्या पाटीलकीच्या वतनाबद्दल नागेवाडीच्या गुरवामहारांमध्ये तीन वेळां फिर्यादी झाल्या. तीनही वेळीं महाराचेंच वतन ठरलें. शेवटची फिर्याद शके १६७४ मार्गशीर्ष शु. ४ इ. स. १७५३ दिजंबर, ता. ९ रोजी होऊन अखेर निकाल झाला."
हा माझा नुसता मुलकी पाटीलकीचा हक्क. मेटे-नाइकी म्हणून एक केवळ लष्करी हक्क आहे. प्रत्येक डोंगरी किल्ल्याच्या शिंबदी संरक्षणासाठी किल्ल्याच्या उतरणीवर ठिकठिकाणीं जेथे थोडी सपाटी असेल तेथे कायम वस्ती करण्यांत येत असे. त्याला मेट्ट=भेटें अशी संज्ञा असे. हा मूळ शब्द कानडी आहे. हे मेट्टकर बहुधा महारच असत. उदाहरण -
मेटे नाइकी
भा. इ. सं. मंडळ पुरस्कृत शिवचरित्रसाहित्य खंड ३ रा पान १९७ वर लेखांक ६०९ ह्या बाबतींत महत्त्वाचा असा आहे :-
शके १६६८; इ.स. १७४६
"करीना (हकीकत) खंडनाक वलद रामनाक महार मौजे करंजिये त. भोर ता. रोहीडखोर लेहोन दिल्हा ऐसाजे. इदिलशहा निजामशहाचे कारकिर्दीस किल्ले रोहिडा येथे आपले बापाचा चुलता काळनाक महार मौजे मजकूर व येसनाक महार सोंडकर ह्या दोघांच्या नाइक्या होत्या. ते समयीं वतनदारीचे चाकरीस कमळनाक महार मौजे नाटंबी ता. मजकूर व वाडी व धावडी ता. उतरोली हे दोघेजण दुतर्फाचे ( किल्ल्याच्या दोन्ही बाजूच्या उतरणीवर ) महार होते. निमे निमे प्रमाणें उत्पन्न घेऊन चाकरी करुन होते. त्या दोघांनी बदमामली (कांही गैरवर्तणूक) केली म्हणून अजम सेखजी किल्लेदार किल्ले रोहिडा यांणी दोघाचीं डोचकीं मारावीसीं केली व मुलें बाळे ढाणकासी ( ढाण्या वाघास खाण्यास रानांत सोडणें !) द्यावीसीं केली. ते सोंडकरानें रदबदली करुन कमळनाक महार मौजे नाटंबी यासी आपले हातीं घेऊन खंड कबूल केला. वाडी धावडीचा महार अटकेंत होता त्यास खंडाचा पैका न मिळे, याकरिता त्यास सर्जा बुरुजाच्या (रायगड) खाली पायांत घालावयाचा हुकूम महाराजांनी केला. त्यावरुन... घातला. त्यावरी काळनाक व सोंडकर महार मयत झाला. पोरांडा झाला. त्यावरी रामनाक आपला बाप गावावरी आला त्याणें रायगडास जाऊन महाराज राजश्री कैलासवासी पूर्वीचा दाखला मनास आणून पूर्ववतप्रमाणे सनद दिली. ते किल्ल्यास आणिली; मेटे ( ठाणी उतरणीवरची ) वसविली. नाइरी वतनदारी चालवूं लागला. पुरातन घरठाणा बांधला, टाके पाणी खावयासी एक दिल्हे... त्याचा लेक आपण. भोजनाक राजाणी वस्ती वाडी ता. उत्रोली त्याची लेकी लग्नाची केली. ते लहान म्हणोन त्याचे घरी येते ठायी राहिलों. वतनदारीची चाकरी व किल्ल्याची नाइकी करीत होतों.... आपण वेगळा निघालों तेव्हा भोजनाक कजिया करु लागला. दसरीयाचे शांतीच्या टोणग्याचे सीर आपले वडील व आपण घेत. भोजनाकाने कजीयाखाले सीर नेत होता. त्यास आपण दोही दिली. त्यातागाईत दरवाजानकीक श्री. जननीजवळ टोपगीयाचे सीर पुरुं लागला."
रा. जोशी ह्यांनी वर दिलेल्या स्पष्टीकरणापुढे आपल्याला सापडलेला मूळ अस्सल महजर जोडला आहे. त्यांत सरकारी दिवाणांतून व गांवचे गोताकडूनही मंजूरी वेळोवेळी कशी मिळत गेली ह्याविषयी स्पष्ट उल्लेख आहेत.
हे गोत म्हणजे केवळ वादी प्रतिवादीचे वारसदार नातेवाईकच नव्हत. तर ज्या व्यक्तींच्या अथवा गांवांच्या हद्दीबद्दल अगर इतर हक्काबद्दल तंटा माजून दिवाण उर्फ पंचायत भरविण्यांत येई. तिच्यांत भाग घेण्यास त्या त्या गांवांच्या सर्व लहान थोर जातींचीं वडील माणसें जमविण्यांत येत असत, त्या सभेत 'गोत' अशी संज्ञा असे. व अशा गोतांत महारही प्रामुख्याने बसत. ह्याला उदाहरण खालील गोत दिलें आहे. त्यांत प्रत्यक्ष छत्रपती मातोश्री जिजाबाईचे शेजारी बापनाक भिकनाक महार आढळतो.
गोतांत महाराचा समावेश
मराठ्यांच्या इतिहासाचीं साधने खंड १६ कानदखोरे मरळ देशमुख प्रकरणी पान ३७ वर लेखांक २२ असा आहे.
"महजरनामा सके १५८८ पराभव नाव सवछरे माघ सुध दसमी वार गुरुवार तदिनी हाजीर मजालसी गोत व मातृश्री आवाजी ( जिजाबाई श्रीशिवाजीची आई) स्थळ मुक्काम सों. धानीब ता. कानदखोरे." ह्या गोतांत हाजर असलेल्यांच्या नांवांत प्रथम जिजाबाईचे नांव आल्यावर मग पुढे वेदमूर्ति ब्राह्मण, मराठे, तेली, न्हावी, गुरव, परीट वगैरे अनेक जातीचीं नांवे झाल्यावर शेवटीं बापनाक व भिकनाक माहार वृत्तिकार मौजे धानीब, आणि खंडनाक व भिकनाक, वरगण ता. मजकूर, ह्यांचाही स्पष्ट उल्लेख आहे. शेवटीं म्हटलें आहे की "सदरहू गोत वैसोन, बाबाजीराव झुंझारराव देशमुख तर्फ कानदखोरे ह्यांचे भाऊ मलोजी पतंगराव या हरदो जणामध्ये वृत्तीचा कथळा होत होता. त्याबद्दल सदरहु गोत वैसोन हरदो जणाचे वाटे केलें, व घरांतून वेगळे निघाले."
त्याच खंडांत लेखांत ५८ पान ६६ वर खालील निवाडा असा आहे. "बिदाणें इनाम राजश्री बावाजी बिन नारायणजी झुंझारराव मरळ देशमुख ता. कानदखोरे यांचे इनाम मौजे गेवंढे येथे आहे, त्याची बिदाणें ( चिन्हें ) श्रीचा अंगारा बादनाक व मातनाक बिनू धाकनाक व धारनाक बिन राधनाक माहार मौजे मा ।। यांणी सत्य स्मरोन सांगितले. शके १७०३ प्लवनाम संवछरे वैशाख व ।। पंचमी शनवार सन इहिदे समानीन मया व अलफ."
अशा मामुली हक्काच्या वादांत जी दिव्यें करुन निकाल लावण्याची वहिवाट असे, त्यांत धार दिव्य, ऐरण दिव्य, रवा दिव्य असे प्रकार असत. आणि ही दिव्ये करण्यास माहार हीच जात उत्तम प्रकारे पात्र ठरलेली असे. कारण ती पुरातन, विश्वासू आणि वादविषयक हक्काची मूळ मालकीण म्हणूनच होय. केव्हा केव्हा तर अशी दिव्येंही न करतां केवळ वतनदार महार मेहतराच्या तोंडी साक्षीवरुनही निवाडा होत असें. हें वरील लेखांक ५८ वरुन स्पष्ट होतें.
ऐरण दिव्य
मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड १५, पान २९९ वर लेखांक २९०, शके १६३१ श्रावण वद्य १ चा, खालीलप्रमाणें आहे.
"सु ।। अशर मया अलफ कारणे झाले साक्षपत्र एसे जे मौजे माडरदेव प्र ।। वाई व मौजे अबडे व बललु व नेरे ता. उत्रोली या गांवांत सिवेचा गरगशा (तंटा) होता. म्हणौन खोपडे देशमुख व माडेर मोकदम हुजूर राजश्री पंचसचीव स्वामीजवळ जावून राजश्री सुभेदारास व समस्त गोतास आज्ञापत्रें घेऊन आले की सिवेवरी जाऊन जीव नजर गुजार करुन हरहक निवाडा हुजूर लिहिणें.... त्यावरुन रा. सुभेदार व समस्त गोत मौजे अबडे येथें येऊन, खोपडे व माडरे आणून खोपडिया पासून दिव्या घ्यावें. त्यास अनसोजी व वयाजी माडरे याणी रदबदली करुन दिव्य आपण करितों म्हणून मागोन घेऊन राजीनामा लिहोन दिला. त्यावरुन श्रावण शुद्ध द्वादसी सणवारी गोदनाक बिन भाननाक माहार मौजे माडरदेव ह्याच्या हातास साबण लावून दोन्ही हात धुतले. कृष्ण न्हावी मौजे खेडी बु।। प्र।। सिरवळ ह्याजकडून नखे काडून हाताचीं निशाणें लिहिलीं. मग दोही हाती पिशव्या घालून लखाटा केला. कैदेंत राखिला. दुसरे दिवसी आदितवासीं.... सिवेवर जेथें माडरे जाऊन उभे राहिले तेथे रा. सुभेदार व समस्त गोत बैसोन का ।। सिरवळचा लाहार आणवून त्याजकडून ऐरण ताविली. महार उभा करून हातीच्या पिशव्या काढून सात मंडळें काढिली. पहिल्या मंडळांत उभा करुन हातावरी सेवल घालून त्यावरील सात पाने पिंपळाचीं ठेवून त्यावरी लोणी घातलें. लोहारानें सांडसे ऐरण धरून महाराच्या हातावरी ठेविली. सात मंडळें चालून सिवेवरी वोल्या गवताचा भाग ठेवला होता, त्यावरी टाकली. डोंब जाला. महाराचे हाती पिसव्या घालून लखाटा केला. कैदेंत ठेविला. तीन रात्री होऊन चौथे दिवसीं बुधवारी रा. सुभेदार व समस्त गीत बैसोन हातीच्या पिसव्या काढिल्या. हात पाहातां महार दिव्यास लागला. ( म्हणजे हातात जखम होऊन दिव्य अपयशी ठरलें. ) उजव्या हातास आंगठ्यापाशी मधलें रेघेवर फोड पावट्याप्रमाणे एक, व त्याच बोटास पुढे लहान फोड दोन जाले. डाव्या हातात मधल्या बोटापाशी एक फोड व त्याचे शेजारी संधीस एक फोड आला. सदरहूप्रमाणें दिव्यास लागला. खोटा झाला. हे साक्ष पत्र सही छ १४ माहे जमादिलावर."
ह्या दिव्याने खोटा ठरला तो महार नव्हे, तर मूळ मराठा वादीच होय. बिचा-या महाराचे हात मात्र हकनाक जळले. ह्या धोक्याला भिऊनच वादी प्रतिवादी स्वत: आपण दिव्य करण्यास धजत नसत. हें पुढील रवा दिव्यावरुन दिसत आहे.
रवा दिव्य
मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें, खंड १८, लेखांक ४, पान ६ वर परगणे पुणें, कसबें सुपे, मौजे वढाणा येथे शेताचे शिवेबाबत तंटा पडून खून झाला. त्या बाबत महजर होऊन निवाडा झाला त्याची हकीकत आहे. हा काळ शहाजी महाराजाच्या अंमलाचा आहे. शके १५४० मार्गशीर्ष व।। १२ रोजी शहाजीच्या सांगण्यावर हा दिवाणी महजर घडला आहे. ह्या निवाड्यांत "शके १४४६ तारण संवच्छरे मार्गेश्वर वद्य रवौ तदिनी दसकत कान्हो लुखो, पेघो लुखो, मलो कोडों माहार विर्तिकार मौजे वढाणे आत्मसुखें पेघो मालोस व पेघाई मालीस लेहोन दिधले ते ते जे मौजे चिचोली मजरा सुपाचा तेथील सिवेची सेतें वटाणें याखाली पडली होती. तें दिव करुन साधली तें लेकुराचें लेकुरी औलादी अफलादीनसी खाइजे एबाबे मी उभा राहे माझीए बंसीचा उभा राहे..." वगैरे मागील पुराव्याचा कागद पुढे आणला होता. पण हा कागद मंजूर केला गेला नाही. कारण "जे वक्ती दिव होते ते वक्ती हरदो माहालीचे कारकून व देशमुख व देशक व जबार व कोने कुए मेळवून दिवाण होते तेथे मइजर त्यांची नांवें निशाणे करुन महजर करताती. ए कागदी तैसा अमल नाही. यासी तो कागद रूजू न पडे..." नंतर ह्या खटल्यांत महाराने ऐरण दिव्य करावें, असें सुचविण्यांत आलें. पण तेंही साधेना म्हणून शेवटीं खुनापर्यंत पाळी आली. तेव्हा रवा दिव्य करावयाचें ठरलें. म्हणजे "तेल ४४५ व तूप ४४५ ऐसे तपेलियांत घालून तावून दोघा मोकदमाचे (वादी प्रतिवादीचे ) हात एकवट बांधोन घालावें..." पण शेवटी गोताने दोघा मोकदमांची समजूत घालून प्रकरण आसपांस मिटवलें. रवा दिव्य करण्याचें धाडस कोणी केलें नाही. बिचा-या महारांची दगदग वाचली.
नुसती पाटीलकी अगर मेटे नाइकीच नव्हे तर अस्सल सरदारीचेंही उदाहरण, जें पेशवाईअखेर भडकलेल्या सोवळ्याच्या दिव्यांतूनही टिकून उरलें तें तर हृदयंगम आहे. तें असें :
शिदनाक महार
भारतवर्ष मासिक पुस्तकांतून जुन्या ऐतिहासिक गोष्टी ह्या मथळ्याखाली कृष्णाजी विष्णू आचार्य कालगावकर, शाळामास्तर कासेगांव, ह्यांनी लिहिलेल्या व प्रसिद्ध कै. पारसनीस ह्यांनी इ.स. १९०० मध्यें छापलेल्या हकीकती पुणें येथील इतिहास मंडळाचे संग्रही आहेत. त्यांत ३२वी गोष्ट शिदनाक महाराची खालीलप्रमाणें फार मनोरंजक आढळते.
"सातारा जिल्ह्यांत तासगांव तालुक्यांत कळंबी म्हणून एक गांव आहे तेथचा हा वतनदार महार. औरंगजेबाचे हातून संभाजी मारला गेल्यावर पुढें जी महाराष्ट्रात बंडाळी माजली, ती पंचवीस तीव वर्षे जास्त कमी चालूच होती. त्या वेळी शिदनाकानें महार लोकांचे एक पथक उभारुन धामधूम केली. पुढें त्याचा मराठे लोकांस पुष्कळ उपयोग झाला. शाहुराजा मोंगलांचे कैदेंतून सुटून ताराबाईपासून आपलें राज्य मिळविण्याकरितां आला, तेव्हा ते लहान मोठेो सरदास त्यास मिळाले त्यांत हा शिदनाकही मिळाला. शाहूस राज्यप्राप्ति झाल्यावर ज्यांनी त्यास मदत केली, त्या सर्वेास त्याने त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या दिल्या. त्या वेळी शिदनाक ह्यास कळंबी गांव इनाम दिला. तो अद्यापि त्याच्या वंशजाकडे चालत आहे.
"ह्या शिदनाकाचा नातू त्याच्याच नांवाचा होता, तो खडर्याच्या लढाईत होता. खडर्याच्या मैदानावर जेव्हां मराठ्यांच्या फौजेचा तळ पडला तेव्हां सरदार आपापल्या लोकांसह मिसली ( मानाचा हक्क) प्रमाणे उतरले. शिदनाकाच्या गोटाच्या आसपास दुस-या ब्राह्मण व मराठा सरदारांचे गोट होते. पेशवाईत सोंवळ्या ओंवळ्याचा विचार बराच फाजील वाढत चालला होता, त्यामुळें कित्येकांनी सवाई माधवराव कचेरीच्या डे-यांत बसले असतां, विनंती केली की, महाराचा गोट मध्येंच आहे तो बाजूस काढावा. पेशव्यांनी विनंती ऐकून आपल्या बाजूस बसलेल्या हिरोजी पाटणकर नांवाच्या वयोवृद्ध सरदाराकडे पाहिलें. तेव्हां तो मराठा सरदार बोलला की ही कांही जेवणाची पंगत नव्हे, म्हणून मध्येंच महाराचा गोष्ट असल्यास हरकत नाहीं. ही तरवार घरणा-या शूरांची पंगत आहे. येथे जातीचा विचार नाही. 'ज्याची तलवार खंबीर तो हंबीर' पाटणकराचें बोलणें ऐकून पेशव्यांनी मान डोलविली.
"पुढे लढाईचे दिवशी सरदार लोक पेशव्यांस मुजरे करुन लढाईस चालले. तेव्हा शिदनाकही मुज-यास आला. मुजरा करुन हात जोडून पेशव्यांस म्हणाला. "महाराज! मी शिदनाक महार आहे. मी महार म्हणून कांही लोक माझा तिरस्कार करीत आहेत. आज आपल्या पायाचा दास कामगिरी कशी करितो ती पाहावी असें म्हणून निघून गेला. पुढे लढाई चालूं झाली. परशुरामभाऊवर पठाणांनी मोठी गर्दी करुन भाऊस घोड्यावरुन खाली आणिलें. त्या वेळीं मराठे व पठाण ह्यांची जी चकमक झाली तींत शिदनाकाने अप्रतिम शौर्य दाखविलें. त्याची पटवर्धन मंडळीने मोठी तारीफ केली. पेशवाई बुडाल्यावरही हा शिदनाक बरींच वर्षे होता. चितामणराव अप्पा सांगलीकर दुखण्याने फार आजारी असतां, त्यांच्या भेटीस हा गेला होता. तेव्हां त्यांनी मोठ्या सभारंभाने ह्याची मुलाखत घेतली. आणि आपल्या पदरच्या मंडळीस त्याची माहिती करुन दिली."
महारांचे बावन हक्क
महारांच्या मुलकी हक्कांत त्यांचे विशेष गाजलेले 'बावन हक्क' हें एक विशेष प्रकरण आहे. त्याच्या दोन सनदा महत्त्वाच्या आहेत. पैकी एक बेदरचा बहामनी बादशहा दुसरा महमदशहा ( १४६३-१४८२) याच्या काळापासूनची आहे. तिच्या नकलेची नकल म्हणून एक प्रत संशोधक राजवाड्यांनी प्रसिद्ध केली, तिचा आशय पुढे दिला आहे. दुसरी सनद ह्याच तोडीची मराठ्यांच्या इतिहासाची साधनें खंड विसावा, ले. १७४, पान २२४ व प्रसिद्ध झाली आहे. हिच्यांत महाराचे बरोबर ५२ हक्क लहानसान मिळून दिले आहेत. ही निझामशाहींतली शके १५६७ राक्षस नाम संवच्छरे ( इ.स. १६१५) मधली आहे. ह्या दोन्ही सनदांतील हक्कांच्या तपशीलाचा मेळ बसत नाही. पण पहिली अधिक जुनी, तपशीलवार, अधिक हक्कांची आणि महत्त्वाची आहे. दुसरा महामदशहा बाहमनीच्या कारकीर्दीत इ. स. १४७५ सालीं दक्षिणेंत भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळीं मंगळवेढ्यास दामाजीपंत नांवाचा सात्त्विक ब्राह्मण कमावीसदार होता. त्याने दुष्कळांत सरकारी धान्य दुष्काळपीडितांस वाटलें, ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्या प्रकरणांत मंगळवेढ्यांत एक विठू महार होता त्याने दामाजीपंताचे सरकारी देणें आपलें स्वत:चें पुरुन ठेवलेलं धन देऊन भागविलें, आणि वरील सनद स्वत: दामाजीपंताच्या हातून लिहिलेली बादशहाकडून मिळविली असें राजवाड्यांचे म्हणणें खाली दिलें आहे. पण सनदेंत अंबरनाक असे महाराचें नांव आहे. अमृतनाक महारास ही मूळ सनद मिळाली असें कित्येक महारांचे म्हणणें मी ऐकलें आहे. ह्या सनदेची नक्कल हस्तलिखित मी माझ्या कांही महार मित्रांकडेही पाहिली आहे. ह्या सनदेंतील हक्कांचे विशेष स्वरुप खाली दिल्याप्रमाणें दिसते.
हाडकी हाडोळी वगैरे केवळ ग्रामसंस्थेंतील निकृष्ट हक्कच ह्यांत नमूद नसून, ब्राह्मण मराठ्यांपासून तों चांभार, मांग आणि फासेपारधी अशांच्याही लग्नावर महारांचा कर दर लग्नास २।रु स्पष्ट नमूद आहे. लग्नांत मराठे ब्राह्मणांचा वर घोड्यावर, महारांचा बैलावर (कर्नाटकांत विेशेष ) व मांग व इतर कनिष्ठांचा हेल्यावर बसवून वरात काढण्याची वहिवाट असे. ह्या सनदेंत कोणत्या जातीचा वर घोड्यावरुन, कोणाचा बैलावरुन, कोणाचा रेड्यावरुन निघावा ह्याचा तपशील स्पष्ट केला आहे. त्यांत महारांनी घोड्यावरचा हक्क संपादन करण्याचें कारण अंबरनाकाने बादशहाची बेगम विश्वासूपणाने संभाळली असें दिलें आहे. ह्याशिवाय जकातीचे हक्क; बाहेरून येणा-या पुष्कळ मालावर दर गाडीमागें किंवा पशूमागे किती कर घ्यावयाचा तो स्पष्ट उल्लेखिला आहे. हे हक्क केवळ बलुत्याचे नसून प्रत्यक्ष राजसत्तेने उपभेगावयाचे असतात. ते महारांस कसे मिळाले? हे केवळ वाहमनी बादशहाने नवीन दिल्याने मिळण्यासारखे नसून, पुरातन चालत आलेले, मध्यंतरी मागें पडलेले व पुन: उजळलेले दिसतात. अशी महत्त्वाची सनद मुंगी पैठण ( महाराष्ट्राची अति प्राचीन राजधानी ) येथे ब्रह्मवृंदाची व इतर हक्कादारांची सभा होऊन देवळांत मंजूर झालेली आहे. हे हक्क ब्राह्मण मराठ्यांकडूनच उगवून घ्यावयाचे नसून, तेली, तांबोळी, कोष्टी, न्हावी, परीट, चांभार, मांग, जीनगर इ. वरील खालील तमाम जातींकडून महारांनी आणखी कामें काय काय करुन घ्यावयाची हेंही तेथे सांगितले आहे. लग्नटक्का २।व पाय तांदूळ वगैरे हक्क आता जे ब्राह्मण घेत आहेत, ते महारांना मिळाक्याचे असें स्पष्ट नमूद आहे. ह्यांत मांग वगैरे इतर अस्पृश्यांचा संबंध नाही अशीही सोडवणूक केली आहे. ह्यावरुन पूर्वी मांगांचेही असेच मालकी हक्क असावेत अशी शंका येते. कारण कांही प्रांतांत मांगांची लहान सान राज्ये होतीं असं मागें आठव्या प्रकरणांत सांगितलें आहे. ( पान १२६ पहा) जकाचीचे हक्क हल्ली आम्लाईत मध्यवर्ती बादशाही आहेत. पण मध्ययुगांत हे रस्ते राखण्याचें काम जंगलांत व डोंगरांत राहणा-या ह्या विश्वासूव काटक जातीनेच केल्यामुळें हा जकातीचा हक्क त्यांच्याकडेच उरला असल्यास नक्क कोणते? आणि प्रत्येक गांवशिवाराची अतिशय उत्पन्नाची जमीन महारांच्या मिराशीची असल्याचें तरी काय नवल ? अशा महत्त्वाच्या सनदेची पहिली उजळणी झाली तेव्हा "एणे प्रमाणें सनद पैठणचे मुक्कामीं एकनाथस्वामीचे रावळांत जाहली हें तुम्हास कळावें. पांढरीस कळावें. आठवा लाख सोमवंशास कळावें. " अशी दखलगिरी अभिमानाने करणें साहजिक आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळाचें चतुर्थ-संमेलन-वृत्त, पान ५३ वर प्रसिद्ध संशोधक वि.का.राजवाडे ह्यांचा खालील आशयाचा कागद प्रसिद्ध झाला आहे.
दामाजीपंत व विठ्या महार
१ "सातारकर महाराजांच्या दप्तरांत नकलेची नकल केलेला एक महजर सापडला. त्यांत शहरांत व खेड्यांत महारांना कोणकोणते हक्क पूर्वापार आहेत यांची याद दिली आहे. मूळ महजर बेदरची पादशाहत असतांना झाला. तदनंतर एकनाथ स्वामीच्या मृत्यूनंतर पैठणास एकनाथाच्या देवालयांत पुन: मूळ महजराची उजळणी झाली. ही उजळणी हिजरी सन १०५१ श्रावण शुद्ध १३ रविवारीं झाली. ( शके १५६३).... महारांच्या हक्कांचा तपशीलवार निर्देश केल्यावर खालील वाक्यें ह्या सारांशांत आलीं आहेत :-
" हें देणें पाच्छायाचें व दामाजीपंत ह्यांच्या हातचा कागद असे. विठ्या महार मंगळवेढ्याचा पाच्छायाचे कामीं पडला. व दामाजीपंत कामी पडला म्हणोन पादशहाणी विठ्या महारास हक करुन दिले."
ह्या वाक्यानंतर आणखी कांही राहिल्यासाहिल्या हक्कांचे गणन करुन पुन: खालील हकीकत लिहिली आहे :-
"बेदरास जाऊन पाच्छया व याची लेक बेगम आनली आणि पाच्छाव यासी हात जोडोन उभा राहिला. पाछाव याचे घोड्याची जागल करावयास गेला. तो तेथे मांग चोरीस आला. तेव्हा महार जागा होता. मग पाच्छाव यास जाग केलें. विश्वासूक महार ठरला. म्हणोन घोडा वरातीस दिल्हे. आंबरनाक माहार यास कृपा करुन दिल्हे. बाच्छाव याची तीळमोठींतील कोठाडी लुटल्या त्याजबद्दल तगादा दामाजीपंतास केला. ते वेळेस श्री. विठोबाचे विठ्या महारानें रुप धरून बाच्छाव याची रसद पोचती केली. दामाजीपंताचा पैका भरून विठ्या महारानें दिल्हा आणि बाच्छायाणें पुन: पावती दिली व दामाजीपंत याजपार्शी विठ्या महारानें आनोन दिल्ही. बाछाव यांणी चौकशी केली व दामाजीपंत याची चौकशी केली. त्याजवरुन विठ्या माहार यास दर उपकार पोटास भाकरी व बसावयास जागा करुन दिल्ही. माहाराचे बंदोबस्त करुन दिल्हे."
ह्या महजरीवरुन राजवाडे ह्यांचें असें म्हणणें आहे की, मंगळवेढ्यास विठ्या नांवाच्या एका खरोखर असलेल्या ऐतिहासिक महार गृहस्थाने दामाजी पंतावर आलेलं संकट जाणून आपल्या स्वत:चें जमिनींत पुरलेलं द्रव्य परस्पर बादशहाकडे भरणा करुन त्याची पावती दामाजीपंतांना आणून दिल्ही. पुढे ह्या गोष्टीला काव्यमय स्वरूप येऊन विठ्या महाराचे ऐतिहासिक अस्तित्वाचा लोप झाला. व त्याला श्री विठोबाचें रुप आलें. तें कसंही असो. वर निर्दिष्ट केलेले जे ५२ किंवा जास्त हक्क आहेत त्यांपैकी कांही क्षुल्लक आहेत तर कांही फारच मोठे म्हणजे खुद्द राजकीय सत्तेनेच उपभोगावयाचे आहेत. शिवाय हे हक्क एका दोघामहार व्यक्तीचे नसून ग्रामसंस्थेंत प्रतिष्ठित झालेल्या सगळ्या माहार जातीने हे हक्क उपभोगावयाचे आहेत, हें वर निर्दिष्ट केलेल्या "आठरा लाख सोमवंशाला कळावे" ह्या घोषणेवरुन सिद्ध होतें, हे ध्यानांत घेण्यासारखें आहे.
हल्ली अस्पृश्य बनलेल्या सर्वच जातींनी पूर्वी राजवैभव किंवा जमिनीचा मालकी हक्क अनुभवलेला आहे असें माझें म्हणणें मुळीच नाही. पण ह्यापैकी ब-याच जाती पूर्वी उत्तम स्थितींत होत्या, त्याचे पुरावे अशा ह्या सनदांतून अद्यापि संशोधकांस आढळतात. येवढेंच सांगणे आहे. इतकेंच नव्हे. ह्या दैवहतक जातीचें पूर्वीचें वैभव गेलें तें गेलेंच उलट मध्ययुगांतील ह्यांच्या गुलामगिरीचेही पुरावे अशा सनदांतून आढळतात. तेही उघडकीस आणणें आमचें काम आहे.
शिवेचा वाद पडल्यास ह्या पुरातन मालकांची साक्ष घ्यावी, त्यांच्याकडून दिव्ये करावींत हें ठीक आहे. पण एखाद्या किल्ल्याची भिंत चढेनाशी झाली, एखाद्या तळ्यास पाणी ठरेनासें झालें, तर त्या खाली नेमकें एका गरीब महारास किंवा घेडास बळी द्यावयाचा रिवाज होता. तो त्याच्या असह्य गुलामगिरीचा द्योतक आहे.
प्राचीन रोमन राष्ट्रांत एखादें दिव्य करावयाचें असल्यास आपल्या घरच्या विकत घेतलेल्या गुलामांकडून तें करावयाचें अशी चाल असे, किंवा जिवास जीव मोबदला द्यावयाचा असल्यास गुलामांचा जीव देण्याची चाल असें हें मी वाचलें आहे. तोच प्रकार ह्या अस्पृश्य असहायांना बळी देण्याचा दिसतो. पाटण नांवाची गुजराथची प्रसिद्ध राजधानी होती. तेथे इ.स. १०१४-११४३ पर्यंत प्रसिद्ध सिद्धराजा राज्य करीत होता. त्या वेळीं तेथील तळ्यांत पाणी ठरेना म्हणून मायो नांवाच्या धेडाला बळी दिल्याचें उदाहरण प्रसिद्धच आहे. मायो आपला जीव लोककार्यास्तव वाहण्यास सिद्ध झाला म्हणून त्याने मागितलेला वर म्हणून त्याच्या तिरस्कृत जातीला शहरांजवळ व गांवाजवळ राहण्यास परवानगी देण्यांत आली. ( काठेवाड डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर, पुस्तक ८, पान १५७ पहा. ) पण त्याचाच बळी का घेण्यांत आला, ह्या प्रश्नाचें उत्तर त्याला इतर वरिष्ठाप्रमाणें स्वतंत्र जगण्याचा हक्क नव्हता, तो गुलाम जातींत जन्मला होता, हेंच तसेंच पुढील उदाहरण रा. ब. गणेश चिमणाजी वाड बी.ए. ह्यांनी निवडलेल्या सनदा व पत्रें ह्यांत प्रकरण २, पान ७ वर दिलें आहे.
बेदरच्या बादशहाचें ताम्रपत्र
"इनामपत्र येसाजी नाईक चिळे, हैबतजी नाईक खोमणे, हणमंतजी नाईक भाडवलकर यास बेदर पादशाही सुरु सन सबा समानीन खमस मया, हें ताम्रपत्र लिहिलें जे: - किल्ले पुरंधर येथे शेंदरी बुरजास कामास लावले, तेव्हां काम शेवटास जाईना. सबब पादशहास दृष्टांत जाहला जे, ज्येष्ठ पुत्र व ज्येष्ठ सून अशी उभयतां बुरुजांत दिल्ही असातं काम शेवटास जाईल. असा दृष्टांत होतांच, पादशहा जागृत होऊन, येलाजी नाईक चिबे यांस वर्तमान सांगितलें. तेव्हां येसाजी नाईक म्हणों लागले जे मी आपला पुत्र व सून देतों. मग बहरिनाक सोननाक याचा पुत्र नाथनाक व देवकाई अशी उभयतां आश्विन वद्य. अष्टमीस शेंटरी बुरुजांत गाडलीं. मग बुरजाचें काम सिद्धीस गेलें. मग पादशहा बेदरहून निघोन किल्ले पुरंधरात आले. तेव्हा शेंदरी बुरूज पाहून बहुत खुषमर्जी होऊन येंसजी नाईक ह्यांस पुरंदर किल्ला सरंजाम सुद्धा दरोबस्त बक्षिस दिला. भहिरनाक सोननाक यास किल्ले पुरंधर येथें होन २०५ दोनशे पांच होन दिल्हे. व न्हावी, भोंगोली सातशें पांच होनाचे दोन गांव दिल्हे. नंतर बादशहाची स्वारी बेदरास गेलीं. "
हिंदुपदबादशाही नवीन निर्माण करणा-या छत्रपति श्री शिवाजीनं रोहिडा किल्ल्यावर अटकेंत ठेवलेल्या वाडीवर महाराला आपला खंड उर्फ लांच देऊन आपली सुटका करुन घेण्याचें सामर्थ्य नव्हतें एवढ्याच कारणावरुन रायगडच्या सर्जा बुरूजाखाली त्या बिचा-याला पुरण्याची सजा दिली ती देखील ह्या गुलामगिरीचेंच उदाहरण ज्या बहीरनाक महाराने आपला ज्येष्ठ पुत्र नाथनाक व ज्येष्ठ सून देवकी हिला बळी दिलें तो केवळ गुलाम होती की काय? येरवी येसजी नाईक मराठ्याने आपला पुत्र बळी देतो म्हणून बादशहास सांगून शेवटी त्याने बहीरनाकाच्या मुलास कसें दिले ? त्याच्या घरच्या विकत घेतलेल्या गुलामाची ही कथा की काय? कांही असो; ज्येष्ठ पुत्रास दत्तकही देणें अधर्म आहे. पण त्यास बळी दिला. बहीरनाकाचा हा अविचार झाला, म्हणून त्याच्या घराण्याला अविचारे हें आडनांव पडलें, सासवड तालुक्यांत अवचरें ह्या नांवाचें महार घराणें वरील बादशाही उत्पन्न भोगणारें भिंवडी गांवी अद्यापि आढळते.
असो. महाराष्ट्राच्या राजकारणांत मध्ययुगांत किंवा मराठी रियासर्तीत महाराइतका मांग किंवा इतर अस्पृश्यांचा उल्लेख आढळत नाही. महार व मांग ह्यांचे हाडवैर असल्याचें व त्यांच्यांत तंटे असल्याचे अझून देखील दृष्टोत्पत्तीस येतें. मराठ्यांनी जसें महारांस जिंकले, तसें त्यापूर्वी मांगाना महारांनी जिंकले असेल काय? पण ह्यासंबंधी कांही पुरावा नाही. महार हे मध्ययुगांत जमिनीचे मालक, वतनदार, निदान बलुतेदार म्हणून तरी वावरत आलेले आहेत. इंग्रजी अमलापूर्वी व नंतरही महार ही जात अत्यंत इमानी अशी ख्याति चालत आलेली आहे. सरकारी खजीना बिकट परिस्थितींतून सुरक्षित पोंचविण्यासंबंधी त्यांची वाहवा अद्यापि कानांवर येते. रा. बहादूर वाड ह्यांच्या रोजनिशींच्या प्रसिद्ध झालेल्या ९ भागांतून "देशांतील बंडे" सदराखाली भिल्ल, कोळी, रामोशी, बेरड वगैरेच्या धामधुमी वाचण्यास मिळतात. पण महार जात गुन्हेगार ह्या सदरांतही आढळत नाही. उलट मध्ययुगीन हिंदुराज्य असो, मोगलाई असो, मराठेशाही असो, किंवा आंग्लाई असो, चालू सत्तेशी जिवापाड इमानाने राहून शेवटी जीवही अर्पण करण्याचा निष्ठेचा बहाणा ह्या जातीचा दिसतो. ह्या बाबतींत, ब्रिटिश सी. आय. डी. खात्यांतील बडे पेन्शनर इतिहासज्ञ श्री. बाबासाहेब देशपांडे ह्यांनी मोठ्या अभिमानाने महारासंबंधी अत्यंत अनुकूल अभिप्राय मला समक्ष दिला आहे.
नाशिक आणि ठाणें ह्या दोन जिल्ह्यांचे हद्दीवर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर वाघेरा म्हणून एक जुना डोंगरी किल्ला आहे. तो आतां ओसाड पडला आहे. आजू बाजूस कोळी लोकांची वस्ती आहे. तेथे पूर्वी परवारी जातीचा राजा होता अशी माहिती मिळते. पण परवारी जात सेन्सस रिपोर्टातही आढळत नाही. महारांना तिकडे परवारी म्हणत असावेत. हल्ली ब्रिटिश पलटणींतून पेन्शन घेतलेली जी कोणी सुभेदार जमादार कोकणी महार मंडळी माझ्या ओळखीची आहे त्यांच्या जुन्या सर्व्हिस बुकांतून त्यांची जात परवारी असें नमूद केलेलं मी स्वत: पाहिलें आहे. पूर्वी मद्रासेकडे प्रथम पारिया पलटणी इंग्रजांनी उभ्या केल्या त्यानंतर इकडील कांही कोंकणी महारचांभारांची इंग्रजी लष्करांत भरती झाली. त्यांनाच चुकून परवारी असें म्हटलें असणें संभवनीय आहे. वाघे-याच्या ह्या परवारी राजाचें राज्य गेलें. त्याच्या तैनातींतले कांही महार, कोळी वगैरे सावरगांव, गोरठाणें वगैरे ठिकाणीं राहत आहेत अशी ऐकीव माहिती आहे, पण हा राजा स्वत: महार, मांग, की कोळी होता हें निश्चित होत नाही. मात्र तो मरला गेल्यावर त्याची बायको सती गेली व जवळ जो घाटरस्ता आहे त्याला, हल्ली सतीघाट हें नांव आहे, असें सांगतात. इकडील कोळी मृतमांस खातात असेंही एकाने सांगितलें. पण ते अस्पृश्य खास नाहीत. सुरतेकडे मांगेले नांवाचे कोल=कोळी वंशाचे लोक आहेत. पण तेही अस्पृश्य नाहीत.
तें कसेंही असो. कोणत्याही जातीचा मनुष्य असो, तो लष्करी पेशांत राहून वाढला किंवा निदान पोलीसां राहून मानमान्यतेला चढला तर त्याला एक प्रकारचा सामाजिक आढ्यपणा येतोच. त्याबरोबर सामान्य धर्माचा सोंवळेपणाही येऊन, तो धर्मगुरु बाह्यणांच्या आश्रयाखाली जाऊं पाहतो. महारांची लग्ने ब्राह्मण उपाध्यायांनी लावण्याचा रिवाज नाही असें मी म्हटलें आहे. ( मागे प्रकरण ९ वें, पान १४४ , १४७ पहा ). पेशवाईच्या अखेरीस लष्करी नोकरपेशांत इभ्रतीत चढलेल्या कांही महारांनी आपल्या जातींतील कांही लग्नें ब्राह्मण वतनदार जोशांकडून लावून घेण्याचा आग्रह धरिला व तो कांही वेळ टिकवलाही. पण अखेरीस सवाई माधवरावांकडे फिर्याद होऊन महारांचा हा डाव फसला. तो येणेंप्रमाणे:
महारांची लग्नें जोशांनी लावण्याबाबत
सवाई माधवराव पेशेव यांची रोजनिशी (वाड यांनी संपादिलेली-भाग १८, पान २७९-इ.स. १७८५-८६ )
"रघुनाथ ज्योतिषी बिन त्रिंबक ज्योतिषी व कृष्ण ज्योतिषी बिन दामोदर ज्योतिषी मामले पाल पंचमहाल याणी हुजूर विदित केलें की तर्फ कोरबरशे उर्फ पौड खोरे येथील वृत्ति पुरातन आमचेकडे आहे, त्यांत महारांची लग्नें तर्फे मजकुरी ज्योतीष्यांनीं लावण्याची चाल पुरातन नसतां सन अर्बा समानीनांत आप्पाजी कृष्ण कमावीसदार याचकडे तर्फ मजकूरचे महार फिर्याद होऊन आपली लग्नें ज्योतिषी यांणी लावावीत, ते लावीत नाहीत म्हणोन सांगितल्यावरुन पुर्ती चौकशी न करिता पेशजी रखमाजी वाकडे हवालदार कोरीगडास होते त्यांचे वेळेस किल्ल्याचे चाकरमाने महारांचे लग्न लावण्याचें होतें, ते समयी लग्न लावणार मेढ्या महार हाजर नव्हता सबब किल्ले मजकूर हवालदार व सबनीस थाणी आमचा बाप, भाऊ विनायक ज्योतिषी दहापंधरा वर्षांचा अज्ञान होता, त्यावर निग्रह करुन महारांचे लग्न लावलें. त्यास आजमासें पंचावन वर्षे झालीं. तेवढ्याच दाखल्यावरुन महारांची लग्ने ज्योतिषांनी लावीत जावीं म्हणोन कमाविसदारांनी महारास भोगवटीयास पत्र करुन दिल्हे. आम्ही अतिशूद्राचे लग्नास मूहूर्त मात्र सांगतो, लग्नें लावण्याची नवी चाल होणार नाही असें उत्तर केलें. कमावीसदारानीं विषाद मानून.. जबरदस्ती करुन आमचे वतनाची जप्ती करुन वृत्तीचे कामकाजास नवा गुमास्ता ठेवला... येविशीची चौकशी करुन दाखले मनांत आणतां, महारांची लग्नें ज्योतिषांनी लावण्याची चाल फार करुन नाहीं, कोठे कोठे लावीतही असतील परंतु कोंकणप्रांती नाही, त्यांचे जातीत मेढेमहार आहेत तेच लावतात. याप्रमाणे तळकोंकणचे जमीदार व ज्योतिषी हुजूर आहेत त्यांणी विदीत केलें. वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यांणी लिहून दिल्हे कीं शहर जुन्नर बरहुकूम पेठासुद्धा व तफेंचें गांव पाऊणशें व शिवनेर वगैरे किल्ले पांच ह्या ठिकाणीं ज्योतिषपणाची वृत्ति परंपरागत आपली आहे परंतु आपले वृत्तींत अतिशूद्राची लग्नें आम्ही लावीत नाही. अतिभूद्रांचे जातींत ढेगोमेगो (पुढारी) आहेत, तेच त्यांची लग्नें लावीत आले असतां, पूर्वी एक वेळ किल्ल्याचे चाकरमाने व प्रांतांतील दोनचार हजार पर्यंत महार मिळोन गवगवा करोन औरंगजेब बादशहाजवळ फिर्याद केली. तेव्हा त्याणीं पुरातन चाल मनास आणून ज्योतिषी याणीं महारांची लग्नें लावू नयेत असा ठराव केला, त्याप्रमाणे हा कालवर चालते.".... याचा निवाडा महाराच्या उलट व ज्योतिषांना अनुकूल झाला तो असा :-
"सदरहु अन्वयें समस्त महार तर्फ कोरबा रसें उर्फ पोंडखोरें यांस आपाजि कृष्ण यांजकडून पत्र करुन घेतलें आहे, तें ज्योतिषी याजवळ आपाजि कृष्ण यांजकडून पत्र करुन घेतलें आहे, तें ज्योतिषी याजवळ माघारां देणें. तुमचे जातीमध्ये मेढे महार लग्नें लावीत असल्याप्रमाणें लावतील या उपरी ज्योतिषी ह्यास खटला केल्यास मुलाहिजा होणार नाही." मागें धर्म ह्या नवव्या प्रकरणांत मंदिर प्रवेशाच्या हल्लीच्या सत्याग्रहाच्या चळवळीला राजकारण म्हटलें आहे (पान १५० पहा). त्याच प्रमाणें ह्याही प्रयत्नाचा मी राजकारणांतच समावेश केला आहे. असो आतां आपण मराठेशाहीच्या अखेरीस व हल्लीच्या ब्रिटिश अमलाच्या अगदी हद्दीवर येऊन पोंचलों आहों. येथून अगदी नव्या मनूंत आम्ही शिरणार, हें वाचकांनी ध्यानांत आणावें; व आपला दृष्टिकोण अगदी बदलून पुढील विषयाचें अवलोकन करावें.
भारतीय राज्यघटनेवर द्राविड. आर्य शक, हूण, म्लेंच्छ इ. अनेक नांवाखाली हल्ले ह्या कालापर्यंत झाले. पण त्यांत समाजशास्त्रदृष्टीने विशेष फरक नव्हता. पण दोन शतकांपूर्वीपासून हिंदी राज्यपद्धतीवरच नव्हे तर समाजपद्धतीवरही युरोपांतून जो अपूर्व हल्ला चढविण्यांत आला आहे त्यांत एक विशेष आहे. ह्या हल्ल्याने नुसत्या भारतीय बादशाहींत क्रांति झाली इतकेंच नव्हे; तर प्रत्यक्ष युरोपांतच एका नव्या जागतिक क्रांतीचा उदय झाला होता. तिचा प्रवेशही ह्या जरठ भारतीय समाजांत होऊ लागला. ही क्रांति म्हणजे औद्योगिक जगतांतील मजूरांच्या बाहुबळांत यांत्रिक शक्तीची अपूर्व भर पडून, अगोदर समाजाचा सांकेतिक पायाच बदलला आणि मग त्यावरची केवळ रुढिवशात् चाललेल्या वर्गांवर्गीची तारांबळ उडाली हें दृश्य होय. मात्र ही उलाढाल एकाच रात्रीं घडून आली असें नव्हे. उलट ह्या भरतखंडांत दोन भिन्न दृष्टीने जी समाजरचना दृढ बनून जवळ जवळ अनादि भासूं लागली होती ती रचना आज झपाट्याने बदलत आहे. मात्र ती अझूनही नामशेष व्हावयाला वेळ लागणार आहे.
पहिली दृष्टि धर्माची आणि केवळ भावनेची. तिच्यामुळें वर्णव्यवस्था म्हणून एक रचना घडली होती. व दुसरी तिच्याहून पुरातन, स्वाभाविक व बळकट दृष्टि अर्थाची, जी मानवी गरजांच्या पायावर रचली गेली होती; तिच्यामुळें ग्रामसस्थेचा पाया घातला गेला. भारतवर्षांत मौर्य कालापासून जरी मोठमोठालीं साम्राज्ये विकास पावली व विसकटलीं तरी भारतवर्ष म्हणजे केवळ खेडेगांवांचा समुद्राय आणि कृषि प्रधान समाजांचा एक अवाढव्य गट होता. अयोध्या, मथुरा, अवंती, कांची काशी, द्वारावती अशी शहरें केवळ हाताच्या बोटांवरच मोजण्यासारकी होतीं किंवा उरत. जीं नाश पावत त्यांचा पुन: खेड्यांतच विलय होत असें. नद्या जसे आपलें ओघ बदलत आल्या आहेत, तशींच रणांगणें व नृपांगणें, क्षेत्रांगणांतून आपलें रूप बदलीत असत. इतकेच काय! पण ब्राह्मण क्षत्रिय म्हणविणा-या स्वयंमन्य जमाती धुळीस मिळून शूद्र अतिशूद्र बनल्या आहेत व उलटही प्रकार सामाजिक इतिहासाच्या परड्यांत घडले आहेत. फक्त पाहणारास डोळे व ऐकणारास कान मात्र पाहिजेत !
ग्रामसंस्था ऊर्फ गांवगाडा नावाचें एक अस्सल मराठी भाषेच्या साध्या सौंदर्यांत नटलेलें पुस्तक इ.स. १९१५ सालीं श्री. त्रिंबक नारायण अत्रे ह्यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे. हे अत्रे ब्रिटिश मुलखांतील एक मुलकी अधिकारी असून बादशाही संशोधन खात्यांतील एक मार्मिक मदतनीस होते. भारतवर्षांतून विशेषत: महाराष्ट्रांतून ग्रामसंस्थेचें जे उच्चाटन ब्रिटिश रियासतींतून जाणून व नेणूनही चाललें आहे, तें विशेष न शिकलेल्या लोकांनाही ह्या लहानशा पुस्तकावरुन कळणार आहे. तीन्ही वर्णांचा व शूद्रातिशूद्रांचाही प्रचंड ओघ आज दोनशे वर्षे खेड्यांतून शहराकडे चालला आहे, त्यामुळें वरील गांवगाड्याचें स्वरुप थोड्याच काळांत केवळ अशा पुस्तकांतूनच उरणार आहे. कुणबी म्हणजे शूद्र; आणि अडाणी म्हणजे कुणबी अथवा प्रत्यक्ष श्रम न करणारे, वरचे अथवा खालचे सर्व प्रतिष्ठित अप्रतिष्ठित वर्ग, अशा मार्मिक अर्थाने हे शब्द ह्या पुस्तकांत वापरले आहेत. "फुकटखाऊपणाचे सर्व अवगुण अडाण्यांत जसे शिरले तसे कुणब्यामध्येंही उतरले. चौकोनी चिरा बनविण्यासारखी परिस्थिती जातिधर्माने व वतनी पद्धतीने गुदमरली म्हणून कुणबी व अडाणी ह्यांचे सर्वसामान्य ज्ञान अगदीं शून्यावर येऊन बसलें. तसेंच अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळें दुस-याच्या पागोट्यावर नजर ठेवण्याची खोड त्यांना लागली, आणि स्वाभिमान व प्रामाणिकपणा नष्ट झाला. हा त्यांचा दोष नव्हे. जातिधर्म व त्याचें अपत्य वतनपद्धति ह्यांचा हा दोष आहे." ( गांवगाडा -पान २१७) हें विधान अत्यंत खोल आणि खरें आहे. चूक येवढीच की, जातिधर्म व त्यांचें अपत्य वतन पद्धति असें नातें नसून वतनपद्धति व तिचें अपत्य जातिधर्म असा वारसा संबंध हिंदी समाजशास्त्र ओरडून सांगत आहे ! वतनपद्धति जातिधर्माहून फार पुरातन आहे. कारण हिंदी ग्रामसंस्था हिंदू वर्णव्यवस्थेला आजीबाई शोभेल इतकी जुनी आहे. वर्णव्यवस्था ही एक भावनेचें जाळें आहे. ग्रामसंस्था स्वाभाविक गरजांच्या नियमावर उभारली आहे. म्हणून अधिक काळ टिकली आहे. जातिधर्म हा एक भावनेचा विंचू आहे. तर अस्पृश्यता तिला मागाहून फुटलेली नांगी आहे. पुरातन ग्रामसंस्थेत एका मागून एक विकास पावलेल्या जातिधर्माने व शेवटीं अस्पृश्यतेने आपापलीं घरें केलेलीं आहेत. पण भारतवर्षांत युरोपियनांबरोबर आलेल्या जागतिक क्रांतीमुळे ही घरें उर्फ छिद्रें आता हळूहळू बुजत चाललीं आहेत.
मोगलाईतील व स्वराज्यांतील कांही मराठी उता-यावरुन दिसून येतें की निदान महाराष्ट्रांतील कांही अस्पृश्य मानलेल्या जाती केवळ अलुते-बलुतेदारच नसून, चांगले परपंरचे वतनदार होते, इतकेंच नव्हे त्यांतील कांही व्यक्तींनी शिलेदारी करुन आपल्या तलवारीचें पाणी स्वकीय परकीय गलीमांना पाजण्याची मिळालेली दुर्मिळ सुसंधी दवडलेली नाही. इतर प्रांतांतील जुने नवें वाड्मय असेंच धुंडाळल्यास भावी संशोधकास इतर प्रांतांतला 'अस्पृश्यां'मध्येही अशा जाती व व्यक्ती सहज आढळतील. आणि मी जो ह्या इतभागी जातीच्या उज्वल भूतकालाचा सुगावा ह्या ग्रंथद्वारें हुडकीत आहें, तो त्यांना सापडून ते माझ्यापेक्षा अधिक यशस्वी होतील.
तें कसेंही असो, मध्ययुगांत आज अस्पृश्य मानलेल्या सर्व जाती, धर्म आणि अर्थ या दोन्ही दृष्टीनी केवळ नामोहरम झाल्या होत्या. गांवगाडयांतील श्रमविभाग आणि हक्कवारसा खालीलप्रमाणें ठरला होता. उच्च म्हणविणारे वरील तीन्ही वर्ण अडाणी उर्फ बैठे किंबहुना ऐतखाऊ बनले. काळी असो पांढरी असो, जमीनीचा मालक कोणीही ठरो, तिचा कामचलावू ताबा मात्र कुणब्याकडे आला. व ते केवळ श्रमाचे अधिकारी झाले. गांवकीच्या कसबी कामाची जबाबदारी व हक्कवारसा अठरा पगड जातींनी उर्फ बलुतेदारांनी उचलला. ह्यांत ज्योतिष्यांपासून तो ढोखभंग्यांपर्यंत सर्वांच्या मिसली उर्फ हक्कमर्यादा निर्विवाद ठरल्या. मैला उचलणारा भंगी व फाशी देणारा मांग ( अर्थात ह्यांची कामें शहरांतूनच चालणारीं ) ह्यांनी देखील आपली मिराशी ठरविली होती. म्हणजे त्यावरील अतिक्रमण त्यांना असह्य असे. शेवटी शिल्लक उरली ती बेकारी उर्फ महारकी. "गांवकीच्या कसबी कामाची जातवार वाटणी झाल्यावर बेगार काम उरलें. तें कोणतीही हुन्नरी जात पतकरीना. असें हें पडून राहिलेलं काम महारांच्या गळ्यांत पडलें; म्हणूनच महार म्हणत की आम्ही काय पडल्या कामाचे चाकर. जें काम करण्याला अभ्यास, कला किंवा विशेषसें ध्यान नको त्याला बेगार म्हणतात. रोख मेहनतान्वावाचून करावें लागतें त्याला कामाला तेलंगणांत 'वेट्टी' म्हणतात; तेव्हां ह्या शब्दापासून 'वेठ' शब्द निघाला असावा. गांवगाड्याचा खराखुरा वेठ-बिगारी किंवा हरकाम्या फरास महार होय." ( गांवगाडा पान ४९). बेगार म्हटल्याबद्दल महारांना राग येण्याचें कारण नाही. महाराष्ट्रात दुसरी बेहुन्नरी जात अगर जमात म्हणजे मराठी अगर कुणबी हीच होय. महारांत मराठ्यांत फरक इतकाच की रोख मेहनतान्यावाचून मराठी कधी कोणतीही बेगारी करणार नाही - मग तो बेगारी मुलखगिरीच्या नांवाने खपो अगर भांडी घासण्याच्या नांवाने चालो. महाराला रोखीला हक्क नसे. तो मराठ्याचा हुकमी बंदा. पण त्याला पुरातन जमीनीचे वतनी हक्क असत. बेगारी मराठी बहुधा उप-याच असणार. महाराष्ट्रांत मराठ्यांच्याही पूर्वीचा महार खास होता. मध्ययुगांत केव्हाही मराठी स्वतंत्र आणि अतिक्रमण करणारा, पण महार गुलामगिरींत रखडणारा आढळतो. हाच प्रकार इतर प्रांतांतल्या क्षत्रिय व अस्पृश्य गणलेल्या वर्गांच्या परस्पर संबंधाचा आहे. म्हणून भारतीय अस्पृश्यता ही एक भारतीयांचे भलें मोठें दुष्ट राजकारण आहे. असें मी म्हणत आलों आहे. ह्यांत क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य ह्या तिघांची भागी आहे.
"मुलकी फौजदारी संबंधाने महारांची मुख्य कामें येणेंप्रमाणे:- पट्टीसाठी असाम्यांना बोलावणें, वसूल तहसिलींत नेणें, कागदपत्र परगांवी पोंचविणे, पाटील कुळकरण्याबरोबर गांवांत व शिवारांत हिंडणे आणि परगांवी जाणें; गांवांत मुक्कामाला मोठे लोक अधिकारी आले म्हणजे त्यांच्यासाठी सरपण चारा आणणें, जनावरांची मालीस करणें, दाणापाणी दाखविणें, शेण लीद काढणें, त्यांच्या तळावर 'बशा' बसून राहणें, गांवची व कामगाराची वेठ बिगार वाहणें, वाटसरांना जंगलांतून नेऊन पोंचविणें, दौंडी देणें, गांवची शीव व शेताच्या बांध उरुळ्या ध्यानांत धरणें, त्या न मोडल्या जातील अशी खबरदारी घेणें व त्याबद्दलच्या भांडणांत पुरावा देणें, दरोबस्त पिकें व खळी राखणें, रात्री काळीत पांढरींत गस्त घालणें, गांवची जंगल व झाडें जतन करणें, जंगली जनावरें मारणें, रात्रंदिवस घाटांत पहारा करणें, चोरवाटाव मा-याच्या जागा ह्यांची माहिती मिळविणें व त्या रोखणें, गांवांत आल्या गेल्याची खबर काढणें, न देखल्या माणसावर नजर ठेवणें, वहिमी माणसाची पाटलांना वर्दी देणे; गांवांतल्या माणसान् माणसांची चालचलणूक लक्षांत ठेवणे, चोरांचा तपास लावणें व माग काढणें; चावडीपुढे, वेशीपुढे व गांवचे रस्ते झाडणें, गावं साफ ठेवणें, मेलें जनावर ओढणें, वगैरे होत. ह्या शिवाय घरकी कामें महार करीत. गांवकीवर नेमून दिलेल्या महारांना पाडेवार म्हणत. घरकी कामें करणा-याला राबता महार, घर महार म्हणत." ( गांववाडा पान ४९,५०)
गावचें पोलीस, लष्कर, दिवाणी, वसुली, पोष्ट, हेर, सरबराई, म्युनिसीपालिटी, समाजसेवा, वगैरे कुल जबाबदारी महारावर होती. अर्थात् ही सर्व जबाबदारी अखेर मराठा पाटलावर होती पण पाटलाला हरकदम महार जबाबदार होता. गांवगाड्यांतच नव्हे तर बादशाही दर बारांतही देशमुख देशापांड्याचा तसाच पाटील कुलकर्ण्यांचा हस्तक, तसाच पाठीराखा महार होता. तसा कायद्याने किंवा रिवाजांत इतर कोणी नव्हता. मग ही जात मराठ्याबरोबर किंबहुना कांकणभर जास्तच राजकारणी होती म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. "वतनदार महाराचीं घरकी कामें येणेंप्रमाणे आहेत:- कुणब्याचें बी, औत, मराठी, वगैरे ओझ्याची शेतांत ने आण करणें, दारापुढे झाडणें, गुराचे गोठे साफ ठेवणें, सर्पण आणणें व फोडणें, मु-हाळीं जाणें, मिरासदार परगांवी जाण्यास निघाला असतां त्याचेबरोबर गड्याप्रमाणें जाणें, चिठ्या चपाट्या परगांवी नेणें, मौतीची खबर परगांवी पोंचविणें, सरण वाहणें इत्यादि." (गांवगाडा पान ५०) एकूण महार म्हणजे नुसता एक सरकारी गुलाम नसून ग्रामसंस्थेंतील एक पिढीजाद सार्वजनिक गुलाम होता. हें रहस्य कांही और आहे.
महाराप्रमाणें मांगही एक बिनहुन्नरी बेकार दिसतो. पण तो गांवगाड्यांत महारापेक्षांही खाली दडपला गेला आहे. ह्या दडपण्यांत महाराचाही हात दिसतो. ह्यावरुन महाराच्याही पूर्वीचा हिंदभूमीचा पुत्र मांग दिसतो. वर (पान १९६) जो दामाजीपंत आणि विठू महाराच्या नांवाने एका महत्त्वाच्या जुन्या महजरीचा उल्लेख आला आहे, त्यांत महाराच्या विशेष हक्कांची नोद असून "त्यांत मांगांचा कांही संबंध नाही" असं ठिकठिकाणीं बजावलें आहे. "हरकी माहारकी सीतादेवी (जमीन) कुणब्याची मळणी जाहलेवर कुणब्यानें सेतांत महारास देत असावी... १ मांगाचें लग्न रानांत करावेंम ते दिवसीं तिखटीचा मांडव घालून तीन मेढीचा करावा व रानांत हल्यावर वरात काढावी. गावांत मिरवू नये, गांव पांढरीचा विडा त्यास द्यावा. १ नगरीचे होळीचा नैवेद्य महाराने घ्यावा १. पोळ्याचा निव्वेद व बैलाची ववाळणी माहाराने घ्यावी. १ माहाराचे लग्नास मांगाणे पागुट व लुगडें देत जावें १. गाव पांढर मिळोन सरकारांचे पागेंतला घोडा महाराचे वरातीस द्यावा. मांगाहून वहिवाट-चालक हा खरा. मांगाचा त्याचा संबंध नाही. मांगाबद्दल कोणी बोलूं लागल्यास तो जातीबाहेर पडेल." ( भा. इ. स. मंडळाचे चतुर्थ संमेलनवृत्त , पान ६४). येणेंप्रमाणे वेदरच्या बादशहाचे वेळी महाराने मांगावर वर्चस्व गाजवूनच न राहतां, गांवगाड्यांत त्रैवर्णिकाची जी खासगी गुलामगिरी उर्फ राबती त्याला करावी लागत होती, त्या राबतीच्या जाचांतूनही स्वत:ला सोडवून घेण्याची कारवाई केल्याचा वरील महजरींतच स्पष्ट उल्लेख आहे, तो असा: "देशमुख याचे घरांत राबती महारांने करावी, त्यास पोटास भाकरी घालावी. पाटील ह्याचे घरीं महाराने राबती करावी सबब त्याजला घडून पांघरुनाबद्दल रुपये ६ देत जावें; दर रोज पोटास भाकरी घालावी. ह्या सिवाय विसी बोलू हराटीचे पांच बिघे देऊन राबती घ्यावी. नाही पेक्षां राबती विसी बोलूं नये." (सदर वृत्त. पान ६३). मराठी स्वराज्यांत आणि विशेषत: आंग्लाईत ही राबतीची जबाबदारी महाराने अगदी संपुष्टांत आणिली आहे. कर्नाटकांतील देसाई देशपांड्यांचे पुरातन घराण्यांतूनही होल्यांची राबतीची उदाहरणें अद्यापि आढळतात, तितकी महाराष्ट्रात महाराची आढळत नाहीत. परंतु गांव स्वच्छ ठेवण्याची सार्वजनिक जबाबदारी खेड्यातून अद्यापि महाराकडेच आहे. "हें काम खासगी नसून सरकारी आहे, आणि तें घरकीचे आहे अशी महारांची समजूत होऊ देऊं नयें, असें ता. २८ जून १८८८ च्या सरकारी ठराव नं. ४२७३ मध्यें फर्मांवलें आहे.... गांवचे रस्ते झाडण्याचें ते साफ नाकारतात. कोणी मोठा अम्मलदार गांवी येणार असल्यास ते गांवक-याचे मागे जिकडे तिकडे साफसूफ करण्याची निकड लावतात. आणि आपण फार तर चावडीपुढे आणि कांही ठिकाणी येण्याजाण्याच्या रस्त्यावर खराटा फिरवितात. ज्याचे हद्दीत घाण असेल त्याचेवर फौजदारी खटला होतो. त्यामुळें स्वत: राबून किंवा महारामांगाना मोल देऊन जो तो आपली जागा साफ राखतो." ( गांवगाडा पान ९४).
गांवगाड्याची ही वतनी पद्धत ह्या युगांत कोणत्याही दृष्टीने पाहतां गौरसोयीची व कटकटीची आहे हें नवीन इंग्रज सरकारच्या लक्षांत प्रथमपासूनच आलें आहे. इतकेंच नव्हे तर पेशवाईअखेर आणि आंग्लाई-आरंभ दोन्ही डोळ्यांनी पाहून, लोकस्थितीचें सूक्ष्म निरीक्षण करणा-या परशराम कवीने केव्हाच भाकींत केलें.
पाटील कुळकर्णी नांव उगीच घालून दमले येरझारा
सत्ता साहेबी अगदी बुडाली महाराचा त्यांहून तोरा ।।
(गांवगाडा पान ९४) ह्या वरुन लोकांना ही पद्धती डोईजड झाली होती. "इ.स. १८३९ च्या अॅक्ट २७ अन्वयें शेव, फसकी, वाणगी सारखें यच्चयावत् पांढरी हक्क उर्फ मोहतर्फा उकळण्याची झाडून सर्व वतनदारांना सरकारनें मनाई केली आहे. सर्व्हे सेटलमेंट प्रमाणें परगणे वतनदार व पाटील कुळकर्णी ह्यांना घुगरी, सळई बलुत्यासारखे काळीचे हक्क उकळण्याची बंदी केली; आणि पाटील कुलकर्ण्यांची चाकरी वंशपरंपरेने कायम करुन त्यांच्या परभारे उत्पन्नाबद्दल वसूली रकमेवर रोकड मुशाहिरा तोडून दिला आहे. महार जागले ह्यांना मात्र मामूलप्रमाणे बलुते हक्क उकळण्याची मोकळीक सरकारने ठेविली आहे." ( सदर पान ६८) कुळकर्ण्यांची कायमची वतनेंही पुढे सरकारनी रद्द केली व पगारी तलाठी नेमले. पण माहारामांगांच्या बलुत्याची कटकट अद्यापि दोहोपक्षी चालूच आहे. ह्यासंबंधी कायदे मंडळांत अगदी अलीकडेही महाराष्ट्रांत आणि व-हाडांत बरीच चळवळ वेळोवेळी झालेली आहे. पण सोक्षमोक्ष झाला नाही. गांव आणि महारवाडा ह्यांचे कांही मासलेवाईक तंटे मात्र ध्यानांत घेण्यासारखे आहेत.
" लाखेफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे महारांचा व गावचा लढा पडला. गांवची घरें १२५ लोकवस्ती सुमारें ८०० आणि महारांची लोकसंख्या सुमारें २००. काळींत सुमारें १०० नांगर चालत होते. लोक नांगरामागे महारांना चार पायल्या धान्य व रोजची भाकर देण्याला कबूल होते. महारांचे म्हणणें असं पडलें की, गावाला आठ महार लागतात, तर आम्हांला रोज दर घरची एक भाकर, सणावाराला सर्व महारवाड्याला वाढणें, पड्याची माती व कातडें आणि शेतांत पिकेल त्याचा दहावा हिस्सा बलुतें ह्याप्रमाणे मिळालें पाहिजे... सन १९०५ सालीं महार जागल्यांच्या वतनासंबंधाने चौकशी चालू होती तेव्हा ते स्वच्छ म्हणत की, माणसीं दहा रुपये दरमहा दिला तरी परवडणार नाही. टाकळी, भान, तालुके नेवासे येथील महारांना पांच वर्षे सस्पिंड केलें; तेव्हा पुन: कामावर रुजू करुन घेण्याच्या खटपटीसाठी हजार रुपये देण्यास कबूल झाले. सन १९९२ सालीं पारनेर तालुक्यांत वडनेर बुद्रुक गांवी निजामशाहींतील एक महार आला, आणि त्याने एकाने दोन रुपये चौथ्या दिवशी देण्याचा धंदा सुरु केला. ह्या धंद्यांत सदर गांवच्या महारांनी ६००-७०० रु. घातलें." ( गांवगाडा, पान १०६-७) ही एक बाजू झाली. पण हिला दुसरी बाजू आहे. ती 'गांवगाडा' कर्त्याच्या ध्यानात इ.स. १९९५ च्या सुमारास आली नसली तरी अस्पृश्यांनिवारणाच्या तीन तपानंतर आता प्रत्येक तालुक्यानिहाय खेडोखेडीं उद्योन्मुख अस्पृश्य पुढारी आणि सनातनी हिंदू ह्यांच्यामध्यें नुसता वादच नव्हे तर मारामा-या व रक्तस्त्राव होत असतात व आमच्या मिशनला मध्यस्थी करावी लागते हें कांही खोटें नाही. अस्पृश्यांनी मृतमांस न खाण्याची शपथ घ्यावी, पड ओढण्याचें नाकारावें, की लगेच बलुत्याची गोष्ट दूर राहिली पण अस्पृश्य डोईजड झाले म्हणून सनातन्यांनी त्यांना सडकून काढावें, त्यांची पिकें कापावीतं, त्यांचे पाणी बंद करावें असा क्रम चालला आहे व त्याची नीट दाद लागत नाही. ब्रिटीश मुलूखच नव्हे तर उत्तरेकडे इंदूर अथवा दक्षिणेकडे भोर सारख्या संस्थानांतूनही अशा कटकटी आमच्याकडे नित्य येत आहेत. मात्र ह्याला राजकारण हें नांव मिळत नाही. !
आता आपण ब्रिटिश रियासतींत अस्पृश्य वर्गाची लष्करांत भरती कशी काय झाली, ह्या रहस्यमय विषयाकडे वळूं या. ५।७ हजार मैलांवरुन येऊन मूठभर इंग्रज लोकांनी जो सारा भरतखंड आता आपल्या मुठींत वळला आहे तो कांही सर्व लष्कर विलायतेहून आणून वळला नाही. मुसलमान लोकांचे हल्ले झाले ते त्यांच्या तयार लष्करी टोळ्यांनी केले. हल्ले यशस्वी होतात हें पाहून ह्या टोळ्यांच्य मुख्यांनी येथे बादशाह्या स्थापल्या. तसें युरोपियनांचे झालें नाही. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे सर्व तलवारी घेऊन नव्हे, तागडी घेऊन व्यापाराकरितां येथे आले. पैकी फ्रेंचांनीच राज्यस्थापनेची हाव प्रथम धऱली. पण मायदेशांतच म्हणजे फ्रान्स देशांत क्रांती झाल्याने बारभाई माजून इतक्या दूरदेशांतले विधायक राजकरण फ्रेंचांना आवरलें नाही. म्हणून इंग्रजांनी फ्रेंचांचा डाव आपल्या मनावर घेऊन तो आपण यशस्वी केला. इंग्रजांच्या लष्कर उभारणीचा इतिहास त्यांच्या राजकारणी काव्याला अगदी शोभण्यासारखा आहे. त्यांच्या प्रथम सुरत, मद्रास, कलकत्ता येथे माल उतरण्याच्या व भरण्याच्या वखारी होत्या. त्यांच्या राखणीसाठी लाठीकाठीवाल्यांची शिबंदी होती. तिचाच विकास हल्लीच्या अजस्त्र बादशाही सैन्यांत झाला आहे. क्लाइव्हसारकें आपल्या बापाला नकोसें झालेलें उनाड पोर मद्रासच्या वखारींत कारकुनाचें काम करीत असतां अर्काटच्या हल्ल्यांत शिपायाचा पोषाख करुन गेलें. तेथे त्याला राज्यस्थापनेची स्वप्ने पडू लागू लागली! मद्रासेकडे अर्काट येथे त्याला अकस्मात विजय मिळाल, म्हणून त्याने आपली मद्रासेकडील खोगीर भरती टोळी कलकत्त्याकडील कटकटींत नशीब काढण्यासाठी नेली, त्या भरतींत प्रथम शिरलेले तामील पारियाही होते. पारियाइतका स्वस्ता शिपायी जगांतकोठे मिळणार ? आपण भातावरचें पाणी पिऊन भात गो-या सोजिरांना देणारा भाडोत्री शिपायी म्हणून त्याने इतिहासांत नांव कमावलें आहे ! अर्काटचा वेढा इ.स. १७५१ साली झाला. ह्यानंतर बंगालची कारवाई होऊन इ.स. १७५७ मध्यें फ्लासीच्या लढाईनंतर दिल्लीच्या बादशाहीचे इंग्रज हेच दिवाण बनले. पुढे इ.स. १८१७-१८१८ मध्ये इंग्रजांच्या पळपुट्या दुस-या बाजीरावाशीं खडकी, कोरेगांव व शेवटीं अष्टें येथे तीन चकमकी उडाल्या. पेशवाई बुडून इंग्रजांची वाट सा-या हिंदुस्थानांत निष्कंटक झाली. मराठ्यांच्या लढायांत ज्या पारिया पलटणी म्हणून दक्षिणेकडील लष्कर होतें. त्यांत महाराष्ट्रांतील शूर महारही पुष्कळ होते. त्यांचें नांव पारिया पलटणी पडण्याचें कारण हिंदुस्थानांत लष्करांत भरती प्रथम अस्पृश्यांतील पारियांचीच होय. म्हणूनच महार शिपायांची जात परवारी अशाच नांवाने नमूद होत असें.
मराठ्यांनी शेवटचा मिळविलेला विजय म्हणजे खडर्याची लढाई. तींत शिदनाक नांवाचा महार सरदार, पहिल्या शाहूच्या एकनिष्ठ मराठी सरदाराचा नातू होता. तेव्हापर्यंत मराठ्यांशी एकनिष्ठ राहिलेले महार कोरेगांवच्या लढाईचे वेळी सन १८१८ सालीं म्हणजे अवघ्या २३ वर्षांत उप-या इंग्रजांना इतके कसे वश झाले, हा मोठा चिंतनीय विषय आहे. कोरेगांवची लढाई इंग्रज बहादूरांनी मोठ्या ईष्येनें मारली. तेथे आता एक जुना रणस्तंभ भीमेच्या काठी उभा आहे. त्या लढाईंत कमास आलेल्या शेंकडो शिपायांची नांवें ह्या खांबावर कोरलेलीं आढळतात. त्यांत एकंदर खालील २३ महार शिपायापैकी पहिले २० शिपाई ठार झाले, व शेवटचे तीन जखमी झालेले आहेत. १ सोमनाक कमलनाक नाईक २. रामनाक येसनाक नाईक; पुढील १८ जण शिपायी होते, ३ गोदनाक कोठेनाक, ४. रामनाक येसनाक, ५ भागनाक हरनाक, ६ अंबनाक काननाक, ७ गणनाक बाळनाक, ८ बाळनाक कोंडनाक, ९. रुपनाक लखनाक. १०. वपनाक रामनाक, ११ विटनाक धामनाक, १२ राजनाक गणनाक, १३ वपनाक हरनाक, १४ रैनाक वाननाक, १५ गणनाक धर्मनाक, १६ देवनाक आननाक, १७ गोपाळनाक बाळनाक, १८ हरनाक हीरनाक, १९ जेटनाक द्यैनाक, २० गणनाक लखनाक, पुढील तीन शिपाई जखमी झाले - २१ जाननाक हीरनाक, २२ भीकनाक रतननाक, २३ रतननाक धाननाक. एका लढाईंत इतके महार कामास आले तर तेव्हा अवघ्या सैन्यांत हिंदुस्थानभर किती अस्पृश्य मानलेले शूर मर्द होते ह्याची आता नुसती पुसट कल्पना करण्यापलीकडे साधन उरलेलें नाही. निदान तूर्त आम्हांस उपलब्ध नाही. ही निष्ठेची थारेपालट होण्याला केवळ दुस-या रावबाजीचा दिवटेपणाच कारण नव्हे. इंग्रजांची समयज्ञता, शिस्त आणि वेळेवर रोख पगार देण्याची प्रसिद्धि ह्या गुणांची भुरळ पडून इंग्रजांना अस्पृश्य मानलेलेच नव्हत, तर चांगले नरपति गजपति क्षत्रिय आणि भूदेव सोंवळे ब्राह्मण आपल्या तलवारी आणि लेखण्यांसह वश झाले. पण आमचा मुद्दा ही निष्ठापालट नसून, तो हा आहे की, अव्वल इंग्रजींत जर अस्पृश्यांची इंग्रज लष्करांतही इतकी चहा होती, तर आता ती कशी आहे?
लेफ्टेनंट जनरल सर जॉर्ज मॅकमन्न नांवाच्या एक लष्करी गृहस्थाने नुकतेंच म्हणजे इ.स. १९३३ फेब्रुवारी महिन्यांत The Martial Races of India ( हिंदुस्थानांतील लढावू जाती ) हें एक मोठें पुस्तक लिहून प्रसिद्ध केलें आहे. त्यांत इंग्रजांच्या पूर्वापार लष्करी धोरणाचें रहस्य चांगले रेखाटलें आहे. अगदी प्रथम वाक्यांतच प्रस्तावनेंत ग्रंथकार स्पष्ट म्हणतात की हें पुस्तक हिंदुस्थानांत हल्ली बळावत असलेल्या महात्मा गांधी रुपी विषावर एक उतारा म्हणून लिहिलें आहे. लष्करी अथवा लढाऊ जातीची मीमांसा करीत असतां पहिल्या प्रकरणाच्या पहिल्याच प्या-यांत ग्रंथकाराने अशा जातींच्या यादींत मद्रासच्या पारियांचीच काय ती गणना केली आहे. ती अशी:- "शीख, पंजाबी, सरहद्द मुसलमान, मराठी, गुरखा, राजपूत आणि मद्रासचा पारिया." शेवटच्या पारियाविषयी "Whom Baba Gandhi never fathered" म्हणजे " त्याला बाबा गांधीने कधीच आपल्या पंखाखाली घेतलें नाही." असा ग्रंथकाराने मार्मिक शेरा दिला आहे. अव्वल इंग्रजीत हिंदुस्थानांत जी चहूकडे बेबंदशाही माजली होती तेव्हा इंग्रजांनी आपलें नशीब काढतांना प्रथम कोणकोणत्या जातींना हाताशी धरलें तें सांगतांना ह्या ग्रंथकाराने काढलेले पुढील उद्गार नमुनेदार आहेत. "जसजशी ह्या देशांत अंदाधुंदी माजूं लागली, तसतसे हिंदुस्तानाच्या सर्व भागांतून व्यापारी वर्गाच्या तांड्यांची रखवालदारी करणारे अगर इकडून तिकडे जासूद अथवा हेर म्हणून कामगिरी करणारे कांही बाजारी वर्ग तेव्हा मुबलक आढळत असत. मद्रासेकडे (प्रथम ह्याच प्रांतांत ब्रिटिशांनी अकरा एकद्देशीय पलटणी उभारल्या ) नेटिव्ह ख्रिस्ती व पारिया जाती मोठ्या कामास आल्या. पोटांत दोन घोट दारू आणि खांद्यावर तपकिरी रंगाचा पट्टा मिळाला की एतद्देशीय रजवाड्यांच्या कसलेल्या सैन्यांच्या सामन्याला उभा राहवयाला पारिया गडी कधी अपात्र समजला जात नसे. (Martial Races of India पान १६९) ही झाली अव्वल इंग्रेजीची ढब.
पुढे जसजसें इंग्रजांचें बस्तान येथे बसत चाललें तसतसें लष्करांत एतद्देशीय लोकांची भरती करण्याचें बादशाही धोरण बदलत चाललें आणि तशी लष्करांतून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊ लागली. मग इंग्रजांना येथील जातींचा लष्करी दृष्टीने अस्सल अथवा कम अस्सल हा भेदभाव सुचू लागला आणि हिंदी लष्करांचे 'अस्सलीकरण" सुरु झालें. सदर ग्रंथकाराने ह्या निवडानिवडीला आपल्या नवव्या प्रकरणांत Brahmanization of the Army असें न समजतां म्हटलें आहे. सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडापर्यंत बंगाली पलटणींत एक जात लखनौकडील राजपूत आणि पुरभय्ये ब्राह्मण शिपायांचीच भरती होत असे. ह्या मोठ्या बंडांत ह्या दोन जातींनी पुढाकार घेतला म्हणून पुढे ह्यांची भरती बंद झाली. ह्यापुढे हिंदी लष्करासाठी नव्या दृष्टीने निवड होऊं लागली. जातिवंत इभ्रतदार, वतनदार जातींतून ही भरती व्हावी असें वळण पडत चाललें.
"तिस-या मराठा युद्धांत (इ.स १८०२-३) मद्रासी सैन्याने आर्थर वेलस्लीच्या निशाणाखाली मोठी प्रसिद्धि मिळविली; लॉर्ड लेकच्या बंगाली सैन्यालाही मद्रासी सैन्याहून अधिक कीर्ती मिळवितां आली नाही. असें असूनही ह्या वेळेपासून एतद्देशीयांच्या भरतीच्या बाबतींत ब्राह्मणीकरणाचें (जातिवंत इजतीचें ) धोरण माजूं लागलें. ह्याचें कित्येक जुन्या इंग्रज अम्मलदारांना फार दु:ख वाटूं लागलें. अव्वल मद्रासी लष्करांत जुन्या पेंढारांची-पठाण, आरब, तुर्क अफगाण, हबशी, मेक्रानींची भरती होत असें. हें पेंढार दक्षिणेकडील मुसलमान बादशहाच्या लष्करांत पूर्वीपासून भरणा होत असे. अझूनी दक्षिण हैदराबादेस त्यांची भरती होतच आहे. ह्याचप्रमाणें दुसरा मोठा वर्ग पारियांचा. पोटांत दारुचे घोट आणि खांद्यावर पट्टा मिळाला की झाली ह्यांची युद्धाची तयारी ! ह्यांनी हिंदी रजवाड्यांच्या बेशिस्त सैन्याशी जरी मोठ्या नांव लौकिकाचा सामना केला तरी अखेरीस त्या बिचा-यांना लष्करी इज्जत संपादन करतां आली नाही. ते राष्ट्रीय दर्जाचे नव्हते. इंग्रजांना जर भारतीयांवर राज्य करावयाचें होतें व तेंही त्यांच्या खुषीने, तर त्यांचे सैन्यांतील शिपाई भारतीय समाजांत ज्ञातीय मान्यता पावलेलेच असावयास पाहिजे होते. म्हणून ज्यांची गांवांत व शिवारांत मानमान्यतेची परंपरा आहे अर्थात् जे राष्ट्रमान्य आहेत अशांचीच लष्करी पेशांत भरती व्हावी अशी परंपरा पडूं लागली."
चौथ्या मराठा युद्धांत 'मद्रास तोफखाना" होता. त्यांत पारिया होते. मराठे महारही पुष्कळ पायदळांत होते. कोरेगांवच्या रणस्तंभावर त्यांची नांवे अझूनी चमकतात. तरी हे मॅकमन साहेब म्हणतात. " ह्या शेवटच्या मराठा युद्धांत, ह्या मद्रासी सैन्याने जयश्री मिळविली नाही. मराठी, मेवाडी रजपूत व पेंढा-यांच्या हल्ल्याला मुख्य तोंड देण्याचें श्रेय केवळ इंग्रजांकडील आरबांनीच मिळविलें, (म्हणून) इंग्रजांना आपलें भरतीचें धोरण जातिवंतांच्या बाजूने वळवावे लागलें. सन १८५७ सालच्या बंडानंतर भरतीच्या पिढीजाद पद्धतीचा (System of Regular Indian Army) अंतच झाला. आतापर्यंत बंगालच्या सैन्यांत जो अयोध्येकडील राजपूत आणि ब्राह्मण शेतक-यांचा मक्ताच चालू असे, तो ह्यापुढे बंद पडला. पुढे पुढे इंग्रजी शांतीच्या झेंड्याखाली जसजशी सुखासीनता वाढू लागली तसतशी दक्षिण देशांतील (मद्रासी) सैन्याची लष्करी तडफ मंदावूं लागली.
"लॉर्ड किचनेरचे कारकीर्दीपासून तर हिंदुस्थानांतील जातींचें व वंशांचे लष्करी दृष्टीने अगदी बारीक अध्ययन सुरु झालें. तेव्हा पासून मराठ्यांची विशेषत: कोंकणी मराठ्यांची आराधना (Cult) शिखरास पोंचू लागली. शेवटच्या महायुद्धानंतर ११७ वें ( मराठा लाइट् इनफंट्री) पायदळ हें 'रॉयल' हा अत्यंत उज्ज्वल बहुमानाचा शिक्का मिरवीत आहे."
ह्या सबंध पुस्तकांत महार चाभार वगैरे महाराष्ट्रांतील कोणत्याही अस्पृश्य जातीचा चुकून देखील कोठेही उल्लेख झालेला दिसत नाही. हे ब्रिटिश सरकाराचें धोरण मोठेंच निराशाजनक आहे. ह्याच्या प्रतिकारार्थ निदान महाराष्ट्रांतर तरी जोराचे प्रयत्न झाल्याशिवाय राहिलें नाहीत. ह्या बाबतींत पुण्यांतील महारांचे अनुभविक पुढारी श्री. शिवराम जानवा कांबळे ह्यांचे चिकाटीचें कार्य त्यांना भूषणावह आहे. त्यांनी प्रथम पुण्याजवळ सासवड येथे ५१ गांवच्या महारमंडळीची सभा भरवून मुंबई सरकाराकडे एक छापील अर्ज पाठविला त्यावर दूरदूरच्या डेक्कन व कोंकण येथील १५८८ महार बांधवांच्या सह्या झाल्या होत्या. त्यांतील अस्पृश्यांकरितां मागण्या पुढीलप्रमाणें होत्या : १. खालच्या दरजाच्या सरकारी नोकरींत घेणें, २. सार्वजनिक सरकारी शाळेंत मुलांना घेण्याबद्दलचे अडथळे नाहीसे करणें. ३. पोलीसांत चाकरी करण्याची मुभा देणें ४. हिंदूस्थानच्या सैन्यांत चाकरी करण्याची परवानगी देणें. ह्यांपैकी पहिल्या दोन मागण्यांना सरकाराने कांहीतरी गुळमुळीत उत्तरें दिलीं, तिस-या मागणीसंबंधी जातीच्या निकृष्टपणाची सबब सांगितली आणि चौथ्यासंबंधी मुंबई सरकार हात घालूं शकत नाही, असें स्पष्ट उत्तर आलें. ह्या अत्यंत असमाधानकारक उत्तरावर तेव्हाच्या प्रसिद्ध सुधारक पत्रांत महारांना अनुकूल अशी खरमरीत टीका आली आहे. ( नवलकरकृत शि. जा. कांबळे ह्यांचे चरित्र, पान २५). यानंतर सन १९०५ मध्यें ह्या बाबतींत हिंदुस्तान सरकाराकडे दुसरा अर्ज करण्यांत आला. पण त्यालाही निराशाजनकच उत्तर आलें. ह्यानंतर आम्ही मुंबईत १९०६ सालीं निराश्रित साह्यकारी मंडळी (Depressed Classes Mission ) स्थापन केली. तिची एक शाखा कांबळे ह्यांच्या विनंतीवरुन पुणें येथे १९०८ सालीं उघडण्यांत आली. त्यानंतर ता. ५ एप्रिल १९१० रोजी महार जातीची जेजुरी क्षेत्रांत मोठी परिषद भरविण्यांत आली. तेथे मी व आमच्या मिशनचे प्रतिनिधी हजर होतों. त्यांत २२ कलमांचा एक विस्तृत विचाराचा व बारीक माहितीने भरलेला अर्ज इंग्रजींतून ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविण्यांत आला. पनवेलचे सुभेदार बहादूर गंगाराम कृष्णाजी अध्यक्ष व श्री. शि. जा. कांबळे सेक्रेटरी ह्यांच्या सह्या होत्या. टाइम्स ऑफ इंडिया, बंगालचे केशवचंद्र सेन, पुण्याचे नामदार गोखले वगैरे थोर थोर पुरुषांचे अधिकारयुक्त अनुकूल अभिप्राय समाविष्ट केले होते. मुंबई सैन्यांतील निरनिराळ्या २१ पलटणींतून मोठी बहादुरीचीं कामें करुन जमादार, सुभेदार, सुभेदार-मेजरच्या रॅंकेपर्यंत चढलेल्या एकंदर २३३ महार गृहस्थांची नावनिशीवार यादी दिली आहे. यांत एक सरदार बहादूरही आहेत ! हा एक मोठा विशेष होय. लॉर्ड किचनेरने हा महार चांभारांचा हक्क बुडवून मोठा अन्याय केला, हें उत्तम सिद्ध केलें आहे. जे महार गृहस्थ आपली जात व धर्म सोडून ख्रिस्ती होतात, त्यांना ख्रिस्ती धर्मांत धर्मगुरूचेंही स्थान मिळूं शकतें. व त्यांना युरोपियनांनाही उपदेश करण्याची पात्रता येते. पण त्यांच्याच भाऊबंदांनी केवळ आपली धर्माची परंपरा राखली म्हणून, इंग्रजांना इमानाने रणांगणांत जीव मुठीत धरुन राज्य मिळवून दिलें आणि टिकविलें तरी, शेवटी सैन्यांतून नेमकी त्यांचीच हकालपट्टी व्हावी हें अत्यंत निकाशाकारक व अन्यायाचें आहे, हें सिद्ध केलें आहे. (शि. जा. कांबळे चरित्र, पान १४२, १५७) शेवटीं हा सर्व प्रयत्न अरण्यरुदनाप्रमाणे निरर्थक ठरला. अशाच प्रकारचा प्रयत्न मागे दापोडीचे मास्तर बाबा गोपाळराव वलंगकर ह्यांनीही केला असें ऐकिवांत आहे. ह्याशिवाय वरील चरित्रांत श्री. कांबळे ह्यांनी पुण्यांतील पर्वतीच्या व नाशिक येथील काळा रामाच्या देवळांत प्रवेश करण्याचे जे आटोकाट श्रम केले त्याचीही साद्यन्त हकीकत दिली आहे.
असो, ज्या अस्पृश्यांनी इंग्रज हे हिंदुस्थानांत नवखे असतांना, फ्रेंचांविरुद्धच नव्हे तर प्रत्यक्ष पेशव्याप्रमाणें आपल्या एक वेळच्या धन्याच्याही विरुद्ध झुंजण्यांत शिकस्त केली त्यांना आता सैन्यांत लढाऊ कामावर घेण्यांत येत नाही. मध्यतरी महायुद्धांत त्यांची बरीच भरती झाली होती. पण तीही आता बंद झाली आहे. हे मोठेंच आश्चर्य ! औधचे पंतप्रतिनिधीबरोबर रायगडचा प्रवास करुन त्याचें वर्णन श्री. द.ग. कुलकर्णी ह्यांनी जुलै १९३३ च्या किर्लोस्कर मासिकांत दिलें आहे. त्यांतील पुढील उल्लेख ह्या बाबतींत मासलेवाइक आहे. ( कि. मासिक पान ७२३)
"डाव्या बाजूस टकमक टोंक आहे. याला आज 'रायनाक' टोंक म्हणतात. पेशवाईच्या अखेरच्या काळांत हा अभेद्य किल्ला सर करण्याची गुरुकिल्ली पाचाडच्या रायनाक नांवाच्या महाराने इंग्रजांना सांगितली आणि इंग्रजांनी त्याप्रमाणे जगदीश्वराच्या उजव्या हातच्या डोंगरावरुन तोफा डागून अत्यंत बिकट जागी असलेला मराठ्यांचा दारुखाना उडविला. धूर्त इंग्रजांनी रायनाकाला पुढे ह्याच टोकावरुन खाली लोटून दिलें म्हणून त्याच्या नांवाने तें आज ओळखलें जात आहे." भावी सैन्यांतून होणा-या हाकालपट्टीचें हा कडेलोट एक स्पष्ट पूर्वचिन्ह नव्हे तर काय? ह्याला म्हणतात धोरण !
अस्पृश्य लोकांना लढाऊ लष्करांत भरती न करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळें ह्या लोकांच्या उद्धाराची एक अमूल्य संधी दवडण्यांत आली आहे ह्यांत संशय नाही. पण ह्या विक्षिप्त धोरणाला काय काय कारणें झाली हें मोठें रहस्य आहे. महाराष्ट्रांतील महारांचे अनुभव व सन्मान्य पुढारी, माझे दोघे मित्र व आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनमधले सहकारी श्री. शिवराम जानबा कांबळे व सुभेदार राघोराम सज्जन घाटगे ह्यांनी अधिकृत रीत्या मला ह्या बाबतींत पुढील माहिती पुरविली आहे. सुभेदार घाटगें ह्यांच्या दोन तीन पिढ्यांनी ब्रिटिश लष्करांत मोठ्या नेकीने नांव मिळविलें आहे. खुद्द घाटगे साहेबांनी गेल्या महायुद्धांत व अगोदरही चांगली कामगिरी केली आहे. सन १९२१ सालची गोष्ट. एडन जवळील नोबद दकिन गांवाजवळ सरहद्दीवर १११ व्या पलटणीला तळ पडला होता. आरबी डाकूंची एक टोली चाल करुन येत आहे अशी हूल उठली. कपनीचे नायक कॅपटन होल्सवर्थ ह्यांनी सुभेदार घाटगे ह्यांना ह्या टोळीला जवळच्याच खिंडीत थोपवून धरण्याचा हुकून केला. जवळ कांही हत्यार नसतांना व अंगावर भरपूर पोषाकही नसतांना केवळ छातीच्या हिमतीने ह्या एकट्याच बहाद्दराने ह्या टोळीस कांही तास थोपवून धरिलें व शिफारस मिळविली. हेच घाटगे हल्ली डी.सी.मिशनच्या पुण्याच्या शाखेचे सन्मान्य सेक्रेटरी, पुणे शहर म्युनिसिपलिटीचे लोकनियुक्त सभासद व सरकारनियुक्त बेंच मॅजिस्ट्रेट आहेत दुसरे श्री. कांबळे हे तर महारांचे पुढारी म्हणून अखिल महाराष्ट्रांत सुप्रसिद्धच आहेत. ह्यावरुन पुढील तीन प्या-यांतील माहिती खरी मानण्यास हरकत दिसत नाही.
सुमारें १८९०-९१ पर्यंत ब्रिटिश लष्करांत महार चांभारांची भरती होत असतां तेव्हापासून प्रथम नवीन ऑफिसर मंडळीची भरती बंद झाली, नंतर पूर्वीच्यांनाही रजा मिळूं लागली. ह्याविषयीं दाद लावून घेण्याचे पहिले प्रयत्न महाड तालुक्यांतील रावडुल गांवचे पेन्शनर हवालदार गोपाळनाथ विठ्ठलनाक वलंगकर नांवाच्या वृद्ध गृहस्थाने मोठ्या चिकाटीने केले. महात्मा जोतीबा फुले, बाबा पदमजी सारख्यांची ह्यांना शिकवण व मदत होती. सन १८९५ सालीं पुण्यास भरलेल्या काँग्रेसचे वेळीं ह्यांनी चळवळ केली होती. दापोली येथील अस्पृश्य वर्गांतील महार चांभार लष्करी पेन्शनवाल्यांच्या वसाहतींत सदर गोपाळबावांनी बरीच चळवळ केली. पण चळवळ नवीन असल्यामुळें यश आलें नाही. ह्यांनी हिंदुस्थान सरकाराकडे अर्ज केला असतां ह्या पेन्शनर लोकांना त्यावेली नुसत्या सह्या करण्याचेंही धैर्य झालें नाही. पुढे हीच चळवळ श्री. कांबळे ह्यांनी स १९०३ पासून मोठ्या नेटाने इ.स. १९१० पर्यंत चालविली. ती अद्याप चालूच आहे.
लष्करांत भरती बंद होण्याचीं कारणें अनेक सांगतात. पूर्वी कामगिरी असलेल्या शिपायांना रोज दोन प्रहरीं २ तास, स्वयंपाक करुन जेवण्यास वगैरे रजा मिळत असे. पण आणीबाणीचे वेळी ही रजा देणें. ही शक्य नसल्यामुळें त्यांच्यासाठी स्वयंपाकघर उघण्याचें ठरलें. तेव्हा एकत्र जेवण्याचा प्रसंग येई, म्हणून जातवार पलटणी कराव्या लागल्या. पण ह्यापेक्षा अधिक खरें कारण म्हणजे इज्जतदार जातिवंत लढाऊ लोकांच्याच जातवार फलटणी कराव्या असें ठरलें, हें होय. त्यामुळें ह्या निकृट वर्गांचा ह्या इज्जतीच्या पिशाच्चाला बळी द्यावा लागला. श्री. कांबळे ह्यांनी मुंबई आणि हिंदुस्थान सरकाराकडे व खुद्द ब्रिटिश पार्लमेंटकडे वेळोवेळी अर्ज केले, तरी कांहीच दाद लागली नाही.
शेवटी महायुद्ध ओढवले. तेव्हा मराठ्यांच्या जयजयकाराबरोबरच महार चाभारांचाही उदो उदो सुरु झाला आणि १११ व्या महार पलटणीची भरती सुरु झाली. त्यावेळी मुंबई आणि पुणें टाऊन हॉलमध्ये आमच्या मिशनच्या साह्याने जाहीर सभा झाल्या. महार व इतर पुढा-यांनी प्रयत्न केले. युद्ध संपले. फत्ते झाली. पण अखेरीस चोहीकडे सामसूम झाल्यावर ही १११ वी पलटण सन १९२१-२२ चे सुमारास बरखास्त करण्यांत आली ! कांबळे साहेबांनी लष्करांत मोठी निषेधाची सभा भरविली. इ.स. १८९० पूर्वी ६वी, ११ वीं, १२ वी, १८वी, २४वी अशी अनेक फलटणीतून शेंकडो महार चांभार ऑफिसरांनी व हजारो शिपायांनी आपली आहुती दिली होती. सन. १८५७ सालच्या बंडांत ह्या अस्पृश्यांनी इंग्रजाच्या बाजूने मोठी अतुल स्वामिनिष्ठा दाखविली होती. म्हणून १८५७ सालच्या बंडांत कामास आलेल्या शिपायांची नांवे दिल्ली येथील काश्मरी गेटावर कोरलेली आढळतात. पण ह्या सर्वांचा कांहीच उपयोग न होतां, महायुद्धांत व नंतर १११ व्या फलटणीने ५।६ वर्षे मोठा नामांकित बहाद्दरी पुन: शेवटीं ह्या बिचा-या लढाऊ जातीला आता घरीं बसावें किंवा मोल मजूरी करुन पोट जाळावें लागलें आहे. ह्या रहस्याला इतिहासांत दुसरी जोडच नाही !
असो. होतां होतां आम्ही अगदी आजकालच्या काळांत येऊन उतरलों. राष्ट्राचा योगक्षेम चालविण्याच्या कामांत राजे अथवा त्याची प्रभावळ उर्फ दरबार जसा भाग घेत आहे तसाच सर्व देशांत व सर्व काळांत अगदी सर्व जातींची प्रजाही भाग घेत आहे, हें हिंदुस्थानांतील गांवगाड्यावरुन व इतर देशांतील तशाच संस्थांवरुन दिसून येतें. तरी आधुनिक राजकारणाची हल्ली ह्यापुढेही बरीच मजल थडकत चालली आहे. केवळ अंतर्गत योगक्षेमांतच नव्हे तर सर्वच राजशासनापद्धतींत राजयंत्र प्रत्यक्ष हालविण्याचे कामीं सर्व दरजाच्या स्त्रीपुरुष प्रौढ व्यक्तींस वाव मिळावा, सर्वांना महत्वाचे बाबतींत प्रत्यक्ष मत देण्याचा अधिकार असावा, व अशा मतदान पद्धतीने कायदे मंडळांत व विधिमंडळांत व इतर स्थानिक कारभार मंडळांत सर्व जातींचे व हितसंबंधांचे योग्य प्रमाणांत वेळोवेळीं निवडून जाणारे प्रतिनिधी असावेत, व येणेंप्रमाणे ही राज्ययंत्राची धुरा खालपासून अगदी वरपर्यंत लोकसत्तेच्या मुठींत असावी हें नवीन मत आता ह्या जुनाट भारतवर्षांतही रुजत चाललें आहे. इ.स. १८८५ सालीं राष्ट्रीय सभा स्थापन झाली प्रथम हिच्यांत शिकलेले पांढरपेशेच जाऊं लागले. युरोप, आफ्रिका व आशिया ह्या तीन्ही खंडांतील लोकांवर ज्या महायुद्धाचा परिणाम झाला, त्याच्या लांटांसरशी ह्या नवीन भारतीय राजकारणांवर परिणाम होऊन त्याची पाळेंमुळें खोल रूजत चालली. अखिल भारतीय अस्पृश्यांच्या उद्धारासाठी सन १९०६ साली मुंबईस 'जी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी" स्थापण्यांत आली, तिचें कार्य आणि शाखा झपाट्याने सर्व देशभर पसरुन, केवळ शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक उन्नती वगैरेच्याच दृष्टीनें नव्हे, तर ह्या नवीन राजकारणी दृष्टीनेही अखिल भारतांतील अस्पृश्य जमातींची जागृति होऊं लागली. शेवटी सं. १९१४-१८ च्या महायुद्धानंतर हिंदी राज्यपद्धतींत जी मोठी सुधारणा होऊं घातली त्या वेळी ह्या वरील मंडळीच्या प्रमुखांनी व प्रांतोप्रांतीच्या प्रचारकांनी मोठा भाग घेतला. अर्थात हे सर्व प्रचारक स्पृश्य वर्गोचेच असल्याने अस्पृश्यांनी ह्या नवीन जागृतीच्या कार्योत राष्ट्रीय सभेशीं सहकार्य करण्यास शिकावें व नवीन मनूंत आपली जागा ठरवावी असें त्यांचें धोरण होतें. पण तेव्हापासून अस्पृश्यांतून कांही लहान मोठे प्रांताप्रांतांतून स्वत:चे पुढारी ह्या अनेक जातींतून पुढे येऊं लागले. त्यांना हें राष्ट्रीय सभेशीं सहकार करण्याचें धोरण पटेनासें झालें. हे कांही अशीं अस्पृश्यांच्या साह्याने तर ब-याच अंशी केवळ आपल्याच धोरणाने व स्वतंत्रपणाने आपआपल्या हक्काची मांडणी करुन लागले.
ह्या बाबतींत मुंबईचे डॉ. आंबेडकर, डॉ. सोळांकी, मद्रासचे रा. एम्. सी. राजा, श्रीनिवासन्, मध्यप्रांतांतले रा. गवई, नंदा गवळी, बंगालचे रा. विश्वास मल्लीक वगैरेंची कामगिरी ध्यानांत घेण्यासारखी आहे. १९१९ सालीं साउथबरो कमिटीपुढे तसेंच अलीकडे सायमन कमिशन व लोदियन कमिटीपुढे वगैरे ह्या व अशाच इतर वर्गोच्या पुढा-यांची जी कारवाई केली आहे ती नजरे आड करुन चालवयाचें नाही. राऊंड टेबलचें सत्र तर अद्यापि चालूच आहे. प्रथम प्रथम ह्या पुढा-यांच्या स्वतंत्र मागण्यांचा अर्थ नीट व कळल्याने म्हणा किंवा कळूनही म्हणा, राष्ट्रीय सभेने प्रथम दुर्लक्ष केलें; नंतर ह्या पुढा-यांच्या स्वतंत्र चळवळीला आवरुन धरण्याचा यत्न करुन पाहिला; महात्मा गांधीजी सारख्या धीरोदात्त पुढा-यांच्याही पुढा-याने असेंच अळम टळम करुन शेवटीं भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचाच दृष्टिकोण पतकरुन आता सर्वस्वी ह्या निराश्रितांना आपला आश्रय देण्याकडे, किंबहुना त्यांचा आश्रय घेण्याकडे आपला कल कळविला आहे.
पण ह्या चालू गोष्टी आहेत. आमचें हें प्रकरण व सर्व पुस्तकच आता आपल्या घालून दिलेल्या मर्यादेवर येऊन ठेपलें आहे. शिवाय ह्या गोष्टी अस्पृश्यतानिवारणाच्या पुढील प्रकरणाखाली जातात. पुढील दुसरें पुस्तक ईशकृपेने तयार होईल तेव्हा त्यांतील पहिला खंड अस्पृश्य दलित समाजाच्या उद्धाराचा व अस्पृश्यतानिवारणाचा इतिहास आणि दुसरा खंड, उपायचिंतन व उपसंहार असे होतील त्यांतूनच शिल्लक उरलेल्या विषयाची मांडणी करणें बरें होईल.
हें पुस्तक व ह्यांतील निस्पृह आणि नवे विचार लोकादरास कसे काय पात्र ठरतात, हें पाहूनच पुढील विचारांची तयारी व मांडणी करण्यास उत्तेजन येणार आहे. हे सर्व विचार माझ्या गत आयुष्यांतील सार्वजनिक सेवेच्या प्रकाशांत मला ह्यापूर्वीच सुचलेले होते. ते आता प्रसिद्ध करण्यास कोणत्याही बाह्य उत्तेजनाची वास्तवक पाहतां जरूर नसावी. तथापि प्रत्यक्ष मनुष्यकृति अंतर्बाह्य स्फूर्तींला केव्हाही वश होणार म्हणून वरील विनय प्रकट केला आहे. वाचकांकडून त्याचा योग्य तो स्वीकार होवो अशी ईश्वरजवळ प्रार्थना करुन हें पुस्तक संपवितो.