प्रकरण आठवे : नांवांची व्युत्पत्ति व इतिहास

आता कांही मुख्य जातींच्या नांवांची मूळ व्युत्पत्ति काय असावी ह्याचें भाषाशास्त्राच्या निर्विकार दृष्टीने विवेचन करुन ह्या हीन मानलेल्या जाती खरोखर मुळांतच हीन होत्या, किंवा त्यांच्या नांवांतूनही कांही उज्ज्वल पूर्वेतिहासाचा पुरावा बाहेर डोकावत आहे. हें पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहें. हें विवेचन करण्यासाठी ज्या थोड्या जाती मी निवडल्या आहेत त्या जातींच्या लोकांमध्ये मी स्वत: बहुश: दोन दोन चार चार महिने, क्वचित् वर्ष वर्ष भरही, जाऊन राहिलों आहें. त्यांत माझा हेतु हा होता की त्यांचे खाद्य, पेय, पेहराव, डामडौल, व्यक्तिविषयक आवडी, घरगुती चालरीत, जातीय परंपरा, ह्या गोष्टी समक्ष निरखून पहाव्या. आज माझ्या तीस वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणानंतर मला ह्या कित्येक हतभागी जातींचे उर्फ राष्ट्रांचे मूळ उज्जवल असावें, असें स्वतंत्रपणें वाटत आहे. पुढील व्युत्पत्तीमध्य माझे भाषाशास्त्र सपशेल जरी चुकलें असलें, तरी त्यामुळे माझ्या इतर निरीक्षणाला बाधा येत नाही. उलट पक्षीं, माझी व्युत्पत्ति खरी ठरल्यास मात्र तो एक स्वतंत्र पुरावा होईल. एवढ्याच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला पुरावा होईल. एवढ्याच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला हें जें व्युत्पत्तीचें ठिगळ मी जोडण्याचे धाडस केलें आहे, ते अगदीच अनाठायीं ठरेल, असें मला वाटत नाही.


महार ( महाराष्ट्र)
महार ह्या नांवाचा विस्तार मराठी भाषेपुरता अथवा महाराष्ट्रापुरताच नसून पंजाबी, सिधी, गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली ओरिया, तेलगू, आसामी, इतक्या भाषांतून व अनुक्रमें देशांतून आढळतो. तो असा :- महार, म्हार-आधुनिक महाराष्ट्र, मध्य हिंदुस्थान; म्हेतर, म्हेर, मेर- गुजराथ, मारवाड, माळवा, राजपुताना आणि मध्य प्रांताचा हिंदी भाग; मेघ मघ, मेघवाळ. मोघिया-पंजाब, गुजाराथ, ग्वाल्हेर; माल, मालो, माली, मलयन -बंगाल, ओरिसा, आंध्र, मलबार, महार ह्या नांवाची आजवर अनेक निरुत्कें सुचविण्यांत आली आहेत. त्यापैकी कांही विक्षिप्त आहेत तर कांही विचार करण्यासारखी आहेत. महाअरी=मोठा शत्रु, अशी व्युत्पत्ति जोतीबा फुले ह्यांनी सुचविली आहे. दुसरी अशी आहे :- पार्वतीच्या कपाळावर घामाचा बिंदु आला, तो एका कमळपत्रावर पडला; त्याचें सुंदर मूल होऊन खेळू लागलें. तें रांगत बाहेर जाऊन एक मेलेली गाय खाऊं लागलें. म्हणून शिवाने रागावून त्यास महा आहारी मोठी खादाड होशील असा शाप दिला. तो महार झाला. ही विक्षिप्त निरुत्कें.


मृताहार : प. लो. वा . डॉ. सर भांडारकर ह्यांनी मृताहर अशी व्युत्पत्ति सुचविली होती. इ.स. १९९२ सालीं पुण्यांत डी.सी.मिशनची पहिली अस्पृश्यता-निवारक परिषद भरली, तिचे अध्यक्ष ह्या नात्याने डॉक्टरसाहेबांनी ही प्रथमत:च पुढे आणिली. मृत + आहार=मेलेलीं गुरें ओढून नेणारा, हा अर्थ ह्या लोकांच्या चालू धंद्याला लागू पडतो. पण संस्कृत वाड्मयांत ह्या नांवाचा असा प्रचार कोठे आढळत नाही. मार्केंडेय पुराणांतील ३२ व्या अध्यायांत पुढील श्लोक आहेत :-


उदक्याश्वश्रृगालादी न्सूतिकान्त्यावसायिन:|
स्पृष्टा स्नायीत शौचार्य तथैच मृतहारिण: ||३३||


मृतनिर्यातकाश्चैव परदारारताश्च ये |
एतदेव हि कर्तव्यं प्राज्ञै: शोधनभात्मन: ||४०||


अभोज्यसूतिकाषंढमार्जाराखूश्वकुक्कुटान् |
पतिताविद्धचंडालान् मृताहारांश्व धर्मविद् ||४१||


संस्पृश्य शुद्धयते स्नानादु दक्याग्रामसूकरौ |
तद्वच्च सूतिकाशौचदूषितौ पुरुषावपि ||४२||


वरील उता-यात चंडाल, अन्त्यावसायी, असे शब्द योजून पुन: मृताहार, मृतहारि, मृतनिर्यातक असे शब्द घातले आहेत. मृत ह्याचा अर्थ मृत मनुष्य अथवा प्रेत असाच आहे. मेलेलीं ढोरें अशा अर्थाचा संदर्भ ह्या ठिकाणी मुळीच संभवत नाही. वरिष्ठ जातीच्या माणसांची प्रेतें महार नेऊं शकणार नाही. म्हणून मृतांचे आप्त असाच येथे अर्थ आहे. मृताहार म्हणजे मेलेलीं ढोरें ओढणारा असा अर्थ डॉ. भांडारकर ह्यांनी नव्यानेच केलेला दिसतो. महार असें मागाहून संभावित मराठींत रुपान्तर झालें. त्याचें मूळरुप म्हार असें गांवढळांचे तोंडात अद्यापि आहे, तेंच रुप पहिलें असावें. माळव्यांत व नागपुराकडे हिंदी भाषेंत म्हेर असें रूप हल्लीही आहे; त्याचा संभावित अपभ्रंश महार असा करून, पुन: त्याचें मृताहर असें संस्कृत रुप मानण्यांत फारच दूरान्वय होत आहे. म्हार हे पूर्वीपासूनच मेलेलीं गुरें ओढणारे होते, ही कल्पना इतिहासाला धरून नाही; म्हणून ही व्युत्पत्ति असमर्थनीय ठरते. माळव्याप्रमाणे गुजराथेंतही म्हारांना म्हेत्तर असें म्हणतात. त्यापासून म्हेर असें रुप होणें शक्य आहे. अजमीर-मेरवाडामध्ये म्हेर असें रूप आहे. म्हेतर (महत्तर) म्हणजे मोठा अथवा जुना माणूस म्हातारा शब्दाचीद्दी हीच व्यत्पत्ति आहे. आणि हिच व्युत्पत्ति ह्या प्राचीन जातीच्या इतिहासाला अधिक सुसंगत दिसते.


म्हार म्हात्म्य : ह्या पुराणाची हस्तलिखित पोथी इ.स. १९०७ सालीं परळ येथील आमच्या रात्रीच्या शाळेंतील एका भाविक म्हार मुलाने मला दिली. तिची भाषा मासलेवाईक म्हारी आहे. ह्यांत म्हार, म्हादेव, म्हामुनि असे नमुनेदार शब्द आहेत. ह्याच्या दुस-या अध्यायाच्या आरंभी खालीलप्रमाणें मूळ वर्णिलें आहे.


आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैसा | सेस न वर्णवी झाली सीमा | वेदा न कळे आगमा | सोमववष अप्रंपार ||२|| हे म्हार म्हात्म्य कथा आगळी | जो का धरील हृदयकमळी | तयाचे द्वीतभावाची होळी | करील रुषि मार्केंडी || ३|| .... तरी हा मार्केडी मूळ पुरुष | तयापासून म्हाराचा बवस | ऐका तजना हो सावकास | चित्ती विश्वास धरुनिया ||५|| अनंत यौगापासून | कितीक राजाचे ढळले जन | परी हा म्हार जूनाट पुरातन | न ढळेची कल्पान्ती ||६|| देव झाले उदंड | परि हा म्हार अक्षय्य काळदंड | ह्याच्या स्वाधीन नवखंड | केले मुळींच क्रत्यांनी ||७||

 
मुसलमानाचा संबंध मोठा चमत्कारिक उल्लेखिला आहे.


म्हार आणि मुसलमान | हे दोघे एक वंशे उत्पन्न | चंद्र वंध पूर्ण | सोम म्हणती तयालागे || अ. ३. ओवी १९.


तिस-या अध्यायाच्या आरंभी आचार विलक्षण सांगितला आहे. ह्या अध्यायाची ७६ वी ओवी अशी आहे.


म्हाराचा मूळ पुरुष सोमाजी नाम| दैवत सिव, देस मार्वड उत्तम |
रुषि मार्केडेय तयाचा उत्तम | घाई पूर्ण गरजतसे ||७६||


सहाव्या अध्यायांत ४९ व्या ओवीपासून आद्य शून्यवादाचें वर्णन आहे. ह्यांत महायान बौद्ध धर्माची छटा दिसते. सातव्या अध्यायांत कर्त्याचें नांव आहे.


"पूर्वी व्यास वाल्मिक मुनी | सुखसनकादिक आदि करुनी |
तयानें हें म्हार म्हात्म्य रत्नखाणी | कल्पित करोनी ठेविलें ||१६|| तयाची चतुरा ऐसी | कलियुगीं अवतरला बाळकदास | त्यांनी ह्या म्हार म्हात्म्याचा प्रकास | करोनि दाखविला कलियुगी ||


सातव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथसमाप्तीचे स्थळ व काळ सांगितला आहे.


"पूर्वे सन्निध पने पाकन | पावणे दोन योजन | दक्षिणेस गोदावरी पूर्ण | तीन योजने जाण बा ||८०|| पश्चिमेस नीराबाई मध्ये | उत्तरभागी पाडेगाव आहे | ग्रंथ कर्त्याचा अवतार पाहे | तेथे झाला जाणिजे ||८१|| शके १८८८ (?) सर्वधारी नाम संवत्सर प्रवेसी | वैशाख वद्य पंचमीस | ग्रंथ समाप्त झाला पै ||८२|| चंद्रवार ते दिसि | सोमवंश प्रवेसी | प्रथम प्रहारासी | ग्रंथ समाप्त केला हो ||८३ ||

 
शके १८८८ असें चुकून पडलें असावें. शके १७८८ असावें. येरवी पुढील ओवीचा प्राप्त जुळणार नाही. शके १८८८ पुढे याव यांचें आहे.


माल ( बंगाल, आंध्र )
माल, मालो, माली : ह्या नांवाच्या जाती बंगाल, ओरिसा, तेलंगण देशांत पुष्कळ आहेत. त्या अगदी महाराप्रमाणेंच आहेत. हे वंशाने एकच असावेच असें म्हणवत नाही. त्यांचा आपसांत रोटी बेटी व्यवहारही होत नाही. त्यांची व्युत्पत्ति मल्ल आणि मार ह्या दोन भिन्न शब्दांपासून संभवते. गौतम बुद्धाचे काळीं, झल्ल, मल्ल नांवाची क्षत्रिय राष्ट्रें शाक्यांच्या शेजारी राहात होती. किंबहुना तींही शाक्याचीच पोटजात असावीत. कालवशाने हीं राष्ट्रे झालो, मालो ह्या नांवाने अस्पृश्यतेप्रत पोचलीं असावीत. तुकारामाच्या अभंगात सालोमालो म्हणजे य:कश्चित माणूस ह्या अर्थाने हा शब्द आला आहे. साळी माळी ह्याच मूळ क्षत्रिय नांवांपासून आले असावेत. एक प्रांतात जी जात प्रतिष्ठेप्रत चढली किंवा पूर्वी प्रतिष्ठेंत होती तीच दुस-या प्रांतात हीनत्वाप्रत गेलेली अशीं आणखीही उदाहरणें ह्या अफाट देशांत आहेत. बंगाल्यांत माळी ही जात अस्पृश्य आहे, ती मालाकार म्हणजे फुलमाळी ह्या जातीपासून अगदी वेगळी आहे. मालाकार हे नवशाखा शूद्रांपैकी आचरणीय आहेत. माळी अनाचरणीय आहेत. हर प्रसाद शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे पूर्वीचें मल्ल राष्ट्र पूर्वी बौद्ध असून मुसलमानांच्या स्वारीनंतर बौद्ध धर्माचा उच्छेद झाल्यामुळे बहिष्कृत झालें असावें. झालिया (जाळी विणणारे) म्हणून दुसरी बहिष्कृत जात आहे ती झल्ल असावी. महाराष्ट्रात जसे मांगाबरोबर महार, तसे आंध्रदेशांत मादिगाबरोबर माल म्हणून एक अस्पृश्य ग्रामबाह्य जात आहे. मराठ्यांचा महारांशी मांगांशी जसा सेव्य सेवक अथवा जेते जित असा संबंध आहे, तसाच आंध्र देशांत रेड्डी ह्यांचा मालांशी आणि मादिगांशीं आहे. रेड्डींनी (रट्टांनी) ह्या मालांना आपल्या मूळ मगध देशांतून निघतांना तेलंगणांत आपल्या ग्रामसंस्थेच्या योगक्षेमासाठी बरोबर आणिलें असावें. महारांप्रमाणेच मालही बलुतेदार आहेत. त्यांची महारांप्रमाणे मरीअम्मा ही ग्रामदेवता प्रत्येक गावाच्या शिवेवर असते. तिला रेड्डी फार भजतात. कित्येक ठिकाणीं ह्या मरीअम्मेचा पूजारीपणाही रेड्डींकडेच असलेला मी पाहिला आहे. पण मुळांत ही मारी अम्मा मालांचीच ह्यांत शंका नाही. बुद्धाचे काळी मार नावाचे जें दृष्ट व खुनशी दैवत होतें त्याचीच नातलग ही मरी दिसते. ओरिसाच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांत खोंड वगैरे रानटी जाती ह्या मरी आईला भयंकर रीतीने नरबळी देत असत. ते बंद करण्याचे प्रयत्न लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत ब्रिटिश सरकार करीत आलें. पण अद्यापि हा प्रकार तुरळक चालू आहेच. मार आणि मरी हे शब्द फार चिंतनीय आहेत. मॅक्स मुलरने आपल्या Physical Religion-Gifford Lectures मध्ये पान ३२० वर म्हटलें आहे - " पाली भाषेमध्यें मारु असें पद दुष्ट देवतेसंबंधी योजलेलें आढळते." मला वाटते ह्या पदांत मल अथवा मर = डोंगर ही द्राविड धातू मूळ असावी. तिच्यापासून मार, माल म्हार वगैरे पर्याय होणें अगदी संभवनीय आहे.