प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग

ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनांत आणून मी जेव्हा इ. स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालों, तेव्हा माझे मनांतील मुख्य उद्देश केवळ बौद्ध धर्मांचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून इतर माझे व्यवसाय आणि अभ्यास कांही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होतें. पण मी जेव्हा या विचित्र देशांत संचार करु लागलों, तेव्हा प्राचीनवस्तुशास्त्र, तुलनास्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादि ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्म धर्माचा प्रचारक या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणें भाग आहे. आणि वरील शास्त्रें तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरची व त्याशीं सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून अगदी हद्दीवरची व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषत: इतक्या भिन्न परिस्थितींत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणें मला फार कठीण पडलें.


ब्रह्मदेशांत हिंदुस्थानांतला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट खरी आहे. तेवढ्यावरुन येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृत वर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता. इतकेंच नव्हे, तर या देशांत पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला. पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत या देशांत बहिष्कृत स्थितींत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार पांच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो या टोपणनांवाच्या एक इंग्रजाने लिहिलेल्या Burman-His Life and Nation या इंग्रजी ग्रंथांत मी जेव्हा या निरनिराळ्या बहिष्कृत दास-वर्गांचे वर्णन वाचिलें तेव्हा मला फार आश्चर्य वाटले. जातिभेद नसताही बहिष्कृत वर्ग असू शकतो, ही गोष्ट अमेरिकेंतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जें वर्तन घडतें व दक्षिण आफ्रिकेंतील गौरकार्याचे इतर वर्णीयांशी जें वर्तन घडतें, तें ज्यांनी पाहिलें आहे, त्यांना सहज पटण्यासारखी आहे.


गेल्या वर्षी भारत-इतिहास-संशोधक-मंडळापुढे 'अस्पृश्यतेचें मूळ आणि तिचा हिंदुस्थानांतील विकास' या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हापासून या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहें. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांची मला जी माहिती शोधाअंतीं मिळाली व प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळें माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.


ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम ब्रह्मदेशांतील गुलामगिरीच्या संस्थेंत आहे. ब्रिटीश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशांत इ. स. १८८५ सालीं पूर्णपणे झाली. यापूर्वींच्या स्वराज्यांत या देशांत गुलामगिरीची संस्था होती. ती तेथे किती पुरातन होती हें ठरविण्याची निश्चित साधनें तूर्त उपलब्ध नाहीत. अनेकविध सामग्री जमवून मि. जी. ई. हावें, आय.सी.एस. यांनीनुकताच एक ब्रह्मदेशाचा नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यांत त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सुरु झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हे घराणें अनिरुद्ध नांवाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले. या देशांत मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताचीं जी कामें ह्या राजाने केली. त्यांत देशांतील बौद्ध धर्मांची सुधारणा करुन मोठमोठी बौद्ध देवस्थानें बांधिली, हे एक काम होय. ही देवळे बांधण्यासाठी खेड्यांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरुन आणून गुलाम करुन त्यांच्याकडून काम घेतलें. याशिवाय कायमच्या गुलामगिरीचें दुसरें एक कारण ब्रह्मदेशांत असें आहे. देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदारीचीं कामें करणें, हे गुलामांचेचं काम आहे. कित्येक भाविक लोक गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारणपणें राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेड्यांतून धरुन आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईंत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यांत येत असे. मि. हावें यांनी पान ३३१ वर एक इ.स. ११७९ च्या शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यांत 'अभिनंदथू नांवाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठें देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वत:ला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिलें', असा उल्लेख आहे.


अशा देवळी गुलामांवर व त्यांतल्या त्यांत लढाईंत जिंकून आणिलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळून मिसळून राहत नसे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत. व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजांत वावरण्यास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यांत येत असे. याप्रमाणे गुलामगिरींतून ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम झाला असावा.एकंदरीत ब्रह्मदेशांतील हल्लीची धार्मिक संस्कृति व कांही अशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतींतून आली आहे, असें दिसतें. निदान कांही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असें म्हणण्यास हिंदी बौद्ध संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितींतले बहिष्कृत वर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डून संडाला, तुबायाझा अशीं जीं नावें आहेत. ती हिंदी भाषेंतून तिकडे गेलीं आहेत. ती नावें चंडाल, डोम चंडाल, अशुभराजा या हिंदी नांवांचेच अपभ्रंश होत, यांत संशय नाही. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट व करतां आल्यामुळें त्या भाषेंतील च श र या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेंत अनुक्रमें स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंशाचा नियम आहे, त्यावरहुकूम ब्रह्मी बहिष्कृत वर्गांची नांवें हल्ली तेथे प्रचारांत आहेत. अशुभराजा यांतील पहिल्या अचा लोप झाला व वरील नियमाप्रमाणे तुबायाझा असें शेवटलें नांव सिद्ध झालें आहे.


ब्रह्मदेशांत ब्रिटीश राज्य स्थापन होईपर्यंत खालील पांच प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.


(१) युद्धांत जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळातील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यांत आलेलें असे. यांना फयाचून हें नावं आहे. फया हा शब्द बुद्ध या शब्दाचा चिनी भाषेंतून आलेला अपभ्रंश आहे. बुद्ध-बुढ-भूर-फुर-फया अशी ही अपभ्रंशपरंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशांत बुद्ध त्याची मूर्ति, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.


(२) स्मशानांतील मार्तिकादि अशुभ संस्कारांशी संबंध असलेलीं, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामें करणारे ग्रामबाह्य वर्ग यांना तुबायाझा ( अशुभराजा), संडाला, डून संडाला अशीं नांवें आहेत.


(३) केवळ भिकेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एकदा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असें नांव आहे. केबा हें नांव तुबायाझानाही लावण्यांत येते, कारण तेही भीकच मागतात. के=मदत, वा=हो (संबोधन). 'मला मदत करा', असें म्हणत भीक मागणारे असा या नांवाचा मूळ अर्थ आहे.


(४) माफीचे भयंकर गुन्हेगार - अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यांत राजाच्या विशेष कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचें, जेलरचें, फांशी देण्यांचे वगैरे तिरस्कृत कामे आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे म्हणजे पोलिस, लेयाटों=चोपदार, छडीदार अशी नांवें असत. अशा अधिका-यांना जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.


(५) ह्याशिवाय तु-डै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. व यांचा एक लहान गाव मंडळालेपासून १०-१२ मैलांवर आहे, असें माझे ऐकण्यांत आलें. पण प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास मला वेळ मिळला नाही. ह्यांचा समावेश वरील दुस-या वर्गांत मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेंही मी ऐकलें.


वरील पांचही बहिष्कृत वर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानांतील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर सा-या ब्रह्मदेशांत ५/६ हजार असेल. यांची स्थितीही हिंदुस्थानांतल्या इतकी करुणास्पद नाही. हे आपलें ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यांत कोणी पर्वा करती नाहीत. हे जरी आपल्या मूळ गावींच बहिष्कृत स्थितींत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानांतल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यांत येत नसे. तरी पण त्यांना गावांत येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्तेंत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावीं मुद्दाम जाऊन पाहिले. ब्रह्मदेशांत कडक अस्पृश्यता नव्हती-निदान हल्ली नाही-हें खरें असलें तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोटीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्टच नको. हल्ली देखील कोणी उघडपणें आपलें मूळ वरील चार पांच प्रकारापैकी एकांत आहे, असें सांगेल, तर त्याच्याशीं ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतांस आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही. ब्रह्मदेशांतील पुराणमतवाद हिंदस्थानांतल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व जो आहे तो झपाट्याने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असें नांही. म्हणून तेथील बहिष्कृत वर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.


वरील पांचही प्रकारच्या बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनांत जो आढळला तो मी संक्षेपाने पुढे देत आहें. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे. उपलब्ध साधनसमाग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशीं निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.


फयाचून : ह्या नांवाचा अर्थ देवळी गुलाम असा आहे. ब्रह्मदेशांतील देवस्थानें अत्यंत पवित्र मानलीं जातात; इतकीं की, युरोपियनांना देकील पादत्राण घालून देवळांतच नव्हे तर भोंवतालच्या विस्तीर्ण आवारांतही पाय टाकण्याची छाती होत नाही. अशा बाबतींत युरोपियनांचेही खू पडले म्हणून पादत्राण घालून मंदिरांतच नव्हे तर प्राकारांतही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठ्या पाट्यांवर आवारापासून कांही अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळें पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हें मोठे कोडेंच मला पडले! शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळांत वाहिलेल्या इतर, फळें, फुलें, सुगंधी पदार्थ व नैवेद्य, इत्यादि सर्वच वस्तु मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलाम वर्ग आहे तोही पूर्वी अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणें अगदी संभवनीय आहे. ह्या गुलाम वर्गांत पूर्वी बहुतेक धरुन आणलेले राजकैदी असत. ह्यांचें एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिद्ध आहे, तें असें.


दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेन शहराचे उत्तरेस २०/२२ मैलांवर किना-यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिद्ध प्राचीन राजधानीचा गांव आहे. तेथे इ. स. च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नांवाचा तेलंग राज राज्य करीत होता. ह्या प्रांतांत द्रविड देशांतून कांची येथून गेलेला 'हीनयान' बौद्ध धर्म जोरावत होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुद्ध नांवाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेंत थटून येथे मनुहा राज्य करीत होता. अनिरुद्धाला उत्तरेकडील भ्रष्ट बौद्ध धर्मांची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून एक नामांकित बौद्ध भिशु पगान येथे जाऊन अनिरुद्धाच्या राष्ट्रीय कार्यांत मार्गदर्शक झाला. त्याने, थटून येथे बौद्ध त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुद्धास मंत्र दिला. सामोपचाराने मागन मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुद्धाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करुन त्रिपिटकच नव्हे तर त्याचें अक्षरश: सर्वस्व हरण केलें. म्हणजे त्याच्या राज्यांतील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यांत नेल्या, इतकेंच नव्हे तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यांत नेली. तेव्हा पर्यंत दक्षिण ब्रह्यादेशांतील संस्कृति दक्षिण हिंदुस्थानांतील आंध्र आणि द्राविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशांत हीनयान बौद्ध संस्कृतीचे मार्गाने गेली होती. ती या युद्धापुढे उत्तर ब्रह्मदेशांत पसरू लागली. थटूनचे बौद्ध ग्रंथ, बौद्ध भिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेंच नव्हे, सर्व राजघराणें आणि दरबारही गिरफदार करुन पगान येथे नेण्यांत आलें. शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या असंख्य नवीन पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यांत आलें. मी थटून आणि पगान हीं जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणें शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तीन्ही दृष्टीने निरखून पाहिली. दक्षिण ब्रह्मदेशांत ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशांत १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूंत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशांत बहिष्कृत वर्ग कोठेच आढळला तो पाहण्यास उत्तरेकडे पगानला जावें लागलें. पगान येथील बहिष्कृत वाड्यांत मनुहा राजाचें घराणें, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष उबाल्विन हा २६ वर्षे वयाचा बाणेदार तरुण व त्याची खानदानी वृद्ध आई यांना मी डोळ्यांनी पाहिलें. त्यांची गा-हाणीं ऐकली. न्यऊ ह्या बंदराजवळ श्रेझीगो नांवाच्या मोठ्या राष्ट्रीय पगोडाजवळ एक फायाचूनांचे वेगळें खेडें आहे. त्याचा थजी उर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठ्या राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे !


फयाचून हे लोक लहान मोठ्या देवळांत हल्ली फुलें, माळा, उदकाड्या, मेणबत्त्या विकण्यासाठी दुकानें मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंत:कृत लोकांचींही अशी दुकानें आहेत. उलट फयाचूनही आपलें मूळ लपवून व हा धंदा सोडून अंत:कृत वर्गांत सररास मिसळत आहेत. ह्यामुळें खरा फयाचून कोण, हें ओळखून काढणें मोठें मुष्किलीचें काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ ह्यांत पुढे दिला आहे.


तुबायाझा : ह्या नांवांतील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणें 'अशुभ राजा' ह्यासंबंधीं मी एक दंतकथा ठिकठिकाणीं ऐकली ती अशी : एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच, असें समजून तिला स्मशानांत पाठविलें. थडग्यांत उतरवितांना ती जिवंत आहे, असें आढळले. स्मशानांत नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणें शक्यच नव्हतें. तिला थडगें खणणा-या संडाला जातींतच ठेवून दिलें व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हें नाव पडलें. त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानांतील धार्मिक संस्कारांत बौद्ध फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच या राजवंशालाही मिळावी, असें राजशासन मिळालें. ही दंतकथा मला पगान येथील तुबायाझाच्या खेड्यांतील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणें सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल उर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोंचवितात, हें ह्यावरून दिसते. मलबारांतील पुलया व चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशीं कसा संबंध येतो, हें मी हिंदुस्थानांत पाहिलेलें मला स्मरलें. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असें त्यांचें म्हणणें आहे. हे संडाला, डून-संडाला लोक मणिपूरच्या बाजूने हिंदु संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशांत नेले असावेत. याशिवाय माझा तर्क दुसरा धावत नाही. अलीकडे दक्षिण हिंदुस्थानांतील लक्षावधि, परैया, पुलया इत्यादि अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी ब्रह्मदेशांत अगदी हीन धंदा करुन राहिले आहेत. ते मुळीच बहिष्कृत नाहीत. पण हे संडाल मात्र प्राचीन काळीं गेलेले अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गांवी थडगें खणण्याचे आपलें जुनें वतनच चालवीत असलेले आढळतात; त्याअर्थी हें प्राचीन हिंदी संस्कृतीचें वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिलें असेल असें माझे मत आहे. विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ हीं पहा.


केबा : पूर्वीप्रमाणे हे महारोगी अपंग बेवारशी भिकारी लोक असून मोठमोठ्या देवळांच्या वाटेवर याचना करीत बसलेले आढळतात. असे अपंग याचना करीत बसलेले इतालीसारख्या प्राचीन अमदानींतल्या रोम व इतर क्षेत्राच्या ठिकाणी मी युरोपांतही प्रत्यक्ष पाहिले. आमच्या हिंदुस्थानांतल्या क्षेत्रांतल्या भिका-यांचा येथे उल्लेखही करण्याची गरज नाही हा वर्ग समाजबाह्य आहे, ह्यांत कांहीच नवल नाही. मंडालेपासून ८ ते १० मैलांवर असलेल्या मेंढाई नांवाच्या खेड्याजवळ केबांची मीं एक स्वतंत्र लहानशी वसाहतच पाहिली. ती मीं पुढे एका निरीक्षणामध्यें विस्ताराने वर्णिली आहे.


चौथा वर्ग जो माफीचा गुन्हेगार तो हल्ली ब्रिटिश अमदानींत कोठेच आढळणें शक्य नाही. पूर्वींच्या स्वराज्यात 'राजा कालस्य कारणम्' हे तत्व जोरावर होतें. राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर 'प्याद्याचा जसा फर्जी' तसाच सात खून करुनही आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांची उदाहरणें पाहाण्यासाठी संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत लांब जावयास नको. हल्लीच्या कोठल्याही लोकछंदानुवर्ती ब्यूराक्रसीच्या सी.आय.डी. मध्ये असले पाणीदार माफीबहादूर शोधीत बसल्यास मिळणार नाहीत, अशी कोण हमी घेईल? मात्र पूर्वीच्या ब्रह्मी स्वराज्यांत अशा लोकांना दरबारांत जरी वेतन मिळे, तरी तेवढ्यावरुन समाजांत त्यांना मान्यता न मिळतां उलट बहिष्कार पडे, असें मीं ब्रह्मदेशाच्या वाड्प्रयांत वाचिलें आहे. पॅगवे हें अशा पोलीस व जेलर लोकांना नांव पडण्याचे कारण ह्यांच्या गालांवर ह्यांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्याची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे. अलीकडच्या कांही गुन्हेगारांना पाश्चात्य सुधारलेल्या समाजाकडून सोन्याच्या तलवारी नजर करण्यांत आल्या आहेत! हा जुन्या नव्यांत एक फरक ध्यानांत धरण्यासारखा आहे. एरव्ही पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेंत खितपत न टाकतां आताप्रमाणेंच पूर्वीही कोठे कोठे समाजकार्याला लावण्यांत येत होतें., हें ब्रह्मदेशांतील उदाहरणांवरुन उघड होतें.


तु डैं. डो ह्या पांचव्या वर्गांचें प्रत्यक्ष निरीक्षण करावयाला मला वेळच मिळाला नाही म्हणून त्यांचें जास्त वर्णन मला करतां येत नाही ह्याबद्दल मी दिलगीर आहे.


असों येथपर्यंत मी पांच बहिष्कृत वर्गांचा उल्लेख व वर्णन केलें. ब्रह्मदेशांत जाईपर्यंत व गेल्यावरही कित्येक आठवडे तेथे आमच्या देशांतल्याप्रमाणे ग्रामबहिष्कृत वर्ग असेल, अशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे अकस्मात मी जेव्हा असे वर्ग कांही विवक्षित प्राचीन ठिकाणीं आढळण्यासारखे आहेत असें ऐकले तेव्हा मी त्याचा फारच जारीने शोध चालविला. दक्षिण ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली पण तीही उडवाउडवीनेच मिळूं लागली. म्हणून मी उत्तर ब्रह्मदेशांत बौद्ध धर्मांचे खरें साधन पाहावयास गेलों असतां खालील पांच खेडीं मी या निरनिराळ्या वर्गांची वस्तुस्थिति प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरिता निवडून काढिली. त्यापैकी तू- डै-डो या (हलालखोर ) वर्गाचें खेडें मात्र प्रत्यक्ष पाहण्याला मला वेळ मिळाला नाही. पण बाकीच्या चार ठिकाणी मात्र मी चांगल्या सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरी फिरुन या निरनिराळ्या वर्गातल्या वृद्ध आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन व शिवाय प्रत्यक्ष स्थिति निरखून पाहून तयार केलेलीं खालचीं सविस्तर टिपणें लिहिलीं आहेत. तीं माझ्या रोजनिशीवरून येथे थोडक्यांत उतरुन घेत आहें. प्रोम शहराजवळील खेड्यांत मात्र माझी जी खडतर निराशा झाली, ती पुढे दिलीच आहे.


येथे मला एक गोष्ट नमूद करणें अवश्य वाटत हे की, ह्या बहिष्कृत वर्गाची स्थिती आता अगदी झपाट्याने सुधारत आहे. आणखी दहापंधरा वर्षांत, मला दिसलीं तितकीं तरी कुटुंबे मी पाहिलेल्या स्थितींत पुढील संशोधकांस आढळतील की नाही याला मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय, आताही या बहिष्कृत वर्गांना त्यांच्या मूळ नांवाने संबोधणें हें मोठें शिताफीचें व धैर्यांचे काम आहे. ब्रह्मी लोकांचा समाज अत्यंत चिडखोर, उतावळा व तापट आहे. थोड्या कारणावरुन हे लोक वर्दळीला येऊन हातघाई करितात. त्यामुळे दुभाष्याचें काम करुन ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समजस माणसें मिळणेंही ब-याच वेळा मुष्किलीचें झालें; व पुष्कळदा अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनी माझी ऐन वेळीं निराशा करुन माझा बेत ढासळून टाकला. म्हणून माझा सर्व भार माझ्या दुभाष्यावर किंवा वाटाड्यावर न टाकतां अगोदर अनेक उपायांशी खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला. ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारही आहेत. विश्वास बसल्यावर ते आपले हितगुज आपल्या उलट असलें तरी मोकळ्या मनाने सांगतील, हा भरंवसा मला अंत:कृत आधुनिक सुशिक्षणाने अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमाने जो आला नाही, तो तेथील बहिष्कृतांच्याच समागमांत आला. हिंदुस्थानांत काय किंवा कोठेही काय, वरिष्ठ म्हणून गाजलेल्यापेक्षा त्यांनी पायांखाली तुडविलेल्या कनिष्ठ वर्गांतच त्या त्या राष्ट्रांच्या ख-या माणुसकीचीं व स्थानिक स्वभावाची लक्षणे सूक्ष्म संशोधकांना जास्त आढळून येण्यासारखी आहेत. हें मी माझ्या निरनिराळ्या देशांतील आजन्म घेतलेल्या अनुभवावरुन म्हणूं शकतो !