प्रकरण अकरावे : राजकारण

ह्या पुस्तकाची मागील १० प्रकरणें १९३२ सालच्या आगष्ट महिन्यांतच तयार करुन छापखान्याकडे पाठविण्यांत आलीं होती. अलीकडे दोन चार वर्षांत अस्पृश्यांच्या राजकारणाला अगदी चुरशीचें स्वरुप आल्यामुळें विशेषत: महात्मा गांधीच्या १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यांतील उपोषणामुळें हें प्रकरण लिहिण्याचें लांबणीवर टाकून कांही काळ वाट पाहावी लागली. पुढे पुण्याचा करार झाला. चालू (१९३३) सालच्या मे महिन्यांत महात्माजींनी पुन: २१ दिवस उपोषण केलें. आता ह्यापुढें हें पुस्तक ताबडतोब प्रसिद्ध झालें पाहिजे. म्हणून हें प्रकरण लिहून संपविलें आहे.

अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे कांही नुसती आजकालची धामधूम आहे अशांतला मुळीच अर्थ नव्हे. हें राजकारण अस्पृश्यतेइतकेंच पुरातन आहे, असें म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति होणार नाही. माझी तर स्वत:ची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय. पहिल्या प्रकरणांत केलेल्या व्याख्येप्रमाणें अस्पृश्यतेचें संघटित स्वरुप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकासच होय. ह्या विकासाची पोलादी चौकट मागे केव्हा एकदा जी घडविली गेली, ती आजवर जशीच्या तशीच जवळ जवळ शाबूत आहे. म्हणून घडविणाराच्या दृष्टीने हिला यशस्वी म्हटलें आहे. मूळ चार वर्णाच्या कालांतराने पुढे हजारो जाती पोटजाती झाल्या, कालमाहात्म्याने त्यांचे आपसांत स्थलांतर व रुपांतरही झालें. पण ह्या चौकटीबाहेरील अस्पृश्यांवर प्रत्यक्ष काळाच्या हातूनही कांही अनुकूल परिणाम घडवितां आले नाहीत. उलट वहिवाटीच्या दाबाखाली जणूं काय ते कायमचेच दडपले गेले आहेत असें दिसतें. 'सवय म्हणजे प्रति सृष्टिच' ही म्हण सार्थ झाली आहे.

ह्या प्राचीन राजकारणाचा खडान् खडा इतिहास उपलब्ध नाही, हें खरें आहे. त्या काळचा प्रत्यक्ष जेत्यांचाच इतिहास उपलब्ध नाही, तेथे जितांचा कोठून असेल? ज्याचें सर्वस्व गेलें, त्या जितांचा इतिहास तरी कसा उरणार? असा कोण जेता आहे की जो आपल्या कृतकर्मांची कथा जशीच्या तशीच लिहून ठेवील? आणि स्वत:चा इतिहास लिहिण्याची अक्कल आणि करामत असती तर हे बिचारे आजचे अस्पृश्य जिततरी कां झाले असते? ह्या प्रकरणीं इतिहास मागणें म्हणजे बाप दाखीव नाही तर श्राद्ध कर म्हणण्याप्रमाणेंच आहे. बिचारे बाप कोठून दाखवतील? मुकाट्याने श्राद्ध करीत आहेत. झाले ! तथापि अगदी तपशीलवार इतिहास नाही तरी त्याचें दिग्दर्शन कांही अशी मागील प्रकरणांतून आलेलेंच आहे. त्यावरुनही ज्यांना अंदाज करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्यापुढे समग्र इतिहास आणून ठेविला, म्हणून तरी काय लाभणार आहे?

ह्या इतिहासाची पुनरावृत्ति जगांत वेळोवेळी पुष्कळदा झाली आहे. गेल्या पांच शतकांत अमेरिका खंडांत ती झाली आहे व हल्ली आफ्रिकेंत, आस्ट्रेलियांत वगैरे चालली आहे. यूरोपांतून सुधारलेलीं म्हणविणारी अनेक राष्ट्रें वेळोवेळीं आली. त्यांनी एतद्देशीयांचा नाश केला, त्यांच्यापैकी कित्येकांना घालवून दिलें व कित्येकांना आपल्या दास्यात ठेविलें. अमेरिकेंतील अत्याचारांचा इतिहास उपलब्ध आहे व तो प्रसिद्धही होत आहे. येथला होण्याची आशा नाही. हाच काय तो फरक. अमेरिका हें नांवही जेत्यांनी आपलें दिलें तसेंच भारत हें नांवही जेत्यांचेंच आहे. अमेरिकेंतील मूळ एतद्देशीयांचा नायनाट झाला आणि ते अगदी थोडे उरले ते उप-या जेत्यांच्या खिजमतीला खुशी अगर लायख नव्हतें, म्हणून नवीन वसाहत करणारांना आपल्या काबाडकष्टासाठी इतर खंडांतून दासांना धरुन जबरीने आणावें लागलें. हिंदुस्थानांत वसाहत करणारांची गरज येथल्या येथेच भागली. पण जोरजबरीचा मामला दोहोकडे सारखाच आहे. अमेरिकेंतील प्रकार निष्ठुर होता आणि येथला फार कनवाळूपणाचा होता असें भासविण्याचा वेळोवेळी आमच्यांतले कांही इतिहासकार प्रयत्न करितात, तो एक नुसता कोडगेपणाचा मासला आहे ह्यापेक्षा अधिक कांही म्हणवत नाही. गेल्या दहा प्रकरणांत, मलबारांत नंबुद्री आणि नायर जातींच्या जमीनदारांनी आज हजारो वर्षें तेथील चेरुमा, पुलया वगैरे अस्पृश्य जातींना किती घोर अवस्थेंत आपल्या मालकीच्या अगर खंडाच्या शेतांवर गुरांप्रमाणे राबविले आहे, ह्याचा उल्लेख आलाच आहे. त्यावरुन, ज्या ज्या काळीं अशा क्रांत्या घडून आल्या त्या काळच्या राजकारणाचें उग्र स्वरुप दिसून येणार आहे.

जगांतील राजकारणाचें मुख्य लक्षण म्हणजे बलिष्ठाने दुबळ्यावर सत्ता चालविणें हें आजकालच्या सुधारलेल्या काळांतही खरेंच आहे. ही सत्ता एकदा आपल्या हाती आल्यावर नामोहरम झालेल्या जातींनी अथवा राष्ट्रांनी पुन: आपलें डोकें वर काढू नये म्हणून त्यांचा राजकीयच नव्हे तर सामाजिक दरजाही खाली दडपून बेपत्ता करण्यासाठी सामुदायिक अस्पृश्यता हें प्राचीन राजकारणांतील एक घोर साधन आहे व हें साधन हिंदुस्थान व सरहद्दीवरील देशांत मध्ययुगांतही उपयोगांत आणिलें गेलें ह्याचा पुरावा ब्रह्मदेशाचा जो मिळतो त्याचें वर्णन सहाव्या प्रकरणांत केलेंच आहे. इतकेंच नव्हे तर बौद्ध धर्मांतून हिंदू धर्मोत, बंगाल व मद्रासकडे परत क्रांति झाली तेव्हा, ज्या पाखंडी समजलेल्या जमाती हिंदु शासनाखाली सहजासहजीं आल्या नाहीत, त्यांना हिंदु धर्मांधिका-यांच्या कारवाईला बळी पडावें लागलें. तत्कालीन हिंदु राजांनी अशा स्पृश्य जमातींना एकजात अस्पृश्य आणि बहिष्कृत कसें ठरविलें तें पांचव्या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. ह्यावरुन प्राचीन राजकारणाचा हा तोडगा, ह्या देशांत अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत बिनदिक्कत चालविण्यांत आला आहे हें दिसून येत आहे. आता आपण ह्या वर्णद्वेषाच्या पायावर उभारलेल्या राजकारणाच्या टप्प्यांचे कालानुक्रमें पुरावे म्हणून वाड्यांतून कांही उतारे मिळाल्यास पाहूं.

वैदिक कालांतील कटकट
ऋग्वेदकालीन आर्यांची शासनपद्धति कशी होती ह्यासंबंधी, कलकल्ता विद्यापीठांतील एक अध्यापक प्रफुल्लचंद्र वसु ह्यांनी Indo Aryan Polity ह्या नांवाचा इ.स. १९९१ साली इंग्रजींत एक प्रबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांतील सहावें प्रकरण, Polity ( राज्यव्यवस्था) मननीय आहे. अर्थात् ही आर्यांच्या किंवा आर्य म्हणविणा-या जमातींशीं मिळतें घेऊन राहणा-या आर्येंतर जमातीपुरतीच होती, हें सांगवयास नको. ह्या काळी आर्यांची समजली जाणारी तीन वर्णांची किंबहुना चार वर्णांची व्यवस्था बनत चालली होती. पण ह्या चातुर्वर्ण्याबाहेर ज्या आर्येतर जमाती हिंदुस्थानांत पूर्वीच ठाणें मांडून राहिलेल्या होत्या, ज्यांच्याशी आर्यांच्या लढाया होत, त्या जमाती सर्व आर्यांहून कमी संस्कृतींच्या होत्या असें मुळीच नव्हे. उलट कांही जमाती तर आर्यांहून पुष्कळ सुसंपन्न व सुसंघटित स्थितींत होत्या. कांही असो; ह्या दोन्ही दर्जांचे आर्येंतर अस्पृश्य किंवा बहिष्कृत स्थितींत मुळीच नव्हते. ते येथील मूळचे रहिवाशी किंवा आर्यांच्या पूर्वी बाहेरुन आलेले व येथे कायम वसाहत करुन राहिलेले, पण भिन्न संस्कृतीचे होते. मात्र त्यांच्याशीं आर्यांचे संधिविग्रह होऊन (१) जे आर्यांशीं समानबल किंवा अधिक सुसंपन्न होते ते आर्यांच्या तीन्ही वरिष्ठ वर्णांत गुणकर्मश: समाविष्ट झाले; (२) जे किंचित् कमी संस्कृतीचे होते ते आर्यांतील चवथा शुद्रवर्ण झणून त्यांच्यांत मिसळले; ह्याशिवाय जो मोठा कमी अधिक संस्कृत वर्ग आर्यांनी अगदी पाडाव केला (३) तोच कालवशाने पुढे अस्पृश्यत्वाप्रत पोचला; आणि (४) जो कधी विशेष संस्कृत नव्हता, आणि ज्यांचा आर्यांशी संबंधच आला नाही, किंवा ते आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर, झाडी, किनारा, बेटें वगैरेंचा आश्रम करुन दूर राहिले, ते अद्यापि त्याच स्थितींत आहेत. पण ह्या चारी प्रकारच्या आर्येतरांना वेदमंत्रांतून दस्यु अथवा दास, हें एकच सामुदायिक नांव आहे. ह्याशिवाय कित्येक विशेषणवाचक नावें ऋग्वेदांतून आढळतात, त्यांच्याशी आर्यांचा किती द्वेष होता व त्यांच्या एकमेकांशी कशा लढाया होत हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या प्रकरणाचे शेवटी ज्या ऋचा अवतीर्ण केल्या आहेत. त्यांवरुन कळण्यासारखें आहे.

ह्या परजातीच्या द्वेषाचें मुख्य एक कारण, त्यांच्या धार्मिक भावना, उपासना व आचार भिन्न असत हें होय. ह्यामुळे परकीयांना अब्रह्मा, अव्रत, अयज्यु, अश्रद्ध, अक्रतु, अकर्म, अमानुष, अदेव्य, अशा अनेक शिव्या दिलेल्या वेदमंत्रांतून आढळतात. ह्याच शिव्यांचा व द्वेषभावनांचा विकास, पुढे ज्या काळी ह्या परकीयांचा पूर्ण पाडाव होऊन ते आर्यांच्या राजकीय व आर्थिक गुलामगिरींत दडपून गेले त्या काळीं आताच्या अस्पृश्यतेंत व बहिष्कारांत झाला हें उघड आहेत.

अच्छा कविं नृमणोगा अभिष्टौ स्वर्षांता मधवन् नाधमानम् ।
ऊतिभिस्तमिषणो द्युन्नहूतौ नि मायावानअब्रह्मा दस्युरर्त ।।
ऋग्वेदसंहिता मं. ४ स्. १६. क्र ९.

ह्यांत मायावान् व अब्रह्मा म्हणजे 'जादूगार' व 'ब्रह्म म्हणजे स्तुति किंवा प्रार्थना न करणारा' अशी निंदा आहे.
न्युकतूनू ग्रथिनो मूधवाच: पनीरश्रद्धाँ अवृधाँ अयज्ञाने ।
प्र प्र तानू दस्यूँरग्निर्विवाय पूर्वश्चकारापराँ अयज्यून् ।।

ह्यांत पणी नांवाचें दस्यूंचे एक निराळेंच राष्ट्र निर्दिष्ट झालें आहे.  मद्रासेकडील हल्लीचे पळ्ळ नांवाचे अस्पृश्य किंवा प्राचीन फिनिशयन त्यांच्याशीं ह्याचा संबंध येतो की काय हा संशोधनीय विषय आहे. अग्रीने त्यांचा अत्यंत नाश केला असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.
प्रान्यच्चक्रमवृह: सूर्यस्य कुत्सायान्यद्वरिवो यातवेSक:।
अनासो दस्यूँरमृणो वधेन नि दुर्योण अवृणड् मृधवाच: ।।

ऋग्वेदसंहिता
ह्यांत दस्यूंना अनास असें म्हटलें आहे. अनास=तोंड, भाषा नसलेले= म्लेच्छ, असें सायणाचार्य म्हणतात, अनास = नाक नसलेले = नकटे असें मॅक्स मूलर म्हणतात.
हे दस्यू किती जरी अधार्मिक, कुरूप व दुर्गुणी असले तरी त्यांच्याशी लढण्याची हींच तेवढी कारणें नसून, ते संपत्तिमान्, सुसंस्कृतिवान आणि सुंसघटित होते आणि त्यांच्या संपत्तीचा आर्यांना हेवा वाटत होता, हें दुसरें अधिक बलवत्तर कारण होतें. दस्यू हे किल्ले बांधून शहरांत राहत असत. आर्यांपेक्षाही ते अधिक स्थाईक झालेले होते.

इंद्राग्नी नवर्ति पुरो दासपत्नीरधूनुतम् । साकमेकेन कर्मंणा ।।
ऋग्वेदसंहिता, ३, १२, ६

इंद्र व अग्नि ह्या दोघांनी दासांच्या आधिपत्याखालील नव्याण्णव पुरें म्हणजे किल्ले एकदम पाडून टाकले. असा ह्या मंत्राचा अर्थ आहे.
प्र ते वोचाम वीर्या या मन्दसान आरुज: । पुरो दासीरभीत्य ।।
ऋग्वेदसंहिता, ४,३२,१०

मन्दसानः= सोम पिऊन माजलेला ( इंद्र )
आरुजः = ( किल्ल्याचा ) फडशा उडविला.

आभिः स्पृधो मिथतीररिषण्यन् अभित्रस्य व्यथया मन्युमिन्द्र ।
आभिर्विश्वा अभियुजो विषूचीरार्याय विशोSवतारीर्दासीः ।।
ऋग्वेदसंहिता, ६, २५, २

ह्या मंत्रांत, आर्यांभोवती दासांचा वेढा पडला आहे, किंवा आर्यांच्या वस्तीभोवताली दस्यूंच्या वसाहती आहेत: इंद्राने त्यांचा नाश करुन आर्यांच्या सेनेचें रक्षण करावें, असा अर्थ आहे.

प्र ये गावो ग भूर्णयस्त्वेषा अयासो अक्रमु: ।
व्रन्त: कृष्णामपत्वचम् ।।
ऋग्वेदसंहिता, ९,४१,१

कृष्ण नांवाचा एक काळ्या रंगाचा असूर होता, तो दहा हजार सेनेसह अंशुमती नदीचे काठापर्यंत चाल करुन आला, त्याचा पराभव झाला, त्यांच्या अंगाची कातडी सोलून काढिली, वगैरे कथा आहे. म १ सू. १३० क्र ८ पहा. अमेरिकेंतील हल्लीचा लिंचिंगचा असाच प्रकार आहे.

उत दासं कौलितरं बृहत: पर्वतादधि । अवाहन्निन्द्र शम्बरम् ।।
ऋग्वेदसंहिता ४.३०.१४

कुलितराचा मुलग शंबर ह्याला इंद्राने मोठ्या पर्वताच्या खाली ओढून मारिलें.

त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा क: प्र यच्छता सहस्त्रा शूर दर्षि ।
अव गिरेर्दोस शम्बरं हनू प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ।।

हा शंबरासुर व दिवोदोस (आर्य ) ह्यांच्यामध्यें बरीच कटकट झालेली दिसते. ह्या कटकटीला कंटाळून शंबर डोंगरी किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिला. हा शंबर, वरील कृष्ण व इतर अेक आर्येंतर नायक सुसंपन्न व सुसंघटित नेते होते. त्यांच्या संस्कृतीचा एक विशेष असा होता की ते अभिचार उर्फ चादूक्रिया वगैरे गुढविद्येंत प्रवीण होते. सुमारें २३०० वर्षांपूर्वी लिहिला गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथाच्या प्रलभने भैषज्यमन्त्रयोग: । ह्या १७८ व्या प्रकरणांत ह्या आर्येंतर राजांचा खालील पुन: उल्लेख आढळत -

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम् ।
भण्डीरपाकं नरकं निकुम्भं कुम्भमेव च ।।

देवलं नारदं वन्दे वन्दे सावर्णिगालवम् ।
एतेषामनुयोगेन कृतं ते स्वापनं महत् ।।

यशा स्वपन्त्यजगरा: स्वपन्त्यपि चमूखला:।।
तथा स्वपन्तु पुरुषा ये च ग्रामें कुतूहला:।।

कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ), पान ४१९ वरील मंत्राचा प्रयोग केला असतां रक्षक व इतर माणसांना झोप लागते अशी समजूत होती. हा प्रयोग करण्यापूर्वी एक श्वपाकी ( मांगीण) कडून हातापायांची नखें विकत घेऊन ती कृष्ण चतुर्दशीला स्मशानांत पुरावींत. ती पुढच्या चतुर्दशीला उकरून कुठून त्यांच्या गोळ्या तयार कराव्यात. त्यामुळें सर्व निद्रिस्त होतात असें ह्याच प्रकरणांत सांगितले आहे. आंध्र देशांत जादूटोणा करणारी एक विशिष्ट अस्पृश्य जात आहे. त्या जातींच्या बायकांची मदत वरिष्ठ वर्गही अशा कार्मी घेतात असें मी त्या प्रांतात फिरत असतांना ऐकिलें आहे. ह्याच प्रकरणांत पुन: खालील श्लोक आढळतात.

बर्लि वैराचनं वन्दे शतमायं च शम्बरम्
निकुम्भं नरकं कुम्भं तन्तुकच्छं महासुरम् ।।

अर्मालवं प्रमीलं च मंडोलूकं घटोद्वलम् ।
कृष्णाकंसोपचारं च पोलोमीं च यशस्विनीम् ।।
अभिमन्त्रय्य गृहामि सिद्धार्थ शवसारिकामे ।।
कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ) पान ४२१

चण्डालीकुम्वीतुम्भकटुकसाराघ: सनीरीभगोसि स्वाहा ।
सदर, पान ४२३

हा मंत्र म्हटला असतां कसलेंही बळकट दार उघडतें आणि सर्वांना झोप लागते ! वरील मंत्रांतील पौलोमी ही चंडाली मोठी यशस्विनी होती ! अशा प्रकारें अस्पृश्यांतील प्रवीण स्त्रीपुरुषांचा गतयुगांतील राजकारणांतही उपयोग होत असें हें ह्या पुस्तकांतील उल्लेखांवरुन दिसतें.

प्रत्यक्ष वेदकाळांत अस्पृश्यता नव्हती. पण त्या काळी ज्या आर्येतर कमकुवत जमातींना आर्यांनी पाडाव केलें त्या पुढे अस्पृश्य व बहिष्कृत झाल्या. बुद्धोदयकालीं त्या पूर्णपणें ह्या हीन स्थितीला पोचल्या होत्या हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या तिस-या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. बौद्ध-जैन-काली अस्पृश्यता थोडी शिथिल झाली. पण अजीबात नष्ट झाली असें मुळीच नव्हे. गौतम बुद्धाने आपल्या भिक्षुसंघात अगदी हीन अस्पृश्यांनाही घेतलें व ते अती अर्हत् पदाला पोचले, असे पाली ग्रंथांत उल्लेख आहेत. ते असे :-

सोपाक (श्वपाक ) नांवाच्या भिक्षूच्या थेरगाथेंत सात पाली गाथा आहेत. त्यांचे मराठी भाषांतर :-
(१) प्रासादाच्या छायेंत चंक्रमण करीत असतांना नरोत्तमाला पाहून मी तिकडे गेलों, आणि त्याला वंदन केलें. (२) चीवर एका खांद्यावर करुन व हात जोडून त्या विशुद्ध सर्वसत्त्वोत्तमाच्या मागोमाग मीही चंक्रमण करु लागलों. (३) तेव्हा त्या कुशल प्रश्न विचारणा-याने मला प्रश्न विचारले आणि न भितां मी त्या गुरुला उत्तरें दिली. (४) प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल तथागताने माझें अभिनंदन केलें, व भिक्षुसंघाकडे वळून तो म्हणाला:- (५) 'ज्या अंगांचे व मगद्यांचे चीवर, पिंडपात, भैषज्य आणि शयनासन हा स्वीकारतो, तो त्यांचा मोठा फायदा समजला पाहिजे जे ह्याचा मानमरातब राखतील, त्यांनाही फायदा होतो. (६) सोपाक तूं आजपासून माझ्या भेटीला येत जा; व हीच तुझी उपसंपदा झाली असें समज.' (७) सात वर्षांचा असताना मला उपसंपदा मिळाली. आणि आता मी हें अंतिम शरीर धारण करीत आहें. धन्य धर्माचें सामर्थ्य !

सुनीत हा भंग्याच्या कुळांत जन्मला. थेरगाथेच्या बाराव्या निपातांत ह्याच्या गाथा आहेत. त्यांत ह्याचें चरित्र आलें आहे. त्याचें मराठी रुपांतर येणेंप्रमाणें :-
(१) मी नीच कुळांत जन्मलो. मी दरिद्री होतों. आणि खाण्यापिण्याचे माझे हाल होत असत. माझा धंदा हलकट होता. मी भंगी (पुप्फ छड्डुक ) होतों. (२) लोक माझा कंटाळा करीत. निदा करीत. तरी मी नम्र मनाने किती तरी लोकांना नमस्कार करीत असें. (३) अशा स्थितींत भिक्षुसंघासहवर्तमान मगघांच्या श्रेष्ठ नगरांत प्रवेश करणा-या महावीर संबुद्धाला मी पाहिलें (४) मी कावड (सोनखताची, मूळ पालींत हिला व्याभंगि असा शब्द आहे ) खाली टाकिली आणि नमस्कार करण्यास पुढे सरसावलो. केवळ माझ्या अनुकंपेने तो पुरुषश्रेष्ठ उभा राहिला. (५) त्या गुरुच्या पायां पडून एका बाजूला उभा राहून  त्या सर्वसत्त्वोत्तमाजवळ मी प्रव्रज्या मागितली. (६) तेव्हा सर्व लोकांवर करुणा करणारा तो कारुणिक गुरु " भिक्षु इकडे ते" असें मला म्हणाला, तीच माझी उपसंपदा झाली. (७) तो मी एकाकी सावधानपणें अरण्यांत राहिलों, व जसा त्या जिनाने उपदेश केला, त्याप्रमाणें त्या गुरुच्या वचनाला अनुसरून वागलों. (८) रात्रीच्या पहिल्या यामांत पूर्वजन्मींची आठवण करण्यास मी समर्थ झालों. रात्रीच्या मध्य यामांत मला दिव्य दृष्टि प्राप्त झाली व रात्रीच्या पश्चिम यामांत मी तमोराशीचा (अविद्येचा) नाश केला. (९) तदनंतर रात्र संपत आली असतां व सूर्योदय जवळ आला असला इंद्र आणि ब्रह्मा येऊन मला नमस्कार करुन हात जोडून उभे राहिले. (१०) ते म्हणाले "हे दान्त पुरुषा, तुला नमस्कार असो. ज्या तुझे आसव क्षीण झाले आहेत, तो तूं, हे भित्रा ! दक्षिणार्ह आहेस." (११) नंतर देवसंघाने माझा आदरसत्कार केलेला गुरुने पाहिला, आणि स्मित करुन तो असें बोलला. (१२) "तपाने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने ब्राह्मण होतो, हेंच ब्राह्मण्य उत्तम आहे."

- प्रो. धर्मानंद कोसंबीकृत "बौद्ध संघाचा परिचय" पान २५४-५६. ही उदार वृत्ति बौद्ध भिक्षूंची झाली. केवळ ध्येयदृष्टीने पाहूं गेल्यास हिंदू धर्मांतील कांही परमहंस संन्याशांचीही वागणूक अशीच उदात्त झाली असेल. पण ह्यावरुन अशा काळी सामान्य लोकव्यवहारांतून अस्पृश्यतेचे उच्चाटन झालें होते, किंवा अशा उदार वृत्तीचा फायदा घेऊन अस्पृश्यांनी आत्मोद्धाराचें मोठें बंड उभे केलें, किंवा त्याच्या वतीने स्पृश्यांची मोठी राजकारणी अथवा सामाजिक पुनरुद्धाराची एखादी राष्ट्रीय चळवळ चालविली असे ऐतिहासिक दाखले मुळीच उपलब्ध नाहीत. इ.स. च्या १९ व्या शतकाच्या मध्यसमयी महात्मा जोतीबा फुले ह्यांनी महारामांगांसाठी शाळा काढल्या, त्यांना आपली स्वत:ची विहीर मोकळी केली, किंबहुना आगरकरांनी, त्या शतकाचे शेवटीं सामाजिक समसमानतेची आपल्या "सुधारक" पत्रात मोठी झोड उठविली म्हणून सामान्य लोकव्यवहारांत तेव्हा तादृश खऱीच क्रांति घडली असें झालें नाही; तोच प्रकार बौद्ध जैनांच्या ह्या अपवादक औदार्याचा झाला. इतकेंच नव्हे, तर पुढे जेव्हा प्रत्येक बौद्ध भिक्षुसंघांतच, ज्यांच्या हाडींमासीं वर्णाश्रम भेदभावाची संस्कृति बेमालूम खिळली होती, अशा ब्राह्मणवर्गाचा बेसुमार शिरकाव झाला तेव्हा 'महायान' नांवाचें रुपांतर घडून बौद्ध धर्मांचें हें वैशिष्टय लोपून गेलें. ह्यापुढचाही खेदकारक परिणाम असा घडला की राजकारणांत क्रांति घडून पुन: हिंदु मताभिमानी राजे व बादशहा प्रमुखपदारुढ झाल्यावर त्यांचे मंत्रिपद व गुरुपद ज्या वर्णाश्रम अतिवाद्यांकडे (extremists ) सहजच गेलें त्यांच्याकडून अस्पृश्यांच्या बाबतींत मोठी जोरीच प्रतिक्रिया सुरु झाली हें मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून ह्यांच्यासंबंधी जे निर्घुण दंडक ठरविले गेले त्यावरुन उघड दिसत आहे. ह्या दंडकांचा ऐतिहासिक पोकळपणा व कृत्रिमपणा कसा होता हें वर चवथ्या प्रकरणांत स्पष्ट झालेंच आहे. आता एवढें खरें आहे की जरी बौद्ध काळांतील सामान्य जनतेंत अस्पृश्यांच्या बाबतींत राजकीय अथवा सामाजिक क्रांति घडली असें दर्शविणारीं ऐतिहासिक उदाहरणें उलब्ध नाहीत, तरी तत्कालीन सुशिक्षित व बहुश्रुत लोकमतांत केव्हा केव्हा बरेच उदार व प्रागतिक विचार प्रचलित झाले असावेत हें पाली वाड्मयांतूनच नव्हे तर संस्कृत वाड्मयांतीलही खालील उता-यांवरुन दिसून येण्यासारखें आहे.

बौद्धांचे औदार्य अगदीच नष्टप्राय झालें असें नसून तें भगवद्गीतेसारख्या हिंदूंच्या धर्मग्रथांतूनच नव्हे तर शुक्रनीतीसारख्या राजकारणावर लिहिलेल्या ग्रंथांतूनही केवळ विचारसृष्टींत व उपदेशसृष्टीत अद्यापि चमकत आहे. चातुर्वर्ण्य हें गुणकर्मानुसार आहे. असें गीता म्हणते तशीच शुक्रनीतींत खालील शिकवण स्पष्ट आहे. ही गीता, ही निति वगैरे हल्लीच्या स्वरुपांत आढळणारी जी मनुस्मृति तिच्या काळातल्या म्हणजे बौद्ध धर्मांला उतरली कळा लागल्यावर. म्हणजे गुप्त साम्राज्यानंतरच्या इ.स. च्या ४ थ्या ५ पांचव्या शतकांतल्या किंवा पुढच्या आहेत. शुक्रनीतिसार ह्या ग्रंथांत पहिल्या व चौथ्या अध्यायांत व इतर ठिकाणींही पुढच्यासारखी विधाने स्पष्ट आढळतात.

न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैश्य एव न ।
न शूद्रो नच वै म्लेच्छो, भेदिता गुणकर्मभि: ।।३८।।

ब्रह्मणस्तु समुत्पन्ना: सर्वे ते किं नु ब्राह्मणा:?।
न वर्णतो न जनकादू ब्राह्मतेज: प्रपद्यते ।। ३९ ।।
शुक्रनीतिसार, अ. १

अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेंछ हे वर्ण जातीने झालेले किंवा होणारे नसून केवळ गुण व कर्म ह्यांच्या भेदानेच होणारे आहेत. केवळ ब्रह्मापासून झाले म्हणून काय ते सर्व ब्राह्मण झाले ? ब्राह्म तेज कांही केवळ वर्णापासून किंवा बापापासून ठर नाही.

त्यक्तस्वधर्माचरण निर्घुणा: परपीडका:।।
चंडाश्च हिंसका नित्यं म्लेच्छास्ते ह्यविवेकिन: ।। ४४
सदर , अ. १

अर्थ - ज्यांनी आपलें कर्तव्य सोडलें, जे निर्दय, परपीडक, उग्र, नेहमी हिंसा करणारे, अविवेकी तेच म्लेच्छ होत. चवथ्या अध्यायाच्या तिस-या प्रकरणाच्या आरंभी, जे सनातन देशधर्म, जातिधर्म आणि कुलधर्म आहेत त्यांची धारणा राजाने करावी; कारण तोच एक देव आहे दुसरा देव नाही, असें म्हटलें आहे; व पुढे प्रस्तुत जातिभेदाची मीमांसा अशी केली आहे.

चतुर्धा भेदिता जातिर्ब्रह्मणा कर्मभि: पुरा ।
तत्तत् सांकर्यसांकर्यात् व्रतिलोमानुलोमत: ।।
जात्यानन्त्यं तु संप्राप्तं तद् वत्कुं नैव शक्यते ।।१२

यन्ते जातिभेंद ये मनुष्याणां तु जन्मना ।
त एव हि विजानन्ति पार्थक्यं नामकर्मभि:।।१३

कर्मणोत्तरमनीश्वत्वं कालतस्तु भवेग्दुणै: ।
विद्या कलाश्रयेणैव तन्नाम्ना जातिरुच्यते ।।१५

अर्थ : पूर्वी देवाने चारच जाती निर्माण केल्या. प्रतिलोम अनुलोम संकारमुळें ह्या मूळ जाती आता अनंत झाल्या आहेत. त्यांची आता व्याख्या करणें केवळ अशक्य आहे. जन्माने जे जाती मानतात त्यांनाच पृथक्पणें ह्या जातींचीं नांवे व कामें माहीत असावीत! ( हा औपरोधिक टोमणा दिसतो !) पण खरें पाहतां कर्मापासूनच उत्तमपणा नीचपणा अंगी येतो व कालांतराने ह्या कर्मज संस्कारांचे स्वभावगुणांत रुपांतर होतें. म्हणून विद्या आणि कलांच्या आश्रयामुळेच त्या त्या जातीची घटना तयार होते.

येणेंप्रमाणें शुक्राचार्यांच्या नांवावर विकणारा ह्या मध्ययुगीन ग्रंथाचा कर्ता बराच प्रागतिक मताचा दिसतो व तो स्वत: वर्णाश्रमधर्माभिमानी असूनही बौद्ध विचारांच्या वळणाचा दिसतो. ह्याचीं विधानें नुसती तात्त्विकच नसून राजकारणांतही तो स्पष्टपणें प्रागतिक, शुद्ध बुद्धिवादी आणि निर्विकार आहे. सैन्याची भरती करतांना व सेना पतीची निवडणूक करतांना कोणत्या तत्त्वावर ती करावी हे सांगतांना याने दुस-या अध्यायांत असें स्पष्ट म्हटलें आहे. 

नीतिशास्त्रास्त्रव्यूहादिनतिविद्याविशारदा: ।
अबाला मध्यवयस: शूरा दान्ता दृढाड्गका: ।।१३७

स्वधर्मनिरता नित्यं स्वामिभक्ता रिपुद्विष: ।
शूद्रा वा क्षत्रिपा वैश्या म्लेच्छा: संकरसंभवा: ।। १३७

सेनाधिपा: सैनिकाश्र्च कार्य्या राज्ञा जयार्थिना ।। १३९

अर्थ : नीति, शास्त्रें, अस्त्रें, व्यूह ( सैन्याची मांडणी ) जाणणारे, लहान नव्हेत व म्हातारे नव्हत असे मध्यवयाचे, शूर, आत्मसंयमी, बळकट शरीराचे, केवळ आपल्याच कर्तव्यांत निरंतर लक्ष्य घालणारे, स्वामिभक्त व शत्रूला कधीही फितूर न होणारे, अशांनाच जय चिंतणा-या राजाने सैनिक व सेनापति म्हणून निवडावें. मग ते जन्माने शूद्र असोत क्षत्रिय, वैश्य, किंबहुना मिभ्र जातीचे म्लेच्छही असोत ! केवळ लष्करी खात्याचेंच नव्हे तर मुलकी राज्यव्यवस्थेचे धोरण ठरवितांनाही ह्या शुक्राचार्यांनी स्पष्ट म्हटलें आहे :

व्यवहारविद: प्राज्ञा वृत्तशीलगुणान्विता: ।
रिपौ मित्रे समा ये च धर्मज्ञा: सत्यवादिन: ।। १६६

निरालसा जितक्रोधकामलोभा: प्रियंवदा: ।
सभ्या: सभासद: कार्या वृद्धा: सर्वासु जातिषु ।।१६७
शुक्रनीतिसार, अ. २ (पृ. १३६)

लष्करांतील निवडणुकीहून भिन्न तत्त्वांवर दिवाणी आणि मुलकी कार्यसभेंतील सभासदांची निवड सांगितली आहे. पण तींत सर्व जातीतून वरील सद्भणी माणसें निवडावीत असें स्पष्ट म्हटलं आहे. हे सर्व खरें असलें तरी ह्या उदार धोरणाची अम्मलबजावणी प्रत्यक्ष अस्पृश्य मानलेल्या ग्रामबहिष्कृतांच्या वाट्याला कितपत आली होती ह्यांची उदाहरणें दाखविणारें तपशीलवार ऐतिहासिक वाड्मय ह्या मध्ययुगीन काळांतील तूर्त तरी उपलब्ध नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. इतकेंच नव्हे तर ह्या उदारमतवादी ग्रंथांतही मधून मधून मनुस्मृतिकारांना शोभणारे खालच्या प्रमाणें पक्षपाती विचार कालमाहात्म्याने चमकतात हा मोठा चमत्कार आहे ! आणि तेंही ह्या दुस-याच अध्यायांत !! नौकरी आणि पगार देतांना शूद्र आणि ब्राह्मण ह्यांमध्ये तारतम्य कसें राखावें हें निर्भीडपणें ठऱविलें आहे !

अन्नाच्छादनमात्रा हि भूति: शूद्रादिषु स्मृता ।
तत्पापभागन्यथा स्यातू पोषको मांसभोजिषु ।। ४०१

यद् ब्राह्मणेनापह्तं धनं तत् परलोकदम् ।
शुद्राय दत्तमपि यच्चरकायैव केवलम् ।। ४०२
अध्याय २ ( पान १९५)

अर्थ : शूद्र नोकरीस ठेवावयाचा झाल्यास नुसतें पोटाला अन्न आणि पाठीला वस्त्र इतकेंच द्यावें. मांस खाणा-यांना ह्यांहून जास्त वेतन दिल्यास धन्याला पाप लागतें ! ब्राह्मणाने एखाद्याच्या घरचें धन चोरलें तरी ज्याचें धन गेलें त्याला स्वर्गप्राप्ति घडते. पण शूद्राला हात उचलून कांही दिलें तर उलट देणारा केवळ नरकालाच जातो !

"शूद्राला सामर्थ्य असलें तरी त्याने धनसंचय करु नये; असा श्रीमंत झालेला शूद्र ब्राह्णाला बाधा करितो." ह्या मनुस्मृतीच्या शिकवणीची ( मागे पृ. ६० पहा) ही अस्सल नक्कल दिसते. राणीच्या जाहीरनाम्यांत अघळपघळ समसमानता जाहीर करुन प्रत्यक्ष किफायतीच्या कामावर नेमतांना विलायतेहून आलेल्या अस्सल गो-या बाळांची ज्या धोरणामुळे वरणी लागते तें पाश्चात्यांनी ह्या शुक्रनीतींतूनच जणूं उचललें आहे की काय, अशी क्षणमात्र शंका येते !

सुमारे ख्रिस्ती शकाच्या ५०० वर्षांनंतर हिंदुस्थानांत बौद्ध धर्मास कायमची उतरती कळा लागून वर्णाश्रमाच्या पायांवर ब्राह्मणी उर्फ शब्द संस्कृतीच्या सनातनी म्हणविणा-या दुहीप्रिय सोवळ्या हिंदुधर्माची घडी कायम बसल्यावर बहिष्कृत अस्पृश्यतेचें उच्चाटन होण्याची शेवटची आशा नष्ट झाली. इतकेंच नव्हे तर हजारों वर्षांच्या सवयीने मानीव अस्पृश्यांना देखील ह्या सोवळ्या धर्माने ठरविलेली अत्यंत हीन स्थिति आपला स्वभावच आहे असें वाटूं लागलें. त्यांतच तृप्त राहणें हाच आपला स्वधर्म असून त्याच्या उलट प्रयत्न करणें मोठा अधर्म आणि सामाजिक गुन्हा होय अशी त्यांची स्वत:ची मनोरचना झाली. मग अशा अभाग्यांचे स्वतंत्र राजकारण तें काय उरणार? जगाच्या कृत्रिम इतिहासांत जें आजपावेतों चमकत आलें आहे असें राजकारण चट सारें जेत्यांचेंच असणार. जितांच्या राजकारणाला वाव तरी कसा मिळणार !

चुकून माकून अपवाद म्हणून कदाकाळीं वाव मिळालाच, तरी त्याला लेखी इतिहासांत प्रवेश कसा मिळणार ? ही अपवाद घटना जितकी मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे, तितकीच सृष्टिक्रमाच्याही उलट आहे. कारण मानवी स्वभाव हा तरी एक सृष्टिक्रमच आहे ना ? ह्या क्रमाला स्थितीस्थापकतेच्या दडपणाखाली गारद झालेला हिंदुस्थआनच कसा अपवाद होणार ? असो. धर्मक्रांति आणि राजक्रांति हीं जुळी भावंडेच होत. धर्म म्हणून जो शब्द येथे योजिला आहे, त्याचा अर्थ मतलब येवढाच खऱा आहे. शुद्ध अध्यात्मांत क्रांतीला वावच नाही. तें स्वयंभू स्वप्रकाशित आणि निरंतर सरळ उन्नतीच्या मार्गानेच जाणारें असतें. त्याच्या उलट धर्म म्हणून जो रज आणि तमोगुणाचा प्रकार आहे, तो राजकारणाहून मुळीच भिन्न नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि वरुन भिन्न भासणारे किती तरी बैल ह्या धर्म उर्फ राजकारणाच्या गाड्याला जुंपले असले, तरी गाडा एकच आहे. ह्या सर्वांची आपसांत एकी असते, तोंवर हें गाडें सुरळीत चाललेलं दिसतें. वितुष्ट माजलें की क्रांति झाली असें इतिहासांत नमूद होतें.

हिंदुस्थानांत अशा क्रांत्या वेळोवेळी झाल्या आहेत. पण ज्या क्रांत्या वर्णव्यवस्थेच्या अभिमानी चालकांनी घडवून आणिल्या त्यांना बहुतकरुन क्रांति हें नांव मिळत नाही. ज्या वर्णव्यवस्थेच्या उच्छेदकांनी घडवून आणिल्या त्या एक तर यशस्वी झाल्या नाहीत, आणि जो त्यांचा भाग यशस्वी झाला तो इतर सामान्य विकासांत असा बेमालूम समरस झालेला आहे. की त्याला ही क्रांती हें नांव मिळत नाही; कारण त्याची क्रिया हळू व अदृश्य पद्धतीने घडलेली असते. म्हणून ती कोणाच्याही डोळ्यावर येऊं शकत नाही. अर्थात् कृत्रिम इतिहास तर अशा विकासाला बोलून चालून डोळ्यांआडच राखणार. येरवी त्याला तरी कृत्रिम हें नांव कोण देऊ शकेल?