इंग्लंडमधील रोजनिशी (जानेवारी ता. १० शुक्रवार १९०२)
ऑक्सफर्ड
जानेवारी ता. १० शुक्रवार १९०२
ऑक्सफर्ड येथे आल्यापासून बरे वाटेना. भूक लागेना. करमेना. आज बायसिकलवर बसून १।। मैल फिरावयाला गेलो होतो. परत आल्यावर थकल्यासारखे वाटू लागेल. संध्याकाळी थोडी थंडी वाजू लागली. उदास वाटू लागले !
जानेवारी ता. ११ शनिवार
ता. ११ नवंबरपासून तो आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला नव्हता. आज मिटोज नावाचे एक प्रकारचे पौष्टिक अन्न लंडनहून मागविले होते ते मला रुचले नाही व पचलेही नाही. दोन प्रहरी जेवण झाल्यावर सडकून उलटी झाली. अन्नाचा तिटकारा आला. आणि अशक्तता वाढू लागली. म्हणून निरूपाय होऊन आज संध्याकाळी मांस खावे लागले. मला वाटले शुद्ध आहार ठेवण्याकरिता मी मजकडून होईल तितका प्रयत्न केला व पुढेही प्रकृती संभाळून करण्याचे मनात आहे.
ता. १२ आदित्यवार
आमच्या कॉलेजचे सोबती मि. इवर्ट ह्याजबरोबर फिरावयाला गेलो होतो. त्यांनी सांगितले की येथे धार्मिक बाबतीत फार औदासिन्य वाढू लागले आहे. फ्रान्स वगैरेकडे तर ह्याहून वाईट स्थिती आहे. लंडनमध्ये शेकडा १० जण चर्चमध्ये जातात. ग्लॅसगोमध्ये १४ जातात व खेड्यात २० जातात. स्कॉटलंडात एके काळी धर्मसंबंधी चर्चा फार होत असे. पण आता व्यापारधंद्याकडेच लोकांचे लक्ष आहे. इवर्ट स्कॉच आहे.
ता. २ मार्च १९०२ रविवार
संध्याकाळी ७ वाजता ऑक्सफर्ड येथील कार्डिगन स्ट्रीटमधील सेंट बार्नबस चर्चमध्ये उपासनेस गेलो. हे हायचर्च३४ प्राटेस्टंट पंथाचे देऊळ आहे. म्हणजे रोमन क्याथोलिक पंथाशी ह्याचे साम्य आहे. पण ह्यात मूर्ती दिसल्या नाही(त). देऊळ विशाल आहे. मुख्य गाभा-यातील काम बघण्यासारखे आहे. पुष्कळ दिवे लावले होते. धुपाचा घमघमीत वास येत होता. ख्राइस्टचर्चप्रमाणे पुष्कळदा गीते म्हणणे व उतारे वाचणे पाळीपाळीने झाले. उपासक सुमारे २०० होते. बायकांची संख्या पुरुषांच्या जवळ जवळ दुप्पट होती. गाणी फार भक्तिपूर्वक व गंभीर व मधुर स्वराने सर्वांनी म्हटली. नंतर सुमारे २० मिनिटे उपदेश झाला. धमार्थ पैशाची पिशवी फिरली. बायका एका बाजूस व पुरुष एका बाजूस बसविण्यात आले होते. ऑक्सफर्ड येथील दुस-या एका हायचर्चमध्येही हाच प्रकार दिसला.
सुट्टी
ब्रिडपोर्ट (डेव्हन शायर)
दक्षिण किनारा
C/o Mr. Cornick, 10 west Str.,
Bridport
ता. १५ मार्च १९०२
सकाळी ९ वाजता ब्रिडपोर्टला निघालो. आमचे कॉलेजास ६ आठवड्यांची आजपासून सुट्टी झाली. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांपैकी १४ जणांनी दक्षिण आफ्रिकेतील लढायीत स्वेच्छेने कामगिरी पतकरली आहे. त्यापैकी दोन विद्यार्थीशिपाई ह्याच गाडीने लढाईवर निघाले. म्हणून त्यास पाठविण्याकरिता विद्यार्थ्यांची गर्दी स्टेशनवर जमली होती. लष्करी ब्यांड सुरू होता. हे पाहून माझे मन विचाराने व विकाराने भरून गेले. ह्या तंद्रीतच सारा प्रवास झाला. आज हवा स्वच्छ आणि ऊन पडले होते. ब्रिडपोर्ट येथे १-३५ ला नियमितपणे पोचलो. मि. कॉर्निक मला नेण्यास स्टेशनावर आले होते. हे मध्यम प्रतीचे दुकानदार आहेत. त्यांचे स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके घर पाहून आनंद झाला. संध्याकाळी मि. हेन्स नावाच्या गृहस्थाकडून दुसरे दिवशी (आदित्यवार) `तरुण लोकांच्या उपासना सभेत` भाषण करण्याविषयी आमंत्रण. पण मला फुरसत नसल्यामुळे कष्टाने नाकारावे लागले.