इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १ जानेवारी १९०२)

ता. १ जानेवारी १९०२
स्वामी विवेकानंद ह्यांनी येथे काय काम केले व त्यांचेमागे काय काम चालले हे समजून घेण्याकरिता, मि. स्टर्डी नावाच्या गृहस्थाकडे गेलो. पण त्याने ह्या कामातून आपले आंग काढले आहे आणि त्यासंबंधी आपली काहीच बोलण्याची इच्छा नाही असे सांगितले. पुढे जे थोडे बोलणे झाले त्यात असे सांगितले की हल्ली काहीच काम चालले नाही. स्वामींच्या बोलण्या (चा) परिणाम नुसता काही बायकांवर मात्र झाला. त्यांची पुस्तके अद्याप बरीच खपत आहेत वगैरे, वगैरे.

संध्याकाळी ८ वाजता युनिटेरियन एसेक्स हॉलमध्ये थिऑसफिक सोसाईटीचा वर्ग पाहावयाला गेलो. प्रत्येक महिन्याचे पहिले बुधवारी सेक्रेटरी एक छापील व्याख्यान देतात. त्यावर जमलेल्या मंडळीत विवाद होतो. सुमारे ३० मंडळी जमली होती. पैकी थिऑसफीस्ट २।४ असतील. हा वर्ग इतरांसाठीच आहे. विषय पुनर्जन्म हा होता. व्याख्यात्याने प्रतिपादन केल्यावर मंडळींनी अनेक प्रश्न विचारिले. व्याख्यात्याने शांतपणे बरी उत्तरे दिली. कोणाचे विशेष समाधान झाल्यासारखे दिसले नाही, तरी सभेचे काम किती शांतपणे व सत्य समजून घेण्याच्या बुद्धीने चालले होते ते पाहून व्याखाते, चिटणीस, श्रोतेमंडळी ह्यांच्याबद्दल पूज्यबुद्धी वाटली. आणि हिंदुस्थानातील मिशन-याचा ख्रिस्ती उपदेश व ऐकणा-याची वर्तणूक ही आठवून विस्मय वाटला. व्याख्यात्याशी बिझांटबाई (बद्दल) बोलताना त्यांनी सांगितले की बिझांटबाईने हिंदुस्थानात जे काम चालविले त्याचा जगातील इतरत्र थिऑसॉफीक चळवळीशी काही संबंध नाही. ते काम ती आपण हिंदू म्हणवून करीत आहे; म्हणून ती व तिचे काम ही दोन्ही दुस-या थिऑसाफिस्टना मान्य नाही. लंडनमध्ये आल्वे मार्ल स्ट्रीटमध्ये दुसरी एक थिआ. सभा आहे, ती पाहणे झाले नाही.

ता. २ जानेवारी १९०२
मिस् हिल्लच्या आमंत्रणावरून पोस्टल मिशनच्या कौउन्सिलमध्ये मुंबईच्या बाजूला एक पोस्टल मिशनची शाखा काढण्याचा माझा विचार कौन्सिलपुढे ठेविला. कमिटीला तो पसंत पडून त्यांनी मला लगेच तशी पुस्तकांची मदत देण्याचे कबूल केले. कमिटीत १०।१२ बायका होत्या. पोस्टल मिशनचे सर्व देशभर काम केवळ बायकाच चालवितात.
 

संध्याकाळी ६ वाजता मॅनस्फर्ड स्ट्रीटमध्ये कॅडमन यांचे युनिटेरिअन मिशन पाहिले. सुमारे २०० मुलांचा मेळा जमला होता. सुमारे ३० मुलींचे तालसुरावर गाणे, नाचणे, ड्रील व डंबेल करणे पाहून फार आनंद झाला. अत्यंत गरीबाच्या मुलास कर्मणूक करून फुकट शिक्षण देण्याची ही योजना आहे.

३ जानेवारी
इनक्वायरर३३ पत्राचे एडिटर डेव्हिस यांजकडे चहा घेण्यास गेलो. हे इंडियन कमिटीचे चेअरमन आहेत. हे फारच मनमिळाऊ आहेत. नवराबायकोने मला फार प्रेमाने व सत्काराने वागविले. हिंदुस्थानातील एकेश्वरी मंडळीचा व येथील युनिटेरिअन्सचा काही ऑफीशल घटनात्मक संबंध असणे तुम्हाला इष्ट वाटत नाही काय म्हणून मी त्यांस विचारता ते म्हणाले की तुमच्या समाजात आधीच पुष्कळ दुही झाली आहे, असे आम्ही ऐकतो. म्हणून असा संबंध इष्ट दिसत नाही. शिवाय मतात कसलाही फरक नसताना असे संबंध आणून तुमच्या कामात विनाकारण ढवळाढवळ केल्याचे अपश्रेय येईल.

४ जानेवारी
दोन प्रहरी २ वाजता वेस्ट मिनिष्टर एबे पाहिले. हे ठिकाण फार जुने म्हणजे एडवर्ड दि कनफेसरपासूनचे आहे. ह्या ठिकाणी राष्ट्रीय सर्व मोठे, कवी, इतिहासकार, ग्रंथकार, योद्धे, धर्मोपदेशक वगैरे विभूतींचे पुतळे व थडगी आहेत. तसेच सर्व राजांचीही थडगी आहेत. ही इमारत उंच असून कमानी गॉथिक थाटाच्या आहेत. मंडपाची उंची १००।१२५ फूट आहे. नंतर पार्लमेन्ट हाऊस पाहिले. नंतर दर पंधरवड्याची लंडन इंडियन इन्स्टिट्यूटची सभा होती तेथे गेलो. अध्यक्ष दादाभाई नवरोजी व दुसरी ५।६ मंडळी हजर होती. पण व्याख्याते व दोन्ही चिटणीस आले नाहीत (शेवटपर्यंत) म्हणून सभा लांबणीवर टाकावी लागली. इंडिअन लंडनात गेला म्हणून काय झाले. इंडियनच तो ! ह्या सभेस कोणी युरोपियन येत नाहीत हे एक भाग्यच. नाहीतर ही हिंदी व्यवस्था त्यास कळली असती. सभेची ही नेहमीची रड आहे.

ता. ५ आदित्यवार जानेवारी १९०२
संडे स्कूल असोशिएशनचे चेअरमन प्रिचर्डस ह्यांचे घरी जेवणास गेलो होतो. नंतर मुलासाठी एक उपासना एका मंदिरात झाली. ती मिस् प्रिचर्ड हिने चालविली. नंतर मला दोन शब्द बोलावे लागले. मुलांची वर्तणूक फार व्यवस्थेशीर होती. सुमारे २०० मुले होती. २० वर्षावरच्या ७ तरूण मुलांचा एक आदित्यवारचा वर्ग मिस्टर प्रिचर्ड स्वतः आपल्या घरी घेतात. संध्याकाळी ७ च्या गाडीने ऑक्सफर्डला निघालो. तो ९।। वाजता ऑक्सफर्ड येथील माझ्या बि-हाडी पोचलो. मला फार दिवसांनी घरी आल्याप्रमाणे झाले.