इंग्लंडमधील रोजनिशी (४ सोमवार, आगष्ट)
ता. ४ सोमवार, आगष्ट
सिव्हील सर्व्हीसकरिता आलेल्या बेळगावच्या भाटवडेकरांची गाठ पडली. त्यांचेबरोबर आर्थर सीट व सॅलिसबरी क्रॅग वगैरेस वळसा घालून आलो. ह्यांची मते राजकीय बाबतीत अत्यंत जहाल आहेत. उत्साह, कळकळ व आवेश फार दिसतो. प्रकृतीने अगदी बळकट पाहून आनंद वाटला. एडिंबरो युनिव्हर्सिटी व्हालंटयर्समध्ये हे लष्करी शिक्षण मार्मिकतेने घेत आहेत व लढण्याची आंगात फार खुमखुमी दिसते. राजकीय मतामुळे सामाजिक व धार्मिक बाबतीत थंड आहेत.
ता. ५ मंगळवार
भाटे५२ ह्याजबरोबर होली रूड राजवाडा पाहिला. येथे मेरी स्कॉटची राणी हिची निजावयाची खोली व हातरूण राखून ठेविले आहे. काळवशाने पलंग व गादीची नासाडी होत आहे. राजवाड्यात जी भयंकर अघोर कृत्ये एलिजवेथच्या वेळी झाली, ती स्थळे पाहण्यास येतात.५३
नंतर स्कॉटचे५४ स्मारक पाहिले. ह्यासाठी एक चारखांबी मनो-यासारखी प्रिन्सेस स्ट्रीट नावाच्या मुख्य रस्त्यात, इमारत आहे. तिची उंची २०० फूट आहे, तळमजल्यात उंच पिठावर, स्कॉटचा विशाल, पांढरा पुतळा बसविला. जवळ त्याचा आवडता कुत्रा त्याचेकडे वळून पाहत आहे. खालपासून वरपर्यंत नकशी फार पाहण्यासारखी आहे. स्कॉटच्या कादंबरीतल्या पात्राचे हावभावासह पुतळे वरपर्यंत उभे आहेत. इमारतीची किंमत १६००० हजार पौंड म्हणजे थोडी कमी दिसते. टोकावर एडिंबरो शहराचा सर्व देखावा दिसतो. स्कॉट, बर्न्स,५५ जॉन नॉक्स५६ व मेरी राणी५७ ही अनुक्रमे ह्या राष्ट्राची आवडती नावे आहेत. हे स्मारक युरोपियन उत्तम कसबी व रसिक लोकास पसंत पडत आहे. एकंदर पाय-या २९० आहेत. संध्याकाळी ब्लॅकफर्ड हिलवरून देखावा पाहिला. रंगेल प्रिय पात्रे निर्लज्जपणे विहार करीत होती. मिस् मुइरहेड व तिच्या आईची गाठ पडली.
ता. ६ बुधवार
दोन प्रहरी १ वाजता कोचमधून फोर्थ ब्रिज पाहण्यास निघालो. हा जगातील अत्यंत प्रचंड पूल एडिंबरोपासून सुमारे ९ मैल लांब फोर्थ नावाच्या खाडीवर आहे. त्याचा नकाशा सर जॉन फाउलरनी तयार केला. हा सर वुइल्यम आरोल ह्यांनी बांधला. पुलाची एकंदर लांबी ११/५ मैल आहे. जगात अत्यंत उंच म्हणजे ४५० (फूट?) उंच पायापासून आहे. खाडीच्या मधोमध एक बेट आहे. त्यावर मधला खांब व दोन्ही काठावर दोन असे तीन खांब व मध्ये दोन जंगी कमानी आहेत. खालील कमानीचा टेका आहे व वरील कमानीने खेंचला आहे. (चित्र पहा). पाण्याखाली खांबांची उंची ५० ते ९० फूट आहे. पाण्यावर कमानी सुरू होतात. पाण्यापासून आगगाडीचे रेल १६० फूट उंच आहेत. कमानीचे उंच लोखंडी खांब ३७० फूट उंच आहेत. हे खांब म्हणजे १ इंच जाड पोलादी पत्र्याचे १२ फूट व्यासाचे मोठे बंब आहेत एकंदर काम पाहून छाती दडपते. वर उभारले असताना जवळून गाडी धावू लागली (की) पूल हादरतो तेव्हा काळीज थरारते !! प्रत्येक इंचाला एक स्क्रू आहे. एकंदर ५०००० पन्नास हजार टन पोलाद लागली आहे. सुमारे १ मैलभर सर्व काम निवळ पोलाद असल्याकारणाने उष्णतेच्या मानाने सर्व पूल २९ इंच वाढतो, अगर अखूड होतो. म्हणून तेवढी जागा त्यास हालण्यास दोनी टोकास मोकळी ठेवली आहे. ह्या अजस्त्र जाळ्यामध्ये आगगाडीचा डबल रस्ता आहे. पोलादीस रंग २५० टन लागतो. ३५००० हजार गॅलन तेल लागते. १८८३-९० पर्यंत सात वर्षे पूल बांधण्यास लागली. एकंदर खर्च ३५००००० लक्ष पौंड लागला. ह्यामुळे २० मैलांचा फेरा वाचला आहे. ह्याच्यावरून समुद्राचा, खाडीचा व दोहोकडच्या हिरव्याचार टेकड्यांचा सुंदर देखावा दिसतो.
जवळच्या क्वीन्स फेरी नावाच्या खेड्यात सुटीसाठी (१५ दिवीस) म्हणून गरीबांची सुमारे १०० मुले धर्मार्थ खर्चाने ठेविली आहेत. दर पंधरावड्यास १०० अशी एकंदर ३०० मुले दर उन्हाळ्यास येथे आणतात. ही सर्व मुले-मुली एडिंबरोतीलच आहेत. त्यांची वये १०।१२ वर्षाचे खालची आहेत. ती नुसती खेळूनबागडून असतात. जवळ आईबाप नसतात. एकेका घरात ५।१० अशी ठेवण्यात येतात. सर्व सुखी दिसली. काय चमत्कारिक धर्मार्थ हा !!
मि. मॅकार्थी नावाच्या एका सुताराने मला आपल्या घरी चहाला नेले. तेथे एक बोलका राघू त्याच्या वृद्ध पत्नीने मजपुढे आणिला.५८ त्याने मोठ्या सभ्यपणे माझ्याशी आपल्या पंज्याने (शेकह्यांड) हात हालविले आणि स्पष्ट 'How do you do' (कसे काय आहे) म्हणून विचारले. ह्याशिवाय तो `प्रेटी पॉली` वगैरे म्हणे. त्याच्या धनिणीने त्यास गाण्यास सांगितल्यावर I have got cold मला थंडी झाली असे सांगितले. टेबलावर चहा मांडल्यावर I want a cup of tea (मला एक चहाचा पेला पाहिजे) असे वरचेवर म्हणे. हिंदुस्थानच्या चालीरीतीवर आमचे बोलणे चालले असता आम्ही मध्ये जेव्हा जेव्हा हसलो तेव्हा तेव्हा पोपटही कळल्याप्रमाणे आमच्यासारखेच हुबेहूब हासे !! ह्या मुक्या जनावराची वाचाळता व बुद्धी पाहून मला आश्चर्य व शरम वाटली. नंतर आगबोटीने लीथ शहरातून सायंकाळी ९ वाजता एडिंबरोस परत आलो.