इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १६ जुलै १९०२ बुधवार)

ता. १६ जुलै १९०२ बुधवार
सकाळी ९ वाजता न्याहारी आटपल्याबरोबर आम्ही घरातील सर्व मंडळी दोन घोड्यांच्या मोठ्या बसमधून बटरमिअर सरोवराची सफर करण्याकरिता निघालो. प्रोफे. आणि मिसेस कार्पेंटर मि. व मिसेस टिंडेल, मिस् मॉली, मि. लमिस, मि. कॉक, बार्न्स, फर्ग्यूसन, लॉकेट व मी असे आम्ही ११ जण होतो. बरोबर दोन प्रहरचा फराळ घेतला होता. प्रथम बॉरोडेलमधून डरवेंट नदीच्या काठाने कॅसलरॉकला वळसा घालून एक पर्वत चढून हॉनिस्टर दरीत उतरलो. वाटेने फार सुंदर झरे, झाडे लागली. एक झ-याचे पाणी तर अति गोड होते. सुमारे ९ मैलावर बटरमिअर नावाचे सरोवर आहे. ते १ मैल सुमारे लांब आहे. मजजवळ एकच काच शिल्लक होती तेवढीच बटरमिअरचा फोटो घेतला. नंतर क्रमॉक सरोवर बोटीतून ओलांडले. बोटवाला व प्रो. कार्पेंटरसाहेबांनी वल्हविले. सर्व मंडळीत कार्पेंटरसो. जास्त बळकट व काटक आहेत. किती चालून त्यांचे तोंडावर थकल्याचे चिन्ह दिसत नाही. वाट शोधून काढणे, हरएक लहानसान माहिती देणे, श्रमाचे सर्व काम स्वतः प्रेमाने व काळजीने करणे वगैरेची त्यांना अगदी सवयच झाली आहे. कोणी थकून मागे राहिल्यास पुन्हा त्याच्यासाठी वाट चालून मागे येत. कोणी फार पुढे गेल्यास त्याजकडेही जात. अंगात पहाडी पोषाक, हातात काठी, खांद्यावरून आडवी दुर्बीण लोंबत असलेली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा हे त्यांचे चित्र. क्रमॉक ओलांडल्यावर त्याचे काठी लहानशा झ-याचे बाजूने फराळेस बसलो. सँडविचेस व बिस्किटे हा मुख्य फराळ. मि. टिंडल ह्यांनी पुडक्याच्या दो-या जमविल्या. मी कागदाची रास करून त्याची होळी पेटविली. कारण अशा ठिकाणी कागद टाकून सृष्टीचे सौंदर्य नासविण्याचे पाप आम्ही केले नाही. नंतर बायका सरोवराच्या काठाने गेल्या. आम्ही ७ जण स्केल फोर्सचा धबधबा पाहिला. ह्याच्या दोन पाय-या होत्या. एक वरची पायरी सुमारे १२० फूट उंचीची असून अगदी सरळ भिंत होती. पाणी फुटून तुषार चहूकडे उडत. देखावा फार रमणीय होता. नंतर मेलब्रेक टेकडीवर चढलो. सरोवरसपाटीपासून हिची उंची सुमारे १३०० फूट आहे. उतरताना दुस-या बाजूने ही फार सरळ होती. पायथ्याशी क्रमॉक सरोवर भिडले होते. ह्या १३०० फूटाची सरळ उंची, खाली शांत ३ मैल लांब आणि खोल पाणी हा देखावा अती गंभीर व प्रेरक होता. उतरताना चतुष्पाद बनावे लागले. बहुतेक उतरण उताणे सरपटत उतरलो. उतरणीवर गवताचा जाड व मऊ गालीचा लावला असल्यामुळे उतरण फारच मौजेची. मि. लॉकेट फार चपळ असल्यामुळे कोकरासारखा केव्हाच खाली गेला. लमिसची काठी मोडून दोन तुकडे झाले, त्याचा त्याने कुबडीप्रमाणे उपयोग केला. शेवटी आम्ही एका हॉटेलात सर्व मिळून चहा घेतला. ५ वाजता गाडीतून घराकडे परतलो. एकंदर सुमारे २६।२७ मैलाची फेरी झाली. ८ वाजता रात्री जेवण झाले.
ता. १७ जुलै
मांड्या भरून आल्या होत्या. घरी पत्रे लिहिली. कार्पेंटरसाहेब दोन प्रहरी १५।१६ मैल फिरून दोन उंच टेकड्या ओलांडून आले. ४ वा. चहानंतर मी बोटीतून ४ मैल डरवेंट वॉटरवरून केसिकला जाऊन आलो. रात्री जेवणानंतर घरातील मंडळीनी लिहिलेल्या बॉरोडेल पॉझ४३ वर्तमानपत्राचा १ ला अंक कारपेंटर सो. (नी) वाचिला. त्यात कारपेंटरसाहेबाची टोकिओची कविता फारच सुरेख वठली. सर्वच मजकूर विनोदाने भरला होता. पुस्तकपरीक्षणाचा भाग चटकदार झाला. एडिटर फार्ले, पुढच्या वर्षीचे मँचेस्टरचे सीनिअर स्टूडंट, ह्याची हुषारी दिसली. ११।। वाजता झोपी गेलो. आज सकाळी जनाबाईकडून आंब्याच्या वड्या पोचल्या.

ता. १८ जुलै १९०२ शुक्रवार
सकाळी ८।२० मिनिटांनी न्याहारी आटपून प्रोफे., आम्ही ५ विद्यार्थी आणि रेव्ह. लमिस असे सातजण अल्सवाटर सरोवर पाहण्यास निघालो. केसविकपासून ट्रटबेकपर्यंत आगगाडी, नंतर बस घेतली. अल्सवाटर हे उंच टेकड्यामध्ये झाकले आहे. तसेच ह्याच्या (जवळ) फारशी वस्ती नसल्यामुळे अगदी निवांत जंगली देखावा दिसतो. १ मैल लांबी, व रुंदी अर्ध्या मैलावर नाही. वरच्या टोकास पॅटरडेल नावाचे स्वच्छ आणि चित्रासारखे खेडे आहे. काठाने दाट झाडीतून सुंदर सडक आहे. अल्सवाटर हॉटेल तर नंदनवनासारखे दिसले. मला सर्वात हेच तळे आवडले. कित्येकाच्या मते डरवेंटवॉटर सर्वांत सुंदर आहे. नंतर आम्ही हेलविलन पर्वत चढू लागलो. उंचीने हा सर्व इंग्लंडात दुसरा आहे. समुद्रसपाटीपासून ह्याची उंची ३११८ फूट आहे. १००० सुमारे चढल्यावर फराळ केला. आज थंडी बरीच पडल्यामुळे पाण्याची फारशी गरज नव्हती आणि पर्वताच्या दुस-या बाजूस जाईपर्यंत पाणी मिळाले नाही. सु. २००० फूट चढल्यावर एक उंच व तीक्ष्ण सुमारे अर्धा मैल घाटशीळ लागली. माथ्यावरून जी वाट होती ती ३।४ फूटच रुंद होती. दोन्ही बाजूने खोल द-या होत्या. उजवीकडे रेड्टार्न नावाचे, हेलविलनच्या अगदी कुशीत, एक मनोहर तळे २००० फूट उंची वर होते. काही ठिकाणी वाट फार कठीण व भयंकर होती. येथेही चतुष्पाद व्हावे लागले. शिखरावर पोचलो तेव्हा भव्य व दूरवर देखावा दिसला. शिखरावर एक शिलालेख दिसला... १८०५ मध्ये चार्लस गाऊ नावाच गृहस्थ बर्फात गोठून शिखराच्या पायथ्याशी मेला. त्याचा प्रामाणिक कुत्रा त्याच्या प्रेताचे रक्षण करीत तीन महिने ह्या डोंगरात होता. शेवटी एका धनगरास हा कुत्रा व त्याच्या धन्याचा अस्थिपंजर दिसला. ह्या कुत्र्याच्या एकनिष्ठेच्या स्मारकार्थ फ्रॉन्सिस पॉवर कॉब ह्या प्राण्याच्या कनवाळू बाईने १८९० मध्ये हा सुंदर शिलालेख रोविला आहे.४४ त्यावर वर्डस्वर्थने ह्या कुत्र्याच्या स्मारकार्थ रचिलेल्या Fidelity नामक कवितेचा एक उतारा कोरला आहे.४५ वाचून अवर्णनीय स्थिती झाली ! दैवी गुण पशूत दिसावे !! नंतर दुस-या बाजूने आम्ही थर्लमिअर सरोवराकडे उतरलो, लॉकेट व मी धावत सर्वांपुढे २० मिनिटे आधी पायथ्याशी आलो. ३ मैलावर जेम्स हॉटेलमध्ये चहा घेतला. येथे कार्पेंटरबाई व टिंडल दंपती घोड्याच्या गाडीने घरी (लीथ कॉटेज) येथे पोचलो. लीथ कॉटेज ही कारपेंटर साहेबांनी उन्हाळ्यात भाड्याने घेतली आहे. येथून सुमारे १०० पावलावर रमणीय डरवेंट नदी आहे. एका हाकेवर डारवेंटवाटर नावाचे सुंदर सरोवर आहे. हे सुमारे ३ मैल लांब, १ मैल रुंद आहे.