इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १३ शुक्रवार १९०१ दिशंबर)

ता. १३ शुक्रवार १९०१ दिशंबर
दोन प्रहरी ३ वाजता मिस मॅनिंगचे घरी गेलो. तिला किती आनंद झाला ! इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर तिने मला आपली लायब्ररी दाखविली. नंतर हिंदुस्थानची चित्रे, मौजेच्या गोष्टी, रुप्याची भांडी वगैरे मोठ्या अभिमानाने दाखविली. प्रत्येक हिंदुस्थानच्या मनुष्याबद्दल आणि वस्तूबद्दल हिचे किती निष्काम प्रेम दिसले. हिने हिंदुस्थानात प्रवास केला आहे आणि मिस् मेरी कार्पेंटर बाईप्रमाणे ही हिंदुस्थानच्या सामाजिक सुधारणा व शिक्षण ह्यांबद्दल झटत आहे. हिने कितीतरी मित्रांचे कुशल विचारिले. दुसरी एक बाई आली होती. तिच्या पुढे मला एक मराठी अथवा संस्कृत गाणे म्हणून दाखविण्यास व त्याचा इंग्रजीत अर्थ सांगण्यास सांगितले. तिची ही भोळेपणाची सलगी पाहून मला तिच्या म्हणण्यास मान द्यावा लागला. मी एक गाणे तोंडाने म्हटले व दुसरे पिआनोवर म्हटले. व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोsपि हेतुः ।

ता. १४ दिशं. १९०१ शनिवार
लंडन इंडियन सोसायटी२६ नावाची लंडन येथील सर्व हिंदुस्थानवाशांची व मित्रांची सभा पार्लमेंटच्या इमारतीजवळ पॅलेस चेंबर(मध्ये) दर पंधरवड्यास शनिवारी भरत असते. दर बैठकीस सभेचे अध्यक्ष परमपूज्य दादाभाई नवरोजी हेच चेअरमन असतात. परीक्षा सुरू असल्यामुळे आज पुष्कळ सभासद आले नव्हते. आमचे मित्र रा. राजाराम भास्कर पानवलकर (यांचे) `इंग्रजी साम्राज्याखाली हिंदुस्थानातील स्वराज्याची आवश्यकता` ह्या विषयावर इंग्रजीत १ तास व्याख्यान झाले. त्यानंतर चौघांची भाषणे झाली. मीही बोललो. बोलणारे सगळेही अजाण व अननुभवी होते. तरी दादाभाई सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकत होते व त्यांचे आपल्या नातवाप्रमाणे कौतुक करीत होते. व्याख्यान आटपल्यावर मुलांनी त्यांस अनेक प्रश्न मोठ्या सलगीने विचारिले. त्यांची फोड त्यांनी मोठ्या आवेशाने केली. म्हातारा देहाने वृद्ध आहे खरा पण त्याचा उत्साह तरण्यापेक्षा तरुण आहे. सभेचे सेक्रेटरी वाघळे ह्यास बोलता बोलता ते सत्तेने म्हणाले, अरे तू किती मूर्ख आहेस रे. आता मी तुला शिव्या हासडीन पहा.

जागृतीतले स्वप्न
आज रात्री पॅसमोर इन्स्टीट्यूटमध्ये `इतालियन चित्रकार` ह्या विषयावर मॅजिक लँटर्न लेक्चर झाले. ते ऐकावयाला गेलो होतो. ऐकत असता मनात एक प्रेरणा झाली ती माझे मित्र राजाराम ह्यांस केव्हा सांगीन असे झाले. घरी आल्यावर आम्ही रात्री १ वाजेतोवर ह्या प्रेरणेसंबंधाने बोलत बसलो. राजारामास ती फार रुचली. ती अशी. राजारामाने मजबरोबर ऑक्सफर्ड येथे रहावे. परवानगी घेऊन काही व्याख्याने मँचेस्टर कॉलेजातील ऐकवीत. राजाराम हे विशेषतः उद्धारक मताचे व मी सुधारक मताचा असे जरी आम्ही आहो तरी दोघांची अतःकरणे शुद्ध व उच्च हेतूने भरलेली असल्यामुळे आम्ही एकमेकांस लवकर जाणिले व प्रीती जमली. राजाराम `आर्य संघा` चा एक कट्टा सभासद आहे व मी प्रार्थनासमाजाचा आहे. पण आता दोघांमध्ये भेद उरला नाही. इतकेच नव्हे तर आम्ही एकमेकांच्या संस्थेचे सभासद झालो. आमच्या भावी आयुष्याचा मार्ग शोधू लागलो. तो एकाच प्रवाहात वाहतो की काय असा दिसला ! थिऑसफी, मांसाहारनिषेध, योगसाधन वगैरे ज्या पौरस्त्य चळवळी येथे चालू आहेत. त्याचे राजारामाने रहस्य जाणून घ्यावे, पुस्तकसंग्रह करावा व माणसे जोडावीत. युनिटेरियानिझम, युनिव्हरसॅलिझमसारख्या ज्या पाश्चात्य सुधारक चळवळी आहेत त्यांचा ठाव मी घ्यावा असे ठरले. आम्ही दोघांनी मिळून येथे १।। वर्षे राहिल्यावर प्रथम आम्ही मिळूनच यूरोप खंडातून प्रवास करावा. रोम, अथेन्स, पॅलेस्टाइन व मक्का, कैरो इ. पुरातन व पवित्र स्थळी यात्रा कराव्यात. तेथील देखाव्यांचे फोटो घ्यावेत. ह्यासाठी राजारामाने ऑक्सफर्ड येथे फोटोग्राफी शिकावी. उदार धर्मावर आम्ही जागोजाग व्याख्याने देऊन आपला निर्वाह करावा. देखावे मॅजिक लँटर्नने दाखवून व्याख्याने द्यावीत. यूरोपात प्रवास झाल्यावर अमेरिकेत, नंतर जपान आणि चीन देशांतून परत कलकत्ता व मद्रास शहरांतून परत स्वदेशी जावे. वाटेत व्याख्याने देणे, स्नेह संपादणे, बंधुता वाढविणे हाच धंदा ठेवावयाचा, पुढील मार्ग साधावयाचा व मागील जोडलेल्या प्रेम व ऐक्य ह्या संपत्तीचाही मेळ घालावयाचा हा क्रम पाळावयाचा इ.इ.

गेल्या गुरुवारी ह्यासंबंधाने थोडे बोलणे झाले होते. येत्या गुरुवारचा दिवस पवित्र करून त्या दिवशी कोठे तरी बाहेर जाऊन ह्यासंबंधाने व्रत ग्रहण करण्याचे ठरवून आज रात्री आम्ही एकत्र निजलो. पण दोघांसही झोप लागली नाही.

ता. १५ दिशंबर आदित्यवार
११ वाजता चार्लस व्हायसेच्या चर्चमध्ये उपासनेस गेलो. हे एका बोळात आहे. एका तास गीते गाणे, उतारे वाचणे आणि प्रार्थना करणे इ. झाल्यावर १२ पासून १२।। पर्यंत उपदेश चा. व्हायसे ह्यांनी केला. हे अगदी कडक सुधारक एकेश्वरी आहेत. ह्यांना युनिटेरियानिझमही पसंत नाही. ह्यात व्हॉयसेचीच थोडीशी चुकी होत आहे. युनिटेरिअन लोकांत शुष्क वाद न करिता मिळून काम करण्याचा मोठा गुण दिसून येतो. तो व्हायसेने घेतल्यास दोघांसही जास्त बळ येईल. पण ह्या गोष्टीस व्हायसेचीच नाखुषी दिसते. त्यास काम फार असल्याने अद्यापी खासगी भेट झाली नाही. चर्चमध्ये व्यवस्था फार चांगली आहे. उपासक सुमारे १०० हजर होते. दारात व्हायसेची पुष्कळ पुस्तके विकावयास ठेविली होती. बोळात शिरतानाच एक छापील व्याख्यान फुकट मिळते. संध्याकाळी पुन्हा उपासना होते. दोन्ही वेळा धर्मार्थ पैसे गोळा होतात. सर्व इंग्लंडांत इतक्या उदार मताचे हे एकच चर्च आहे हे आठवून व्हायसेची धन्यता वाटते !!

मिस् मॅनिंग ह्याचीच अनुयायी आहे. पण तिलाही ह्याचा कडकपणा आवडत नाही. पण त्याचा स्वार्थत्याग व असिधाराव्रत ह्यांबद्दल फार मान आहे. आज मिस् मॅनिंगला `द्रौपदी व सुदेष्णा` हे रविवर्म्याचे चित्र बक्षीस दिले. ते तिला आवडले.