इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १६ मार्च आदित्यवार)

ता. १६ मार्च आदित्यवार
काल संध्याकाळी येथील युनिटेरिअन मंदिराचे आचार्य मि. सॉली ह्यांची भेट झाली. त्यांनी सर्व उपासनाक्रम समजावून दिला. त्यांचे राहणे आचार्याच्या मानाने फार थाटाचे दिसले. युनिटेरिअन समाजास पैशाची विशेष वाण दिसत नाही. आज सकाळी ११ वाजता ह्यांचीच उपासना झाली. उपासनेनंतर कॉल्फॉक्स नावाच्या अती श्रीमंत युनिटेरिअन गृहस्थाची मुलाखत झाली. ते फार साधे दिसले. दोन प्रहरी गावापासून १।। मैलावर कॉर्निकच्या वडिलाचे घर होते. तेथे गेलो. दोघे वृद्ध आईबाप अगदी साधे. त्यांची राहटीही साधी. हे फळझाडाची लागवड करितात. सुमारे ३ एकर जमीनीस फाळा (भाडे) दरसाल २८ पौंड देतात. साधारण जिराईत लागवड जमीनीस एकरास ३ पौंड पडतात. नंतर मि. कॉर्निक उपदेश करण्यास दोन खेड्यास गेले व मी, मिसेस कॉर्निक घरी आलो. संध्याकाळी युनिटेरिअन मंदिरात माझी उपासना झाली. १।२ आठवडे आधीच मजबद्दलच्या जाहीराती प्रसिद्ध झाल्या होत्या. मी पद्धतीप्रमाणे आठवी उपासना वाचली. ह्या पद्धतीत आचार्य व उपासक आळीपाळीने काही वाक्ये म्हणतात. जेणेकरून दोघांचेही लक्ष उपासनेत लागते. ही पद्धत मला फार आवडली. हिला लिटनी असे म्हणतात. श्रोतृसमाज बहुत करून ३००-३५० पर्यंत जमला होता. केवळ मी परका म्हणूनच इतकेजण जमले होते असे वाटते. युनिटेरिअन, शिवाय इतर सर्वांचा भरणा होता. १ तास उपासना झाल्यावर सुमारे वीस मिनीटे माझे व्याख्यान झाले. विषय `ब्रम्हसमाज` होता. बहुतेक सर्वास व्याख्यान कळलेसे दिसले. १०।१२ लहान-थोरांनी तसे येऊन सांगितले. सर्व उपासना अती उंच स्वराने करावी लागल्याने थोडा शेवटी थकवा आला. पण उपासनेत मी स्वतः फार रंगलो !!

१७ सोमवार

सकाळी १०।। वाजता मि. रेव्ह. सॉली ह्याजबरोबर समुद्रकाठी फिरावयास गेलो. वाटेने दोन तीन टेकड्या चढून उतरलो. चालत असता युनिटेरिअनिझम संबंधी भाषण झाले. हफेर्ड ब्रुक ह्यांच Story of the Religion of England इंग्लंडच्या धर्माची गोष्ट हे पुस्तक वाचण्याविषयी शिफारस केली. युनिटेरिअनसपैकी सॉली हेच पहिले Conservative जुन्या मताचे दिसून आले. हिंदुस्थानसंबंधी राजकीय मते ह्यांची सर्व कानझर्व्हेटिव्ह दिसली. बारा वाजता आम्ही वेस्टबेच्या पूर्वेकडील टेकडीवर पोचलो. येथे एकदम १५० फूट उंचीचा कडा तुटला आहे. पायथ्याशी समुद्र पसरला आहे. त्यामुळे देखावा फार उदात्त व रमणीय आहे. येथून पूर्वेकडे पोर्टलंड बेट पश्चिमेकडे डेव्हनशायरचा किनारा दिसतो. पाण्याची, गटाराची आणि उजेडाची व्यवस्था इंग्लंडातील बहुतेक गावात फार उत्तम केली आहे. ब्रिडपोर्ट हा गाव ६००० सहा हजार वस्तीचा आहे. पण ह्यात सर्व व्यवस्था आहे. योव्हिल म्हणून जो गाव आहे त्यात गटाराची फार नामी योजना केली आहे. एक मोठे तळे खणून त्यात सर्व मैला सोडतात. नंतर उष्णता उत्पन्न करून किडे उत्पन्न करितात. किड्यांनी मैल्यातील हेंदर खाल्यावर बाकीचा भाग स्वच्छ खत राहतो वगैरे मजकूर सॉलीने सांगितला. नंतर मि. सॉलीकडे जेवणास गेलो. मिसेस सॉली हिने स्वतः काढिलेली चित्रे व देखावे पाहून आनंद झाला. मिसेस सॉली, मिस् कॉर्निक, मिस् माबल व मिस् व्हाइट ह्या बायकांची चित्रकलेतील हुषारी पाहून इंग्रजी स्त्रियांचे शिक्षणात चित्रकलेची कशी गणना आहे, ते कळले. पर्वत, द-या, नद्या, आरण्ये इ. देखावे पशू-पक्षी इत्यादिकांचे आविर्भाव हुबेहुब दाखविण्याची ह्यांस अत्यंत हातोटी साधली आहे. ग्रीक लोकांत चित्रकला ब-याच थरास पोचली होती. पण हल्ली पाश्चात्यात ती घरोघरी पसरली आहे. संगीत, चित्रे, विणकाम इ. पैकी कोणते तरी लळीत साधल्याशिवाय सभ्यता मिळत नाहीसी झाली आहे.