इंग्लंडमधील रोजनिशी (ता . १० नवंबर १९०१ आदित्यवार )

ता. १० नवंबर १९०१ आदित्यवार
सकाळी बिझांट बाईचे 'पुनर्जन्मा'(ची) काही पाने वाचली. म्यांचेस्टर कॉलेजमध्ये डॉ. ड्रमंडची उपासना झाली. मी दूर बसल्याने मला नीट ऐकू आली नाही. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मिस्टर कॉक जो आमचा कॉलेज बंधू त्याचेच घरी होतो. जेवण तेथे झाले. परस्परांची हकीकत सांगितली. मि. कॉक व त्याची बहीण अशी दोघेच मोठ्या आनंदाने विद्यार्जनात दिवस घालवित आहेत. दोघे अत्यंत ममताळू, सात्त्विक व हिंदुधर्माचे व तत्त्वज्ञानाचे मोठे चहाते आहेत. मि. कॉक हा थिआसफीस्ट आहे व त्या मताचे त्याने बरेच ग्रंथ वाचले आहेत. हा स्वतः खाटकाचा मुलगा असून व स्वतः खाटकाचा धंदा बरेच दिवस करूनही हा आणि बहीण ही दोघे अगदी शाकभक्षक झाली आहेत. आम्हांमध्ये बरेच प्रेम वाढत आहे. आध्यात्मिक भाव व भक्ती वाढविण्या करण्याकरिता नियमित वेळ आम्ही एकत्र जमून काही साधन करण्याचे त्याने सुचविले. माझे मनात हे होतेच. त्यास मी चांगले प्रोत्साहन दिले. घरी परत आल्यावर जेवताना मि. व मिसेस ग्रेडन ह्यांच्याशी मांसाहाराबद्दल कडाक्याचा वाद झाला. मी हिंदुस्थानात असता मी कधी कधी मांस खात असे. पण ते अजिबात सोडावे असे मला वाटत होते. येथे आल्या (वर) व्हेजीटेरिअन म्हणजे शाकभक्षक मंडळीची पुस्तके काही मी विकत घेतली आहेत, त्यांचे मी निरीक्षण करणार आहे. येथे शाकअन्न नीट न मिळाल्यामुळे व वरील गृहस्थाचे घरी मी राहिल्यामुळे वरील व्रत घेण्याचा विचार काही दिवस तसाच ठेवावा लागला. पण आता काही दिवस केवळ शाक व धान्याहार करून चालते की नाही हे पाहणार आहे. येथील थंडीची हवा माझ्या अशक्त प्रकृतीला मानवते की नाही ह्याची मला आल्यावर मोठी भीती होती ती कमी झाली आहे. म्हणून आज हा विचार केला आहे.

ता. ११ सोमवार नवंबर १९०१

आज केवळ सात्त्विक अन्न घेतले. दोघा ग्रेडननी मांस घेण्याविषयी फार आग्रह केला. भजनप्रार्थनेसाठी दर शुक्रवारी जमण्याचे ठरले आहे. मि. शोन नावाचा आमच्या कॉलेजचा विद्यार्थिबंधू थिऑसफिस्ट आहे. तो ही येणार आहे. पाहू काय होते ते.

ता. १३ बुधवार

दोन प्रहरी २।। पासून ४।। पर्यंत ऑक्सफर्डच्या पश्चिमेस २।। मैल फिरावयास मी शामराव गाईकवाड२० मिळून गेलो. तेथे एका शेतात एक मजूर नांगरीत असता त्यास काही माहिती विचारिली. येथे आठवड्याची मजूरी १२।१५ शिलींग शेतकीच्या मजूरास मिळते.
रात्री ८ वाजता आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सभा झाली. अशी एका टर्ममध्ये एकदाच होते म्हणून बोलण्याची सवय होत नाही, म्हणून टर्ममध्ये ३ तीनदा असावी (अशी) काहीनी सूचना केली. पण मार्टिनो क्लबची दोनदा बैठक होते त्यामुळे सभा फार होतात, अशी दुस-यांची तक्रार आली. शेवटी ज्यास वाटेल त्यांनी निराळी खाजगी सभा काढावी असे ठरले. नंतर मि. फर्ग्युसन ह्यांनी जमीनीच्या उत्पन्नावर कर बसवावा की नाही ? हा विषय पुढे आणून बसवावा असे आपले मत सप्रमाण दिले. थोडा वाद होऊन बसवावा असेच ठरले. एकंदरीत पहाता अशा सभा येथे विशेष आस्थेने चालतात असे दिसले नाही.

ता. १५ शुक्रवार

रात्री ९ वाजता मि. शोन, मि बार्न्स आणि मी असे तिघे मि. कॉक ह्याचे घरी आध्यात्मिक साधनाकरिता जमलो होतो. मी प्रथम प्रार्थना केली नंतर कामास सुरुवात झाली. मि. कॉकने आपली कल्पना सांगितली की प्रत्येक आठवड्याला एकाने काही तरी एकाद्या मोठ्या साधूचा प्रासादिक विचार वाचून दाखवावा किंवा त्याचा विशेष उहापोह करावा. नंतर मी माझे विचार लिहून काढीले होते ते वाचले. नंतर मि. शोन व माझा युनिटेरियन मताविषयी थोडा वाद झाला. मि. बार्न्स ह्यांनी सुचविले की आम्ही एकत्र जमल्यावर ५।१० मिनिटे स्वस्थ समाधिस्त बसावे व कोणास काही स्फूर्ती अगर प्रेरणा झाल्यास तिच्या विषयी सर्वांनी विचार करावा. इतके झाल्यावर पुढचे शुक्रवारी जमण्याचे ठरले. आज सुबोध पत्रिकेला पत्र फ्रान्समधील प्रवासाचे वर्णनासंबंधी पाठविले आहे.२१