इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १७ आदित्यवार नवंबर)

ता. १७ आदित्यवार नवंबर

सकाळी १०।। वाजता युनिव्हर्सिटी चर्चमध्ये सर्मन ऐकिले. तेथे सुमारे ३०० लोक आले. पुरुषापेक्षा बायका फार दिसल्या. त्यांपैकी ब-याच भक्तीने ऐकत होत्या. सर्मन साधारणच होते. पण बोलणारा स्पष्ट, जोराने, अस्खलित व कळकळीने बोलत होता. नंतर आमच्या कॉलेजमध्ये देवळात प्रो. रेव्ह. एडिस् ह्यांनी उपासना चालविली. हे आमच्या प्रोफेसरांपैकी सर्वांत अधिक जुन्या मताचे आहेत. श्रोतृसमाज सुमारे १००-१२५ होता. पैकी ३/४ पेक्षा जास्त बायका. हेच देऊळ काय ते सर्व ऑक्सफर्ड (मध्ये) युनिटेरिअन पंथाचे. संध्याकाळी ख्राईष्ट चर्च कॉलेजच्या देवळात उपासनेला गेलो. येथे उपासना एपिस्कोपल चर्चच्या२२ नमुन्याप्रमाणे होते. प्रार्थना, पदे, बायबलातील उतारे वाचणे ही एका ठराविक च्छापिल बुकातून वाचली जातात. देऊळ बरेच जुने असून गावात सर्वात मोठे आहे. प्रार्थना करीत असता गुडघे टेकणे, पद म्हणताना उभे राहाणे व उतारा वाचीत असता बसणे हे आळीपाळीने पुष्कळदा चालते. युनिटेरिअन देवळातही हाच प्रकार असतो. येथे मात्र एक विशेष दिसला की मध्ये एकदा सर्वांनी पूर्वेकडे आपली तोंडे वळवून कांही प्रार्थना केली. कदाचित हे जेरूसलेमकडे ह्यांनी तोंड केले असेल. मुसलमान लोक प्रार्थनेच्या वेळी हिंदुस्थानातून मक्केकडे पश्चिमेकडे पाहतात आणि अशाच उठाबशा करितात.

आज पारा ४६ अंशावर होता.
ता. १८ सोमवार
१२ वाजण्याचे सुमारास टेम्स नदीवर फिरावयास गेलो होतो. द्रोणातील तुपाप्रमाणे पाणी काही ठिकाणी थिजले होते. काठावर पांढरे सफेद बर्फाचे थर बसले होते. संध्या ४।। वाजता आरियंटल काफी नावाच्या चहागृहात काफी घेतली. तरूण युवती सुस्वर फिडल वाजवीत होत्या. १ कप कॉफी व चार बिस्किटाला ४ आणे पडले.

२० बुधवार नवंबर १९०१
संध्याकाळी मि. जॅक्सचे लेक्चर झाले. माझे मन तिकडे लागले नाही. त्यानंतरच्या विद्यार्थ्यांच्या उपासनेला मी राहिलो नाही. धर्मप्रचारणा हा मि. जाक्सच्या शिकविण्याचा विषय आहे. ह्याचे व्याख्यान झाल्यावर आमच्या कॉलेजबंधूपैकी कोणाची तरी उपासना चालविण्याची पाळी असते. व्याख्यान उपासकास लिहून काढावे लागते. तेच उपदेशरूपाने बोलल्याप्रमाणे त्याने वाचून दाखवावयाचे असते. मि. जॅक्स दूर बसून ऐकतो व पहातो. त्याचे व्याख्यान आपल्याबरोबर घेऊन जातो. दुस-या आठवड्यात त्यातील गुणदोष व्याख्यात्या विद्यार्थ्यास खाजगी रीतीने दाखवितो व आपले मत देतो.

मी आजच्या उपासनेला बसलो नाही. मी घरी येऊन मिस् पिअर्सनशी बोलत बसलो. ह्या संभाषणाने मला वरील ठराविक व्याख्यानापेक्षा अधिक ज्ञान मिळाले. इतकेच नव्हेतर माझी आध्यात्मिक उन्नती झाली. मी एथे आल्यापासून (नवंबर १९०१ इ.स.) ता. १६ शनिवार संध्याकाळपर्यंत मि. ग्रेडन व मिसेस ग्रेडन ह्यांच्याबरोबर `पेयींग गेष्ट` पैसे देऊन पाहुण्याप्रमाणे राहात होतो. हे लोक मध्यम स्थितीतले असल्यामुळे ह्यांच्याकडे वरचेवर सभ्य पाहुणे मंडळी येत असे. ह्यामुळे व इतर ह्यांच्या शिष्ट रहाटीमुळे मला इंग्रजी सभ्य चालीरीतीचे बरेच ज्ञान मिळून जरी पुष्कळ फायदा झाला तरी विद्यार्थ्याच्या दृष्टीने ह्या घरी मला बरीच गैरसोय होती. म्हणून मी गेल्या शनिवारी ता. १६ रात्रीपासून मिसेस पिअर्सन् हिचे घरी जागा घेतली आहे. मजबरोबर आमचा कॉलेजबंधू मि. शोन हाही येथेच आहे. हे घर आम्हाला अगदी स्वस्त पडून येथे आमची सर्व प्रकारे सोय आहे. आम्हा दोघाला स्वतंत्र दोन निजण्याच्या खोल्या असून बसण्याला दोघांमध्ये एक खोली सर्व सामान असलेली आहे. पण ह्यापेक्षा चांगली गोष्ट ही आहे की ह्या घरची सर्व माणसे प्रामाणिक, नम्र, ममताळू, माणसाळू अशी आहेत. हे कुटुंब मध्यम स्थितीतील अगदी खालच्या दर्जाचे आहे. किंबुहना फॅशनेबल लोक ह्यास मध्यम स्थितीत न गणता लोअर क्लास म्हणजे खालच्या दर्जात घालतील. मिस्टर आणि मिसेस पिअर्सन, त्यांची तीन मोठी मुले आणि चार मुली अशी नऊ माणसे ह्या कुटुंबात आहेत. हे फार गरीब दिसतात. तरी आपल्या स्थितीत संतुष्ट दिसतात. ही सर्व आमचा वरिष्ठपणाचा मान राखून असतात. सर्व मुलगे आपल्या उद्योगात असतात. वडील मुलगी सुमारे २२ वर्षाची आहे. ती आमच्या दिमतीला आहे. तीन लहान मुली आहेत. पैकी दोघी शाळेस जातात. सर्वात लहान ३।४ वर्षाची घरीच खेळून आहे. दोन्ही लहान मुलीशी माझी मोठी मैत्री झाली आहे. सर्वात लहान आहे ती मजजवळ यावयाला भिते !

सर्वात वडील मिस् अलाइस् पियर्सन्, नंतर नेली,मेरी व मॅगी अशी क्रमाने नावे आहेत. सर्व सुशील आहेत. आज काही वेळ अलाइस् हिच्याशी बोललो. ही किती साधी आहे. पोषाख साधा, हिचे रूप साधे, हिची बुद्धीही साधी (साधारण) तसेच पण मनही साधे (सरळ). कला आणि कावेबाजी ह्यांचा हिला स्पर्शही नाही. आपल्या उणीवा च्छपविण्याची हिच्यात शक्ती नाही. तशीच पण इच्छाही नाही; इतकेच नव्हेतर आपल्या उणीवाबद्दल हिला असमाधानही वाटत नाही! हिच्यात कोणतीही नैतिक वाण दिसत नाही म्हणून हिचा हा भोळा व मुग्ध स्वभाव हिला फारच शोभतो. गरीब स्थितीतील हे निष्कलंक अंतःकरण पाहून माझ्या आध्यात्मिक शिक्षणात बरीच भर पडली !!