इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १६ दिशंबर सोमवार)
ता. १६ दिशंबर सोमवार
रीजंट पार्क येथील अचाट प्राणीसंग्रहालय पाहिले. अनेक त-हेचे पक्षी, साप, सरडा, पाली, सुसरी, किडे, कासव, माझे, जलचर, भूचर, खेचर ह्यांचा हा संग्रह पाहून थक्क झालो. वाघ, सिंह, चित्ते ह्यांस खावयास घालण्याची वेळ झाली होती. भक्ष्य दिसल्याबरोबर गर्जना करीत व उड्या घेत. सर्व प्राण्यांस त्यांना माफक अशा उष्णतेत सर्व त-हेची हितावह व्यवस्था केली होती. अजगरास वेळखे मारण्यास झाडे, वाघास लपून बसण्यास गुहा, हरिणास बागडण्या (स) मैदाने व गरूडास उडण्यास मोठे विशाल तारांचे पिंजरे केले आहेत. हत्ती, पाणघोडा, गेंडा, जिराफ, झीब्रा, सील वगैरे प्राणी पाहून प्रेक्षक विस्मयानंदात गर्क होतो. तिकिटाचे प्रत्येकास ६ पेन्स सोमवारी व इतर दिवशी १ शिलिंग पडतो.
ता. १७ दिशं. मंगळवार
दोन प्रहरी सेक्रेटरी बोवी ह्याजबरोबर `युनिटेरियानिझम` ह्यावर बोललो. हे गृहस्थ नेहमी उद्योगात असतात. मजबरोबर बोलण्यास अर्धा तास सवड करण्यास ह्याला मारामार झाली. नंतर जेथे गरीब लोक असतात तो पूर्वेकडचा भाग पाहिला. स्ट्रेंजर्स होम पाहिले. डॉ. बर्नाडोचे अनाथाश्रम पाहिले. ह्यांची कामे पाहून व रिपोर्ट वाचून अती आश्चर्य व आनंद झाला व माहिती मिळाली.
ता. १८ बुधवार, दिशंबर १९०१
हिंदुस्थानातून निघताना माझे वजन १०५ पौंड होते. आज वजन करता कळले ते ११५ पौंड भरले. पोषाकाचे वजन वजा करिता निदान ५-७ पौंडाचा फरक पडला आहे.
ता. १९ गुरुवारी दिशंबर १९०१
दोन प्रहरी सिटी टेंपलमध्ये पार्करचे व्याख्यान ऐकावयास गेलो, पण त्यावेळी चर्च बंद होते. मग टेम्स नदीवरच्या पुलावरचा देखावा पाहून परत येताना एक भाजी मार्केट पाहिले.
ता. २० शुक्रवारी दिशंबर १९०१
युनिटेरिअन वर्ल्ड नावाच्या नवीन मासिक पुस्तकात प्रसिद्ध करण्याकरिता रेव्ह. बोवी ह्यानी प्रार्थनासमाजाच्या माहितीसंबंधी एक लहानसा लेख मागितला होता, तो मी आज दुपारी लिहून दिला. घरी पत्रे लिहिल्यावर टाल्बटरोडमधल्या रा. गुप्ता नावच्या बंगाली गृहस्थाकडे जेवावयास गेलो. ह्यांच्याशी बोलताना ह्यांनी आपण ब्रह्मो आहो असे सांगितले. पण स्वतःस ब्राह्मधर्माविषयी काहीच ज्ञान नाही हे त्यांनी सहज कबूल केले आणि त्याबद्दल त्यांस काही वाईट वाटलेसे दिसले नाही. आज्जा अगदी कट्टा ब्रह्मो, बाप साधारण आणि नातू असे. ब्राह्मधर्मासारख्या नवीन धर्मातीलही तरूण पिढीचे असे का व्हावे हे उघड उघड आहे. धार्मिक गृहशिक्षण नाही म्हणून. रात्री आठ वाजता नाटकास गेलो. `शार्लाक होम्स` चा प्रयोग झाला. तिकीटाची किंमत २।। शिलींग पडली. नाटकात संगीत अगर कसलाही रस नव्हता. गुप्त पोलीस शार्लाक होम्सचे काम फार छान वठले. ह्या लोकांचे लक्ष अभिनयाकडे फार आहे. ते त्यांनी फार चांगले साधले आहे. रंगभूमी व नेहमीची रहाटी ह्यांत मुळीच फरक दिसला नाही. हीच खुबी आहे. हे उत्तम नाटक गणले आहे, पण मला काही म्हणण्यासारखा आनंद झाला नाही. नाटकगृहातील बायकांची च्छानच्छोकी मला दिसली. बॉक्सचे तिकीटाला ४ गिनी रू. ८४ पडतात.
ता. २१ शनिवार
ब्रिटिश म्युझीअम `नॅचरल हिस्टरी` पाहिले. २०फूट उंच १।२ राक्षसाचे सांगाडे आणि ५।६ हजार वर्षापूर्वीचे झाडाचे एक गोलाकार खोड कापून ठेविले. त्याचा व्यास सु. २० फूट आहे. माझ्या गळ्याइतके उंच एका कासवाचे कबंध आहे.
रात्री ८ वाजता पासमोर इन्स्टिट्यूटमध्ये मिडसमर नाईट(स्) ड्रीमचा प्रयोग गरीब विद्यार्थ्यांकडून करवून गरीब लोकांस फुकट दाखविण्यात आला, तो मी पाहिला. फार चांगला वाटला. ह्या ठिकाणी दर शनिवारी आदित्यवारी व्याख्याने, गाणे, वाचन, उपदेश वगैरे विद्वान लोकाकडून करविण्यात येतात व ह्याचा (उद्देश?) सर्व मजूर लोकांसाठी आहे. कारण सुटीचे दिवस आणि फुरसतीची वेळ अशा प्रकारच्या उच्च करमणूकीत घालविल्याने त्यांचे मन व्यसनाकडे वळत नाही. पासमोर नावाच्या उदार व कनवाळू मनुष्याने पदरचे हजारो रुपये खर्चून व ब-याच देणग्या मिळवून ही अत्यंत उपयोगी संस्था उभी केली आहे.